विठ्ठल साबळे
- ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर छ. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणाऱ्या रितेशला मोठ्या प्रमाणावर ट्रोलचा सामना करावा लागला.
- यामागे ऐतिहासिक कारणांपेक्षा सामाजिक आणि काही प्रमाणात राजकीय मानसिकता अधिक जबाबदार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही निर्विवाद अधिकृत चित्र उपलब्ध नसल्याचे इतिहासकार मानतात. मग रितेश देशमुखच्या बाबतीतच त्याच्या दिसण्यावर किंवा आवाजावरून असे निकष का लावले जात आहेत?
‘’नुसता राजा म्हणून बोलण्यामुळे कोणी राजा होत नसतो, राजा होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं…’’ रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या टीझरमधील हा खणखणीत आवाज सध्या सोशल मीडियाच्या भिंतींवर आदळतोय. पण या आवाजासोबतच एक विखारी कल्लोळही समाज माध्यमांत उठला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा टीझर काय आला आणि महाराष्ट्राच्या आभासी जगात जणू 'पानिपत' सुरू झालं. पण हा वाद निव्वळ सिनेमॅटिक आहे की यामागे काही खोलवर रुजलेली राजकीय आणि सामाजिक कटकारस्थानं आहेत?
संत तुकारामाच्या अभंगाची एक ओळ आहे. "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" ही ओळ आजही समाजाला दिशा देणारी आहे… महाराष्ट्राच्या मातीत मूल्य आणि ओळख जपणाऱ्यांसाठी शिवराय हा श्वास आहे, पण आज याच श्वासावर, याच अस्मितेवर ताबा मिळवू पाहणाऱ्या एका विशिष्ट आणि विखारी विचारसरणीचा सामना करण्याची वेळ आली आहे. ही केवळ एका चित्रपटाची चर्चा नाही, तर हा शिवरायांच्या खऱ्या 'रयतेच्या' स्वरूपाला नाकारणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध पुकारलेला एक वैचारिक एल्गार आहे.
'कुपोषित शिवाजी', 'हेकण्या कशाला झालाय शिवाजी महाराज'अशाप्रकारे ट्रोल
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या टीझरनंतर सोशल मीडियावर ज्या कमेंट्स आल्या आहेत, त्या वाचून हे स्पष्ट होतं की ही एक सुसंघटित मोहीम आहे. कॉमेंट्सकडे बारकाईनं पाहिलं तर, ट्रोलिंगचे स्वरूप किती 'विखारी' आणि वैयक्तिक पातळीवर गेलं आहे, हे स्पष्ट होतं. 'कुपोषित शिवाजी', 'हेकण्या कशाला झालाय शिवाजी महाराज', नखाची सर नाही आणि म्हणे शिवाजी महाराजांची भूमिका करणार... अशा कॉमेंट्स रितेशवर करण्यात आल्या आहेत. हे शब्द केवळ टीका नाही, तर हा थेट द्वेष आहे.

'दिल्लीवर आणि विजापूरवर एकाचवेळी नजर ठेवलीये' अशी उपरोधिक कमेंट करून रितेशच्या चेहऱ्याची चेष्टा केली गेली आहे. 'तोंड उघडल्यावर तर आणखीच अंधार' हे शब्द एका कलाकाराला उद्देशून वापरल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रितेशच्या लूकला 'खान' लूकशी तुलना करून त्याची खिल्ली उडवली जातेय. जे लोक आज रितेशला ट्रोल करतायत, त्यांनी यापूर्वीच्या ढिसाळ ऐतिहासिक चित्रपटांच्या वेळी मौन का पाळलं होतं? असा सवाल सिनेवर्तुळात आणि महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर विचारला जात आहे.
यामागे सामाजिक-राजकीय मानसिकता अधिक जबाबदार - इंद्रजीत सावंत
‘बाईमाणूस'शी बोलताना इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की, शिवाजी महाराजांची भूमिका कोणी साकारावी यावर आक्षेप घेण्याला काही अर्थ नाही, कारण प्रत्येक कलाकाराला ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याचा अधिकार आहे. यापूर्वीही विविध अभिनेत्यांनी ही भूमिका साकारली असून त्यावेळी मोठा विरोध झालेला दिसत नाही. मात्र सध्याच्या वादामागे ऐतिहासिक कारणांपेक्षा सामाजिक आणि काही प्रमाणात राजकीय मानसिकता अधिक जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, शिवाजी महाराज कसे दिसत होते हा प्रश्न इतिहास संशोधनाच्या दृष्टीने पूर्णपणे अनुत्तरित नाही, असे सांगत इंद्रजीत सावंत यानी स्पष्ट केले की, महाराजांची अनेक समकालीन मिनिएचर पेंटिंग्स आणि वर्णनात्मक स्रोत उपलब्ध असून त्यावरून त्यांच्या रूपाबाबत एक ठरावीक आकलन तयार झाले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी हेही अधोरेखित केले की कोणत्याही कलाकृतीतून महाराजांचा अपमान किंवा विकृत इतिहास मांडला जाऊ नये, हीच खरी मर्यादा असावी. एखादा कलाकार त्या भूमिकेला कितपत न्याय देतो, हे चित्रपट पाहिल्यानंतरच ठरवावे, असे सांगत त्यांनी टीकेपेक्षा संयमित मूल्यांकनाची भूमिका मांडली.
