- भागा वरखडे
मराठी साहित्यातील संवेदनशील आणि होतकरू युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी आधुनिक तरुण पिढीच्या भावविश्वाचं आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचं प्रामाणिक आणि मार्मिक चित्रण करते.
मुंबईच्या चाळीतील जीवन, बदलते सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि तरुण मनातील भावनिक हुंदके यांचं प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या कृती हळूहळू चिंतनशील आणि अस्तित्वाच्या शोधाकडं वळतात. त्यामुळं ही कादंबरी नव्या पिढीचा सशक्त आवाज मानली जाते.
कोकरे यांचं लेखन ग्रामीण आणि शहरी जीवनातील बारकावे तसंच आधुनिक तरुणांच्या भावनांचं गहन चित्रण करते. त्यांची साधी; पण प्रभावी लेखनशैली वाचकांना अंतर्मुख करते. कोकरे हे वास्तवदर्शी लेखक असून समाजातील गरीबी, बेरोजगारी, दुर्बल, उपेक्षित घटकांचं जीवनदर्शन त्यांच्या साहित्यात घडतं. त्यांचं लेखन हे सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारं, त्यावर परखड भाष्य करणारं असतं. मुंबईतील वडाळ्यात राहणाऱ्या एका साहित्यिकानं खूपच कमी वयात साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांचं नाव प्रदीप कोकरे ! 
कोण आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेले प्रदीप कोकरे?
मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर, कोकरे यांची शब्दांबद्दलची आवड आणखीच वाढत गेली. ‘मुंबई शहरावर लिहिलेल्या मराठी कवितांचा अभ्यास’ या विषयावर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ते पीएच. डी करत आहेत.
त्यांच्या या संशोधनामुळं मुंबई आणि सांस्कृतिक जडणघडण यावर प्रकाश टाकला जाईल, ही खात्री आहे. युगवाणी, खेळ, मुक्त शब्द, अभिधानंतर, कवितारती, लोकसत्ता, काव्याग्रह, वर्णमुद्रा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. तसंच लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेचे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी प्रदीप यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रतिष्ठित वृत्तपत्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीस 2022-23 सालची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ देण्यात आली होती ‘माझा साहित्यिक प्रवास वृद्धिंगत राहण्यासाठी ही फेलोशीप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे’ असं मत प्रदीप यांनी वेळोवेळी व्यक्त केलं आहे. जीवन आणि संस्कृती यांची सांगड घालत साहित्यविश्व जगणारे नव्या दमाचे अभ्यासक, लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. कोकरे यांना ‘कादंबरी’ या साहित्य प्रकारासाठी पहिला यशवंतराव चव्हाण सेंटरचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देण्यात आला होता.
संबंधित लेख वाचा: 1) विख्यात साहित्यिक महादेव देवानूर म्हणतात, मी शिरच्छेद करेन त्यांचा, जे देवाच्या नावावर… |
‘खोल खोल. दुष्काळ डोळे ’ ही एका संवेदनशील कवी मनाच्या तरुणाच्या उमेदवारीचे दिवस रेखाटणारी कादंबरी आहे. स्थैर्य, सुरक्षितता न गवसलेल्या आणि बुड टेकण्याच्या धडपडीतल्या दिवसांच्या या जणू नोंदी आहेत. या कादंबरीतल्या नायकाचा प्रवासही भटका आणि भणंग 'एका झाडाची सवे न व्हावी : एका स्थानाची सवे न व्हावी :’ असा आहे.
जगण्याच्या घुसळणीत शब्दांना सत्व बहाल करणाऱ्या तुकारामापासून ते आवाजात कारुण्य साकळलेल्या मुकुल शिवपुत्रापर्यंत अशा अनेक गोष्टी या नायकाला बळ पुरवणाऱ्या आहेत. वेढलेली परात्मता, दुःख, स्वार्थ, प्रेम, निराशा अशा विविध प्रवृत्तींचं प्रतिबिंब इथं दिसतं. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक, विस्कळीत वाटणाऱ्या उठाठेवी एका निर्णायक वळणावर चिंतनशीलतेचा टप्पा गाठतात आणि ठाव न गवसलेला हा प्रवासही अस्तित्वशोधाच्या बिंदूपर्यंत येऊन पोहोचतो.
व्यर्थतेतही अर्थपूर्णता शोधणारी 'खोल खोल दुष्काळ डोळे' ही कोकरे यांची कादंबरी म्हणजे आजच्या एका पिढीचा महत्त्वाचा प्रातिनिधिक स्वर आहे. गेल्या काही वर्षात तरुणांसमोर जगण्याचा संघर्ष आणि अस्तित्वाचं संकट गडद होत चाललं आहे. एक विचित्र घुसमट युवा सहन करत आहे. ग्रामीण भागातील युवक हे सगळे प्रश्न जवळून पाहताहेत. ते प्रश्न जवळून अनुभवल्यानं ते वेगळ्या धाटणीनं लिहिण्याचा प्रयत्न कोकरे यांनी केला आहे. त्याला साहित्य अकादमीचा मिळालेला युवा पुरस्कार ही जाणकार व्यक्तीनं पाठीवर दिलेली थाप आहे.
(प्रदीप कोकरे)
कोण आहेत बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेले डॉ. सुरेश सावंत?
