विठ्ठल साबळे
- नोएडामधील एका उघड्या खड्ड्यात वाहन कोसळून सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराजचा मृत्यू झाला. अपघातानंतर मदत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत.
- नोएडातील एका घटनेने सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शहरांतील विकास आणि नागरिकांची सुरक्षितता यातील विसंगती पुन्हा स्पष्ट झाली आहे.
देशातील मोठी शहरे आधुनिकतेचे प्रतीक म्हणून मानली जात असताना , नोएडामध्ये घडलेली एक घटना त्या विकासाच्या दाव्यांना काळा डाग लावणारी ठरली आहे. एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू हा केवळ अपघात नसून, नियोजनशून्य शहरीकरण, निष्काळजी प्रशासन आणि ढिसाळ आपत्कालीन यंत्रणांचा एकत्रित परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. युवराज नावाच्या या तरुणाचा मृत्यू आता वैयक्तिक शोकांतिका न राहता, सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा बनला आहे.
अंधार, धुके आणि उघडा खड्डा...मृत्यूकडे नेणारा प्रवास
घटना नोएडातील एका उच्चभ्रू, वेगाने विकसित होत असलेल्या परिसरातील आहे. रात्री उशिरा काम आटोपून युवराज आपल्या वाहनातून घरी परतत असताना, रस्त्यालगत असलेल्या एका बांधकाम प्रकल्पाजवळील खोल खड्ड्यात वाहन कोसळले. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक, किंवा सूचना नव्हती. धुके आणि कमी दिसणं यामुळे चालकाला परिस्थितीचा अंदाज येणे अशक्य झाले. काही क्षणांतच एक सामान्य प्रवास मृत्यूच्या सापळ्यात अडकला.

या घटनेतील सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे युवराज अपघातानंतर लगेच मृत झाला नव्हता. तो बराच वेळ जिवंत होता. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मदतीसाठी प्रयत्न करत होता, अशी माहिती पुढे आली. काही प्रत्यक्षदर्शींनीही वाहन खड्ड्यात पडताना पाहिल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर जे घडले, ते अधिक भयावह आहे. पोलिस, आपत्कालीन सेवा आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. कोणाची जबाबदारी? या प्रश्नात अमूल्य वेळ वाया गेला आणि अखेर युवराजचा जीव गेला.
माध्यमांनी उचललेला मुद्दा,
घटना समोर येताच प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांनी या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात कव्हरेज दिले. सुरुवातीला अपघात म्हणून मांडलेली बातमी हळूहळू प्रशासनाची लापरवाही आणि सिस्टम फेल्युअर या मुद्द्यांकडे वळली. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. जर हा सर्वसामान्य तरुण नसून, एखादा प्रभावशाली व्यक्ती असता तर, असा सवाल मोठ्या प्रमाणावर विचारला जाऊ लागला. या चर्चेमुळे प्रशासनावर चौकशीचे दडपण वाढले.
या प्रकरणात एक महत्त्वाचा वळण देणारा घटक म्हणजे एक प्रत्यक्षदर्शी व्यक्ती पुढे येऊन घडलेला घटनाक्रम मांडू लागली. या व्यक्तीने अपघातानंतरच्या गोंधळाबद्दल, मदतीच्या विलंबाबद्दल आणि घटनास्थळी असलेल्या त्रुटींबद्दल स्पष्टपणे सांगितले. मात्र त्यानंतर या व्यक्तीला अप्रत्यक्ष दबाव, धमकीसदृश फोन आणि गप्प राहा असा संकेत देण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हे प्रकरण केवळ अपघात न राहता, सत्य दडपण्याच्या प्रयत्नांपर्यंत गेले असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
वाढत्या दबावानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले. विविध यंत्रणांची भूमिका तपासली जात आहे. रस्ता, बांधकाम प्रकल्प, सुरक्षा उपाय आणि बचावकार्य यातील त्रुटींची साखळी उघड होत आहे. काही अधिकाऱ्यांवर प्राथमिक कारवाई, चौकशी समिती आणि अहवाल सादरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र प्रश्न कायम आहे.की, ही कारवाई पुरेशी आहे का? हे देखील काही दिवसांनी विसरली जाणारी आणखी एक फाईल ठरणार?
शहर विकास की माणसांचा बळी?
या घटनेने देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या विकास मॉडेलवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मॉल, आयटी पार्क, उंच इमारती उभ्या राहत असताना, रस्ते, ड्रेनेज, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विकासाचा वेग आणि माणसाच्या सुरक्षिततेतील दरी धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.

युवराजचा मृत्यू हा आकडा नाही, तो एक इशारा आहे. आज नोएडा, उद्या दुसरे कुठले शहर? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला अस्वस्थ करतो. दोषी ठरवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच व्यवस्था सुधारण्याचे ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा अपघात या शब्दाआड लपवले जाणारे मृत्यू सुरूच राहतील, आणि शहरं अधिकाधिक असुरक्षित बनत जातील.






