- डॉ. किर्ती अंधळकर
शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्राची इतकी प्रगती होऊनही किती लोकांपर्यंत ते ज्ञान पोचले आहे? त्या ज्ञानाचे फायदे किती लोकांना झाले आहेत? कारण व्यसनाने आरोग्याचा प्रश्न जटिल होत आहे. आज तरुणांमध्ये फॅशन म्हणून व्यसनाची सुरुवात होते व नंतर काहींचे तेच ‘पॅशन’ बनते. अलिकडील काळात शालेय वयापासून तंबाखू, गुटख्यासारख्या व्यसनाची सुरुवात झालेली अनुभवयास मिळते.
व्यसनाच्या शाळेतील तंबाखू ही बालवाडी असते. नंतर गुटखा, बीअर असे करत ते पदवी मिळवतात; पण प्रत्यक्ष शैक्षणिक आयुष्यातील पदवी कशीतरी पास होतात किंवा शिक्षण मध्येच सोडतात. तंबाखू हे व्यसनाचे प्रवेशद्वार म्हटले तर वावगे ठरणार नाही. या प्रवेशद्वारात जाण्याआधीच धोक्याची जाणीव व्हावी म्हणून हा लेखप्रपंच.
31 मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिन (World No Tobacco Day) म्हणून 1988 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून साजरा केला जाऊ लागला. हा केवळ एक जागरूकता दिन नसून, तंबाखूच्या सर्वांगीण दुष्परिणामांविरुद्ध जागतिक इशारा सुध्दा आहे. हा दिवस आरोग्य, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय स्तरांवरील हानीची जाणीव करून देतो आणि तंबाखू उद्योगाच्या भ्रामक प्रचाराविरुद्ध लोकांना जागृत करतो. 2025 साला साठी जागतिक आरोग्य संघटनेची "छलाचा मुखवटा उतरवा" (Protecting youth from industry manipulation) ह्या उद्दीष्टाचा अंगीकार केला आहे. ज्यामध्ये तरुणांच्या जीवीताला लक्ष्य करणाऱ्या तंबाखू उद्योगाच्या फसव्या प्रचाराला उघड करण्याचे धोरण योजले आहे. 
तंबाखूचा इतिहास…
तंबाखूच्या इतिहास आणि प्रसाराची विचार करता त्याच्या उगमाचा विचार आधी करवा लागतो. तंबाखूचा उगम अमेरिका खंडात झाला, जिथे त्याचा उपयोग धार्मिक विधी आणि औषधी उपायांसाठी होत असे. भारतात 16व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांमार्फत तंबाखूचा आपल्या देशात प्रवेश झाला. पण हळूहळू तंबाखूने व्यसनाच्या मगरमीठीत रुपांतर झालेले दिसते. तंबाखूला इंग्रजी भाषेत ‘टोबॅको’(TOBACCO) म्हटलं जातं, हे आपल्याला माहीत आहे. अरेबीक भाषेतील ‘टबॅक’ (TABAQ) या शब्दावरून हा शब्द आला असावा. ‘टबॅक’ म्हणजे अत्यानंद निर्माण करणारी, उन्माद निर्माण करणारी वनस्पती. तंबाखूची लागवड जगात आठ हजार वर्षांपासून केली जात असल्याचे पुरावे आहेत.
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात ‘रेड इंडियन्स’नी तंबाखूचा वापर प्रथम औषध म्हणून आणि नंतर समारंभात सुरू केला. 11 ऑक्टोबर 1942 रोजी कोलंबसने अमेरिकेच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा तिथल्या ‘रेड इंडियन्स’नी त्याचं स्वागत तंबाखूची सोनेरी पाने देऊन केले. 15 व्या शतकात युरोपात तंबाखू लोकप्रिय झाली. भारतात 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी तंबाखू आणली. मात्र पुढे जहाँगीर बादशहाने आरोग्याला घातक म्हणून तंबाखूला विरोध केला. ब्रिटिशांनी मात्र भारतात तंबाखू लागवडीला प्रोत्साहन देऊन तंबाखूची निर्यात वाढवून महसुलात भर घातली.
संबंधित लेख वाचा: 1) “कसली दारूबंदी? इथं सगळीकडे मिळते दारू, अगदी ॲमेझॉनवरही…” |
भारतात तंबाखूचा प्रवेश कसा झाला ?