मांजरेकर आणि भावेंचे निकष रितेशला का नाहीत?
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक भूमिकांवर एका विशिष्ट वर्गाची 'मक्तेदारी' निर्माण झाली आहे का? या प्रश्नावर सोशल मीडियात सध्या घमासान सुरू आहे.
महेश मांजरेकर: 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' (२००९) मध्ये महेश मांजरेकर महाराजांच्या भूमिकेत दिसले. मांजरेकर स्वतः अनेकदा वादात असतात, तरीही त्यांच्या भूमिकेला असा विखारी विरोध झाला नाही.
सुबोध भावे: 'लोकमान्य' असो किंवा इतर ऐतिहासिक संदर्भ, सुबोध भावे यांना एक 'आदर्श चेहरा' मानले जाते. त्यांनी जेव्हा महाराजांची भूमिका केली, तेव्हा त्यांचे स्वागतच झाले.

मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर महेश मांजरेकर चालतात, सुबोध भावे चालतात, अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळातील चंद्रकांत सूर्यकांत चालतात, तर रितेश देशमुख का नको? जर 'तान्हाजी' मध्ये तानाजी मालुसरे यांचे कोणतेही अधिकृत चित्र उपलब्ध नसताना प्रेक्षक अजय देवगणला डोक्यावर घेतलं जातं, जर 'छावा' मध्ये विकी कौशलला संभाजी महाराज म्हणून स्वीकारलं जातं, तर मग रितेश देशमुखच्या बाबतीतच त्याच्या दिसण्यावर किंवा आवाजावरून असे निकष का लावले जात आहेत? हा दुजाभाव आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. काही लोकांना बहुजनांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांची भूमिका एका वेगळ्या पार्श्वभूमीच्या कलाकाराने करणे मान्य नाही का, असेही यातून वाटू लागते.
महाराज कसे दिसत होते यापेक्षा त्यांनी दिलेले विचार अधिक महत्त्वाचे - राजकुमार तांगडे
या संदर्भात ‘बाईमाणूस 'शी बोलताना ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणी साकारावी यावर कोणाचंही ‘पेटंट’ असू शकत नाही, कारण महाराज हे संपूर्ण समाजाचे पूर्वज आहेत आणि त्या अर्थाने प्रत्येकाला त्यांच्या विषयी आत्मीयता बाळगण्याचा आणि त्यांच्यावर आधारित भूमिका साकारण्याचा अधिकार आहे. सध्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटांबाबत बोलताना त्यांनी असेही नमूद केले की, अशा प्रकारचे वाद सर्वसामान्य लोक निर्माण करत नाहीत, तर काही हितसंबंधी घटक त्यामागे असू शकतात, आणि पूर्ण चित्रपट न पाहता केवळ टीझर किंवा ट्रेलरच्या आधारावर टीका करणे हे योग्य नाही.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबतच्या प्रश्नावर त्यांनी संतुलित भूमिका घेत सांगितले की, त्या काळात छायाचित्रणाची साधने नसल्यामुळे विविध ऐतिहासिक वर्णने आणि परकीय प्रवाशांच्या नोंदींवरूनच त्यांचा अंदाज बांधला गेला आहे. मात्र त्यांनी हेही अधोरेखित केले की, महाराज कसे दिसत होते यापेक्षा त्यांनी दिलेले विचार अधिक महत्त्वाचे आहेत, कारण काळाच्या पलीकडे टिकून राहिलेले जर काही असेल, तर ते त्यांच्या कार्यातून आणि विचारातूनच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?
