(किरण गिते)
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने काल सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत एक गाणं अपलोड केलं… गाण्याचे शब्द होते, satisfied… ‘मी समाधानी आहे’ अशा आशयाचं ते गाणं होतं…
‘’ती वाघिणीप्रमाणे लढली. मी तिला बंगालची वाघीण म्हणायचो. मी तिला सॅल्युट करतो. सत्याचा विजय होईल हे मी तेव्हाही म्हटलं होतं आजही मला हेच वाटतं आहे की सत्याचा विजय झाला.”’’ अशा शब्दांत रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी तिचं कौतुक केलं…
ही तिच रिया चक्रवर्ती आहे जिच्यावर टीव्ही चॅनल्स, सोशल मीडिया अक्षरश: गिधाडांसारखा तुटून पडला होता… ही तिच रिया चक्रवर्ती आहे जी या देशातल्या ‘मीडिया ट्रायल’चं सर्वांत भयंकर उदाहरण होती…आणि ही तिच रिया चक्रवर्ती आहे जिने ‘मला आत्महत्या करावीशी वाटते’’ असं जेव्हा म्हटलं तेव्हा या समाजाने तिला 'तुला कोण थांबवतं आहे', 'आम्ही तर वाट बघतोय', 'सुसाईड लेटर लिहायला विसरू नको' असं इतक्या खालच्या स्तरावर जाऊन ट्रोल केलं होतं.
रिया म्हणते, आता मी समाधानी आहे…
… आणि म्हणूनच 14 जून 2020 पासून इतकं सगळं सहन केल्यानंतर रिया चक्रवर्ती आपल्या सोशल मीडियावर आता ‘मी समाधानी आहे’ असं म्हणते. 14 जून ही तिच तारिख आहे ज्यादिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांत सारख्या चांगल्या कलाकाराने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली होती. रिया ही सुशांत सिंहची त्यादरम्यान गर्लफ्रेंड होती आणि सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही दिवस अगोदरच त्या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
रियानं सुशांतला आत्महत्येसाठी भाग पाडलं असा आरोप करत सुशांतच्या वडिलांनी पटना पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. 'रियानं सुशांतच्या पैशांचा गैरवापर केला, त्याच्यावर अंमली पदार्थांचा प्रयोग आणि त्याला कुटुंबापासून तोडलं' असे आरोपही त्यांनी केले होते. याच आरोपाखाली रिया चक्रवर्तीला तब्बल सहा आठवडे तुरुंगाची हवा खावी लागली होती.
रियाला क्लीन चिट
आज पाच वर्षानंतर अखेर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सीबीआयने देखील आता ही आत्महत्याच असल्याचं म्हटलेलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर संशय होता. त्यामुळे तिला अटक देखील करण्यात आलेली होती. मात्र, सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिल्याची माहिती रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेली आहे.
सुरुवातीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहारच्या पाटणा येथे तक्रार दाखल केली. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये अधिकार क्षेत्रावरून वाद झाल्यानंतर बिहार सरकारच्या शिफारशीवरून हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली होती. त्यानुसार 19 ऑगस्ट 2020 रोजी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.
‘’रोजच्या 'जाचा'पेक्षा एका रांगेत उभं करून गोळ्या का नाही घालत’’?
आता आपण पुन्हा रिया चक्रवर्तीकडे वळू या…सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पहिल्यांदाच मीडियाला मुलाखत देताना रियाने म्हटलं होतं की गेल्या काही महिन्यात त्यांच्यावर जे 'निराधार' आणि 'खोटे' आरोप करण्यात आले त्यामुळे त्या स्वतः आणि त्यांचं कुटुंब इतक्या मानसिक तणावात आहेत की त्यांना आत्महत्या करावी वाटते. मुलाखतीत एका ठिकाणी ती म्हणते की रोज-रोजच्या 'जाचा'पेक्षा आम्हा सर्वांना एका रांगेत उभं करून गोळ्या का नाही घालत?
त्या मुलाखतीत रियाच्या हावभावावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यापाकी काही इथे देत आहोत…
-'ती कॅज्युअल आणि कॉन्फिडंट वाटते.'
-‘पॅनिक अटॅक आणि अँक्झायटीविषयी बोलते, पण तसं दिसत मात्र नाही.' 'तिला अजिबात दुःख नाही.'
-'ती आपलं हसू लपवण्याचा प्रयत्न करत होती'.
रियाचे कोठडीतले दिवस…
तुरुंगात घालवलेल्या त्या कठिण दिवसांबद्दल रियाने एका मुलाखतीत भाष्य केले होते. तिथे तिने दिवस कसा घालवला, पहिल्याच दिवशी तिला जेवायला दिले आणि शौचालयाची सुविधा कशी होती यावर ती बोलली. रिया चक्रवर्तीने लेखक चेतन भगतच्या शोमध्ये तुरुंगातील अनुभव शेअर केला होता. तिने 'डीपटॉक विथ चेतन भगत'मध्ये सांगितलं, 'कोविड प्रोटोकॉलमुळे मला 14 दिवस तुरुंगात वेगळ्या खोलीत राहावं लागलं. त्या खोलीत मी एकटीच होते. मला दुपारी जेवायचे आहे का असे विचारले. मला त्यावेळी इतकी भूक लागली होती की मला त्यांनी जे काही दिलं ते खाल्लं.'
