Skip to main content

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

Article in Marathi
Tej Prakash Bhardwaj
2 days ago
309 views
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

तेज प्रकाश भारद्वाज


  • विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. 


  • आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? 


  • वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.


घटना पहिली…


तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील एका रिलने एवढा गदारोळ उडवून दिला की भारतीय पर्यटकांच्या प्रतिमेबाबत पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली. व्हिएतनाममधील एका विमानतळावर भारतीय पर्यटकांनी विमानाच्या अगदी जवळ गरबा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडीओने इंटरनेटवर अक्षरशः खळबळ उडवली असून “भारतीयांचा उत्साह” की “सार्वजनिक ठिकाणी गैरजबाबदार वर्तन”, यावर नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


घटना दुसरी…


काही दिवसांपूर्वी थायलंडमधील एका व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक ‘देसी प्रवासी’ पटाया बीचवर आराम करताना, उघड्यावर मद्यपान करताना आणि समुद्रकिनाऱ्यावर झोपलेले दिसत होते. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “पटाया बीचवर भारतीय माहोल! समुद्राचा आनंद, मजामस्ती आणि थायलंडमधील अविस्मरणीय क्षण!” मात्र, त्या दृश्यात आणखी एक गोष्ट ठळकपणे दिसत होती… चिप्सची पाकिटे, स्नॅक्सचे रॅपर्स आणि बिअरच्या रिकाम्या कॅन्सनी भरलेला अस्वच्छ समुद्रकिनारा. भारताच्या कोणत्याही बिचवर जसा कचरा अशतो अगदी तसा, जणू काही भारतीय पर्यटकांसाठी आता संपूर्ण जगच कचरापेटी बनले आहे.


सध्या तर असही म्हटलं जातयं की, काही भारतीय पर्यटक देशाची प्रतिमा परदेशात आणि अगदी देशांतर्गतही मलिन करण्याचा जणू विडाच उचलून बाहेर पडले आहेत. व्हिएतनामला गेलेल्या एका भारतीय प्रवाशाने रेडिटवर लिहिले की, हनोईच्या ‘बिअर स्ट्रीट’वर आपल्या देशातील काही लोकांना एका नाईटक्लबमधून हाकलून देण्यात येताना पाहून त्याला “दुसऱ्याच्या कृत्यामुळे वाटणारी लाज” जाणवली. त्याने लिहिले, “एक सभ्य आणि आदराने वागणारा भारतीय प्रवासी असतो, तर त्यामागे पाच जण असे असतात जे सगळ्यांची प्रतिमा खराब करून टाकतात. आणि मग त्याचा फटका कोणाला बसतो? आपल्यासारख्या इतर भारतीयांनाच.”


यावर आणखी एका वापरकर्त्याने अधिक कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, “मी गेली जवळपास पंधरा वर्षे एकट्याने जगभर प्रवास करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, आपली भारतीय प्रतिमा जवळपास संपली आहे. ती पुन्हा अगदी दहा टक्के सुधारण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न आणि जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. पण बहुतेक भारतीय इतके अहंकारी आणि भ्रमात जगणारे आहेत की त्यांना स्वतःचे वर्तन किती असभ्य आहे, याची जाणीवसुद्धा होत नाही.”


User Image


विमानाच्या ‘कमोड’मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, डायपर्स, अंतर्वस्त्रे…


गेल्या महिन्यात भारतीय प्रवाशांनी खचाखच भरलेले शिकागोहून निघालेले एअर इंडियाचे एक विमान अर्ध्या प्रवासातूनच परत फिरण्यास भाग पाडले गेले. कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या… विमानातील १२ पैकी तब्बल ८ शौचालये बंद पडली होती. त्यामागचे कारण होते, शौचालयांत टाकून फ्लश करण्यात आलेल्या पॉलीथिनच्या पिशव्या, ब्लँकेट्स, अंतर्वस्त्रे, डायपर्स, फाटके कापड आणि अगदी कपडेही.


कोची येथील वारंवार विमानप्रवास करणाऱ्या प्रभा मेनन यांनी यावर उपरोधिक प्रतिक्रिया देताना म्हटले, “भारतीय प्रवाशांना शौचालय वापरण्याचे प्रशिक्षण देणे कदाचित व्हिसा प्रक्रियेचाच एक भाग असायला हवे.”


