नशिबात जे काही लिहिलं असेल तेच घडतं असं म्हणत आपल्याकडे समोर येईल त्या परिस्थितीशी तडजोड करून आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला जातो. पण काही जण असेही असतात की, कितीही खडतर परिस्थिती आली, तरी न डगमगता त्याला तोंड देत नशिबाला झुकवून हवं ते मिळवतात.
दुशीला भीमराव शेंडे ही तरुणी अशाच लढणाऱ्यांपैकी एक. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातीत कुरखेडासारख्या ठिकाणी एका गरीब दलित शेतकरी-शेतमजुराच्या कुटुंबात दुशीला जन्माला येते, नुसते शिक्षण घेत नाही, तर रात्रंदिवस मेहनत करते, परिस्थितीला शरण न जाता आपल्या जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा देते आणि चक्क एमपीएससी क्रॅक देखील करते…
दुशीला भिमराव शेंडे ( रा. खरमतटोला, देऊळगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) असं एमपीएससी स्पर्धा परीक्षा क्रॅक करणाऱ्या महिलेचं नाव असून 2010 मध्ये त्यांचं लग्न झालं. पती चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमध्ये नोकरीला आहेत. लग्न झाल्यावर घरसंसार सांभाळत दुशीला यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून एमपीएससी क्रॅक केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
दुशीलावर कौतुकांचा वर्षाव
गडचिरोलीसारख्या आदिवासी दुर्गम, नक्षलग्रस्त भागात, जिथे लोकाना रोजच्या जगण्यासाठी धडपड करावी लागते, अशा आदिवासी भागातून दलित समाजात जगताना खूप प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्यातच त्या महिला असतील तर त्यांना जास्तच अडचणींचा सामना करावा लागतो. जातिभेद आणि आर्थिक अडचणी यांचा सामना करत दुशीला भीमराव शेंडे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून जे शिखर गाठलयं ते म्हणूनच कौतुकास पात्र ठरतं.

‘बाईमाणूस’ शी बोलताना दुशीला आपल्या सबंध आयुष्यावर प्रकाश टाकते. दुशीला यांचे प्राथमिक शिक्षण खरमतटोला येथे झालं. ८वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण देऊळगाव येथील विद्या विकास हायस्कूल मध्ये झालं. आरमोरी येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर एन. एच. कॉलेज ब्रह्मपुरी येथे एम. ए. पूर्ण केलं.
दुशीला या घरची सर्वात मोठी मुलगी असून एक भाऊ सी.आर.पी.एफमध्ये कोब्रा कमांडर आहे. तर दुसरा भाऊ सिव्हिल इंजिनियर आणि बहीण एम.एस.डब्ल्यू करत आहे. वडील शेतकरी असून देखील सर्वच मुलांना चांगले शिक्षण दिले.
जिद्द आणि नवऱ्याची खंबीर साथ
दुशीला घरातील सर्वांत मोठी असल्यामुळे त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. परंतु, त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांचा पाया मजबूत केला होता.
अशिक्षित असूनही मुलाना शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन दिले. परंतु 12 वी नंतर डी. एड. ला नंबर नाही लागला म्हणून त्यांचा मनात विचार आला की, पुढे शिकून काय होणार…? ग्रॅज्युएशननंतर तर लग्नच करायचx आहे. त्यामुळे जास्त काही प्रयत्न न करता एमएला प्रवेश घेतला.
एमएच्या पहिल्या वर्षात असतानाच 2010 मध्ये, दुशीलाचे लग्न झाले. लग्नानंतर एका वर्षातच, त्यांच्या पतीला कॅन्सर झाल्याचे कळल्यामुळे त्यांना मानसिक आघात सहन करावा लागला. या परिस्थितीतून बाहेर येणे खूप कठीण होते. कॅन्सरच्या ऑपरेशननंतर काय होईल हे ही त्यांना माहित नव्हते, परंतु त्यांनी आपल्या पतीची साथ सोडली नाही आणि त्यांनी दोघांनी मिळून कॅन्सरला हरवलं. त्यांच्या पतीचे आरोग्य हळूहळू सुधारत गेले. दोन-तीन वर्षांनंतर त्यांनी नव्या जोमाने जीवनाची सुरुवात केली.
