(विनायक दळवी)
"मी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू रंगाची टोपी परिधान केली, त्याला आता 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मी इथवर प्रवास करू शकेन याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती.
"कसोटी क्रिकेटनं माझा कस पाहिला, मला घडवले आणि मला असे धडे दिले जे मी आयुष्यभर सोबत राहतील.
"पांढऱ्या वेशात क्रिकेट खेळणं अतिशय खास असतं. शांतपणे करावी लागणारी मेहनत, दिवसभर चालणारा खेळ, काही लहानसे क्षण जे इतर कुणी पाहातही नाहीत पण तुमच्या मनात कायमचे कोरले जातात.
"आता या फॉरमॅटपासून वेगळं होतो आहे, निर्णय सोपा नाही - पण योग्य वाटतो आहे. मी या खेळाला माझं सर्वस्व दिलं आहे आणि त्यानं मला इतकं काही दिलं आहे ज्याची मी अपेक्षाही करू शकलो नसतो.
"कसोटी क्रिकेटपासून दूर जाताना माझ्या मनात कृतज्ञता भरली आहे - खेळाविषयी, ज्यांच्यासोबत मैदानावर एकत्र खेळलो त्यांच्याविषयी आणि यात माझे साक्षीदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीविषयी मला कृतज्ञता वाटते. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहीन
#269, सायनिंग ऑफ"
सोशल मीडियावर ही माहिती पोस्ट करत विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट हा भारताचा ‘269’ वा कसोटी खेळाडू आहे. हा नंबरही कायम विराटचाच राहणार आहे. कोहलीच्या या निर्णयाने कोट्यवधी भारतीयांना धक्का बसलाय. विराट आता 36 वर्षांचाही झाला आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय अचानक जाहीर झाल्यानं चाहत्यांना वाईट वाटत आहे.
एका भरलेल्या स्टेडियममध्ये निवृत्ती घेताना पाहायला आवडलं असतं…
विराट कोहलीला असा कुणी गॉडफादर नव्हता. अपमान, अपयश, हिणकस शेरेबाजीनंतर पेटून उठलेल्या विराटने स्वत:त प्रचंड बदल केले. बेपर्वा, उर्मट, स्वभावाला मुरड घातली. फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. सरावावर मेहनत घेतली. आणि यशाच्या शिखरावर तो चढला. आपल्याच यशाच्या गुर्मित वावरला. अहंकाराचा अंगार त्याने शांत होऊ दिला नाही. आपल्या तालावर त्याने क्रिकेट विश्वाला नाचविले. बोर्डाच्या अधिकाऱ्यांना नाचविले. पुरस्कर्ते पायाशी आणले. आपल्याच “टर्मस्”वर क्रिकेट खेळला, जगला. वर्चस्वाच्या त्या साम्राज्याला हादरे बसू लागताच, अपमानित होण्याची वाट पाहिली नाही. स्वत:च्याच इच्छेने कप्तानपदापासून दूर झाला. आताही त्याने अगदी तसचं केलं…
संबंधित लेख वाचा: 1) ‘पॅडी’ नावाच्या एका शापित यक्षाचं जीवनगाणं… |
खरं म्हणजे हर्षा भोगले म्हणतो तसं, विराट कोहलीनं एका भरलेल्या स्टेडियममध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना पाहायला आवडलं असतं. पण ते होणार नसल्यामुळे आता आपण जिथे कुठे असू, तिथून टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करुयात. ट्वेन्टी20 क्रिकेटवर पोसून वाढलेल्या एका पिढीला त्यानं कसोटी क्रिकेट 'कूल' आहे असं दाखवलं, त्याविषयी आकांक्षा वाढवल्या. आणि त्यासाठी खेळ त्याचा आभारी राहील. "
वडिलांचं निधन, ‘बॅड बॉय’ आणि कमबॅक…
2008 साली क्वालालंपूरहून भारताला 19 वर्षांखालील विश्व क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकून देणारा दिल्लीचा एक युवक पुढे भारतीय क्रिकेटचा आधारवड बनणार होता. कुठे माशी शिंकली, कोण जाणे, अचानक तो गायब झाला. त्याच्याबद्दल अनेक उलटसुलट बातम्या ऐकू यायला लागल्या. तो अचानक भारतीय क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ बनला. याचं कारण त्याच्या आयुष्याशी निगडीत होतं. ज्या वडिलांवर त्याचे जीवापाड प्रेम होते, ते वारले. मानसिकदृष्ट्या खचलेला तो युवक अस्वस्थ झाला. काही माजी क्रिकेटपटूंनी त्याला मानसिक आधार दिला. हळूहळू तो सावरला. विराट कोहली नावाने तो भारतीय क्रिकेटमध्ये स्थिरावला. विराटची क्रिकेटमधील आकडेवारी सर्वश्रूत आहे.
