आदिवासी समाजाचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात कचारगड येथील यात्रेला माघपोर्णिमेपासून सुरुवात होणार आहे. दरवर्षी ही यात्रा कोयापुणेम पौर्णिमेला भरत असते. या यात्रेकरिता तब्बल 18 राज्यातून आदिवासी बांधव एकत्रित येऊन गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या आराध्य देवतेचे दर्शन करून आपली संस्कृती जपत आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत रोटी-बेटी व्यवहारासह अन्य खूप उपक्रम राबवले जातात. विशेष म्हणजे ज्या गुफेत ही जत्रा भरते ती आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असल्याचाही दावा केला जातो.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात सध्या आदिवासी बांधवाचे पवित्र व श्रद्धा स्थान मानल्या जाणाऱ्या कचारगड येथे कचारगडची यात्रा सुरु होणार आहे. अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस चालते. याच कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला, अशी आख्यायिका आहे. कचारगड येथे दोन नैसर्गिक गुफा आहेत. त्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुफा असल्यचा दावा केला जातो.
जवळपास पाच हजार लोक या गुफेत एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात. आदिवासी बांधव दरवर्षी आद्य पौर्णिमेला उपस्थित होऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. तसेच लाखोंच्या संख्येने उपस्थित होऊन आपली संस्कृती जोपासतात. या यात्रेकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उतर प्रदेश मिझोरम आदी राज्यातून लाखो भाविक येतात व आपल्या आराध्य दैवत म्हणजे "पारी कोपार लींगो"चे दर्शन या ठिकाणी घेतात.
त्याचप्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव आपआपल्या राज्यातील नृत्य देखील या कोयापुणेम यात्रेदरम्यान सादर करतात. तसेच पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत असंख्य आदिवासी बांधव या यात्रेत सामील होतात.
ही आहे आख्यायिका…
कचारगडच्या गुहा या गोंड समाजाचे धार्मिक स्थळ आहे. त्याच्या धारणेनुसार त्या गुहा म्हणजे त्यांच्या देवांचे निवासस्थान आहेत. त्यांच्या पूर्वजांची अवजारे त्या गुहेत पुरलेली असल्याचा समज गोेंड लोकांमध्ये प्रचलित आहे. त्या पारंपरिक समजुतीमागे पुरातत्त्वीय वस्तुनिष्ठता दडलेली आहे, हे सत्य नाकारता येत नाही. प्रस्तुत संदर्भात रेव्हरंड हिप्लॉप यांनी एका सुपरिचित गोंडी लोकगीतातून नोंदवलेली स्थानिक आख्यायिका येथे विशद करणे महत्त्वाचे ठरावे.
स्थानिक भाषेत या स्थळास काचगड अथवा कचारगड असे म्हणतात. काचगड या शब्दाचा शब्दश: अर्थ लोहगड असा होतो. काच या गोंडी भाषेतील शब्दाचा अर्थ लोखंड असा होतो. लोकगीतातील उल्लेखानुसार महादेव म्हणतो, की लाल टेकडीच्या गुहेमध्ये (काचीकोपा) गोंड लोक बंदिस्त करून ठेवले व त्यावर विशाल प्रस्तर लावून गुहेचे तोंड बंद केले, तेव्हा आदिवासींचा नायक लिंगो याने तो प्रस्तर बाजूला ढकलून सोळा जमातींच्या आदिवासींना मुक्त केले. ते सर्व आदिवासींचे पूर्वज होते. ही आख्यायिका कचारगड या स्थळाविषयी असणे संभवनीय आहे. स्थानिक आदिवासींच्या मनात स्थळाविषयी अपार श्रद्धा व आदर दिसून येतो.
कचारगडच्या गुहेत जाणे हे सामान्य कुवतीच्या माणसाचे काम नव्हे. दरेकसापासून कचारगड असे मार्गक्रमण करताना त्याचा प्रत्यय वारंवार येतो. दरेकसालगतच्या धनेगाव या वनग्रामापासून कचारगडच्या गुहेकडे मार्ग जातो. नवख्या पर्यटकाने जाणकार वाटाड्या गावातून घेणे उत्तम. धनेगाव गावापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे पहाडीत गुंफा आहे. डोंगर चढत-उतरत, जंगल तुडवत त्या स्थळी जाऊन पोचताच स्वागतासाठी उभी असतात ती मधमाश्यांची घरकुले व त्याभोवती घोंगावणा-या माश्या. गुहेच्या दाराचे व त्यावर लटकणा-या अनेक पोळ्यांचे दुरूनच दर्शन होते.
