रितेश ज्योती
- भारतीय समाजाने आणि माध्यमांनी फुलनदेवीला कधी पीडिता म्हणून तर कधी गुन्हेगार म्हणून ‘पेश’ केलं आहे.
- जेव्हा समाजाने फुलनला एका चौकटीत मर्यादित केलं, तेव्हा तिने आपली कहाणी आंतरराष्ट्रीय मंचांवर पोहोचवली.
- जपान, लंडन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन आणि दुबईत फुलनला कसं प्रेम मिळालं…?
फुलनदेवी... नाव घेतल्या बरोबर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते खाकी कपड्यांमध्ये हातात बंदूक घेतलेली आणि डोक्याला लाल रुमाल बांधलेली महिला. शेखर कपूरच्या ‘Bandit Queen’ सिनेमामुळे फुलनदेवी साऱ्या जगाला कळली खरी, परंतू या सिनेमात दाखवण्यात आलेले अनेक प्रसंग प्रत्यक्षात फुलनच्या आयुष्यात घडलेलेच नाहीत किंवा ते अतिरंजित करून दाखवण्यात आले.
त्यामुळे असा प्रश्न पडतो की आपण फुलनदेवीच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करत आहोत का? आपण त्यांना अनेकदा केवळ ‘पीडिता की दरोडेखोर’ या वादापुरतेच मर्यादित ठेवत आलो आहोत. मात्र फूलनदेवी ज्या जागतिक मंचांवर पोहोचली, ते विसरून तरी जातो किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी करतो. भारतीय समाजाने आणि माध्यमांनी फुलनला नेहमीच कधी पीडिता म्हणून तर कधी गुन्हेगार म्हणून पाहिले.
“I, Phoolan Devi: The Autobiography of India’s Bandit Queen” या आपल्या आत्मचरित्रात फुलन लिहिते, “माझ्याबद्दल लोक इतके बोलले आहेत, पण मला स्वतःसाठी मात्र बोलण्याची संधीच मिळाली नाही. इतक्या लोकांनी माझे फोटो काढले आणि त्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे मला वाकवून आणि मोडून वापरले. एका छोट्या गावातील मुलीला, जिने अत्याचार आणि अपमान सहन केला पण जी कधीच मोडली नाही, तिला अनेकांनी तुच्छ मानलं. पत्रकारांना माझी कथा जाणून घ्यायची होती, चित्रपट दिग्दर्शक मला चित्रपटात बंदिस्त करू इच्छित होते. ते सगळे असे बोलत होते जणू मी अस्तित्वातच नाही, जणू मला सन्मानाचा कोणताही अधिकार नाही.”

फुलनच्या या मनोगतामधून हेच दिसतयं की, तिच्या विरोधातील हिंसा केवळ शारीरिक नव्हती, तर तिला न ऐकता, न समजून घेता तिची ज्याप्रकारे व्याख्या करण्यात येत होती तीदेखील एकप्रकारची हिंसाच होती. असे करून आपण एका अशा स्त्रीकडे दुर्लक्ष केले, जिने स्वतःची स्वप्नं आणि स्वतःची इच्छाशक्ती जपली होती.
जेव्हा समाजाने फुलनला एका चौकटीत मर्यादित केलं, तेव्हा तिने आपली कहाणी आंतरराष्ट्रीय मंचांवर पोहोचवली. तिची आत्मकथा सीमापार विविध भाषांमध्ये प्रकाशित झाली. तिला याची चांगली जाणीव होती की, त्यांना कशा प्रकारे सादर केले जात आहे आणि तिने त्याच आतरराष्ट्रीय मंचांचा वापर स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी केला. ती केवळ ‘विषय’ राहिली नाहीत, तर तिने स्वतःची कथा स्वतः घडवली. दक्षिण-पूर्व आशिया आणि युरोपच्या काही भागांमध्ये फुलनला असे अनेक लोक भेटले ज्यांना तिच्या संघर्षाशी आपलेपणा जाणवला.