क्रिकेटवरील त्याचे प्रेम. फिटनेसबाबतचे प्रेम, क्रिकेटला सर्वस्वी वाहून घेणे, या गोष्टीही सर्वांना ठाऊक आहेत. पण, क्रिकेटपटूच्या पडद्याआड एक असा विराट कोहली आहे, जो फार कमी जणांना ठाऊक आहे. कारण, त्याचा तो चेहरा कुणालाच फारसा दिसत नाही. दान एका हातानं केलं तर दुसर्या हाताला कळता कामा नये, अगदी तसाच. असं म्हणतात, युद्धाला जाण्याआधी विंस्टन चर्चिल यांचे भाषण ऐकावे, महाराष्ट्रदिनी आचार्य अत्रे यांचे विचार ऐकावे आणि क्रिकेटच्या ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीचे भाषण ऐकावे. एवढे जोशपूर्ण विराट बोलतो. सहकार्यांना जिंकण्यासाठी त्याच्या भाषणातून प्रेरणा मिळते. ऊर्जा मिळते. ईर्ष्या मिळते. ते ऐकणारे भारतीय खेळाडू पेटून उठतात आणि त्यांच्यात निर्माण झालेली संघर्षाची आग प्रतिस्पर्ध्याला जाळून खाक करते. 
आधी विराट असा नव्हता. गेल्या दशकात त्याच्यात अमूलाग्र बदल झाला. तो परिपक्व झाला. स्वतःच्या कर्तव्याप्रती तो प्रामाणिक होताच. त्याचा तोच प्रामाणिकपणा मैदानावरुन त्याच्या जीवनात उतरला. प्रत्येक गोष्टीकडे तो वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकला. त्याला ती दृष्टी दिली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने. लग्नानंतर विराटचे आयुष्यच बदलले. क्रिकेट मैदानावरचे आणि मैदानाबाहेरचेही. असं म्हणतात, तुम्हाला सर्वात जवळच्या व्यक्तीने दिलेला सल्ला अधिक प्रिय आणि अनुकरणीय असतो. विराटने पत्नीचे ऐकले आणि भारताला अलीकडच्या काळात आपण पाहतो तो आगळावेगळा विराट कोहली मिळाला.
कसा आहे विराट स्वभावाने…?
हा विराट आपल्या क्रिकेटप्रती अतिशय प्रामाणिक आहे. जिम्नॅशियममध्ये गेल्यानंतर आपल्या व्यायामाप्रती प्रामाणिक आहे. सरावाच्या प्रति प्रामाणिक आहे. आहाराच्या बाबतीत खूपच चोखंदळ आहे. तो दुधापसून बनविलेले किंवा दुधाचे अंश असलेले कोणतेही पदार्थ खात नाही किंवा पेय पीत नाही. खाण्याच्या बाबतीतही तो सटरफटर खात नाही. एवढेच काय, पण पाणीदेखील किती प्यावे याबाबतही तो सजग आहे. आवश्यक तेवढेच पाणी पितो. त्याच्या आहाराच्या सवयी अनेक भारतीय खेळाडूंनीही अंगीकारल्या आहेत.