या संदंर्भातील प्रतिक्रियांच्या स्वरूपात एक मोठी विसंगती अशी दिसते की, रितेशच्या लूकची तुलना गुगलवर प्रचिलित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांशी करण्यात येत आहे. पण वास्तव हे आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही निर्विवाद अधिकृत चित्र उपलब्ध नसल्याचे इतिहासकार मानतात. उदाहरणार्थ, इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी एक चित्र पुढे आणले होते आणि ते १६६४ च्या सुरत मोहिमेदरम्यान काढले गेले असा दावा केला होता. एका डच अधिकाऱ्याने ते तयार करून घेतले असा उल्लेखही केला गेला; मात्र अनेक इतिहासकारांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे त्या चित्रालाही निर्विवाद मानता येत नाही. महाराजांच्या दरबारात एकही चित्रकार होता का, याचे ठोस पुरावे आढळत नाहीत.
फ्रेंच जगप्रवासी जॉन द तेवनो 1666 साली सुरतमध्ये आला होता आणि तिथून त्याने दख्खनचा प्रवास केला. शिवाजी महाराजांना पाहिल्यावर तो लिहितो, ‘राजे उंचीने थोडे कमी, पिवळसर गौर वर्णाचे आहेत, त्यांचे नेत्र तेजस्वी आणि बुद्धीमत्ता दर्शवणारे आहेत. ते साधारणपणे दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे.’

सुरत मोहीमेच्या वेळेस त्या शहरात उपस्थित इंग्लिश आणि डच अधिकारी, व्यापारी आणि प्रवाशांनीही शिवाजी महाराजांची वर्णनं केली आहेत. अँथनी स्मिथनं केलेलं वर्णन जॉन ल’एस्कॉलिएट यांनी लिहून ठेवलं आहे. त्यानुसार ‘राजे काहीसे लहान चणीचे आहेत, मला वाटतं उभे राहिले तर माझ्यापेक्षा त्यांची उंची कमी आहे. ते ताठ बांधेसूद शरीरयष्टीचे, चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसतं, त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णानं गोरे दिसतात.’
गुगलवर जी चित्रे आपण पाहतो, ती बहुतांश चित्रकारांच्या कल्पनाशक्तीचा भाग आहेत. १७ व्या शतकात काही युरोपियन आणि डच चित्रकारांनी महाराजांना पाहिल्यावर त्यांची रेखाचित्रे काढली होती, पण ती सुद्धा शंभर टक्के अचूक आहेत असे म्हणता येत नाही. इंग्रज चित्रकाराने काढलेल्या चित्राचा संदर्भ येतो, पण त्यावरही इतिहास संशोधकांमध्ये मोठे मतभेद आहेत. मग जर अधिकृत चेहराच कोणाला माहित नाही, तर रितेश 'तसा दिसत नाही' हा दावा किती फोल आहे? राजा हा त्याच्या कर्तबगारीने आणि विचारांनी श्रेष्ठ असतो, केवळ चेहऱ्याच्या रुबाबाने नाही.
'देशमुख' आडनाव आणि काँग्रेसचा वारसा
रितेश देशमुखला होणाऱ्या विरोधाचा विचार करताना आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल. रितेश हा केवळ एक अभिनेता नाही, तर तो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे. त्याचे बंधू अमित देशमुख आमदार तर धिरज देशमुख काँग्रेसचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्राच्या मातीत ज्या घराण्याने काँग्रेसचा विचार रुजवला, त्या घराण्यातील एका वारसाने 'छत्रपती शिवाजी महाराज' साकारणे, हे एका विशिष्ट 'आयटी सेल'ला आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांना का पचत नाहीये? अशी प्रतिक्रिया सिनेवर्तुळातील एका दिग्दर्शकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

हा विरोध वैचारिक आहे. रितेश भाजपचा नाही, तो हिंदुत्वाच्या त्या 'विशिष्ट' व्याख्येत बसत नाही आणि त्याने यापूर्वी केंद्र सरकारच्या काही धोरणांवर सोशल मीडियातून गंभीर टीका केली आहे. मग अशा व्यक्तीला 'महाराज' म्हणून स्वीकारणे म्हणजे आपल्या राजकीय विरोधकाला मोठे करणे, अशी भीती या ट्रोल गँगच्या मनात आहे का? विलासराव देशमुखांच्या मुलाने केलेली ही भूमिका केवळ चित्रपट न राहता एक राजकीय 'स्टेटमेंट' ठरू शकते, याची भीती प्रस्थापितांना वाटतेय का…? असाही सवाल या दिग्दर्शकाने विचारला आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे असे आहे स्वरूप
या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया समजून घेणे रंजक आहे. २०२१ च्या सुमारास या चित्रपटाची घोषणा झाली होती. सुरुवातीला हा चित्रपट ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आणि या विषयाची भव्यता पाहता, रितेश देशमुखने स्वतःच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला..
