कोविडचा काळ आठवतोय ना? रोज एक नवीन भीति आणि नवं आव्हान. या सर्वांच्या मध्ये हजारो लोकांनी कितीतरी उपाय केले कोविडपासून वाचण्यासाठी. देशात व्हायरस पसरण्याची आणि त्याच्या उगमाची दोन कारणं सांगितली गेली. पहिलं म्हणजे चीनमध्ये तिथल्या लोकांच्या वटवाघूळ खाण्याच्या सवयीनं हा व्हायरस आला तसंच तो प्रयोगशाळेत तयार केलेला होता. पण अनेकांनी शोध घेऊन ही दोन्ही कारणं खोटी असल्याचं सांगितलं.
देशात साथीच्या काळात चुकीच्या गोष्टींमुळेच जास्त हानी झाली. सोशल मीडियाचा यात मोठा हातभार होता. लोकांनी व्हायरसपासून वाचण्यासाठी विषारी धोत्र्याच्या बियाही खाल्ल्या ज्यामुळे 12 लोक मेले. 2024 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्यासाठी चुकीच्या व खोट्या सूचना हा मोठा धोका व आव्हान असल्याचं म्हटलं.
रोग, उपचार, लसी यांच्याविषयीची खोटी माहिती यामुळे विज्ञान व सार्वजनिक आरोग्यावरचा विश्वास कमी होतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास उडतो आणि ते संकटात सापडतं. लोक डॉक्टरांपेक्षा सोशल मीडियावरील तद्दन खोट्या गोष्टी खऱ्या मानतात. ऑनलाईन खोट्या माहितीत सातत्यानं मोठी वाढ होत आहे.
कॅन्सर, डायबेटीस, फिटनेस… प्रत्येक आजाराचा सोशल मीडियावर इलाज
खोटी व चुकीची माहिती लोक कळत-नकळत समोर पाठवत राहतात. ज्याचा जगण्याच्या प्रत्येक पैलूवर गंभीर नकारात्मक परिणाम घडतो. सध्याच्या ऑनलाईन काळात अशा चुकीच्या माहितीचा वेगानं होणारा प्रसार ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. देशातील धार्मिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यात अधिक भर पडते. ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या एका लेखात यासाठी देशव्यापी रणनीतिची गरज असल्याचे म्हटले आहे. देशात कँसरवर मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती ऑनलाईन प्रसारीत केली जाते व लोक त्यामुळे फसतात.
सोशल मीडियावर प्रजनन आरोग्य, लसीकरण, मधुमेह व लठ्ठपणा याविषयावरही मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर टाकली जाते. टीएचआयपी मीडियाच्या सर्वेक्षणानुसार 62 टक्के भारतीय नेटवर विश्वसनिय आरोग्य माहिती ओळखू शकत नाही. अनेक लोकांनी आरोग्याचे दावे खरे आहेत की नाहीत ते समजण्यासाठी मदत मिळण्यावर जोर दिला. अनेकांना आरोग्याच्या चुकीच्या सूचनांविषयी भीति वाटते. काहींनी गंभीर रोग आणि पर्यायी औषधींविषयी चुकीच्या सूचनांना धोकादायक म्हटलं आहे.
लोकांचा डॉक्टरवर कमी विश्वास आहे आणि ऑनलाईन आरोग्य सामग्रीवर ते जास्त विश्वास ठेवतात ही गोष्टही या सर्वेक्षणातून पुढे आली. काही लोकांचा डॉक्टरवर विश्वास असला तरी ते नेटवरून डॉक्टरांचा सल्ला योग्य आहे की नाही त्याची खात्री करून घेतात. पाच पैकी दोघांना फॅक्ट-चेक हेल्पलाईनची माहिती नव्हती. 
ग्रामीण भागातील लोकं अशा खोट्या माहितीला अधिक बळी पडतात
भारतासारख्या विकसनशील देशात आरोग्यासंबंधी चूकीच्या सूचना सार्वजनिक आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम करू शकतात. कोविड काळात 32.9 टक्के लोकांनी लस घेण्यास नकार दिला होता कारण त्यांनी नेटवरील माहितीवर विश्वास ठेवला होता. भारत तसाही चुकीच्या सूचनांच्या बाबतील वरच्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागातील लोक याला जास्त बळी पडतात जिथे आरोग्य साक्षरता कमी आहे आणि लोक अनौपचारिक स्त्रोतांवर जास्त विश्वास ठेवतात.
लोकसंख्यसोबतच भाषा ही मोठी समस्या भारतात आहे. ज्यामुळे चुकीच्या सूचना व माहिती थोपवण्यासाठी जमिनीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकांचा पारंपरिक भारतीय उपचार पद्धती जशा की आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी यांच्यावर जास्त विश्वास आहे ज्यांचा प्रभाव हा ऐलोपॅथिच्या तुलनेत फार मर्यादित असतो. मुलभूत आरोग्यावर सर्वांचाच अधिकार आहे. पण चुकीच्या माहितीवर अवलंबून राहिल्यामुळे लोक योग्य उपचार करून घेत नाहीत, तसेच सरकारलाही ते चांगल्या व स्वस्त आरोग्यसेवा देण्यासाठी बाध्य करत नाहीत.
‘लँसेट’ पत्रिकेतून देशातील विश्वसनीय आरोग्य माहितीच्या कमतरता अधोरेखित केली आहे ज्यामुळे लोकतांत्रिक पर्याय कमकुवत होतात. आरोग्याच्या चूकीच्या सूचना धार्मिक हिंसाचारालाही वाट करून देतात. कोविड काळात लोकांनी मुसलमानांना दोषी ठरवत त्यांच्यावर हिंसाचार केला, त्यांच्याशी भेदभाव केला, त्यांचे शोषण केले.