डॉ. सावंत हे मराठीतील ज्येष्ठ बाल साहित्यकार आणि कवी असून, त्यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहास मराठी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. सावंत यांच्या लेखनाची भाषा अत्यंत साधी, भावपूर्ण आणि कल्पनाशील असून ती मुलांना सहज समजणारी आहे. त्यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहातील रचना मुलांच्या कल्पनाविश्वाला साद घालणाऱ्या आहेत.
निसर्ग, आकाश, स्वप्नं आणि बालमनाच्या भावविश्वाशी निगडित असलेल्या या कविता मुलांना आनंद, समज, आणि सौंदर्यदृष्टी देतात. त्यांच्या कविता लयबद्ध व सहज असून त्यामुळं त्या मुलांना आवडतात आणि आठवतात. डॉ. सावंत हे केवळ कवी नाहीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्य संशोधकही आहेत. त्यांनी ‘बालसाहित्याचा इतिहास’, ‘आंबेडकरी साहित्य’, ‘समाजपरिवर्तनाचे साहित्य’ अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. त्यांच्या ‘नंदादीप’, ‘टिंबूपट’ यांसारख्या पुस्तकांनी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
बालसाहित्याच्या शास्त्रीय अभ्यासाला हाताळत त्यांनी अनेक ग्रंथांचं संपादन आणि संशोधनपर लेखन केलं आहे. विद्यापीठ पातळीवरही त्यांचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. त्यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहानं बालवाचकांमध्ये नवदृष्टिकोन विकसित केला आहे. साहित्य अकादमीनं 23 भारतीय भाषांतील यंदाच्या युवा आणि बालवाङ्मय पुरस्कारांची घोषणा केली. मराठी भाषा विभागात डॉ. सावंत यांच्या आभाळमाया या कवितासंग्रहाची निवड झाल्याचं जाहीर झाल्यानंतर सावंत यांच्या नांदेडसह ठिकठिकाणच्या साहित्यिक, प्रकाशक स्नेहीजनांनी आनंद व्यक्त केला. डॉ. सावंत यांची पुस्तक लेखनाची कारकीर्द अर्धशतकाच्या टप्प्यावर असताना ‘आभाळमाया’ हा प्रकाशित झाला होता.
उच्च माध्यमिक शाळेच्या स्तरावर अध्यापन आणि नंतरच्या काळात मुख्याध्यापक या नात्यानं प्रशासकीय जबाबदारी पार पाडतानाच डॉ. सावंत यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, समीक्षा, संशोधन आणि संपादन इत्यादी वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केलं; पण बालसाहित्य आणि बालशिक्षण, तसंच लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हे त्यांचे आस्थाविषय राहिले आहेत. त्यांची बालसाहित्यातील 33 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
यापूर्वी त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक या नात्यानं त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. एक कृतिशील अध्यापक समाजविकासाचा ध्यास घेऊन समर्पण वृत्तीनं कार्य करत किती समृद्ध आयुष्य जगू शकतो, याचा प्रत्यय त्यांच्यावरच्या पुस्तकातून येतो. डॉ. सावंत यांनी विद्यार्थीहितासाठी, मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, साहित्यसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. 
(डॉ. सुरेश सावंत)
विद्यार्थ्यांसाठी निरंतर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प राबविले. खूप मोठा मित्रपरिवार जोडला. गेली अनेक वर्षे डॉ. सावंत सरांचा साहित्यक्षेत्रात वावर आहे. त्यांनी 43 पुस्तकांचं लेखन केलं आहे. यामध्ये कवितासंग्रह,किशोर कादंबरी, बालकथासंग्रह, चरित्रं, संपादित काव्यसंग्रह, एकांकिका, अनुवादित बालकथा, संशोधन, समीक्षा, लेखसंग्रह याबरोबरच गौरवग्रंथांचं संपादनही केलं आहे.
डॉ. सावंत हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी राजर्षी शाहू विद्यालयात उपक्रमशील अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य अशा वेगवेगळ्या भूमिकांतून रचनात्मक व सर्जनशील कामांचा डोंगर उभा केला आहे . लोकसहभागातून शाळा समृद्ध केली. वाचनचळवळ बळकट व्हावी, वाचनसंस्कृती वाढीस लागावी, यासाठी त्यांनी शाळेत सुसज्ज असं ग्रंथालय निर्माण केलं. मुलांच्या अभिव्यक्तीच्या विकासासाठी ग्रंथालयावर आधारित अनेक उपक्रम, प्रकल्प राबविले. यामुळंच शाळेतील मुलं लिहिती झाली. शाळेतून बालसाहित्यिक निर्माण झाले.
प्रत्येक मूल भाषिकदृष्ट्या समृद्ध व्हावं, यासाठी भाषाशिक्षणाचे वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग केले. विद्यार्थ्यांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले. वाचनकट्टा, अभिव्यक्ती फलक, वाढदिवशी पुस्तक भेट, शालेय हस्तलिखित, वर्गवार वाचनपेटी, फिरतं वाचनालय, लेखक आपल्या भेटीला, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, रद्दीतून ग्रंथालय, मागेल त्याला मागेल ते पुस्तक, नव्या पुस्तकांचं जाहीर स्वागत, शोध प्रतिभाकळ्यांचा, माझा शिक्षक: चरित्रनायक, रोजनिशी:माझी सखी, विज्ञान, कीर्तन असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली.






