- सीमा आनंद या सेक्स एज्युकेटर, पौराणिक कथाकार, लेखिका आणि रिलेशनशिप एक्स्पर्ट आहेत.
- Gen Z ने सीमा आनंद यांना गुगलवर सर्च केल्यानंतर गुगलवर सर्वाधिक सर्च केल्याचा यापूर्वीचा रेकॉर्ड सीमा आनंद यांच्यामुळे मोडला आहे.
- एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीनंतर ६३ वर्षांच्या सीमा आनंद यांचे AI जनरेटेड अश्लील फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे सीमा आनंद प्रचंड भडकल्या आहेत.
भारतीय समाजात स्त्रीदेह, लैंगिकता आणि इच्छांभोवती अजूनही एक जाडजूड मौनाचं आवरण गुंडाळलेलं आहे. कुटुंब, धर्म, परंपरा आणि तथाकथित संस्कृतीच्या नावाखाली स्त्रीला तिच्या शरीरापासून, भावनांपासून आणि इच्छांपासून दूर ठेवलं गेलं. अशा समाजरचनेत उघडपणे ‘सेक्स’, ‘आनंद’, ‘इच्छा’ आणि ‘स्त्रीची लैंगिक स्वायत्तता’ यावर बोलणं म्हणजे बंडखोरीच ठरते. या बंडखोरीचं नाव आहे, सीमा आनंद…
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या सीमा आनंद या सेक्स एज्युकेटर, पौराणिक कथाकार, लेखिका आणि रिलेशनशिप एक्स्पर्ट आहेत. सध्या सीमा आनंद सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहेत. इतक्या की Gen Z सीमा आनंद यांना गुगलवर सर्च केल्यानंतर गुगलवर सर्वाधिक सर्च केल्याचा यापूर्वीचा रेकॉर्ड सीमा आनंद यांच्यामुळे मोडला आहे.
Gen Z ला सीमा आनंदमध्ये अचानक रुची येण्याचं कारण म्हणजे नुकतीच एका पॉडकास्टला त्यांनी दिलेली मुलाखत आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे व्हायरल झालेले AI जनरेटेड अश्लील फोटो…काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिली. ज्यात त्यांनी स्त्री पुरुष शरीरसंबंध, लिव्ह इन मध्ये राहणं योग्य की अयोग्य, लग्नानंतरचं वैवाहिक जीवन अशा विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा केली होती. ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर सीमा आनंद यांचे AI च्या मदतीने अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले.
या नंतर सीमा आनंद यांनी अश्लील फोटो तयार करणाऱ्यांना तोडीस तोड उत्तर दिलं आहे. एका व्हिडीयोत त्या म्हणतात,
“मागच्या आठवड्यात माझे काही फोटो AI च्या मदतीने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. लोकांची मानसिकता किती घाणेरडी आहे आणि किळसवाणी आहे हे मला यावरुन समजलं. मी पोलिसांत तक्रार दिली आहे. पण मी जेव्हा ते फोटो पाहिले आणि कमेंट वाचल्या तेव्हा मला जाणवलं की या लोकांची मानसिकता किती घाणेरडी आहे. माझ्या त्या फोटोंवर लोक ज्या प्रकारे कमेंट करण्यासाठी तुटून पडले मला वाटलं हे काय मानसिकतेचे लोक आहेत? एक युजर कमेंट करत म्हणाला, ही काही एवढी वाईट नाही. माझा एका मुलीसह फोटो घेतला आणि चेहरे बदलले. मी साडी नेसले होते आणि ती शॉर्ट्स मध्ये होती. माझ्या चेहऱ्याला तिचा चेहरा तिच्या चेहऱ्याला माझा चेहरा लावला. हे करुन तुम्ही काय साधलंत? काय मिळवलंत? माझं हे स्पष्ट मत आहे की बलात्काऱ्यांची मानसिकता आहे. असे कपडे घातलेच तर तू निमंत्रणच देते आहेस ना? मुलींची आणि महिलांचीच चूक असते. होय आम्ही हे मान्य केलं आहे.”
सीमा आनंद यांच्या व्हिडियोची लिंक:
मी ६३ वर्षांची आहे, तुम्हाला माझे न्यूड्स हवेत?
