स्त्री आरोग्य हा विषय इतका गहन आहे की स्त्रीच्या जन्मापासूनच तिच्या अस्तित्वावर कायम नकारात्मक छाया पडलेली दिसते. तिने जन्म घ्यावा की नको, इथूनच तिच्या आयुष्याचे निर्णय कोणी दुसरी व्यक्ती ठरवू लागते. 1994 मध्ये याच गोष्टीला म्हणजे गर्भ तयार होण्याच्या आधी आणि एकदा गर्भ बनल्यानंतर, गर्भाची लिंगचाचणी करणे याला कायदेशीर प्रतिबंध करण्यात आला परंतु बेकायदेशीरपणे त्या गोष्टी किती चालतात हे वेळोवेळी उघड होत राहते.
अजूनही उच्च शिक्षित लोक मला विचारत असतात की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये एखादे टेक्निक आहे का की ज्याद्वारे निश्चितपणे मुलाचा गर्भ तयार होईल म्हणून. त्यासाठी पडेल ती किंमत मोजायची त्यांची तयारी असते. तर सांगायचा मुद्दा हा की स्त्रीच्या आयुष्याची सुरुवातच जिथे इतकी संघर्षमय असते, तिथे पुढे नानाविध संघर्ष तिच्या माथी समाजाने लिहून ठेवलेले असतात.
एक डॉक्टर म्हणून मी वेगवेगळ्या पातळीवर स्त्रीच्या आरोग्याची होणारी दुर्दशा पाहते तेव्हा अनेक प्रश्न आणि संताप मनात तयार होत जातो.
ईश्वर मानणे अथवा न मानणे किंवा तुम्ही धार्मिक आहात की नाहीत याची उत्तरे काळ्या पांढऱ्या रंगात कधीच मिळत नसतात. यामध्ये विविध पातळ्या आपल्याकडे पहायला मिळतात. लोकांच्या आयुष्यात देव आणि धर्म किती प्रमाणात आणि कोणत्या रुपात घुसतो हे त्या त्या समाजावर आणि पुन्हा व्यक्तीगतरित्या त्या त्या कुटुंबावर अवलंबून असते. कुटुंब हा शब्द यासाठी वापरते आहे की आपण भारतीय कुटुंब व्यवस्था मानतो.
त्यात भारतीय स्त्री तिचे निर्णय कधीच एकटीने घेऊ शकत नाही. कुटुंबातील व्यक्ती प्रत्यक्षपणे आणि आजूबाजूच्या समाजातील व्यक्ती अप्रत्यक्षपणे तिच्या आयुष्याचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कुटुंब आणि समाज कशाला मान्यता देतो यावर स्त्रीचे भवितव्य प्रामुख्याने अवलंबून असते.
धर्म माणसाच्या आयुष्यात नाना प्रकारे अवतरतो. भारतात असलेले धर्म, हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख आणि धर्म न मानणारे परंतु इतर गोष्टींचे अस्तित्व मानणारे आदिवासी लोक या सर्वांमध्येच त्यांच्या देवाबद्दलच्या आणि धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतींमुळे स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या समस्या विविध प्रमाणात दिसून येतात. काही समस्या या स्त्री पुरुष दोघांनाही भोगाव्या लागतात तर काही समस्या या ती व्यक्ती केवळ स्त्री आहे यामुळेच तिला भोगाव्या लागतात.
कोणाला काही आजार झाला की नवस बोलणे, मंदिरात पूजा करवणे हे प्रकार आपण पाहतोच. परंतु एक फरक दिसून येतो की पुरुषासाठी नवस वगैरे चालू असताना, बहुतांश पुरुषांना दवाखान्यात नेऊन, उपचार चालू केलेले असतात.
स्त्रियांच्या बाबतीत मात्र पहिलेच तिने पुष्कळ दिवस आजार अंगावर काढलेला असतो. त्यात तिला कुपोषण आणि रक्तक्षय या व्याधी जास्त असतात. आजार सुरु झाल्यावर जास्त दिवस देव देव केले जातात. जेव्हा प्रकृती जास्त ढासळते तेव्हा तिला दवाखान्यात नेले जाते. अनेकदा आजार इतका वाढलेला असतो की उपचारांचा फायदा फारसा होत नाही. नवस बोलणे हे जसे आपल्याकडे नित्याचे आहे त्यापेक्षा जास्त उपास तापास करणे हे.