मैदानावरचा विराट वेगळा आहे. तो नवोदित खेळाडूंना उपयुक्त सल्ले देतो. नव्या युक्त्या सांगतो. अनुभवाचे बोल ऐकवतो. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वानंतर भारतीय संघाच्या प्रगतीची ध्वजा सध्या विराटच्या खांद्यावर आहे. तो कर्णधार असो किंवा नसो. धोनीने भारताच्या विजयी परंपरेचा, इतिहासाचा पाया रचला. कोहलीने त्या पायावर आता भारतीय किकेटच्या यशाची इमारत उभी करायला आरंभ केला आहे. वैयक्तिक उच्चांक, विक्रम यापेक्षा तो संघाच्या हिताला अधिक महत्त्व देतो. विक्रमाच्या पाठी तो लागला असता तर यापेक्षा अधिक शतके, विक्रम त्याच्या नावावर लागले असते.
तो धर्मवेडा नाही, अंधश्रद्धाळूपण नाही. पण, इतरांच्या धार्मिक भावनांच विरुद्धही नाही. तो प्रत्येकाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचा आदर करतो. त्याच्या पत्नीचे हनुमान चालिसा तोंडपाठ आहे. पण, कोहलीला सरावाला, फलंदाजीला जाताना ते ऐकायला आवडते. त्याच वेळी विराट आध्यात्मिक शक्तीबाबत बोलू शकतो. आध्यात्मिक किंवा कोणती तरी शक्ती अस्तित्वात आहे, हे तो मानतो. मात्र, त्याचा अतिरेक होऊ देत नाही. विराटला हरिद्वार किंवा जेथे साधू-संतांचे वास्तव्य असते, तेथे जाऊन त्यांच्यासमवेत राहायला आवडते. तो साधू-संतांच्या संगतीतही राहतो, त्यामुळे त्यांचे आध्यात्मिक विषयावरचे ज्ञान सखोल आहे.
कोहलीचे आध्यात्म दिखाव्यासाठी नाही, हे त्याच्या अल्प गोष्टींबाबत दिसून येते. कोहलीला पाळीव प्राण्यांची भाषाही कळते. कोहलीची कुत्र्यांची विशेष मैत्री आहे. तो कुत्र्यांशी बोलतो. त्यांच्याशी संवाद साधतो. क्रिकेट सामन्याआधी नेट्स सरावादरम्यान मैदानाच्या सुरक्षिततेसाठी जे सुरक्षा रक्षकांसोबत पोलिसी कुत्रे असतात, त्यांच्याशी तो अनेकदा गप्पा मारताना दिसतो. तो तेथेच त्या कुत्र्यांसोबत मैदानावर झोपतो. तेथेच त्यांच्याशी गप्पा मारतो. तुमची आध्यात्मिक पातळी वरची असल्याशिवाय हे शक्य होत नाही.
‘ब्रँड कोहली’
सहकार्यांसमवेत असताना विराट अनेक क्रिकेटपटूंच्या नकला करतो. त्यामध्ये आपले आणि परदेशी क्रिकेटपटूही असतात. ते खेळाडू कसे उभे राहतात, स्टान्स घेतात, बोलतात कसे, ते हुबेहुब करुन सर्वांना हसवित असतो. त्याचा गळाही चांगला आहे. किशोरकुमारची गाणी तो गातो. पंजाबी गाणी गातो.
त्याने दिलेला मदतीचा हात इतर कुणाला कळणार नाही, याचीही तो काळजी घेतो. एकदा बंगळुरु येथे मैदानावर सराव सुरू असताना एक लहान मुलगी त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी आली होती. सही झाल्यावर विराटने तिला विचारलं, “तुला काय देऊ? काय हवे आहे?’’ ती लहान मुलगी म्हणाली, “बंगलोरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या मदतीसाठी एक सेंटर आहे, तेथे तू येशील?’’ आपल्या छोट्या चाहतीची मागणी त्याने पूर्ण केली. तेथे गेल्यावर विराटने सेंटर चालविणार्यांना विचारले, “मी या सेंटरसाठी काय करु शकतो.’’ त्या सेंटरला औषधांची गरज होती. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी वातानुकुलित जागेची गरज होती. विराटने लगेच चेक फाडला. विराटच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बाह्य जगाला ठाऊक नाहीत. त्या ठाऊक होऊ नयेत, असे विराटला वाटते.






