सिनेमा आणि टीव्ही आपल्या समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. केवळ मनोरंजनच नाही तर समाजाची समकालीन व्यवस्था, मापदंड, परंपरा आणि वर्तणूक समजण्यासाठीही ते उपयुक्त ठरतात. अनेकदा लोक याचा सूचना मिळवण्याचं साधन म्हणूनही उपयोग करतात. अर्थपूर्ण सिनेमा आणि टीव्ही कार्यक्रमामुळे एकीकडे सामाजिक बदलांना आधार मिळतो तर दुसरीकडे चुकीच्या पात्रांच्या उदात्तीकरणानं समाजातील एखाद्या समूहाला भरकटवण्याचं सामर्थ्यही यांच्यात असतं.
त्यामुळे सिनेमाकारांना पडद्यावर आपली कथा सांगतांना फार सजग आणि जबाबदार राहण्याची गरज असते. खरंतर मनोरंजनाचं जग हे मागणी आणि पूर्तता यावर काम करत असतं. तरीही काही संवेदनशील दिग्दर्शक आणि निर्माता वंचित समुहांना पडद्यावर जागा देत असतात. यात मागील काही वर्षांत एलजीबीटीक्यू समुहाचं चित्रण मोठ्या प्रमाणावर होत आहे.
भारतीय सिनेमा आणि टीव्ही यातून दीर्घकाळ देशातील वैविध्यपूर्ण संस्कृती आणि समाजाचं प्रतिबिंब उमटत आलं आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एलजीबीटीक्यू समुहातील पात्रं मनोरंजनासाठी सिनेमात घेतली जायची. यांना मुख्य पात्राऐवजी सहाय्यक भूमिका मिळायच्या ज्या नायकाच्या अवतीभवती फिरायच्या. क्वियर समुहाला विचित्र आणि संवेदनाहीन पद्धतीनं चित्रपटांमध्ये साकारलं जायचं.
‘शोले’, ‘हम है राही प्यार के’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘दोस्ताना’, ‘मस्तीजादे’, ‘बोल बच्चन’, ‘कल हो न हो’ इत्यादी अनेक चित्रपटांतून एलजीबीटीक्यू समुहाचं विकृत चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून समाजात त्यांच्याविषयी आधीच असलेले पूर्वग्रह आणखी दृढ होऊ लागतात. चित्रपटांत ही पात्रं मनोरंजनासाठी असली तरीही सामान्य प्रेक्षकांवर याचा नकारात्मक प्रभाव पडतो, जो दीर्घकाळ समाजात टिकून राहतो.
ट्रान्सजेंडर समुहाचे असंवेदनशील चित्रण
बॉलिवूडमध्ये ट्रान्सजेंडर समुहाचं चित्रण फारच निराशाजनक राहिलेलं आहे. ज्या चित्रपटांत त्यांना जागा मिळाली त्यात त्यांचा मनोरंजनासाठी किंवा खलनायकी भूमिकेत वावर राहिला आहे. आशुतोष राणा यांनी ‘संघर्ष’ मध्ये केलेली भूमिका असो किंवा ‘सडक’ मध्ये सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असो, दोन्ही हिंसक, आक्रमक, खलनायकी भूमिका आहेत. त्यामुळे ट्रान्सजेंडर समाजाविषयी चुकीच्या धारणा पसरण्यास बळ मिळालं आहे.
‘क्या कूल है हम’, ‘पार्टनर’ आणि ‘मस्ती’ सारख्या चित्रपटांतून ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या लैंगिकतेला नकारात्मक आणि अपमानास्पद पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. टीव्हीवरील लॉफ्टर शोजमध्येही विनोदाच्या नावाखाली होमोफोबिया आणि ट्रान्सफोबियाला मान्यता दिली जाते. पडद्यावरील या चित्रणामुळे लोकांमध्ये चुकीचे संदेश दिले जातात आणि ट्रान्सजेंडर्सविषयी त्यांच्या मनात संशय आणि नकारात्मक भावना तयार होते.
बॉलिवूडमध्ये एलजीबीटीक्यू समुहाचा प्रवास
चित्रपटांत एलजीबीटीक्यू समुहाला प्रतिनिधित्व मिळण्याचा इतिहास टीव्ही ते सिनेमापर्यंत आव्हानं आणि अडचणींनी भरलेला दिसून येतो. अलिकडे त्यात बदल होताना दिसत आहे. 1971 मध्ये आलेला ‘बदनाम बस्ती’ हा चित्रपट क्वियर समुहावरचा पहिला भारतीय चित्रपट समजला जातो. प्रेम कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट त्या काळात एक क्रांतिकारी घटना होती. त्यानंतर 1996 सालच्या दीपा मेहतांच्या ‘फायर’ चित्रपटानं सिनेजगतात आग लावली. क्वियर जोडेपं म्हणून शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी आपल्या अभिनयानं चित्रपट जगात एक वेगळा ठसा उमटवला. याशिवाय ‘अलीगढ’, ‘मार्गरीटा विद स्ट्रॉ’, ‘माय ब्रदर निखिल’, ‘कपूर एंड सन्स’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘बधाई दो’, ‘चंदीगढ करे आशिकी’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांतून क्वियर समुहाचं संवेदनशील चित्रण करण्यात आलं आहे.