‘’AI च्या मदतीने साडी नेसलेल्या व्यक्तीची साडी उतरवून तिला शॉर्टस् मधे दाखवण्यात येणं ही रेपिस्ट मेंटालिटी आहे. जी म्हणते की आता हिला काहीही बोललं तरी चालेल. मी माझ्या मर्जीने शॉर्ट कपडे घातले तर मला ##@** म्हणतील. पण तुम्ही कपडे काढले तर ती सामान्य गोष्ट आहे. देशातले तरुण काय करत आहेत? तर लहान मुली, महिला यांचे न्यूड्स बनवत आहेत. त्यांना कुणाशी मैत्री करायला, बोलायला वेळ नाही. मी ६३ वर्षांची आहे, तुम्हाला माझे न्यूड्स हवेत? जर्क आऊटसाठी? आता वडील मुलांना हेच सांगत असणार की मोठं झाल्यावर तू हवं ते बनू शकतोस आणि मुलं उत्तर देत असतील हो मोठा झाल्यावर मी रेपिस्ट होणार. मला किती वाईट आणि शोषण झाल्यासारखं वाटतंय याची तुम्हाला कल्पना नाही. शिवाय ही समस्या येत्या काळात वाढतच जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फोटोंची बाजू घेणं सोडून द्या.’’
असे सडेतोड उत्तर सीमा आनंद यांनी Gen Z ला या व्हीडियोमधून दिलं आहे. सोशल मीडियावरची ही चर्चा केवळ एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ही चर्चा आहे भारतीय समाजाच्या दांभिकतेची, पितृसत्ताक नैतिकतेची आणि स्त्रीदेहावर लादल्या गेलेल्या नैतिक पहाऱ्याची…

कोण आहेत सीमा आनंद, त्यांनी सेक्स एज्युकेटर हे क्षेत्र का निवडलं ?
सीमा आनंद यांचा हा आवाज एका दिवसात तयार झालेला नाही. त्यांचा प्रवास हा कलाविश्व, मिथकशास्त्र, अध्यात्म आणि वैयक्तिक अनुभवांच्या गुंतागुंतीतून घडलेला आहे. मूळच्या कथकली नृत्यांगना असलेल्या सीमा आनंद यांनी भारतीय परंपरेतील देहभाषा, भाव-हाव आणि प्रतीकात्मकता जवळून अनुभवली. कथकलीसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारात देह हा केवळ सादरीकरणाचं साधन नसतो; तो कथा सांगतो, संघर्ष उलगडतो आणि मानवी इच्छांचं दर्शन घडवतो. याच देहकेंद्री कलाभ्यासातून त्यांना भारतीय पुराणकथांमधील लैंगिकता, संबंध आणि स्त्री–पुरुष नात्यांविषयीचे संदर्भ नव्याने समजू लागले.
या अभ्यासादरम्यान त्यांना एक ठळक विसंगती जाणवली. आपल्या मंदिरांवरील मैथुनशिल्पांमध्ये, पुराणकथांमध्ये आणि प्राचीन ग्रंथांमध्ये लैंगिकतेचं उघड, अनेकदा आध्यात्मिक दर्शन असताना आधुनिक भारत मात्र या विषयावर इतका अस्वस्थ, लाजाळू आणि दडपशाहीकडे झुकलेला का आहे? ही अस्वस्थता केवळ बौद्धिक नव्हती. स्वतःच्या आयुष्यात, आजूबाजूच्या स्त्रियांच्या अनुभवांत आणि समाजाच्या प्रतिक्रियांमध्ये त्यांना एकच गोष्ट सातत्याने दिसत होती ती म्हणजे स्त्रीदेहावर लादलेली भीती आणि अपराधभावना.
याच टप्प्यावर सीमा आनंद यांनी जाणीवपूर्वक सेक्स एज्युकेशन आणि लैंगिक साक्षरतेचं क्षेत्र निवडलं. हे क्षेत्र त्यांनी ‘उत्तेजन’ किंवा ‘प्रोवोकेशन’ म्हणून नव्हे, तर संवाद म्हणून स्वीकारलं. त्यांच्या मते, भारतीय समाजात सेक्स एज्युकेशन म्हणजे केवळ शारीरिक प्रक्रिया शिकवणं नसून, ते सत्ता, नियंत्रण, संमती, आनंद आणि स्वातंत्र्य यांशी जोडलेलं आहे. स्त्रीला तिच्या शरीराची भाषा समजली नाही, तर तिच्या आयुष्यावरील निर्णय नेहमीच इतर कुणी तरी घेत राहणार, हे त्या ठामपणे सांगतात.

सीमा आनंद स्वतःला सेक्स एज्युकेटर, मिथक अभ्यासक आणि वक्त्या म्हणून ओळख देतात. भारतीय पुराणकथा, कामसूत्र, मंदिरशिल्पे आणि लोककथा यांचा आधार घेत त्या एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतात, जर आपल्या इतिहासात लैंगिकतेबद्दल इतकं प्रगल्भ आणि स्वीकारार्ह चिंतन आहे, तर आज आपण इतके घाबरलेले का आहोत?
