टीम बाईमाणूस
- सहा महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. प्रियकराच्या हत्येनंतर आंचल मामीडवारने मृतदेहाशी विवाह करत देशभरात चर्चेचा विषय निर्माण केला होता.
- मात्र आता आंचल स्वतः समोर आली असून, सक्षमचा धाकटा भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता, असा गंभीर आरोप तिने केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
नांदेडमध्ये सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. सक्षमच्या घरातून आंचल मामीडवार निघून गेल्यानंतर तिच्या निर्णयाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान आंचलची बाजू समोर आली नव्हती. आता प्रथमच माध्यमांसमोर येत तिने घर सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी सक्षमची आई संगीता ताटे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आंचल अचानक घर सोडून गेल्याचा दावा केला होता. सक्षमच्या मृत्यूनंतर आंचलने "आता मीच तुमचा मुलगा आहे, तुमची काळजी घेईन," असं सांगितलं होतं. ती काही महिने कुटुंबासोबत राहिली. मात्र, आजीची तब्येत बिघडल्याचं कारण सांगून ती गेली आणि त्यानंतर परत आली नाही, असं संगीता ताटे यांनी म्हटलं होतं.
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आंचलच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. काहींनी तिच्यावर टीका केली, तर काहींनी तिची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली. अखेर या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना आंचलने वेगळाच दावा केला आहे.

“माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही”
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, "माध्यमांशी बोलताना आंचल मामीडवारने सक्षमचा धाकटा भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप केला. ही बाब आपण सक्षमच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवला गेला नाही", असं तिने सांगितलं.
"पुढे काही अनुचित घडलं तरी माझ्यावर विश्वास ठेवला जाणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी सर्वांना सांगून आणि पोलिसांना माहिती देऊन ते घर सोडलं. पोलिस कर्मचाऱ्यांनी मला माझ्या वडिलांच्या घरी पोहोचवलं," असा दावा आंचलने केला आहे. सध्या आपण वडिलांच्या घरी राहत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
आंचलने सक्षमच्या वडिलांच्या निधनाबाबतही प्रतिक्रिया दिली. त्यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचं तिने सांगितलं. तसेच, आपण घर सोडल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या ट्रोलिंगबाबत नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्य जाणून न घेता एखाद्या व्यक्तीबाबत निष्कर्ष काढू नयेत, असं आवाहनही तिने केलं आहे.
दरम्यान, या नव्या खुलास्यामुळे सक्षम ताटे प्रकरणात चर्चेचं केंद्र बदललं आहे. आतापर्यंत आंचलने घर का सोडलं, यावर चर्चा होत होती. मात्र, आता तिने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांमुळे नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आरोपांवर सक्षमच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय असेल, तसेच पुढे याबाबत कोणती भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