त्यांतून त्यांच्या समुहाची समाजातील स्वीकृती आणि संघर्ष आला आहे. टीव्हीवर 2016 मध्ये आलेली ‘द अदर लव्ह स्टोरी’ ही मालिका क्वियर संबंधांवरची पहिली भारतीय मालिका समजली जाते. रुपा राव लिखित आणि दिग्दर्शित या मालिकेत दोन युवतींमधील प्रेमकथा दाखवली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तर ‘मॅरीड वुमेन’, ‘फोर मोर शॉट्स’, ‘मेड इन हेवन’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून एलजीबीटीक्यू समुहांविषयीचं चित्रण सामान्य पद्धतीने करण्यात आलेलं आहे.
या समुहाच्या प्रगतीसाठी सिनेमा आणि टीव्ही यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पण यादृष्टीनं अजूनही फार काही करण्यात आलेलं नाही ही सत्यस्थिती आहे. सुरूवातीला जेव्हा क्वियर समुह आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत होते तेव्हा त्यांना जागा देण्यासाठी सिनेमा आणि टीव्हीने त्यांना मदत केली आहे. पण यांच्या चित्रणात गांभीर्य कमी आणि मनोरंजन व नकारात्मकता जास्त होती. त्यांना जी जागा मिळणं अपेक्षित होती ती जागा त्यांना सिनेमात मिळू शकली नाही. त्यांच्या वास्तविक आयुष्यातला संघर्ष, त्यांचं प्रेम, आनंद-दुःख या गोष्टींना सिनेमात स्थान मिळालं नाही.
सिनेमा आणि टीव्हीत हवी ती जागा न मिळाल्यानं एलजीबीटीक्यू समुहाला आपली बाजू मांडण्याचं, आपली वास्तविक परिस्थिती दाखवण्याची संधी मिळाली नाही. हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा या समुहातील लोकच सिनेमा किंवा टीव्हीवर आपलं काम सादर करू शकतील. तेव्हाच त्यात विश्सवनियता आणि प्रामाणिकता असू शकते. दुसरं असं की चित्रपट हे बहुसंख्य प्रेक्षकांची आवड तसेच बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विचार करूनच तयार करण्यात येतात. यात सामाजिक स्वीकारही महत्त्वाचा असतो.
अनेकदा सिनेमावाले चित्रपटांना वादापासून दूर ठेवण्यासाठी विवादीत मुद्द्यांवर चित्रपट तयार करत नाहीत. समाजमान्य विषयांवरच सिनेमा बनवतात. भारतीय समाजात अजूनही लैंगिक कल आणि लैंगिक ओळख याविषयी उघडपणे चर्चा होऊ शकत नाही. सनातनी धार्मिक समुहांचा विरोध तसंच सेंसर बोर्डची मान्यता मिळण्यातील अडचण यामुळेही अशा विषयांपासून चित्रपट जगत दूरच राहतो.
असं असलं तरी आता एलजीबीटीक्यू समुहाच्या गोष्टींना मुख्य प्रवाहात जागा मिळू लागली आहे. मागील दोन दशकांत या समुहातील अनेक अनेक लोकांनी मुख्य प्रवाहातील कलाकारांसोबत एकत्र येत अनेक संवेदनशील चित्रपट तयार केले आहेत. ओटीटीवर तर हे ठळकपणे दिसून येतं. कारण तिथं सिनेमा आणि टीव्ही यांच्याप्रमाणे होणारा विरोध कमी प्रमाणात असतो. दुसरीकडे देश आणि जगभरात एलजीबीटीक्यू आंदोलनं, त्यांचे अधिकार याविषयी सातत्यानं सकारात्मक गोष्टी घडत आहेत.
क्वियर सिनेमाला समर्पित असलेला पहिला ‘कशीश मुंबई इंटरनॅशनल क्वियर फिल्म फेस्टिवल’ एलजीबीटीक्यू समुहाच्या कथानकांना मंच देणारा महत्त्वाचा प्रयत्न आहे. आता या समुहातील लोकांना सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रांत योग्य ते प्रतिनिधित्व मिळण्याची गरज आहे. तरच त्यांच्या आयुष्यातील कथा वास्तविक रुपात प्रेक्षकांसमोर येऊ शकतील. त्यातून त्यांनाही या समाजात इतरांप्रमाणेच त्यांच्या हक्काचं स्थान मिळू शकेल, त्यांनाही इतरांप्रमाणे हव्या त्या क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी लाभेल, ज्यात न्याय असेल, सर्वसमावेशकता असेल.
(सौजन्य - फेमिनिजम ऑफ इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






