(लीना पांढरे)
गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर भारतीय साहित्यातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व. गुरुदेवांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या 'प्राणांवर नभ धरणारी' सात समुद्रांपल्याडची सखी आणि तिच्याशी गुंफले गेलेले अलवार प्रीतीबंध याचा परिमल त्यांच्या कवितांमधून दरवळत राहिलेला आहे.
अर्जेंटिना देशातील एक चिमुकलं गाव, सान इसिद्रो. या गावातील व्हिक्टोरिया ओकॅम्पो नावाच्या एका बुद्धिमान स्पॅनिश युवतीने रवींद्रनाथ टागोरांची 'गीतांजली' वाचली आणि त्यातील आर्त वेदना तिला स्पर्शुन गेली. आणि मग दोघांमध्ये पत्र संवाद सुरू झाला.
या घटनेनंतर दहा वर्षांनी व्हिक्टोरियाला रवींद्रनाथ टागोर भेटले. रवींद्रनाथ टागोर अर्जेंटिनामध्ये आले होते. येताना बोटीतून केलेल्या दीर्घ प्रवासामुळे ते आजारी पडले होते. तेव्हा ते त्रेसष्ट वर्षाचे होते आणि विक्टोरिया जेमतेम चौतीस वर्षांची होती. प्रेमभंग आणि अयशस्वी विवाह याचे कडवट अनुभव तिच्या गाठीला होते. रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली' आणि इतर अनुवादित साहित्याने तिच्या वेदनेवर फुंकर घातली होती. 
(व्हिक्टोरिया ओकॅम्पो)
अर्जेंटिनामध्ये एका बंगल्यात त्यांच्या राहण्याची सोय व्हिक्टोरियाने केली आणि ती त्यांच्यासह झुळझुळणार्या नदीच्या किनाऱ्यावर गर्द वनराजीमध्ये त्यांना संगीत ऐकवत आणि त्यांच्या कवितेचे अनुवाद समजावून घेत तेथे काही महिने राहिली. रवींद्रनाथांनी तिला बंगाली शिकवलं तर तिने रवींद्रनाथांना स्पॅनिश शिकवले. तिच्या सृजनशील सहवासात रवींद्रनाथ टागोर यांनी अतिशय सुरेख भावकविता रचल्या.
तिच्या समर्पण भावाने ते भारावून गेले. प्रीतीचे हे असे दान स्वीकारता येणार नाही हे ओळखून ते भारतात परतले. परतताना त्यांच्या बोटीत आवर्जून व्हिक्टोरियाने एक आराम खुर्ची त्यांना भेट म्हणून चढवली. आजही शांतिनिकेतनमध्ये ती आराम खुर्ची सांभाळून ठेवलेली आहे .
याशिवाय तीनजणींचा गडद परिणाम गुरुदेवांच्या आयुष्यावर आणि कवितेवर झालेला आढळतो. अबोध कौमार्यावस्थेत असताना रवींद्रनाथांवर मायेची सावली धरणारी आणि त्यांची मैत्रीण झालेली त्यांची वहिनी कादंबरीदेवी, त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी गुरुदेवांना भेटलेली सहेली अन्नपूर्णा तर्खड जी नलिनी होऊन त्यांच्या कवितेत उतरली आणि रवींद्रनाथ टागोरांची साधी सरळ घरेलू प्रेमळ पत्नी प्रतिमा देवी !
या सर्व स्फूर्ती देवतांपेक्षा सुद्धा प्रगल्भ आणि प्रौढ वयामध्ये आयुष्य मावळतीला लागलं असताना विलक्षण समर्पण भावनेने त्यांना भेटलेल्या व्हिक्टोरिया या अत्यंत बुद्धिमान स्त्रीने त्यांच्यावर गारुड केले. या दोघांमधील 'भालोबासा' पत्रव्यवहार आजही जतन केलेला आहे. त्या कोवळ्या सोनेरी दिवसांची छाया रवींद्रनाथांच्या कवितांवर पडलेली आहे.
एकदा रवींद्रनाथ आजारी पडले असताना हवापालट आणि विश्रांतीसाठी कलकत्ता सोडून जवळच असणाऱ्या खेड्यातील आपल्या शेतीवाडीवर जाऊन राहिले. तेथे निसर्गाच्या सानिध्यात निवांतपणा मिळाल्यावर रवींद्रनाथांनी आपल्याच काही बंगाली कवितांचा इंग्लिशमधून अनुवाद केला. नंतर ते लंडनला गेले असताना डब्ल्यू. बीं. यीट्स वगैरे कवींच्या संपर्कात आले. यीट्स व इतर कवी त्यांच्या रूपांतरित इंग्लिश कविता वाचून स्तिमित झाले. या सर्वांच्या आग्रहाने रवींद्रनाथांनी त्या इंग्लिश कविता प्रसिद्ध केल्या. या कवितासंग्रहाला यीट्सने प्रस्तावना लिहिली. हाच कविता संग्रह म्हणजे गीतांजली. जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी असणारे नोबेल पारितोषिक 1913 साली या काव्यसंग्रहाला बहाल करण्यात आले.
