टीम बाईमाणूस
- तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर.
- गेल्या साठ वर्षांपासून तमाशाचा हा महानायक महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर राज्य करतोय.
- रघुवीर खेडकर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने दिल्लीला आपला पारंपरिक ढोलकी फडाचा तमाशा सादर केला होता.
वय वर्षे ६२, जागेवरून उठायचे असेल, खाली वाकायचे असेल तर कुणाच्यातरी आधाराची नेहमीच गरज, रोज सकाळी उठणे नित्यनेमाने तासभर देवाचा पूजापाठ करणे, दिवसातून एकच वेळा पूर्ण जेवण करणे, जेवणानंतर सकाळ संध्याकाळ मधुमेह आणि रक्तदाबाच्या तब्बल दहा गोळ्या घेणे आणि याखेरीज अतिशय कमी बोलणे, चापून चोपून म्हणजेच प्रमाण भाषेत मोजून मापून बोलणे हा सगळा स्वभाव आणि प्रकृती एखाद्या थकलेल्या ज्येष्ठ माणसाची वाटू शकते पण, जर तुम्हाला सांगितलं की दोन पाऊले टाकायला आधाराची गरज असणारा माणूस तमाशाच्या मंचावर गेल्यावर मात्र अंगात वीज संचारावी तसा देहभान विसरून नाचतो, एरवी मंचाखाली असताना एकेक शब्द मोठ्या कष्टाने आणि विचार करून बोलणारा माणूस मंचावर मात्र सुसाट चावट विनोद करीत सुटतो, वेगवेगळी उंच स्वरात मोठ्या आवाजात गाणी म्हणतो, प्रचंड ताकदीने वगनाट्य सादर करतो.. तर तुम्हाला काय वाटेल? 
कदाचित अनेकांना ही गोष्ट वाचायलाच विचित्र वाटत असेल पण ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी आहे. ही गोष्ट मागील पन्नास वर्षे महाराष्ट्रातील तमाशा रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोककलाकार आदरणीय मास्टर रघुवीर खेडकर यांची आहे. रघुवीर खेडकर महाराष्ट्राच्या गाजलेल्या तमाशा फडांपैकी असणारे एक लोकप्रिय कलावंत आहेत. अनेक राज्य शासनाच्या पुरस्कारांचा मानकरी असणारा हा अवलिया आजही तमाशा ही अस्सल लोककला टिकवण्यासाठी कसोशीने लढतोय.
प्रेत एका कपड्यात झाकून ठेवले अन् रघुवीरने तमाशा पुन्हा सुरू केला
1991 च्या नांदेड जिल्ह्यातील मालेगावच्या यात्रेतला एक प्रसंग.. रघुवीर खेडकर यांचा तंबू यात्रेत लागला होता आणि राजीव गांधी हत्या प्रसंगावर वग सादर होणार होता. त्यासाठी एक हेलिकॉप्टर बनवण्यात आले होते आणि फटाक्यांची दारू आणि सुतळी बॉम्ब तयार ठेवण्यात आले होते. वामन लोहगावकर हा सोंगाड्या आणि रघुवीर खेडकर यांचा मुलगा व भाचेमंडळी राजीव गांधींच्या स्वागताला तयार होती, असा प्रसंग त्या वगात दाखवण्यात आला होता.
आपटबारच्या पेटीचे झाकण आदळल्याने मोठा स्फोट झाला. रघुवीरचा पाच-सहा वर्षांचा भाचा बबलू जबरदस्त भाजला, तर वामनमामांच्या डोक्याचा एक भाग अक्षरश: फुटून बाजूला पडला. वामनमामा जागीच ठार, तर बबलू जबर जखमी. हिंमतवान कांताबाई सातारकर नातू बबलूला घेऊन एकट्या नांदेडला दवाखान्यात रवाना झाल्या. प्रेक्षकात गोंधळ उडाला, परंतु हे दु:ख बाजूला ठेवून वामनमामाचे प्रेत एका कपड्यात झाकून ठेवले व तमाशा पुन्हा सुरू झाला. रघुवीर खेडकरमधला जातिवंत सोंगाड्या प्रेक्षकांना खळाळून हसवत होता त्या वेळी रघुवीर नावाच्या सोंगाड्याच्या अंत:करणात काय वेदना होत्या याची कल्पना कुणीच करू शकणार नाही.
सोंगाड्याचा वारसा पुढे नेणारा एक महान लोककलावंत
हाच तो महाराष्ट्राचा आघाडीचा सोंगाड्या रघुवीर खेडकर.. तमाशा ओळखला जातो तो त्यातील सरदार, शाहीर, सोंगाड्या आणि नर्तिका या व्यक्तिरेखांमुळे. कोणत्याही तमाशाच्या लोकप्रियतेत या सर्व व्यक्तिरेखा जर उठावदार असतील तर तो तमाशा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतो. यातील एखादा घटकही तमाशाची लोकप्रियता वाढवतो. तमाशातील सोंगाड्या या बहुआयामी व्यक्तिरेखेबद्दल एक पूर्ण मालिका लोकप्रिय होऊ शकते. साधारणत: बाकेराव हा हजरजबाबी सोंगाड्या प्रसिद्ध होता. 