लग्नानंतर दुशीलाचे आयुष्य खूप बदलले. त्यांच्या पतीला प्रायव्हेट नोकरी होती आणि त्यामुळे घराचा खर्च फक्त ह्याच पगारावर चालत होता. त्यामुळे आपण काहीतरी करावं असं त्यांना वाटत होत. त्या काही दिवस शाळेत शिकवायला गेल्या, सोबतच त्यांचं ग्रॅज्युएशन लग्नानंतरच पूर्ण झालं.
त्या जेव्हा शिकत होत्या तेव्हा मनात एक विचार आला की, आपण एवढे शिकलो किंवा शिकत आहोत याचा उपयोग काय होणार? तेव्हापासून काहीतरी वेगळं करण्याचं त्यांच्या मनात येऊ लागलं. दुशीलाला काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. पण नेमकं काय हे त्यांना कळत नव्हतं.
त्यांच्या पतीने याचं उत्तर त्यांना दिलं. ते म्हणाले की, एमपीएससी करायचं... लहानपणी काहीतरी मोठं करायचं हे त्यांच स्वप्न आणि नवऱ्याची साथ यामुळे त्यांना नव्याने त्यांच्या विचारांना बळ मिळालं.
कोणताही क्लास न लावता…
2018 पासून, त्यांनी हिमतीने आणि जिद्दीने एमपीएससीच्या परिक्षेची तयारी केली. आर्थिक अडचणींमुळे, त्यांनी कोणतेही शिकवणी वर्ग न लावता स्वतःच अभ्यास केला. 2020 मध्ये त्यांचा निकाल न आल्यामुळे त्या निराश झाल्या आणि डिप्रेशनमध्ये गेल्या. परंतु, त्यांनी हार मानली नाही.

कुटुंबाच्या मदतीने आणि नवऱ्याच्या साथीतून, त्यांनी पुन्हा नव्याने अभ्यास सुरू केला. त्यांच्या घरातील सगळ्यांचा पाठिंबा होता. 2022 मध्ये त्यांनी फॉर्म भरला आणि प्री, मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, 2024 मध्ये त्यांचे पीएसआय पदासाठी सिलेक्शन झाले.
आयुष्यात कुठलीही गोष्ट करायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवत काम करा. शेवटी यश अपयश मिळतेच. पण पूर्ण प्रयत्न करूनही जर तुम्हाला अपयश मिळत असेल तर ते काही यशापेक्षा कमी नाही आणि यश मिळेल हे तर हमखास आपलेच असते.
आपल्या प्रवासात अनेक लोकांचे योगदान असते महिलांना आयुष्यात काही करायचे असेल तर त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरुवात करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
1 ऑगस्टला निकाल लागल्यानंतर, आता लोकं त्यांना भेटायला येत आहेत आणि त्यांनी कसा अभ्यास केला हे जाणून घेऊ इच्छित आहेत. एक साधारण गृहिणीचे जीवन हे फक्त घर सांभाळण्यापुरते मर्यादित नसावे, असे दुशीलाला नेहमीच वाटत होते. त्यांना वाटायचं की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे.
त्यांनी सकाळी उठून घरातील सर्व कामं करून, दररोज लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास केला. त्यांची एक वर्षभराची ही नियमितता, त्यांच्या कष्टांमुळे आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे त्यांना यश मिळाले. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि प्रयत्नांनी त्यांनी समाजात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
आज दुशीला लाखो लोकांसाठी एक उदाहरण आहे. जे कालपर्यंत तिची चेष्टा करायचे, ते आज आपल्या मुलांना तिचे उदाहरण देतात. तिने आपल्या मेहनतीने ‘एखादी गोष्ट करायची जिद्द आणि प्रयत्न करत राहिल्यास प्रत्येक परिस्थितीत यश अपरिहार्य आहे’, हे सिद्ध केले आहे.