मी बनारसला गेले असताना, आम्ही मेडिकल कॅम्प घेतला होता. मी महिलांना औषधे लिहून देत होते, तेव्हा त्या म्हणायच्या की आज उपवास आहे तर आम्ही दुसऱ्या दिवशी औषधे घेऊ. ते ऐकून मी वैतागायचे,की आज जर ताप असेल तर आजच गोळी खावी लागेल ना.
आज उपवास करत, ती बाई ताप अंगावर काढणार, शरीरात असलेला जंतूसंसर्ग antibiotic आज न खाल्ल्याने उद्यापर्यंत आणखी वाढणार. बरं, आठवड्यातून तीन चार वेळा तिथल्या बायका उपवास करायच्या. म्हणजे प्रश्न एक दिवसाचा नाही. मग अशाने त्यांचे उपचार व्यवस्थित कसे होतील बरं ? मी त्यांना शेवटी लिस्ट बनवायला लावली की त्यांचे महिनाभरात आणि पर्यायाने वर्षभरात किती उपवास येतात म्हणून.
इतकी मोठी ती लिस्ट. मग त्यांना म्हणाले पुरुष किती वेळा उपवास करतात ? वर्षातून दोन की तीन वेळा. ती इतकी मोठी तफावतच डोळे उघडणारी होती.
हिंदू धर्मात जशी देवासाठी करण्यात येणाऱ्या उपवासाची पद्धत आहे तशी मुस्लीम लोकांत रमजानमध्ये रोजे करण्याचा नियम. मी औरंगाबादमध्ये काही दिवस काम करत होते तेव्हा रमजानच्या महिन्यात गर्भवती महिला यायच्या तेव्हा सोबत सासू असायची. पण मी तपासणीसाठी त्यांना बाजूला नेले की एकांतात मला त्या सांगायच्या, की त्यांना रोजे करणे होत नाहीये आणि मी त्यांच्या सासूला डॉक्टर म्हणून अधिकारवाणीने सांगावे की यांना रोजे करू देऊ नका म्हणून.
ते ऐकून मला खरेच या मुस्लीम मुलींची काळजी वाटायची. खरेतर मुलगी वयात येताना मासिक पाळी सुरु होते तेव्हा त्या वाढत्या वयात तिला पोषक आणि जास्त आहाराची गरज असते. तसेच गर्भवती महिलेलासुद्धा जास्त मात्रेमध्ये पोषक आहाराची गरज असते. अशा गरजेच्या काळातच स्त्रियांना योग्य आहारापासून वंचित ठेवले गेले तर त्यांना कुपोषण, रक्तक्षय, अंगदुखी, थकवा, नैराश्य, नको त्या वयात पोक्तपणा हे सर्व त्रास भोगावे लागतात.
मुलीला पाळी येण्याचा जो काळ असतो, तेव्हा खरेतर तिला मानसिक आधार आणि समजून घ्यायची गरज असते. पण त्याच काळात विटाळ आणि देवापासून लांब रहा, तुझे शरीर अपवित्र आहे अशा चुकीच्या समजुती तिच्या मनावर ठसवल्यामुळे मुलींचा आत्मविश्वास कायमसाठी कमी होतो.
स्त्रीची मासिक पाळी आणि गर्भधारणा हे विषय सुरुवातीपासूनच मनुष्याला गूढ वाटत आले आहेत. त्यामुळे त्याभोवती अनेक धार्मिक श्रद्धांचे जाळे गुंफले गेलेले आहे. मासिक पाळी म्हणजे विटाळ हा तर सर्वानीच अनुभवलेला प्रकार.
आजच्या एकविसाव्या शतकात अनेक स्वतः डॉक्टर असलेल्या स्त्रियासुद्धा या गैरसमजुती पळताना दिसतात. कोणी म्हणेल की याचा आणि आरोग्याचा काय संबंध ? तर संबंध असा की अशा निरनिराळ्या चुकीच्या धार्मिक समजुतीमधून स्त्रीला स्वतःच्या अवयवांबद्दल लाज बाळगायला शिकवली जाते. त्यातून होते असे की अनेक आजार सुरु झाले तरी या लाजेखातर स्त्रिया दवाखान्यात तपासणीसाठी जात नाहीत. आजार जेव्हा बळावतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, बाकी जननांगांचे कर्करोग हे यातूनच वाढत जातात. हे कर्करोग होऊन नयेत यासाठी लससुद्धा आहे परंतु आपल्यापैकी किती लोकांना त्याची माहिती आहे ? अशी लस किंवा pap ची वेळोवेळी आवश्यक असणारी तपासणी याबाबत आपल्याकडे मुळीच जागरूकता नाही.