जेलमधील एक अनोखी मैत्री…
जेलमध्ये असताना, फुलनदेवीला ब्रिटिश लेखक रॉय मोक्सहॅम यांचे अचानक एक पत्र आले. रॉय मोक्सहॅम हे त्या वेळी ‘पासमोर एडवर्ड्स म्युझियम’मध्ये ग्रंथपाल म्हणून काम करायचे. मोक्सहॅम यांनी फुलनची कहाणी ‘द इंडिपेंडेंट’मध्ये वाचली होती, ज्यात जेलमधून लढवलेल्या पोटनिवडणुकीचा आणि त्यांच्या आयुष्याचा थोडक्यात उल्लेख करण्यात आला होता. ते वाचून रॉय मोक्सहॅम भावूक झाले आणि त्यांनी फुलनला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला, जरी त्यांना खात्री नव्हती की पत्र पोहोचेल किंवा त्यावर उत्तर मिळेल. पण फुलनचं उत्तर आलं... पुढच्या दोन वर्षांत फुलन आणि मोक्सहॅम यांच्यात अनेक पत्रांची देवाणघेवाण झाली, ज्यामुळे जेलमधील फुलनच्या एकटेपणाच्या काळात त्यांना एकप्रकारची सोबत आणि आधार मिळाला.
जपानशी खास नातं होतं फुलनदेवीचं…
फुलनदेवीची आत्मकथा जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर वाचली गेली. १९९५ मध्ये फुलनने जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारला, तेव्हा जपानी शाही कुटुंबातील इतो मिचिको नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आयोजित समारंभात सहभागी झाल्या होत्या. याच दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला होता.

जानेवारी १९९९ मध्ये फुलनदेवी जपानी संसदेला संबोधित करण्यासाठी टोकियोला गेली. तिने टोकियो आणि क्योटो या शहरांना भेट दिली. तिच्या आत्मकथेचा जपानी भाषेतील अनुवाद अत्यंत लोकप्रिय झाला आणि वाचकांनी तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली. फुलनला या दोन्ही शहरांशी विशेष आपुलकी वाटू लागली. ती स्थानिक बाजारांमध्ये गेली आणि आनंदाने जपानी खाद्यपदार्थांचा तिने आस्वाद घेतला.
आशियातील राजकारणाच्या प्राध्यापिका चिहारू ताकेनाका यांनी आपल्या “Gendered Violence and Beyond: Situating Phoolan Devi in Indian Democracy” या लेखात लिहिलं आहे, “फूलनचा मृत्यू दरोडेखोर म्हणून झाला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या खासदार म्हणून मरण पावल्या. त्यांचे जीवन आपल्याला दाखवतं की भारतीय लोकशाहीमध्ये हिंसक गुन्ह्यांना वर्गसंघर्षाच्या कच्च्या रूपापलीकडे जाऊन पार करण्याची क्षमता आहे. आज जपान भारताकडे २१व्या शतकातील आशिया-पॅसिफिक प्रदेशातील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पाहतो. माझे हे पुस्तक भारत आणि जपानला जुन्या पण नव्या शेजाऱ्यांप्रमाणे एकमेकांना समजून घेण्यास मदत करेल, अशी मला आशा आहे.”
फुलनचे लंडनचे अपूर्ण स्वप्न…
त्याच काळात फुलनदेवीने आपल्या आत्मकथेच्या फ्रेंच आवृत्ती “Moi, Phoolan Devi” च्या प्रचारासाठी फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडनचा दौरा केला.पुढे दुबईतील लोकाना संबोधित करताना फुलनने म्हटले, “मी अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार केला, मरून जाण्याचा विचार केला. पण मग मला वाटलं की दररोज हजारो मुली मरतात. लोक मला दरोडेखोर या नावाने ओळखतात, ‘दरोडेखोर फूलन देवी.’ सांगा पाहू, माझे चार हात-पाय आहेत का? लोकं म्हणतात, ‘ती चंबळ घाटीची आहे, ती चंबळ घाटीची आहे.’ चंबळ घाटी माझे आई-वडील आहेत का? माझा जन्म आई-वडिलांपासून झाला. माझा एकमेव गुन्हा इतकाच आहे की माझा जन्म एका झोपडीत झाला, मी गरीब कुटुंबात जन्मले, मी एका शोषित समाजात जन्मले. मग मला जगण्याचा अधिकार नाही का?”
