ओळखलत का सर मला?
कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील एक विद्यार्थी त्याच्या सरांकडे मदत मागतो आहे. पुरामुळे त्याच्या घराची झालेली दुर्दशा तो सरांना सांगतो. कवितेत शेवटी, सरांना वाटते हा विद्यार्थी आपल्याकडे आर्थिक मदत मागत आहे. तेव्हा ते खिशातून पैसे काढू लागतात तेव्हा तो विद्यार्थी म्हणतो, 'पैसे नकोत सर,जरा एकटेपणा वाटला.'
या विद्यार्थ्याची जी भावना आहे तीच भावना दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांची आहे.दिल्लीच्या जुन्या राजेंद्रनगर भागात आंदोलन करत असलेले विद्यार्थीदेखील त्यांच्या प्रिय सरांना असाच काहीसा प्रश्न विचारत आहेत की, ओळखलत का सर आम्हाला? पण कोण आहेत ते प्रिय सर? तर ते आहेत ‘दृष्टी’ आयएएस या कोचिंग क्लासेसचे संस्थापक विकास दिव्यकिर्ती.
मागच्या आठवड्यात दिल्लीच्या जुन्या राजेंद्रनगर भागात पावसाने अनेक स्वप्नांना कायमचे मातीमोल केले. त्याचं झालं असं की, दिल्लीतील, मुखर्जीनगर, ओल्ड राजेंद्र नगर, नेहरूनगर भागात स्पर्धा परीक्षेशी संबंधित अनेक कोचिंग क्लासेसचे ऑफिस, अभ्यासिका या परिसरात आहेत. याच भागात नियमित वर्ग देखील सुरू असतात. त्यामुळे हा कायमच गजबजलेला परिसर. याच परिसरात इमारतींच्या तळघरात या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका आहेत.
बहुतांश अनधिकृत असलेल्या या इमारतींमध्ये कोणत्याच प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी तळघरात जाऊन तीन विद्यार्थी मृत्युमुखी पडले. ‘राव आयएएस स्टडी सर्कल’ या कोचिंग क्लासच्या अभ्यासिकेत हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांना बाहेर पडता न आल्याने अक्षरशः नाकातोंडात पाणी जाऊन मरण पावले. त्यानंतर विद्यार्थ्यांतून प्रशासन व कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत कारभारावर टीका होऊ लागली.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर दिल्ली महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. महापालिकेने राजेंद्र नगर व मुखर्जी नगरसह दिल्लीतल्या अनेक ठिकाणी इमारतींची तळघरं, प्रामुख्याने ज्या इमारतींमध्ये शिकवणी वर्ग चालवले जातात अशा इमारतींची तळघरं सील करण्यास सुरुवाती केली आहे. महापालिकेने 13 कोचिंग इनस्टिट्युटची तळघरं सील केली.
दुसऱ्या बाजूला उस्फूर्तपणे एकत्र येत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे, मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी व या परिसरात चांगल्या व खात्रीशीर सुरक्षा उपाययोजना असणाऱ्या सुविधा मिळाव्यात.
विद्यार्थ्यांनी विकास दिव्यकिर्ती यांना टार्गेट का केले?
मागील पाच सहा दिवसांपासून विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनात, त्यांना अपेक्षा आहे की, संबंधित कोचिंग संस्थांनी देखील विद्यार्थ्यांकडून सहभागी व्हावे.आपला शिक्षक आपल्या न्यायहक्कांच्या बाजूने उभा राहिला पाहिजे ही विद्यार्थ्यांची मागणी रास्तच आहे. पण गेल्या आठवड्यात विकास दिव्यकिर्ती यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा आंदोलनाला पाठिंबा देखील दिला नाही.
यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे विशेषत: युपीएससी नागरी सेवा परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्याविरोधात आक्रमक झाले.सोशल मीडियावर देखील या सगळ्या 'एस्पिरंट' ने त्यांच्याविरोधात कमेंट करून त्यांच्यातील रोषाला मोकळी वाट करून दिली. दिल्ली महापालिकेने दृष्टी आयएएस संस्थेलाही त्यांच्या कारवाईदरम्यान टाळं ठोकलं आहे.

