(सुजाता देशमुख)
पद्मश्री सुनिता कृष्णन… आधी 'देशद्रोही' आणि नंतर 'पद्मश्री'!
जेमतेम चार फूट सहा इंच उंचीची सुनिता स्टेजवर पाय रोवून बोलायला लागली. दीड तास,सट सट सट - विचारांच्या, अनुभवांच्या, तोंड दिलेल्या संकटांच्या गोळ्या सुटत होत्या. थांबली…! सपशेल बधीर झालेले चारशे प्रेक्षक आपापल्याही नकळत उभे राहिले. त्यांच्यात निम्म्याहून अधिक महाविद्यालयीन मुलं-मुली.
Standing ovation!
निमित्त, 'पुणे इंटरनॅशनल सेंटर' या संस्थेतर्फे आयोजित तिच्या 'I am what I am' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचं.
सुनिता 'देशद्रोही' का? तर, वेश्या होण्यापासून मुलींना वाचवण्याच्या आणि त्यांचं पुनर्वसन करण्याच्या आपल्या कामाबद्दल परदेशी दिलेल्या व्याख्यानांतून, माहिती देऊन देशाची 'बदनामी' केली म्हणून!
सुनिताला 'पद्मश्री' का? तर, सुमारे तीस हजार मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करून त्यांना आयुष्यात सक्षम केल्याबद्दल आणि 'प्रज्वला' या आपल्या संस्थेतर्फे जागतिक दर्जाचं मोठं काम उभं केल्याबद्दल!
|
संबंधित लेख वाचा: |
सुनिता जन्म 23 मे 1969 रोजी बंगळुरूमध्ये झाला. जन्मत: सुनिताला शारीरिक व्यंग होतं. लहानपणीच तिच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सुनितावर पंधराव्या वर्षी आठ जणांनी बलात्कार केला. त्यातून सुरू झाला मुलींवरच्या अन्यायाविरुद्ध अखंड लढा. जीवघेणे सतरा हल्ले झाले. त्यातला एक अॅसिड हल्लाही होता, जो चुकून चुकला. तीनवेळा एकाच जागी फटके मारले गेल्यामुळे एक कान कायमचा बहिरा झाला. शरीरातल्या प्रत्येक हाडानं मार खाल्ला. पाठदुखी जन्मभराची सोबतीला आली. कॅन्सर झाला, पण त्यातून बाहेर आली.
तिच्या पुस्तकात सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची वाक्यं आहेत. 
'......social media posts that supposedly celebrate my work rarely touch upon the huge milestones that 'Prajwala' has achieved in prevention or advocacy. In their reductive write ups I remain the victim who has saved countless others, my work an abridged footnote..... Is this what makes posts popular?'
बलात्काराचा उल्लेख टाळून पुढे जाता येत नाही, कारण त्यातून खचून न जाता तू उभी राहिलीस सुनिता. आणि नुसती उभी राहिली नाहीस, तर आज हजारोंना सक्षम करणारी जीवनदायिनी झालीस म्हणूनही ते अपरिहार्य! शिवाय तुझ्या भाषणात आणि पुस्तकातही त्या अपघाताचा संदर्भ येतोच.
सुनिताच्या भाषणातले बहुतेक मुद्दे आपल्याला माहीत असतात. म्हणजे उदाहरणार्थ भारतात दर सोळा मिनिटाला एक बलात्कार होतो, शरीरविक्रयाच्या व्यवसायाची जागतिक उलाढाल काही हजारो कोटी आहे, वगैरे वगैरे.
"शारीरिक हल्ले परतवता येतात. मुलींना वेश्यागृहांतून सोडविण्याचा संघर्ष एकवेळ सोपा म्हणता येईल. पण समाजाच्या - पाळंमुळं घट्ट रुजलेल्या - मानसिक धारणांचं काय करायचं?" हा प्रश्न विचारून सुनितानं एक उदाहरण सांगितलं…
"वाचवलेल्या एका वेश्येची तीन वर्षांची मुलगी कमालीची हुशार होती. एका इंग्रजी शाळेत, 'तिची परीक्षा घेऊन मगच प्रवेश द्या', अशी गळ घातली. प्रवेश परीक्षेत या मुलीनं सुंदर कामगिरी केली. त्यामुळे प्रवेश मिळून तिचं शिक्षण सुरू झालं. मग वार्षिक स्नेहसंमेलन आलं. 'जी कुणी उत्तम कविता म्हणेल, तिला मोठं चॉकलेट बक्षीस मिळेल', असं पाहुण्यांनी जाहीर केलं. या मुलीला बक्षीस मिळालं नाही. ती पाहुण्यांकडे गेली आणि म्हणाली, "मी जर फ्रॉक वर केला आणि हवं ते दाखवलं तर मला चॉकलेट द्याल?" 
आईच्या पलंगाखाली झोपणार्या लेकराचा हा भीषण निष्पाप प्रश्न शाळा चालकांच्या सुसंस्कारी मनाला भयानक लागला. तिला शाळेतून ताबडतोब काढून टाकण्यात आलं."
सुनिता फक्त उदाहरणं देऊन थांबत नव्हती. प्रत्येक अनुभवामागची कार्यकारणमीमांसा आणि त्यांचे सामाजिक पापुद्रे उलगडून दाखवत होती.
"इथे यायच्या आधी कदाचित 'आम्हाला या प्रश्नांची एवढी दाहकता माहीत नव्हती', असा युक्तिवाद तुम्ही करू शकाल. परंतु कार्यक्रम झाल्यावर बाहेर पडतांना तुमचं असं काही म्हणणं मान्यच करता येणार नाही". हे सुनिताचं थेट, भेदक वाक्य सगळ्यांच्या माना खाली जायला लावणारं होतं.
You are what you are Sunita...पण तुझं पुस्तक वाचणं, त्याचा प्रसार करणं आणि वैयक्तिक पातळीवर किमान vigilant राहून आमच्या धारणांमध्ये, कोत्या समजांमध्ये, जाणिवांमध्ये विचारपूर्वक बदल करणं हे आमच्या हातात नक्की आहे.