जेव्हा चेतन भगतने रिया चक्रवर्तीला कारागृहातील टॉयलेटची काय अवस्था होती असे विचारले तेव्हा ती म्हणाली, 'तुम्ही जिथे झोपता त्याच्या शेजारीच टॉयलेट होते. त्यांची स्थिती चांगली नव्हती. तुरुंगात राहणे सर्वात कठीण आहे. मानसिक आघात इतका गंभीर असतो की त्याच्या तुलनेत शारीरिक आघातही फिके पडतील.
रिया चक्रवर्तीने सांगितले की, जेलमध्ये तिला सकाळी 6 वाजता नाश्ता, 11 वाजता दुपारचे जेवण आणि 2 वाजता रात्रीचे जेवण दिले जात होते. रियाच्या म्हणण्यानुसार, ते कैद्यांसाठी सकाळी 5 वाजता गेट उघडायचे आणि संध्याकाळी 5 वाजता बंद करायचे. 'बहुतेक लोक रात्रीचे जेवण साठवायचे आणि ते रात्री 7-8 वाजता खायचे. मी माझी संपूर्ण दिनचर्या बदलली. ते खायला जमणार नव्हतेच. गरम असते तर थोडे तरी खाल्ले गेले असते. त्यामुळे मी पहाटे 4 वाजता उठू लागले आणि दुपारी 2 वाजता जेवू लागले.'
असे सुरू झाले करिअर
रिया चक्रवर्तीचा जन्म 1 जुलै, 1992 रोजी बंगळुरूमध्ये झाला. तिने आपले करियर 2009 मध्ये छोट्या पडद्यावरील MTV TVS Scooty Teen Diva ' पासून केली होती. ती या शो ची विजेता बनू शकली नाही पण रनरअप म्हणून तिला समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एमटिव्हीचे काही शो बोस्टून करताना ती दिसली. त्यानंतर रियाने बँड बाजा बारातसाठी ऑडिशन दिले होते पण तिला रिजेक्ट केले आहे. रियाने आयुष्मान खुरानासोबत 'ओये हिरीये' या म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे.
बॉलिवूडमध्ये नशिबाने साथ दिली नाही म्हणून रियाने दक्षिणेकडे मोर्चा वळवला. 2012 मध्ये तिचा तेलुगु चित्रपट 'तुनिगा तुनिगा' रिलीज झाला होता. त्यानंतर एका वर्षानंतरच त्याने 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोन्ही चित्रपट चांगले चालले नाहीत. 2014 मध्ये चारुदत्त आचार्य दिग्दर्शित आणि रमेश सिप्पी आणि रोहन सिप्पी निर्मित, 'सोनाली केबल' हा देखील रियाच्या कारकिर्दीतील एक फ्लॉप चित्रपट होता.
त्यानंतर 2017 मध्ये अभिनेत्रीने रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉयसोबत नशीब आजमावले. बँक लुटमारीवर आधारित 'बँक चोर' या चित्रपटात ती दिसली होती. हा चित्रपटही फ्लॉप झाला. पुढच्या वर्षी 2018 मध्ये ती जलेबी या रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसली. रिया चक्रवर्तीच्या कारकिर्दीतील हा चित्रपटही फ्लॉप ठरला. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर, अभिनेत्रीचा अमिताभ बच्चनसोबतचा चेहरा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला, तो देखील फ्लॉप झाला.
रिया कशी आली सुशांतच्या आयुष्यात?
रिया चक्रवर्ती 2013 मध्ये सुशांत सिंगला भेटली होती. त्यावेळी तो 'शुद्ध देसी रोमान्स' हा चित्रपट करत होता. त्यानंतर रिया 'अपने पिता की मारुती' या चित्रपटात काम करत होती. दोन्ही चित्रपटांचे सेट जवळपास होते. रिया आणि सुशांत पहिल्यांदाच भेटले होते. यानंतर रिया आणि सुशांत अनेक पार्ट्यांमध्ये भेटले आणि त्यांची मैत्री झाली. मैत्रीनंतर ते एकमेकांच्या जवळ आले.
यानंतर रिया आणि सुशांतने एकमेकांचे नंबर घेतले आणि भेटीगाठी सुरूच राहिल्या. रियाने नुकतेच सांगितले होते की, सुशांत त्यावेळी आधीच रिलेशनशिपमध्ये होता. जरी तो रियाच्या संपर्कात होता. रिया सांगते की ती आणि सुशांत 2017-18 मध्ये एका प्रॉडक्शन हाऊसमधून वेगळे झाले आणि वेगवेगळ्या बॅनरसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले.