पण प्रश्न पडतो की कलकत्त्याच्या आलिशान वैभवशाली जमीनदाराच्या टागोर सदनात जन्मलेल्या रवींद्रनाथ या राजकुमाराचा वेदनांशी संबंध कुठे आला? राजपूत्र सिद्धार्थ सिद्धी अवस्थेला पोहोचून गौतम बुद्ध कसा झाला? कार्ल मार्क्स हा अत्यंत सुस्थितीत असणाऱ्या वकिलाचा सुपुत्र मग त्याला शोषितांचे दुःख कसं आकळलं?
या महामानवांप्रमाणेच रविंद्नाथांच्या जीवनातील बालपणीचा कालखंड सर्वस्वी आत्मकेंद्रित आणि स्वप्नाळू होता. कुठल्याही शाळेत न जाता घरीच शिक्षक येऊन रवींद्रला शिकवत. सहसा टागोर सदन या राजवाड्याची तटबंदी ओलांडायची मुभा लहानग्या रवींद्रला नव्हती .घराभोवतीचे उद्यान, झाडं, पक्षी, फळं, फुलं, हिरवळ, सोनेरी उन्हात पोहणारी फुलपाखरं, आकाशातुन संथपणे सरकणाऱ्या मेघमाला, चंद्र, सूर्य, तारे, झुळझुळणारे मंद गंधित वारे हेच रवींद्रचे जग होते. अगदी थेट राजपुत्र सिद्धार्थची आठवण करून देणारे जग. जेथे दुःखाला प्रवेश करायला अनुमती नव्हती.
पण विशीत असतानाच तीर्थरूपांच्या आज्ञेने रवींद्रनाथांना जमीनदारी सांभाळावी लागली. तेव्हा प्रथम या राजपुत्राचा संबंध सामान्य जनांच्या दुःखाशी, कटू वास्तवाशी आला. गरीब शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची दुःखे जवळून न्याहाळताना या सुखी राजपुत्राची दुनियाच बदलून गेली. त्यांच्या नजरेसमोरील पटल दूर झाले आणि त्यांना या जगाचे चराचराचे अंतरंग दिसू लागले.
चाळिशीत असताना रवींद्रनाथांच्या व्यक्तिगत जीवनात दुःखं व आपत्ती कोसळायला सुरुवात झाली. त्यांच्यावर झालेला पहिला आघात म्हणजे त्यांच्या प्रिय पत्नीचा मृत्यू .नंतर क्षयाने कन्येचा मृत्यू. धाकट्या मुलाचा आजारपणात ओढवलेला मृत्यू. गीतांजलीतील असंख्य गीतांवर ही मृत्यूची दाट कृष्णछाया पडलेली आहे. या दारुण वियोग दुःखामुळे रवींद्रनाथ गंभीर व अनासक्त झाले. सांसारिक सुखदुःख यापासून ते परमात्म्याच्या भक्तीकडे वळले.
'गीतांजली'तील प्रेयसी आपल्या प्रियतमाला सांगते की 'तू मला अनंत आनंदाची अनुभूती देऊन माझं जीवन पुनश्च उमलवलं आहेस. माझा देह, माझं अस्तित्व एक वेळूची बासरी आहे. जिच्यात तू तुझे चिरंतन नूतन मधुरतम स्वर फुंकले आहेस. त्यातून बाहेर पडणाऱ्या सुरांमधे माझ्या जीवनातील कडवटपणा विरून गेला आणि मी एक आनंदी पाखरू होऊन सागराच्या निळाईवर पंख पालवून उडू लागले. माझ्या गीतांच्या पसरलेल्या पंखांनी तुझ्या पावलांना पुसटसा स्पर्श केला. एरव्ही जेथे मी पामर कधीही पोहोचू शकणार नाही. ‘अज्ञात झऱ्यावर रात्री ऐकू येणारा हाच तर पावा' नव्हे ना !
एका हळव्या गीतात प्रिया स्वतःला एक चिमुकलं फुल संबोधून आपल्या प्रियकराला विनवते की' हे चिमुकले फुल तू त्वरित खुडून घे नाहीतर ते तुझ्यापुढे झुकून झुकून शेवटी मातीला मिळेल. या फुलाचे रंग गडद विलोभनीय नाहीत. याचा गंधही फिक्कट मंद आहे. या फुलाला तुझ्या कंठातील हारात जागा मिळणार नाही. पण तू मला असे खुडून घेताना तुझ्या स्पर्शाने माझ्या देठाला झालेली वेदना मी जपेन. या अभागी फुलाला तुझ्या चरणाशी रुजू करून घे.'
