जागतिक पातळीवर अनेक दशकांपासून होणारी वृक्षांची तोड आणि मुख्यत: जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढून जगाचे तापमान तब्बल एक अंशाने वाढले आहे. त्यात या शतकात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या तापमानवाढीचे परिणाम सध्या जगातील सर्वच देश भोगत आहेत. निसर्गाचे चक्र बदलले आहे, हवामानाचा लहरीपणा वाढतोच आहे. ही स्थिती भविष्यात मानवाच्या ऱ्हासाकडेच घेऊन जाणारी आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक संयोजन समितीने हे 2024 सालचे ऑलिम्पिक आजवरचे सर्वांत पर्यावरणपूरक खेळाचे आयोजन असेल, असा दावा केला आहे. पर्यावरणपुरक आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाची हमी देत पॅरिसमध्ये होत असलेली ही स्पर्धा भविष्यातील ऑलिम्पिक यजमानांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पॅरिसच्या आयोजकांनी व्यक्त केलाय.

ऑलिम्पिकच्या आयोजनामधून सामान्यत: कार्बनचे जितके उत्सर्जन होते, ते निम्म्यावर आणण्याचा आयोजन समितीचा निर्धार आहे. टोकियो 2020, रिओ 2016 व लंडन 2012 या सर्व ऑलिम्पिक आयोजनाच्या प्रत्येक वेळी साधारणत: 3.5 दशलक्ष टन इतक्या कार्बनचे उत्सर्जन झाले होते.
हे उत्सर्जन आता निम्म्यावर म्हणजेच साधारण 1.75 टन्सवर आणण्याचे आयोजन समितीचे ध्येय आहे आणि म्हणूनच पर्यावरणपूरक म्हणजेच 'ग्रीन ऑलिम्पिक' असं यंदाचं ब्रीदवाक्य आहे. ते समोर ठेवूनच स्पर्धेची सगळी तयारी करण्यात आली आहे.
पर्यावरणपुरक ऑलिम्पिकसाठी पॅरिस काय करतयं?
- 'ग्रीन ऑलिम्पिक' साठी ऑलिम्पिक व्हिलेज सोडलं तर स्पर्धांचे व्हेन्यू तयार करताना कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आलेलं नाही. उलट पॅरिसमधील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांवर अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. उदा., पॅरिसच्या रॉयल पॅलेससारख्या काही ऐतिहासिक इमारतींमध्ये काही स्पर्धा आयोजित केल्या आहेत; तर आयफेल टॉवर, आंवालिद, त्रोकॅदरो, वर्साय पॅलेस इत्यादी ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांसाठी विविध तात्पुरती स्टेडियम बांधण्यात आली आहेत, जी स्पर्धा संपल्यानंतर काढून टाकली जाणार आहेत आणि त्याचा पर्यावरणाला काही धोकाही होणार नाही. शहरातील ग्रीन स्पेसला धक्का न लावता त्यात आणखी झाडं लावून शहराची हवा शक्य तितकी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

- पॅरिसमध्ये फक्त सेंट डेनिसमध्ये एक्वाटिक्स सेंटर नव्याने बांधण्यात येणार आहे. हे एक्वाटिक्स सेंटरदेखील सौरऊर्जेवर चालणारे आहे. बांधकाम उद्योग हादेखील हरितगृह वायू उत्सर्जित करणारा एक प्रमुख घटक आहे. त्याचा एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये 37 टक्के वाटा आहे.
- पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर करण्यात येत आहे. त्यामध्ये भूऔष्णिक व सौरऊर्जेचाही समावेश आहे. त्याबरोबरच हवामानास अनुकूल अशा अनेक कृती राबविण्यात येत आहेत.
- पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये वनस्पती-आधारित, स्थानिक व शाश्वत अन्नपदार्थांचा प्रचार करण्यात येणार आहे. कारण- अन्न आणि कृषी संघटनेचे म्हणणे आहे की, एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा विचार केल्यास मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे 18 टक्के उत्सर्जन होते. हे ऑलिम्पिक पार पडल्यानंतर खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या सगळ्या पायाभूत सुविधांचाही पुनर्वापर केला जाणार आहे.
- या ऑलिम्पिकच्या बहुतेक स्थळांवर पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा सहज उपलब्ध आहे. पॅरिसमध्ये पर्यटकांसाठी दळणवळणासाठी विशेष सेवाही दिली जाणार आहे. पॅरिसमध्ये एक हजार किमीच्या सायकल मार्गिकादेखील विकसित केल्या गेल्या आहेत. खेळांदरम्यान शहरात वावरण्यासाठी म्हणून तीन हजार सायकल्स भाड्याने वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

- पॅरिसमध्ये सध्या उच्च तापमान आहे. त्यामुळे आयोजकांना खेळाडूंच्या सोईसाठी अडीच हजार तात्पुरते कूलिंग युनिट्स बसवावी लागले आहेत. खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था अगदीच साध्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्यांना झोपण्यासाठी देण्यात येणाऱ्या गाद्या या मासेमारीच्या जाळ्यांचा पुनर्वापर करून बनवलेल्या असणार आहेत.
- ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ऊर्जानिर्मितीसाठी सोलार पॅनल आणि पवनचक्की बनवण्यात आली आहे. पाण्याचा हवा तेवढाच वापर व्हावा यासाठी वॉटर फिक्स्चर्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्रे वॉटर रिसायकलिंग सिस्टीम्स बसवण्यात आल्या आहेत. कचरा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे.
- ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये स्पर्धकांसाठी बांधण्यात आलेली जवळपास सहा हजार घरं स्पर्धा संपल्यानंतर सामान्य नागरिकांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारची परवडणाऱ्या घरांची योजना, विद्यार्थी निवास, शाळा इत्यादी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑलिम्पिक व्हिलेज वापरण्यात येईल.