सीमा आनंद यांना सातत्याने ट्रोल का केलं जातं?
हा प्रश्न विचारणं व्यवस्थेला अस्वस्थ करतं. कारण तो प्रश्न केवळ लैंगिकतेचा नाही; तो नियंत्रणाचा आहे. सीमा आनंद यांच्या भाषणांवर आणि मांडणीवर टीकेचा भडिमार होतो. त्यांना ‘संस्कृतीविरोधी’, ‘अश्लील’, ‘पश्चिमी विचारांची वाहक’ अशी लेबलं लावली जातात. पण यात एक ठळक विरोधाभास आहे. या सगळ्या टीकाकारांना मंदिरांवरील मैथुनशिल्पं दिसत नाहीत, पुराणकथांमधील लैंगिक स्वातंत्र्य दिसत नाही, देवतांच्या मानवी इच्छांचं दर्शन दिसत नाही. दिसतो तो फक्त आजचा स्त्रीदेह, जो बोलतो आहे, प्रश्न विचारतो आहे आणि आनंदावर हक्क सांगतो आहे.
सीमा आनंद म्हणतात, महिलांना वयानुसार गप्प राहण्याचा सल्ला दिला जातो, परंतु त्यांना ही मानसिकता मोडायची आहे. त्यांची ओळख त्यांच्या कामाने आणि विचारांनी निश्चित होते, त्यांचे वय किंवा शरीराने नाही.

आणि हीच गोष्ट समाजाला अस्वस्थ करते. कारण समस्या सेक्सची नाही; समस्या आहे स्त्रीच्या आवाजाची. पुरुषांनी लैंगिकतेवर बोललं, विनोद केला किंवा त्याचं प्रदर्शन केलं तर ते ‘नैसर्गिक’ ठरतं. पण स्त्रीने बोललं, तर ते ‘अति’, ‘अश्लील’ आणि ‘संस्कृतीला धोका’ ठरतं. सीमा आनंद या दुहेरी निकषांवर बोट ठेवतात, म्हणूनच त्या अस्वस्थ करणाऱ्या ठरतात.
त्या वारंवार सांगतात की आज आपण ज्या ‘भारतीय संस्कृती’चं रक्षण करत असल्याचा दावा करतो, ती प्रत्यक्षात औपनिवेशिक व्हिक्टोरियन नैतिकतेची देण आहे. ब्रिटिश काळात लादलेली लाज, संयम आणि दडपशाही आज ‘परंपरा’ म्हणून पुढे रेटली जाते. त्याआधीचा भारत मात्र देह, इच्छा आणि आनंदाकडे अधिक सहजतेने पाहणारा होता. इतिहास आठवण करून देणं म्हणजे वर्तमानातील खोटेपणा उघडा पाडणं आणि ते अनेकांना सहन होत नाही.
स्त्रीच्या शरीरावर अधिकार कुणाचा आहे? समाजाचा? कुटुंबाचा? धर्माचा? की स्वतः स्त्रीचा?
हा प्रश्न केवळ शहरी, मध्यमवर्गीय स्त्रियांचा नाही. ग्रामीण भागात, दलित, आदिवासी आणि वंचित समुदायांतील स्त्रियांवर शरीर, सन्मान आणि नैतिकतेच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांची मुळं याच नियंत्रणाच्या मानसिकतेत आहेत. स्त्रीच्या देहावर अधिकार गाजवण्याची वृत्तीच बलात्कार, सन्मानहत्यांपासून ते घरगुती हिंसाचारापर्यंतच्या सगळ्या शोषणांची जननी आहे.
सीमा आनंद यांच्यावर टीका करणं सोपं आहे. कठीण आहे स्वतःच्या अस्वस्थतेला सामोरं जाणं. कठीण आहे हे मान्य करणं की आपण ज्या समाजात जगतो, तो स्त्रीच्या आनंदाला घाबरतो. कारण आनंदी स्त्री म्हणजे नियंत्रित न होणारी स्त्री. सीमा आनंद परिपूर्ण नाहीत, वादातीत नाहीत. त्यांच्या मांडणीशी प्रत्येकजण सहमत होईलच असं नाही. पण त्या एक संवाद उघडतात,, जो आपण शतकानुशतके दडपून टाकला आहे. तो संवाद म्हणजे स्त्रीच्या देहाचा, इच्छांचा आणि आत्मसन्मानाचा. सीमा आनंद यांचं बोलणं अस्वस्थ करतं. पण कधी कधी, बदलाची सुरुवात अस्वस्थतेतूनच होते.