विकास दिव्यकिर्ती हे दृष्टी आयएएस या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. हिंदी साहित्य, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र,इतिहास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. त्यांची विद्यार्थ्यांच्या मनातील प्रतिमा पाहिली ते अतिशय अभ्यासू निवेदन करणारे,अवघड विषय समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगणारे व नितीमंत आदर्श गुरूजन म्हणजे विकास दिव्यकीर्ती.
त्यांच्या लेक्चरमधील अनेक संदर्भाच्या रिल्सना सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज असतात. त्यांच्या लेक्चर्सचे, कॉपीराइटचे उल्लंघन करून काळ्याबाजारात त्यांना देखील प्रचंड मागणी आहे.
मी माफी मागतो, यापुढे अशी चूक होणार नाही - विकास दिव्यकीर्ती
इतकी क्रेझ असलेले विकास दिव्यकीर्ती जेव्हा विद्यार्थ्यांची ठामपणे बाजू घेत नाहीत तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. अखेर काल विकास दिव्यकीर्ती यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सगळ्याचे स्पष्टीकरण दिले. त्यात त्यांनी संपूर्ण समाजाची, देशाची माफी मागून यापुढे अशी चूक होणार नाही असे म्हणले.
प्रतिक्रिया देण्यास का उशीर झाला या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते की, "भावनाविवश न होता मी लगेच व्यक्त होत नाही.अ साच माझा स्वभाव आहे. घटना झाल्यापासून मला विद्यार्थ्यांचे पाण्यात बुडण्याचे चित्र सतत डोळ्यापुढे येते. या कल्पनेने मी अस्वस्थ होतो."
अर्थात त्यांनी यावर न थांबता दिल्लीच्या नायब राज्यपालांसोबत अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नासंबंधी बैठक आयोजित केली. या इमारतींच्या बेसमेंटमधील सुरक्षा उपाययोजना यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी त्यांनी सगळ्या कोचिंग क्लासेसना सोबत घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत.
कोचिंग क्लासेसना 'फायर NOC' का दिली जात नाही यासंबंधी चर्चा झाली त्यातून आता मार्ग काढला जाईल. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या पाच जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. संसदेत देखील बासुरी स्वराज व अखिलेश यादव यांनी या घटनेसंबंधी प्रश्न उपस्थित केले.
आता अपेक्षा एवढीच की, यात संबंधितांवर कारवाई होऊन सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत आणि ज्यांना ऐकून विद्यार्थ्यांना दिव्यत्वाची प्रचिती येते असे विकास दिव्यकीर्ती यांनी पुन्हा जोमाने अध्यापन करावे.

विकास दिव्यकिर्ती यांची पार्श्वभूमी
हरियाणातील विकास दिव्यकिर्ती हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांचे आई वडील दोघे हिंदी साहित्य या विषयाचे प्राध्यापक होते. विकास दिव्यकिर्ती यांनी दिल्ली विद्यापीठातून हिंदी साहित्यात पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर 1996 साली, पहिल्याच प्रयत्नात युपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवांच्या परीक्षेत यश मिळवले.
केंद्रीय गृहमंत्रालयात नियुक्ती मिळाली परंतु त्यांनी 1999 साली राजीनामा देऊन दृष्टी आयएएस या संस्थेची स्थापना केली. प्रचंड व्यासंग,अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी, भाषेवरील प्रभुत्व या सगळ्या कारणांनी ते विद्यार्थ्यांत अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी हे भारतभर प्रशासनात कार्यरत आहेत.
नुकताच मनोज शर्मा या आयपीएस सेवेतील अधिकाऱ्यावर चित्रित झालेला सिनेमा म्हणजे '12th fail'. हे मनोज शर्मा विकास दिव्यकीर्ती यांचेच विद्यार्थी. हिंदी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा दृष्टी आयएएस हा क्लास आशेचा किरण आहे.






