- अप्सरा आगा
- नसरापूर चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्या भीमराव कांबळेला पुणे न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.
- १ मे २०२६ रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा निकाल अवघ्या दोन महिन्यात लागत असल्याने हा राज्यातील सर्वात जलद खटला ठरणार आहे.
- तीव्र जनआंदोलनांनंतर पुणे पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. अंतिम निकाल आता २९ जुनला लागणार आहे.
पुणे जिल्ह्यामधल्या नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा पुणे जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाचा निकाल लागला. न्यायालयाने ६५ वर्षांच्या त्या नराधम आरोपीला, म्हणजेच भीमराव कांबळेला या अमानुष गुन्ह्यासाठी दोषी ठरवलं आहे. आपल्या राज्यातील न्यायालयीन इतिहासात ही सगळ्यात जलदगतीने झालेली सुनावणी मानली जाते.
२५ जून रोजी कोर्टाचं कामकाज सुरू झाल्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळूंखे यांनी आरोपी भीमराव कांबळेवरचे सगळे गंभीर आरोप पुराव्यांसकट सिद्ध झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर न्यायाधीशांनी दोषी ठरलेल्या भीमरावला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि त्याला विचारलं की, ज्या गुन्ह्याचा पहिला साक्षीदार तू स्वतःच आहेस, तो सगळा प्रसंग आठव आणि आता तूच सांग की तुला काय शिक्षा द्यायला पाहिजे?
न्यायाधीशांच्या या प्रश्नाने कोर्टात काही वेळ शांतता पसरली, पण इतका भयंकर गुन्हा करूनही त्या नराधम भीमरावच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक रेषसुद्धा नव्हती. त्याने कोर्टात परत एकदा स्वतःचा बचाव करायचा खोटा बनाव रचला आणि म्हणाला की, 'मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी-शेव खायला घेऊन गेलो होतो, तिथे माझा पाय घसरला आणि मी पडलो, माझ्यासोबत त्या मुलीच्या डोक्याला पण मार लागला आणि ती सारखी रडत-ओरडत होती म्हणून मी तिला शांत करायचा प्रयत्न करत होतो.'
त्याचा हा खोटारडेपणा ऐकून न्यायाधीशांनी त्याला लगेच फटकारलं आणि म्हणाले की, 'आता तू जे सांगतोयस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावरचा गुन्हा सिद्ध झालाय, आता फक्त एवढंच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला हवी?' यावर मात्र भीमरावकडे काहीच उत्तर नव्हतं आणि तो गप्पच राहिला.
नराधमाने निष्पाप चिमुरडीला तब्बल ३९ मिनिटं ओरबाडलं
यानंतर सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना या गुन्ह्याची भीषण आणि क्रूर बाजू सगळ्यांसमोर आणली. मेडिकल रिपोर्टचा हवाला देत त्यांनी सांगितलं की, त्या नराधमाने निष्पाप चिमुरडीला तब्बल ३९ मिनिटं ओरबाडलं होतं, ज्यामध्ये तिच्या चिमुरड्या शरीरावर १८ गंभीर जखमा झाल्या होत्या आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतरसुद्धा तिच्या मृतदेहावर अत्याचार करण्यात आले होते.

हा आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेलाय आणि तो समाजासाठी मोठा धोका आहे, कारण याच्या आधीसुद्धा त्याने एका प्राण्यावर अत्याचार केले होते. त्याची विकृती एवढी भयंकर आहे की त्याच्या स्वतःच्या कुटुंबाने आणि त्याच्या ७ मुलींनीसुद्धा त्याला पूर्णपणे नाकारलंय, म्हणूनच कोर्टात त्याच्या बाजूने उभा राहायला एकही वकील पुढे आला नव्हता.
फाशीची शिक्षाच योग्य राहील - सरकारी वकील
विशेष सरकारी वकील अजय मिसार म्हणाले, 'ही घटना समाजासाठी घातक असून त्या दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झालेत. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध झालाय.
या आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता तो कोणत्याही परिस्थितीत सुधरू शकत नाही. या आधीच्या दोन गुन्ह्यांमधे हा आरोपी दुर्दैवीरित्या सुटला होता. मात्र तो समाजासाठी घातक आहे. तो सुधारण्याच्या पलिकडे गेलाय. त्यामुळे फक्त फाशी हीच या आरोपीला योग्य राहील.'
दोन कलमांमध्ये थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद
या सगळ्या प्रकरणात ज्या कलमांखाली गुन्हा सिद्ध झालाय, त्यातल्या दोन कलमांमध्ये थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे सरकारी वकिलांनी आणि पीडित मुलीच्या हताश वडिलांनी कोर्टाकडे या नराधमाला थेट फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केलीय, जेणेकरून भविष्यात कुणाचीही असं कृत्य करायची हिंमत होणार नाही.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे हे सगळे युक्तिवाद ऐकून घेतले असून, या नराधमाला नेमकी काय शिक्षा होणार याचा अंतिम निकाल २९ जून २०२६ ला, म्हणजेच येत्या सोमवारी होणार लागणार आहे, ज्यामुळे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या अंतिम निकालाकडे लागलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला.
या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली.
कठोर शिक्षेसाठी ठिकठिकाणी तीव्र आंदोलने
नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या अमानुष घटनेनंतर संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. गुन्हेगाराला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, यासाठी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात आली.

या घटनेचा मुख्य उद्रेक नसरापूर आणि भोर परिसरात पहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी नसरापूर फाटा येथे एकत्र येत पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (नवले पूल) तब्बल दोन तास 'रास्ता रोको' आंदोलन केले, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यासोबतच नसरापूर, भोर, चेलाडी आणि किकवी परिसरातील स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला.
१ मे ते २५ जून - संपूर्ण घटनाक्रम
न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि तपासाच्या आधारे या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:
१ मे २०२६ (संध्याकाळ) - नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची निष्पाप मुलगी अचानक बेपत्ता झाली. काही वेळानंतर तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूर हत्या झाल्याचे समोर आले.
२ मे २०२६ - पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुख्य संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
मे २०२६ चा पहिला आठवडा - चिमुरडीचा शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर महत्त्वपूर्ण भौतिक पुरावे जप्त केले. याच काळात नसरापूर, भोर आणि संपूर्ण पुणे परिसरात नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलने केली व आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
तपासाचा वेगवान टप्पा - तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला थेट घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्निर्मिती केली. त्याचे 'डीएनए' नमुने, साक्षीदारांचे जबाब आणि इतर शास्त्रीय व वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
१६ मे २०२६ - गुन्हा घडल्यापासून अवघ्या १५ दिवसांच्या आत पोलिसांनी विशेष न्यायालयात तब्बल १,२०० पानांचे भक्कम आरोपपत्र दाखल केले.
२८ मे २०२६ - न्यायालयाने आरोपीविरुद्ध अधिकृतपणे आरोप निश्चित केले आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
जून २०२६ - सरकारी पक्षाने अतिशय प्रभावीपणे वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक महत्त्वपूर्ण प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आणि त्यांची उलटतपासणी यशस्वीपणे पूर्ण झाली.
२० जून २०२६ - दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद सुरू झाला. सरकारी पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्याची आग्रही मागणी केली.
२५ जून २०२६ - आरोपी भीमराव कांबळे दोषी.
२९ जून २०२६ - न्यायालयाकडून या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होणार.