त्यानंतर दगडूबाबा साळी, दत्ताेबा तांबे, काळू-बाळू, दादू इंदुरीकर, शंकर शिवणेकर, किसन कुसगावकर, वसंत अवसरीकर, दत्ता महाडिक -पुणेकर आदी मान्यवर सोंगाड्यांची नावे घेतली जातात. रघुवीर खेडकरने सोंगाड्याचा हा वारसा अतिशय प्रभावीपणे जपला आहे. राजकपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' या चित्रपटासारखीच सोंगाड्यांची अवस्था असते. बोर्डावर ते जनसामान्यांना पोट भरून हसवतात आणि बोर्डामागे मात्र त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारा कोणी नसतो. तुकाराम जाधव नावाच्या एका कवीच्या कवितेतील एक ओळ सोंगाड्याच्या आयुष्याशी अगदी मिळतीजुळती आहे, ती अशी : 'तुमच्या वेदनांची फुलपाखरं झाली । माझ्या फुलपाखराला वेदना होताहेत.'
राष्ट्रकुल स्पर्धेत सादर केला पारंपरिक तमाशा
कधी काळी दिल्लीच्या तख्तापर्यंत मराठी कर्तृत्वाचा झेंडा फडकला होता. त्याला काही शतके झाली; परंतु ग्रामीण भागाचे चैतन्यलेणे समजला जाणारा लोकनाट्य तमाशा पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर स्वार होऊन जगावर अधिराज्य गाजवले तेदेखील रघुवीरनेच. रघुवीर खेडकर या आदर्श सोंगाड्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या निमित्ताने दिल्लीला संगीत नाटक अकादमीच्या मेघदूत खुल्या रंगमंचावर आपला पारंपरिक ढोलकी फडाचा तमाशा सादर केला.
चंदीगड येथे तमाशा सादर केला आणि अवघ्या भारतात आपली कीर्ती पसरवली. सहा दशकांहून अधिक काळापासून कांताबाई राज्याच्या तमाशा रसिकांची मने रिझवत आहेत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून गेली चार दशके चिरंजीव रघुवीर या अस्सल सोंगाड्याने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. रघुवीर खेडकर म्हणतो, माझी आई कांताबाई सातारकर ही माझी सर्वात मोठी गुरू असून, जुने कलावंत दत्ता, दत्ताेबा तांबे, दत्ता महाडिक, गुलाबराव बोरगावकर, लक्ष्मण टाकळीकर यांनाही मी गुरू मानतो.
मुंबईकरांना अस्सल तमाशाचे दर्शनही याच अवलियाने घडवले आणि तेही विद्यानगरीत. तमाशाला राजमान्यता, लोकमान्यता मिळाली असताना रघुवीरच्या रूपाने गावकुसाबाहेरील या कलेला त्यानिमित्त विद्वत्मान्यतादेखील मिळाली. या प्रसंगी रघुवीरने अतिशय सर्मपक भाषण केले होते. तो म्हणाला की, 'इथं जमलेले लोक शिकलेले आहेत, विद्वान आहेत. त्यांना आमची भाषा खटकेल, अश्लील वाटेल. 
आम्ही गावरान माणसं आहोत. आमचं जगणं खुलं आसतंय, तशी भाषाही रांगडी असती. ही आमची गावरान रांगडी भाषा आहे. तिला अश्लील मानू नका. आमचा तमाशा तुम्हाला थोडा भडक वाटंल. पण आम्ही गावोगावी तमाशा सादर करतो तेव्हा वीस-वीस हजार लोकं समोर असतात. आताची ही गर्दी म्हंजे आमचा एक कोपराय. त्या मोठय़ा गर्दीपुढे तमाशा सादर करताना मोठय़ानं बोलां लागतं, हातवारे करावे लागतात. तुम्हा विद्वान लोकांपुढं आमची कला सादर करणं हे आमचं भाग्य..'
रघुवीर यांनी आजपर्यंत राज्यातील वास्तव प्रसंगांवर प्रबोधनपर वगनाट्ये रसिक कलाकारांसमोर सादर केली आहेत. रघुवीर आज फक्त कलाकार नसून तो कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरला आहे. तमाशा फडमालकांची संघटना तो अतिशय उत्तमपणे चालवतोय. तमाशा कलावंतांच्या प्रश्नांवर आवाज उठवतोय. शासन दरबारी त्यांची बाजू मांडतोय. अभिजन वर्गाशी लढा देतोय.
आजही नारायणगाव येथे जत्रांच्या हंगामात ज्या सुपार्या फुटल्या जातात त्यात रघुवीर खेडकरच्या तमाशाची सुपारी सर्वाधिक रकमेची असते, हे विशेष. लावण्यांच्या कार्यक्रमामुळे लोकनाट्य कलेला उतरती कळा लागल्याच्या आरोपाला रघुवीर त्वेषाने प्रत्युत्तर देतो. तमाशा ही कला ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असून, ही कला पाहण्यासाठी ग्रामीण भागात उघड्या मैदानावर आजही हजारो प्रेक्षक येत असतात. आजच्या यांत्रिक युगात लोकनाट्य तमाशा कार्यक्रमालाच ग्रामीण भागातील प्रेक्षक, काबाडकष्ट करणारा शेतकरी वर्ग पसंती देत आहे.