शहरांत किंवा शिकलेल्या कुटुंबात पण स्त्रीच्या या तपासण्या करून घ्याव्यात अथवा कर्करोग प्रतिबंध करणारी लस घ्यावी ही काळजी नाही. कधी मी भाषणात हे सांगितले तर हे फ्रीमध्ये मिळावे इकडे कल असतो. महाग आहे या सबबीखाली टाळले जाते. तेव्हा मला खरेच आश्चर्य वाटते की स्त्रीच्या आरोग्यावर खर्च करायच्या वेळीच लोकांना हे सगळं आठवतं का ?
हिंदू धर्मात जसा मासिक पाळीभोवती विटाळ आहे तसा मुस्लीम समाजात सुद्धा पाळीमध्ये मुलीला नमाज पढायला मज्जाव असतो. ख्रिश्चन धर्मात तर संततिनियमन करणे आणि गर्भपात करणे हे धर्मविरोधी वर्तन मानले गेले आहे. याचाच अर्थ मूल हवे असेल तरच सेक्स करा, आणि सेक्समधून गर्भ राहिला तर तो जन्माला घातलाच पाहिजे ही सक्ती.
संततिनियमन हे खरेतर स्त्रियांसाठी मोठे वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया नको असलेल्या गर्भधारणेपासून स्वतःचा बचाव करू शकतात. कारण शेवटी सेक्समध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही सहभाग घेत असले तरी शारीरिक जडणघडणीमुळे शेवटी स्त्रीच त्यात अडकते. नको असलेल्या गर्भाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम तिलाच झेलावे लागतात.
त्यामुळे संततिनियमनाच्या साधनांचा शोध हा स्त्रीसाठी मुक्तिदायी ठरला. परंतु ख्रिश्चन धर्म अजूनही ते कसे धर्मविरोधी आहे यातच अडकून पडल्याने, आजही बहुतेक सर्व मिशनरी रुग्णालयांत गर्भपात सुविधा उपलब्ध नसते. धर्मासाठी स्त्रीला ही सुविधा नाकारणे हेच खरेतर अमानवी वर्तन आहे.
मी छत्तीसगडमध्ये आदिवासी भागात काम करत असताना, तिथे स्त्रिया गर्भ राहू नये म्हणून जंगली बुटी खायच्या, ज्याचा अर्थातच काही उपयोग व्हायचा नाही. तिथे मासिक पाळीचे आजार ही काळी जादू मानली जाते, त्यामुळे त्यासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी सिरागुनियाकडे नेले जाते.
सिरागुनिया म्हणजे आदिवासींच्या देव देवतांशी संबंधित व्यक्ती जी काही प्रकार करून, म्हणजे चटके देणे, दातांनी चावे घेणे, तसेच जंगली मुळी, वनस्पतीचा पाला देऊन आजार ठीक करण्याचे दावे करते. आजार जास्त गंभीर असेल तर रुग्ण अनेक दिवस तिथे मुक्कामसुद्धा करतात.
हाच प्रकार मी गडचिरोली जिल्ह्यातही पाहिला होता. मलेरिया झालेले अनेक रुग्ण तिथे राहायचे आणि मलेरिया मेंदूत पोहोचून बेशुद्ध झाल्यावर मग रुग्णाला दवाखान्यात आणले जाते. यात लहान मुले आणि गर्भवती बायका यांना सर्वात जास्त धोका असतो.
मला पूर्वी वाटायचं या अशा टोकाच्या अंधश्रद्धा फक्त आदिवासी भागांत आहेत. परंतु बार्शी या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात प्रगती केलेल्या तालुक्याच्या गावीसुद्धा अनेक देवऋषी आहेत हे इथले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मस्तूद सर यांच्याकडून समजले.
मानसिक आजार हे शारीरिक आजारापेक्षा अतिशय वेगळे आणि गूढ भासणारे असल्याने, त्याच्या उपचाराकरिता अजूनही आपल्याकडे देवऋषी किंवा मुस्लीम पीर यांच्याकडे नेण्याची पद्धत आहे. त्यात रुग्णाला औषधोपचार तर मिळतच नाही. उलट तिथे रुग्णांवर शारीरिक अत्याचार होतात. त्यातून आजार वाढत जातो ते वेगळेच. स्त्रियांना प्रसुतीनंतर होणारा नैराश्याचा आजार कमी अधिक प्रमाणात अनेक स्त्रियांमध्ये आढळून येतो.