आरोग्य साक्षरतेसाठी काय करावं लागेल?
देशातील चूकीच्या माहितीविरोधातील लढाई फक्त सत्य माहिती करून घेण्यापूरती मर्यादित नाही. आरोग्य सेवांची विश्वसनीयता आणि डॉक्टरांची सुरक्षा निश्चित करण्याचाही त्यात समावेश आहे. भारतीय चिकीत्सक संघाने याविषयी सरकारला कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘द हिंदू’ मधील एका बातमीनुसार, व्यवस्थेवर विश्वास, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि वैज्ञानिक माहितीपर्यंत पोहोच यामुळे यात बदल करता येऊ शकतो. उदा. मध्यप्रदेशात झाबुआ जिल्ह्यात आशा कार्यकर्त्या, एएनएम आणि आरोग्य अधिकारी यांनी कोविड लस घेण्यासाठी पारंपरिक ‘खटला बैठकी’ आयोजित केल्या होत्या.
त्यामुळे लोकांचा व्यवस्थेवर विश्वास वाढला. कमी आरोग्य साक्षरता ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका असते असं जागतिक आरोग्य संघटना सांगते. कारण त्यामुळे आरोग्य सेवांमध्ये विषमता वाढू शकते. आरोग्य साक्षरता म्हणजे व्यक्तीकडे अशी माहिती हवी ज्यामुळे तो आपल्या जगण्यात आरोग्य चांगले करण्यासाठी, सुधारण्यासाठी चांगले व योग्य निर्णय घेऊ शकेल. त्यासाठी योग्य माहितीपर्यंत पोहोचू शकेल, ती समजून, तिचं मूल्यांकन करून आणि दुसऱ्यांशी त्याविषयी चर्चा करू शकेल. इन्फोडेमिक्स (माहितीची साथ) पासून वाचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि विश्वसनीय वैज्ञानिक सूचना लोकांपर्यंत पोहोचवणे हाच योग्य उपाय असतो.
मुख्य प्रवाहातील माध्यमे अनेकदा आरोग्यासंबंधी चुकीच्या बातम्या पसरवत असतात. एखाद्या शोधाचे निष्कर्ष वाढवून सांगणे, अर्धवट माहिती देणे, चुकीची माहिती देणे, बातमीची खात्री न करणे यातून हा धोका वाढतो. एखाद्या औषधाचे फायदे वाढवून सांगताना त्याच्या साईड-इफेक्टविषयी काही न सांगणे अनेकदा होते. त्यामुळे लोक चूकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आरोग्य पत्रकारांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
पत्रकारीतेची नैतिकता त्यांनी पाळली तरीही चूकीच्या बातम्या देण्याची चूक त्यांच्याकडून होणार नाही. ते योग्य व समतोल वार्तांकन करून लोकांना पूर्ण माहिती देऊ शकतात. आरोग्य-अफवा थोपवण्यासही मदत करू शकतात. स्वतःचे अनुभव न मिसळवता त्यांनी या बातम्या देण्याची नितांत गरज आहे. प्रत्यक्ष इलाज करण्याआधी विश्वसनीय डॉक्टरांकडून सल्ला घेण्यास न चुकता सांगणे ही देखील पत्रकारांची जबाबदारी आहे.
लोकं ऑनलाईन माहितीवर विश्वास का ठेवतात?
लोक ऑनलाईन माहितीवर विश्वास का ठेवतात याचाही विचार करायला पाहिजे. याची चार कारणं आहेत.
१) लोकांना खरं आणि खोटं यातील फरक समजत नाही. त्यांच्याकडे योग्य माहिती नसणे तसेच डिजीटल निरक्षरता ही याची कारणं असतात.
२) लोक त्यांच्या आधीच्या समजूती, विश्वास, परंपरा, विचार यामुळे चुकीच्या सूचनांवर विश्वास ठेवतात.
३) ऑनलाईन माहितीविषयी लोक फार बारकाईनं विचार करत नाहीत. ते विचार न करता वाचतात आणि ती माहिती पुढे पाठवून देतात.
४) डॉक्टरांचा, रुग्णालयांचा, औषधांचा मोठा खर्च अनेकांना परवडत नाही आणि चांगली सरकारी आरोग्य सेवा उपलब्ध होत नाहीत, किंवा त्यांच्यावर लोकांचा विश्वास नसतो यामुळेही फुकटच्या उपायांकडे लोक वळतात आणि आपलं नुकसान करून घेतात.
कोविड महासाथीनं हे दाखवलंय की आरोग्याच्या चुकीच्या माहितीमुळे किती घातक परिणाम होऊ शकतात. शेकडो लोकांचा बळी त्यामुळेच गेला. यावरचा उपाय म्हणजे केवळ सरकारी कारवाई नाही, तर सामान्य लोक, आरोग्य कर्मचारी, माध्यमे, शिक्षण संस्था या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आरोग्य साक्षरता वाढवण्यासाठी, फॅक्ट-चेकींगसाठी आणि संवाद-पीठांचा योग्य उपयोग करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे.
माध्यमांचा जबाबदार उपयोग आणि वैज्ञानिक माहिती यांच्या आधारे चूकीच्या माहितीचा सामना करता येऊ शकतो. सामुदायिक प्रयत्नांनी देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारता येऊ शकते व ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. चुकीची माहिती पाठवू नका, प्रसारीत करू नका व त्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना द्या.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