भारतात तंबाखूचे सेवनाचे प्रकार आपण पाहिले तर त्याची सुरवात दात घासण्याचे साधन म्हणजे मिसरीने झाली. ते गावोगावी लोकप्रिय झाले. पण मुळात तंबाखू ही धूम्रपानाच्या स्वरूपात सिगारेट, बीडी, हुक्का वापरली गेली. तर चघळण्याच्या स्वरूपात गुटखा, खैनी, पानमसाला यातून वापरला गेला. मात्र दंतमंजन म्हणून मिसरी -गुलचा वापर सर्वत्र होऊ लागला. भारत आज तंबाखू उत्पादनात दुसर्या क्रमांकावर आहे. भारतात एकूण 13 राज्यांत तंबाखूची शेती केली जाते. भारतात प्रतिवर्षी 10 हजार कोटी सिगारेट बनतात व 70 हजार कोटी बिड्यांची निर्मीती होते. महसूल – तंबाखू उत्पादकांकडून केंद्र शासनास 50 टक्के महसूल मिळतो.
2017 साली झालेल्या ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS 2 – 2016-17) नुसार भारतातील सुमारे 28.6% प्रौढ तंबाखू वापरतात, त्यात पुरुष –42.4%, स्त्रिया – 14.2% ह्या तंबाखूच्या व्यसनाच्या अधीन आहेत. 2009-10 च्या तुलनेत ही संख्या घटलेली दिसणे सकारात्मक असले तरी संख्येचा विचार करता आजही खूप जण तंबाखूचे सेवन करून आपल्या जीवाला धोक्यात घालत आहेत.
तंबाखूत 3500, तर धूम्रपानाच्या धुरात 4000 रसायन असतात. यापैकी निकोटिन, कार्बन मोनोक्साईड, पारा, शिसे, अॅसिटोन, अमायनो अॅसिड्स, क्रोमियम, कॅडमियम इत्यादी नावे आपल्या ऐकण्यातली आहेत. तंबाखूतील निकोटिनमुळे माणूस व्यसनाधीन बनतो. तंबाखूचे दुष्परिणामांचा विचार करता त्याचे मानवी आरोग्यावर भयंकर परिणाम होतात. त्यामुळे तोंड, घसा, फुफ्फुस, अन्ननलिका, मूत्राशय व गर्भाशयाचे कर्करोगाला सामोरे जाऊ शकते. तसेच त्याच्या सेवनाने हृदयविकार, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, COPD, वंध्यत्व सुध्दा येऊ शकते. सेकंडहँड स्मोकमुळे म्हणजे पॅसिव्ह स्मोकमुळे मुलांमध्ये दमा, श्वसनसंकट, नवजात मृत्यूमध्ये वाढ होताना दिसते.
तंबाखूमुळे केवळ आरोग्याच नाही तर व्यक्तीचे सामाजिक व आर्थिक नुकसान सुध्दा होते. बहूतांश गरीब कुटुंब आपल्या मर्यादित उत्पन्नाचा मोठा हिस्सा तंबाखूवर खर्च करताना दिसून येतात. त्यांच्या आरोग्य खर्चात वाढ होते, पोषण व शिक्षणावर परिणाम होतो. याचा एकत्रित परिणाम म्हणून सरकारवरील आरोग्यव्यवस्थेचा आर्थिक भार वाढला जातो. पर्यावरणीय नुकसानसुध्दा तंबाखू मुळे होते असते.तंबाखू शेतीमुळे जंगलतोड व जमिनीचा ऱ्हास याचे परिणाम दिसून आलेले आहेत. तसेच सिगारेट बट्स, प्लास्टिक रॅपरमुळे घनकचरा व प्रदूषण होते. पॅसिव्ह स्मोकमुळे हवेचे विषारीकरणही होत जाते. 
तंबाखू उद्योग आणि तरुण पिढी
पौगंडावस्था म्हणजे बालपण व तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंतचा कालावधी. या वयात स्वातंत्र्याची, स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव व्हायला सुरुवात होते. समवयस्कांचा प्रभाव, भन्नाट नवीन कल्पना, काही वेगळे करून पाहण्याची उत्सुकता वाढते. जाहिरातींचा प्रभाव, मोठ्या मित्रांचे किंवा घरातील, समाजातील वडिलधार्यांचे अनुकरण, गैरसमज (परीक्षाकाळात झोप जाण्यासाठी तंबाखू खावे) यामुळे व्यसनाचा पहिला अनुभव घेतला जातो. तंबाखू उत्पादक कंपन्या ह्या विशेषत: तरुणांना लक्ष्य करताना दिसून येतात.