'मेघदूत' हे रवींद्रनाथांचे आवडते काव्य होते. गीतांजलीतील अनेक कवितांमधून मेघदूताचे पडसाद उमटले आहेत. या कवितांमध्ये मेघांचे सांद्र, सजल सानिध्य जाणवते. आषाढ श्रावणातील छायांकित आणि अभ्रकिंत पर्जन्याचे धारानृत्य, निरभ्र निळाई हरवून कृष्णमेघाच्छादित झालेलं आभाळ, सर्वत्र बंद होत गेलेले घरांचे दरवाजे आणि कोसळत्या पावसात निर्जन झालेल्या वाटा! विजांचा वादळी कडकडाट... याच वाटेने आपला साजण रात्री पावसात येईल म्हणून घराची गवाक्षे, द्वारे खुली ठेवून अथक वाट पाहणारी प्रेयसी.' स्वप्नाप्रमाणे येऊन निघून जाऊ नकोस रे' अशी विनवणी करते.
रात्रभर पुन्हा-पुन्हा दार खोलून दूरवर पावसाच्या धारात साजणाची चाहूल घेत राहते. कधीतरी रात्र ढळता ढळता दूर रानातून तो येईल आणि आपल्या पावलांच्या मुद्रा अंगणातल्या धुळीत उमटवून निघून जाईल. नेमक्या त्या क्षणी एखाद्या अभिशापासारखी निद्रा पापण्यांवर तरंगेल आणि मग त्याला भेटताच येणार नाही म्हणून प्रेयसी व्याकुळलेली!
तर कधी मेघाच्छादित श्यामल संध्याकाळी नदीच्या पात्रात नौका लोटून आपल्या प्रियकरासह दूर दूर निघून जाण्यासाठी उत्सुक झालेली अभिसारिका! तशातच पैलतिरावरून वाऱ्यावर तरंगत येणारं प्रियकराचं व्याकूळ गीत.
गीतांजलीमध्ये एक आर्त विरहगीत आहे. किनाराच नसणाऱ्या दुःखाला सहोदर केलेली प्रेयसी म्हणते, 'मी परडीतं फुलं भरून, धूळभरल्या वाटेच्या कडेला तासाचे तास तुझी वाट पहात राहिले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी माझ्या परडीतील फुलं लुटून नेली. आता माझी ओंजळ रिती झाली आहे. सकाळ उलटली.. माध्यानाची उन्हं सुद्धा कलू लागली.. रात्रीचे प्रहरही उलटू लागले. तरीही या धूळ भरल्या रस्त्याच्या कडेला तुझी वाट पहात बसलेली मी एखाद्या भीकारणीसारखी लाचार, दीनवाणी, शरमिंदी.. माझा चेहरा पदरात लपवून बसले आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा मला घायाळ करून विचारत आहेत की 'मला नेमकं काय हवंय ?' मी निस्तब्ध.. निरुत्तर.
मला वाटतं की दूरवरून प्रकाशझोत पडतील आणि लखलखीत सोनेरी अश्व जोडलेला तुझा रत्नखचित रथ माझ्यासमोर येऊन थांबेल. वसंतातील झुळकीसारखा तू रथातून खाली उतरशील. धुळीत पडलेल्या मला उचलून हृदयाशी धरशील. वादळातील डहाळीप्रमाणे थरथरणाऱ्या या गरीब मुलीला तू सन्मानाने रथात तुझ्याशेजारी बसवशील. पण युगं उलटून गेलीत.. तुझ्या रथाच्या चाकांचा ध्वनि माझ्या कानावर अद्यापही पडलेला नाही. मी अजुनही रडत, आक्रंदत येथे तुझी वाट पाहते आहे.
वेदनांचा उदास चंद्रप्रकाश, मग्न तळ्याकाठी विसावलेलं प्रियेचं आत्मरत मन अशी कविता गुंफली जाण्यासाठी आयुष्याच्या उत्तरार्धात का असेना पण एखादी मनस्वी अवखळ प्रिया भेटायला हवी. कुठल्याशा कवींने म्हटलय,
"दशोपनिषदांच्या दशा माझ्या चक्रीपागोट्याला
वेदांच्या शब्दजड खडावा माझ्या पायी
आता तूच फक्त विचारू शकतेस
गाण्याच्या भेंड्या खेळूया का ? "