हा चित्रपट 'त्रिखंडात्मक' असणार आहे. 'राजा शिवाजी'चा त्रिखंडात्मक सीक्वेल येणार आहे. जसा 'धुरंधर' भाग १ आणि भाग २ आला होता.. तसाच राजा शिवाजी चित्रपट म्हणजेच हे शिवचरित्र तीन भागांमध्ये असणार आहे.. रितेशने या चित्रपटासाठी स्वतःची शरीरयष्टी कमावली, 'वेड' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर त्याने आपले सर्वस्व या सिनेमासाठी पणाला लावले आहे.

वेध महामानवाचा, श्री राजा शिवछत्रपती, शिवचरित्र सारखी काही पुस्तके वाचून रितेश देशमुखने या चित्रपटाची पटकथा काय असावी, याचा विचार केला. संजय दत्त, अभिषेक बच्चन, सलमान खान, विद्या बालन,बोमन इराणी,फरदीन खान यांच्यासारखे मोठे कलाकार रितेश देशमुख यांनी या चित्रपटातून मराठीत एकत्र आणले आहेत. सलमान खान जिवाजी महाले यांच्या भूमिकेत दिसेल! महेश मांजरेकर (ज्यांनी स्वत: एका चित्रपटात शिवराय साकारले होते) सचिन खेडेकर,भाग्यश्री पटवर्धन,अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी ही मराठीतील मोठी कलाकार मंडळी आहेत. ही कलाकारांची उपस्थिती केवळ स्टार पॉवर नाही, तर शिवाजी महाराजांचा इतिहास, भाषेच्या सीमा ओलांडून नेण्याचा प्रयत्न आहे. मराठी, हिंदी आणि तेलगू अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट पोहोचणार असल्याने हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही.
पुरंदरेंचा 'हिंसक' शिवाजी विरुद्ध पानसरेंचा 'रयतेचा' शिवाजी…?
या वादाच्या मुळाशी दोन विचारधारांचा संघर्ष आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मांडणीत शिवाजी महाराजांचा संघर्ष मुघल आणि आदिलशाही सत्तांविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्याच्या रूपात अधिक ठळकपणे दिसतो. त्यामुळे काही टीकाकारांच्या मते, या मांडणीत धार्मिक संघर्षाचा भाग अधोरेखित होतो, तर इतरांच्या मते हा इतिहास मांडण्याचा एक दृष्टिकोन आहे.
पण कॉ. गोविंद पानसरे यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकातून जे खरा छ. शिवाजी महाराज समोर आणले, तो या प्रेक्षकांना नको आहे. पानसरेंचे शिवाजी महाराज हे अठरा पगड जातींना सोबत घेणारा होते. त्यांच्या सैन्यात मुस्लिम होते (उदा. सिद्दी हिलाल, मदारी मेहेतर), त्यांच्या सैन्यात महार, मांग, रामोशी असे सर्व अठरा पगड जातींचे लोक होते. 
छत्रपती शिवाजी महाराज प्रस्थापित सत्तेविरुद्ध उभा राहून स्वराज्य उभारणारे राजा होते. रितेश देशमुखच्या टीझरमध्ये जेव्हा ‘स्वराज्यासाठी विद्रोह’ हा शब्द ऐकू येतो, तेव्हा काही प्रतिक्रिया तीव्र होताना दिसतात. कारण ‘विद्रोह’ या शब्दाकडे काहीजण अजूनही ‘बंड’ या नकारात्मक अर्थाने पाहतात, तर इतरांच्या मते तो अन्यायकारक सत्तेविरुद्ध उभे राहण्याचा संकेत आहे. त्यामुळे हा वाद केवळ शब्दांचा नसून, इतिहासाकडे पाहण्याच्या दोन भिन्न दृष्टिकोनांचा असल्याचे स्पष्ट होते.
'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होईलच, पण त्यापूर्वीच सुरू झालेला हा रणसंग्राम खूप काही शिकवून जातोय. हा लढा केवळ रितेश देशमुख विरुद्ध ट्रोलर्स असा नाहीये. हा लढा आहे 'महाराजांच्या प्रतिमेवर मक्तेदारी सांगणाऱ्या' विरुद्ध 'महाराजांना अठरा पगड जातींपर्यंत पोहोचवू पाहणाऱ्या' बहुजन विचारांचा. जर रितेश देशमुख या चित्रपटातून महाराजांचा खरा 'रयतेचा राजा' हा पैलू समोर आणणार असेल, तर त्याला होणारा हा विरोध स्वाभाविकच आहे. कारण ज्यांनी महाराजांना केवळ एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त केले आहे, त्यांना महाराजांचा 'सर्वसमावेशक' चेहरा पचणार नाही.