फूलन देवी अनेक वर्षांपासून लंडनला जाण्याची इच्छा व्यक्त करत होती. तेथे तिचे अनेक मित्र आणि शुभेच्छुक होते, जे फुलनला वारंवार लंडनला बोलवत असत. पण खासदार म्हणून तिच्या जबाबदाऱ्यांमुळे ही यात्रा पुढे ढकलली जात होती. तिने रॉय मोक्सहॅम यांना, ज्यांना ती दूर देशातील भाऊ मानत असत, असेही वचन दिले होते की जेव्हा ती लंडनला येईल तेव्हा त्यांच्याच घरी राहतील. लंडनची ही यात्रा अपूर्णच राहिली. २००१ मध्ये फुलनच्या हत्येमुळे तिचे राजकीय जीवन आणि जगभर सुरू झालेल्या प्रवासांना अचानक पूर्णविराम मिळाला.

रॉय मोक्सहॅम नंतर आठवून सांगतात की, ‘’मैत्रीच्या सुरुवातीच्या वर्षांत त्यांना नेहमी भीती वाटत असे की त्यांची हत्या होऊ शकते. त्यांना त्यांची पहिली भेट आठवते, जेव्हा त्यांच्या घराला सशस्त्र पोलिसांनी वेढा घातला होता. एका अधिकाऱ्याने त्यांना छतावर नेऊन मशीनगन ठेवण्याची जागा दाखवली होती. काळ जसजसा गेला तसतशी त्यांची सुरक्षा कमी होत गेली. चित्रकूटच्या एका प्रवासात फुलनसोबत फक्त एकच अंगरक्षक होता. काही अंशी त्यांना स्वतःलाही तसंच करायचं होतं. त्यांना सामान्य जीवन जगायचे होते. तरीही त्यांना माहिती होते की त्यांचे शत्रू सूड उगवू शकतात. त्या अनेकदा म्हणायच्या की त्यांची हत्या होऊ शकते. ‘’
मोक्सहॅम यांनी पाहिलं की नंतरच्या वर्षांत त्यांना मृत्यूची भीती तशी राहिली नव्हती, जशी ती तुरुंगात होती. कदाचित त्यांना वाटत होते की त्यांनी काही प्रमाणात आपले ध्येय पूर्ण केले आहे. नशिबात असेल तर ते होईल.
1994 साली फुलन देवीची सुटका झाल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी तिला भेटून तिला स्वत:बद्दल पुस्तक लिहिण्याची विनंती केली. फुलनला पुस्तक म्हणजे काय हेसुद्धा माहिती नव्हतं. तिनं संमती दिल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी फुलनची कहाणी तिच्याच शब्दांत रेकॉर्ड केली आणि नंतर शब्दांत उतरवून पुस्तकरूपानं प्रकाशित केली.
‘’माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय’’
आपल्या आत्मकथेत फुलन लिहिते, "मी स्वतः फार चांगली आहे असं माझं म्हणणं नाही. पण मी वाईटसुद्धा नाही. पुरुषांनी मला जे भोगायला लावलं त्यांना मी त्याचीच परतफेड करायला लावली. माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय, अन्यायानं दबल्या जाणाऱ्या आणि अपमानानं जळणाऱ्या लोकांसाठी मी धैर्यानं हात पुढे करत आहे. मी जे भोगलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न. आता प्रथमच माझ्या समाजातील एका स्त्रीला आपल्या आयुष्याची सत्यकथा सांगता आली आहे आणि आपण सर्वांनी सहन केलेल्या अन्यायाची सार्वजनिक साक्ष देता आली आहे. मला आशा होती की माझी साक्ष इतरांना मदत करेल. इतर स्त्रियांना, माझ्या बहिणींना ज्यांचा अपमान झाला, आणि माझ्या भावांना ज्यांचे शोषण होत आहे. मी सिद्ध करू इच्छित होते की आपणा सर्वांना सन्मान आहे, आपला जन्म कुठेही झाला असो, आपली जात, आपला त्वचेचा रंग किंवा आपले लिंग काहीही असो. मला सन्मान हवा होता. लोकांनी म्हणावे, ‘फूलन देवी एक माणूस आहे,’ अशी माझी इच्छा होती. कारण तेव्हाच ते इतरांविषयीही तेच म्हणतील.”

“मेरे कर्मों का गीत गाओ.
मेरी लड़ाइयों की कहानी सुनाओ.
कैसे मैंने धोखेबाज़ दानवों से मुकाबला किया.
मेरी गलतियों को माफ करो.
और मुझे शांति प्रदान करो.”