आपल्याकडील तरूणही आकर्षक पॅकेजिंग, वेगवेगळे फ्लेवर्स यात फसले जातात. त्यासाठी चित्रपट, सोशल मीडिया, सेलिब्रिटींचा आक्रमक वापर केला जातो. त्यातून तंबाखूच्या सेवनाची भूरळ पाडली जाते. मुक्त व बिनधास्त जीवनशैलीचा आभास देणाऱ्या जाहिराती ह्या सुध्दा तरूणांना आकर्षित करत असतात. WHO चे उद्दीष्ट सुध्दा आपल्याला हेच दर्शवत असते. त्यामुळे तरुणांच्या मनावर होणाऱ्या तंबाखूच्या प्रभावापासून त्यांचे संरक्षण गरजेचे आहे.
तंबाखू सोडण्याचे उपाय आणि आव्हाने
तंबाखू सोडण्याचे फायदे सुध्दा ह्या लेखात सांगणे क्रमप्राप्त आहे . तंबाखू सोडल्यामुळे 20 मिनिटांतच हृदयगती सामान्य होते. तसेच 12 तासांतच शरीरातील कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण कमी होत जाते. दोन ते 12 आठवड्यांत तर शरिरातील रक्ताभिसरण व फुफ्फुस कार्य सुधारताना दिसून येते. 1 वर्षात हृदयरोगाचा धोका अर्धा होत असतो. दहा वर्षांत कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतोच होतो.
तंबाखू सोडणे आव्हानात्मक असले तरी शक्य असते. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) ज्यात निकोटिन गम, पॅचेस वापरले जातात. तसेच समुपदेशनाव्दारे तर काही वेळा औषधांचा वापर करून देखील तंबाखू सोडवता येते.
तंबाखू सोडवण्यासाठी सरकारी सुविधा सुध्दा महत्वाचे आहे. सरकारचे कार्य हे सर्वात महत्वाचे ठरते. सरकारतर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणासाठी हेल्पलाइन – 1800-11-2356 चालवली जाते. तर mCessation सेवेत मोबाईलवरून मार्गदर्शन देणारी सेवा – फक्त QUIT असा मेसेज 14444 या क्रमांकावर पाठवता येते.
तंबाखूच्या सेवनामुळे व्यक्तीला मानसिक ताण, सामाजिक दबाव, वजन वाढ या गोष्टींचा सामना करवा लागतो पण सातत्यपूर्ण इच्छाशक्तीने त्यावर मात करता येते.
तंबाखू नियंत्रणासाठी कायदे
भारतातील तंबाखू नियंत्रणासाठी कायदे केलेले आहेत त्यात भारत सरकारने लागू केलेला COTPA 2003 (Cigarettes and Other Tobacco Products Act) कायद्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री निषिद्धता, 18 वर्षाखालील व्यक्तींना विक्री हा गुन्हा ठरवलेला आहे, तंबाखू उत्पादनांवर चित्रमय चेतावणी व उच्च कर लावला आहे. पण वरील कायदे अंमलबजावणीत अडथळे येतात. विशेषत: स्थानिक प्रशासनाचा अभाव, जनतेची असहकारता दिसून येते. तंबाखू सेवनावर सार्वत्रिक नियंत्रण करण्यासाठी सामाजिक सहभाग आवश्यक आहे.
तंबाखू हे एक हळूहळू मरण आणणारे विष आहे. ते केवळ वैयक्तिक आरोग्याचे संकट नसून, आपल्या समाज, अर्थव्यवस्था व पर्यावरणासाठीही गंभीर आहे. आपण सर्वांनी मिळून तंबाखूमुक्त भारत घडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे, प्रशासन आणि नागरिक यांचे एकत्रित प्रयत्नच या लढाईत निर्णायक ठरणार आहे. या जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त आपणाला संकल्प करायला हवा आणि सर्वांना संदेश द्यायला हवा की “तंबाखू सोडा, निरोगी आयुष्य जोडा!”
(लेखिका तंबाखू समुपदेशक आणि सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा या क्षेत्रात एम.डी.एस. आहेत.)