आपल्याकडे त्याबाबत फारशी जागरुकता नाहीये. परंतु काही टक्के स्त्रियांमध्ये मात्र हा आजार टोकाला जात त्याचे रुपांतर सायकोसिस म्हणजेच तीव्र भ्रमसदृश्य मनोविकारात होते, ज्यात स्त्री स्वतः आत्महत्या करू शकते किंवा बाळाचा जीव घेऊ शकते. ग्रामीण भागात अशा मृत्यू पावलेल्या स्त्रीला हडळ मानतात आणि पुढे कोणा स्त्रीला तसा आजार झाल्यास हडळ लागली म्हणतात.
खरेतर स्त्रीच्या या आजाराची खूप सारी कारणे तिला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीत, तिच्या आरोग्याकडे केले गेलेले दुर्लक्ष आणि समाजाची तिच्या प्रती असलेली असंवेदनशीलता यात आहे. परंतु शहरी भागात सुद्धा या आजाराबद्दल फारसे प्रबोधन झालेले नाही.
आपले होते काय, विटाळ, अंधश्रद्धा या गोष्टी फक्त ग्रामीण भागांत चालतात असा मोठा गैरसमज आहे. परंतु शहरी भागात वेगळ्या रुपात आकारास आलेल्या अंधश्रद्धा या तितक्याच नुकसानकारक आहेत. राम मंदिराचे उद्घाटन ठरले तेव्हा त्याच तारखेदिवशी अनेक कुटुंबांनी घरातील स्त्रीची सिझेरियन शस्त्रक्रिया करवून घेतली. का तर पवित्र दिवस म्हणून.
इतक्या मोठ्या मूर्खपणाला काय बोलणार ? जर उद्या सर्वच लोकांनी धर्मवेडे होऊन असा प्रकार करायचे ठरवले तर आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊन, ज्या रुग्णांना खरेच गरज आहे परंतु या गर्दीत नंबर लावायला पैसे नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार. आणि पैसे मोजून जे लोक ही अतार्किक मुर्खांची गर्दी निर्माण करत आहेत, त्यात कोणा स्त्रीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण ? शिक्षित लोक आजसुद्धा अनेक गोष्टींसाठी कुंडली बघतात.
पूजा घालतात. कुठलेतरी गुरु शोधून त्यांच्या पायांवर पैसा ओतला जातो. डॉक्टर पैसे उकळायला बसले आहेत असे म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, डायबेटीस, बिपी याची औषधे टाळली जातात. आजकाल तर कर्करोगासाठी पण देवाचे अंगारे, कसल्या कसल्या पावडरी दिल्या जातात. धार्मिक गुरूचा सल्ला किंवा ब्राह्मणाने घरी घातलेली पूजा महत्वाची मानली जाते. आणि इतके करून कोणी व्यक्ती मेली तर देवाची इच्छा म्हणून स्वीकारले जाते.
आरोग्य म्हणजे काय ? WHO म्हणजेच World Health Organisation ही जागतिक संघटना सांगते की आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे किंवा रोगमुक्त असणे असे नाही. तर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे.
तर हे असे सर्वांगीण आरोग्य खरेच आपल्या देशातील स्त्रीला मिळते का ? मध्ये कर्नाटकात नियम केला होता की मुस्लीम मुलींनी बुरखा घातला तर त्यांना शाळेत प्रवेश नाही. असा नियम काढण्याने, कट्टर धार्मिक घरातील काही मुली शिक्षणाला कायमच्या मुकतील हे जर आपल्याला कळत नसेल तर आपल्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. असे नियम बनवण्याने धर्मांधता संपणार नाही.
त्यासाठी उलट आपल्याला असे सर्वांगीण शिक्षण द्यावे लागेल ज्याने अपोआप उद्याचे तरूण डोळस आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारे घडतील. पण तसे होते आहे का ? उलट आता हिंदू धर्मसुद्धा कट्टर होत चालला आहे, ज्याने भविष्यात हिंदू स्त्रियांचे स्वातंत्र्य धोक्यात येऊन, प्रगतीचा गाडा दहा पावले मागे जाऊ शकतो.