कचारगडाच्या उत्खननात आदिमानवाचे अवशेष
तो गुहासमूह मैकल पर्वतश्रेणीमध्ये यू आकाराच्या दरीत पश्चिम-दक्षिण असा पसरलेला आहे. समुहात चार नैसर्गिक शैलाश्रये आहेत. ती गुहा पर्वताच्या पायथ्याशी वाहणा-या दोन पावसाळी प्रवाहांपासून पाचशेअठरा मीटर उंचीवर असून गुहांचा पृष्ठभाग राखेच्या अवशेषांनी भरलेला आहे.
गुहासमुहातील सर्वात मोठी गुहा ही उत्तर-दक्षिण अठ्ठावन मीटर लांब व सत्तावन मीटर रुंद आहे. तिचे छत अतिशय उंचावर आहे. ती पर्वताच्या पोटात नैसर्गिक रीत्या एकाच खडकात तयार झालेली आहे. गुहा पश्चिमाभिमुख असून तिचे प्रवेशद्वार पंचवीस मीटर इतके रुंद आहे, तर तिच्या कमानीची (आर्च) सरासरी उंची चौ-याण्णव मीटर इतकी आहे.
महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक गुहांमध्ये आकाराने सर्वात मोठी अशीच ही गुहा आहे. गुहेच्या छताच्या आग्नेयेस छताच्या कोप-याशी मोठे छिद्र आरपार गेले आहे. त्यातून आकाशदर्शन होते. त्यामुळे गुहेमध्ये दिवसभर भरपूर प्रकाश खेळत राहतो.
पश्चिमेच्या दारातून दुपारनंतर भरपूर सूर्यप्रकाश आत येतो. त्यामुळे गुहेत सुलभतेने वावरता येते. गुहेच्या दक्षिण कोप-यात नैसर्गिक झरा असून त्याचे पाणी पिण्यास योग्य आहे. गुहेमध्ये नैऋत्येस व उत्तर बाजूस कमीत कमी तीन खोल कोनाडे (विवर) आहेत. त्या ठिकाणी यायचे झाल्यास मात्र टॉर्चची गरज भासते. कोनाडे खोल असून आत निमुळते होत गेलेले आहेत.
गुहेमधील पूर्व व उत्तर बाजूंचा बहुतेक पृष्ठभाग हा राखेच्या निक्षेपाने व्याप्त असून पावसाळ्यात छताच्या छिद्रातून पडणा-या पावसाच्या पाण्यामुळे गुहेच्या पृष्ठभागावरील काही राख व अवशेष वाहून गेलेले आहेत. तथापी बरेच क्षेत्र मानवी हस्तक्षेपापासून अबाधित राहिलेले आहे. त्या ठिकाणच्या राखेच्या थरात पूर्वपुरातन काळातील दगडी अवजारे व इतर पुरावशेष आढळतात.
सालेकसा तालुक्यात पुरातत्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे अवशेष मिळाल्यामुळे या तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या प्रागैतिहासिक शाखेने (नागपूर कार्यालय) ऑक्टोबर 1982 मध्ये त्या ठिकाणी चाचणी उत्खनन केले होते. कचारगडाच्या उत्खननात चकचकीत कु-हाड, छन्नी, उखळ हे पाषाणशस्त्रे सापडलेली आहेत. यावरून या गुहेत आदिमानवाचे वास्तव्य होते, असा अंदाज बांधता येतो. उत्खननात गुहेच्या मध्यभागी मानवी वसाहतीशी निर्देशक असे सहा पृष्ठभाग प्राप्त झाले.
त्यातून मध्यपाषाण काळापासून नवाष्म युगापर्यंतची विविध हत्यारे, नवपाषाण काळाची निदर्शक मृदभांडी, त्याचप्रमाणे महापाषाण संस्कृतीची निदर्शक अशी कृष्णलोहित मृदभांडीसुद्धा प्राप्त झाली. उत्खननकर्त्यांच्या मते, नैसर्गिक गुहेमध्ये प्राप्त मानवी अवशेषातून मध्याश्मयुगातील अवजारे व मृदभांडी गुहेमधून प्राप्त होणे हा पुरावा संपूर्ण भारतात आश्चर्यकारक असा आहे. कारण त्यापूर्वीची नवाश्मयुगाशी संबंधित सर्व वसाहतस्थळे ही मोकळ्या व सपाट जागेत होती. कचारगड येथून प्राप्त पुरावशेष नवाश्मग्युगातही या प्रकारच्या नैसर्गिक गुहांमध्ये मानवी वसाहत होती या बाबीकडे आपले लक्ष वेधतात.
ती गुहा साधारणपणे पाचशे माणसे आरामात उभी राहू शकतील एवढी मोठी, तसेच प्रकाश व पाणी यांनी समृद्ध आहे. त्याशिवाय वारा, पाऊस, ऊन यांपासून नैसर्गिक रीत्या तिथे संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे अश्मयुगीन मानवाने आपल्या निवासासाठी त्या स्थळाचा उपयोग करणे अत्यंत स्वाभाविक होते.






