- सुमित्रा वसावे, नंदुरबार
“दररोज सकाळी तीन-चार किलोमीटरचा घाट चढून, अरुंद रस्त्यांवरून बसमधून शाळेत जाणं... आणि परत येताना काळजीच्या सावलीतून प्रवास करणं.. शिक्षण मिळवणं एवढं कठीण असतं का?” हा प्रश्न सातपुड्याच्या प्रत्येक पालकाच्या मनात पुन्हा एकदा धडकलाय. कालच आमलीबारी घाटातील बस अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 40 हून अधिक जखमी झाले. या घटनेने एकच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला..तो म्हणजे शिकण्यासाठी मुलांना जीव धोक्यात कधीपर्यंत घालावा लागणार?
आमलीबारी घाटात भीषण बस अपघात.. दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू,...
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरली आहे. काही दिवसांपूर्वीच तळोदा तालुक्यातील वाण्याविहीर येथे दिवाळीत झालेल्या बस अपघाताचे दुःख अजून ओसरलेले नसतानाच, काल पुन्हा एका दुर्घटनेने जिल्हा हादरला. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस आमलीबारी घाटात कोसळल्याने दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल 40विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना काल सकाळी घडली, जेव्हा बस (क्रमांक एम.एच.15ए.के.1459) मोलगी-अक्कलकुवा मार्गाने विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना आमलीबारी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस तब्बल 50 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये 54 विद्यार्थी, एक शिक्षक आणि एक शाळा सहाय्यक असे एकूण 56 जण होते. अपघात इतका भीषण होता की निंबीपाडा येथील सात वर्षीय जगदीश बहासिंग वळवी आणि काठी येथील 13 वर्षीय कपिला जहांगिर राऊत या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण सातपुडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाळा आठवीपर्यंतच... पुढील शिक्षणासाठी जीव धोक्यात
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जि.प. शाळा निंबीपाडा (मो.), केंद्र-मालपाडा या शाळेत सध्या इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. इयत्ता 8 वी हा शाळेतील शेवटचा वर्ग असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. अनेक विद्यार्थ्यांना दररोज तीन ते चार किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो, तर काहींना बस किंवा खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. या प्रवासात विशेषतः मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. काही विद्यार्थिनी आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पुढे चालू ठेवू शकत नाहीत. या परिस्थितीत, गावातीलच शाळेत पुढील शिक्षणाची सुविधा मिळावी, अशी मागणी पालक व विद्यार्थी दोघेही करत आहेत.
याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी मिळून शाळेला संमतीपत्र ही दिले,
पालक भोवला नजमा पावरा यांनी आपल्या संमतीपत्रात लिहिले आहे, “माझा पाल्य जि.प. शाळा निंबीपाडा (मो.) येथे इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे. पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. जर शाळेत 9 वीचा वर्ग सुरू झाला तर माझा मुलगा याच शाळेत शिक्षण घेईल. त्यासाठी माझी पूर्ण संमती आहे.”
वंदना पावरा या विद्यार्थिनीने देखील पात्र लिहून शाळेला विनंती केली आहे की, “मी वंदना गोवसा पावरा, जि.प. शाळा निंबीपाडा (मो.) येथे शिकते. आमच्या शाळेत फक्त 8 वीपर्यंत शिक्षण आहे. पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते, पण आमच्या घरची परिस्थिती तशी नाही. शाळा तीन-चार किलोमीटरवर आहे. जर आमच्या गावातच 9 वीची सुविधा झाली, तर माझं शिक्षण थांबणार नाही.” वंदनाचं हे पत्र या भागातील वास्तव सांगून जाते. सातपुड्यातील असंख्य मुलींचं शिक्षण फक्त अंतरामुळे थांबतं हे या पत्रात स्पष्ट होतं.
दुर्गम भागातील शिक्षणाच्या मर्यादा...
अक्कलकुवा तालुक्याच्या डोंगराळ परिसरात अजूनही अनेक शाळा 8 वी पर्यंतच मर्यादित आहेत. तर काहीशाळेची पटसंख्या मर्यादित आहे. पुढील वर्गांसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 10 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागतो. काही गावांत वाहतुकीची साधने नाहीत. घाटरस्त्यांवरील अपघात, पावसाळ्यातील ओढे आणि जंगलातील मार्ग यामुळे पालक दररोज काळजीत असतात. अनेक वेळा या कारणांमुळे पालक आपल्या मुलांना पुढे शिकवू शकत नाहीत. परिणामी अनेक विद्यार्थी 8 वी नंतर शिक्षण सोडतात.
शिक्षण प्रकल्प आणि वास्तव यांतील दरी...
आदिवासी विकास विभाग आणि शिक्षण विभागाकडून शाळांसाठी अनेक योजना जाहीर होतात. परंतु त्या प्रत्यक्षात पोहोचत नाहीत. शाळा चालवण्यासाठी पुरेसे शिक्षक, वर्गखोल्या, आणि आवश्यक सुविधा नसल्याने उच्च माध्यमिक वर्ग सुरू होऊ शकत नाहीत. त्यातच विद्यार्थ्यांची संख्या "ठरावीक मर्यादेपेक्षा कमी" असल्याचे कारण देऊन अनेक प्रस्ताव थांबवले जातात. मात्र, पालक आणि शिक्षकांचा प्रश्न स्पष्ट आहे, "जर सुविधा मिळाल्या नाहीत, तर विद्यार्थी कसे शिकणार?"
अपघातातून शिकण्याची वेळ आली आहे...
बाईमाणूसने घटनास्थळावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. निंबीपाडा येथे राहणारे तिज्या रामा वसावे यांनी सांगितले, "मला फोन आला की ‘तुझी मुलगी जी बसमध्ये होती, तिचा अपघात झाला आहे’ हे कळताच मी त्वरित घटनास्थळी पोहचलो. माझी मुलगी सुखरूप दिसली, पण माझ्या गावातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता ते बघून मन हेलावून गेलं. सर्व विद्यार्थी जिकडे तिकडे पडलेले होते. मी इतर लोकांसोबत मिळून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केली. ते सगळं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं.”
दवाखान्यात उपचार घेत असलेल्या दिव्या वसावे या विद्यार्थिनीने सांगितले, "काय झालं आम्हाला कळलंच नाही. पण गाडीचा ब्रेकचं लागत नाहीये असं ड्रायव्हर काका सरांना सांगत होते. आणि तेवढ्यातच आमची गाडी दरीत कोसळली."
अपघातानंतर रुग्णालय परिसरात पालकांनी एकच गर्दी केली. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांचा आक्रोश आणि संतप्त प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या.
अनेक पालकांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. शरद वसावे यांनी बाईमाणूसशी बोलताना सांगितले, "आमच्या शाळेत आश्रम शाळा आहेत मॉडर्न स्कुल आहे पण त्याची पटसंख्या 20 पर्यंतच असल्याकारणाने अनेक मुलांना तिथे प्रवेश मिळत नाही. मॉडर्न स्कुल मध्ये तर मुलांना इंग्रजी वाचता आली तरच प्रवेश देतात इथे मुलांना मराठी व्यवस्थित येत नाही तर इंग्रजी कशी येणार? जर शाळेची पटसंख्या वाढवली तर बाहेर जाऊन दुसऱ्या शाळेत मुलांना शिकावेच लागले नसते आणि हा अपघात ही झाला नसता."
आमलीबारी घाटातील अपघाताने संपूर्ण जिल्ह्याला हादरवले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जात होते. हीच या संपूर्ण घटनेची मुळं आहेत.