हिंदू धर्मात विधवा स्त्रीला ज्या पद्धतीने आजही अपमानित केले जाते त्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर काहीच परिणाम होत नसेल का ? ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पूर्वीच्या काळात पुण्यातील गर्भवती विधवा ब्राह्मण बायकांना निवारा दिला, मदत केली म्हणून त्या बाया त्या त्रासातून सुखरूप जिवंत तरी राहिल्या.
सुधारक विधवा पुनर्विवाहबद्दल बोलायचे तर त्यांच्यावर ब्रिटीशांच्या मदतीने धर्मात लुडबुड केल्याचे आरोप व्हायचे. एवढेच कशाला, साधी स्त्री शिक्षणाची गोष्ट निघाली तरी स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल असे तेव्हा पंडित लोक बोंबा ठोकत होते. त्यामुळे धार्मिक कट्टरता स्त्रीची गळचेपी केल्याशिवाय राहणार नाही हे अटळ सत्य आहे. सन 1882 साली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा निबंध लिहिला.
त्या काळात ती बाई निर्भीडपणे धर्माचा बुरखा फाडत वस्तुस्थिती लिहिते पण आपण मात्र आजच्या एकविसाव्या शतकातसुद्धा मूग गिळून गप्प बसतो. त्या सांगतात की लोक बुवाची तारीफ कशी करतात तर, ‘आमचे महाराज फार साक्षात्कारी आहेत.
परवा उजाड गावचे पाटलाला अगदी मूल नव्हते. पण बुवांनी विभूती दिली मात्र, झाला त्याला मुलगा, असे हे बुवा मोठे चमत्कारिक आहेत. कोणाचा कसा का रोग, भूतबाधा असेना.
यांचे दर्शन झाले की पुरे, सर्व नाहीसे होते. असे हे प्रत्यक्ष सांभाचा अवतार.’ पुढे त्या म्हणतात, ‘आता हा इतका बावांचा डौल वरपांगी झाला. पण बुवाचे अंतर्यामी जर कोणी पाहील तर तेथे स्त्री व धन यांच्या लोभाचे दोन प्रज्वलित जाळ दृष्टीस पडतील.’
हे सगळे लिहित असताना ताराबाई त्या काळातील वर्तमानपत्रात आलेली बातमी सांगतात, ‘एका बाईस मूल होत नव्हते तेव्हा कोणी कुचिष्ट भोंदू देवरूषानी तिला लहान मुलाचे *** गुळाबरोबर खाल्ल्याने गर्भवती होशील असे सांगितले आणि तिने ते केले.
पुढे त्याचा सर्वत्र बोभाटा होऊन नवऱ्याने तिची पाठ लाकडाने खूप नरम केल्यावर जनापवाद चुकवण्याकरिता तिने जीव दिला.’ आता तुम्ही म्हणाल, की ही घटना 1882 मध्ये लिहिलेली आहे. परंतु आजच्या काळातसुद्धा ही घटना वेगवगेळ्या रुपात घडतच आहे. गंमत म्हणजे प्रत्येकाला वाटते की माझ्या घरात हे घडत नाही. पण प्रत्येकाने स्वतः चे प्रामाणिक आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
श्रद्धा कुठे संपते आणि कुठे अंधश्रद्धा सुरु होते ही जी सीमारेखा आहे, ती फार धूसर आहे. त्यामुळे मला स्पष्ट वाटते, कोणाला श्रद्धेपायी काही प्रयोग करायचेच असतील तर स्वतःच्या शरीरावर करून घ्यावेत.
श्रद्धा ही त्या त्या व्यक्तीपुरती मर्यादित ठेवावी. जेव्हा ती कुटुंबावर किंवा स्वतः च्या पोराबाळांवर, बहिणीवर लादली जाते तेव्हा त्याचे दुष्परिणाम दुसऱ्याला भोगावे लागतात. त्यामुळे श्रद्धा ही वैयक्तिक ठेवावी. पण अर्थात आपली कुटुंब संस्था आणि समाज, हे दोन्हीही पुरुषसत्ताक असल्याने धर्म स्त्रीवर नियंत्रण ठेवू पाहतो, तर काही ठिकाणी तिचे शोषणसुद्धा करतो.
त्यामुळे स्त्री आरोग्याचा प्रश्न केवळ आजार आणि औषधे इतका मर्यादित पातळीवर न पाहता, तो सर्वांगीण आरोग्याच्या पातळीवर जाऊन पाहिला, तरच स्त्रीला खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य कसे मिळू शकेल, याचा आपल्याला विचार करता येईल.
(सौजन्य - प्रेरक ललकारी)