या घटनेनंतर एअर इंडियाने प्रवाशांना आवाहन केले की, “शौचालयांचा वापर केवळ त्यासाठीच करावा ज्यासाठी ती बनवली गेली आहेत.” विशेष म्हणजे, बंद पडलेल्या शौचालयांमध्ये केवळ इकॉनॉमी वर्गातीलच नव्हे तर बिझनेस क्लासमधील शौचालयांचाही समावेश होता.


आज असभ्य, नियमांकडे दुर्लक्ष करणारा आणि सार्वजनिक शिष्टाचारांचे भान नसलेला ‘देसी पर्यटक’ जणू भारताचा नवा अनधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर बनत चालला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अशा प्रतिमेमुळे “मेरा भारत महान” या घोषणेची प्रतिष्ठा जगासमोर वाढण्याऐवजी अधिकच धूसर होताना दिसते.


‘अग्ली इंंडियन’ पेक्षा ‘अग्ली चायनीज’ जगभरात प्रसिद्ध


मात्र, वस्तुस्थिती या लोकप्रिय समजुतीला पूर्णपणे दुजोरा देत नाही. भारतीय पर्यटक हे जगातील सर्वांत वाईट पर्यटक आहेत, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. अनेक वर्षांपासून या बाबतीत चीनी पर्यटकांची प्रतिमा अधिक नकारात्मक राहिली आहे. एका टप्प्यावर चीन सरकारलाच आपल्या नागरिकांना प्रवासादरम्यान सार्वजनिक ठिकाणी कोणते वर्तन अयोग्य मानले जाते, याची माहिती देणारी मार्गदर्शक पत्रके वाटावी लागली होती. रस्त्याच्या कोपऱ्यांवर शौच करणे यांसारख्या कृती सार्वजनिक शिष्टाचारांच्या विरोधात आहेत, हे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.


२०१३ मध्ये १५ वर्षीय डिंग जिनहाओ या चीनी मुलाने इजिप्तमधील प्राचीन लक्झर मंदिराच्या भिंतीवर आपले नाव कोरले होते. या घटनेनंतर चीनी पर्यटकांविषयीचा रोष इतका वाढला की पॅरिसपासून फुकेतपर्यंत अनेक पर्यटनस्थळांवर त्यांचे स्वागत कमी होत गेले.


पर्यटकांच्या वर्तनाचे मूल्यांकन करणाऱ्या ‘एक्स्पीडिया बेस्ट टुरिस्ट इंडेक्स’ या सर्वेक्षणात एकदा ब्रिटिश पर्यटकांना युरोपमधील सर्वांत वाईट वर्तन करणारे पर्यटक म्हणून संबोधण्यात आले होते. त्यांच्यावर अस्वच्छता पसरवणे, टिप देण्यास कंजूषपणा करणे आणि सतत चिडचिड्या स्वभावाने वागणे असे आरोप होते. फ्रेंच पर्यटकांनाही कंजूष म्हणून ओळखले गेले. अमेरिकन पर्यटकांची प्रतिमा वेगळ्याच कारणांनी मलिन झाली आहे. स्थानिक संस्कृतीबद्दलचे अज्ञान आणि सांस्कृतिक असंवेदनशीलता यामुळे त्यांना अनेकदा “अग्ली अमेरिकन्स” अशी उपाधी दिली जाते. ही संज्ञा लेखक ग्रॅहम ग्रीन यांच्या प्रसिद्ध साहित्यकृतीतून लोकप्रिय झाली. दुसरीकडे, ब्रिटिश पर्यटकांबद्दल असा स्टीरिओटाइप आहे की काही पेग जास्त झाल्यानंतर ते परदेशी शहरांच्या रस्त्यांवर कपडे काढून धावतानाही आढळतात.


२०१९ मधील युगोव्ह (YouGov) सर्वेक्षणानुसार, ज्या देशांमध्ये चीनी पर्यटकांचे प्रमाण मोठे आहे, तेथील स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीचा असंतोष लक्षणीय प्रमाणात दिसून येतो. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सिंगापूरमधील तब्बल तीन-चतुर्थांश नागरिकांनी चीनी पर्यटकांना सर्वांत वाईट पर्यटक म्हटले होते. थायलंड, मलेशिया आणि व्हिएतनाममध्येही जवळपास ४० टक्के स्थानिक नागरिकांचे मत असेच होते.


म्हणजेच, असभ्य किंवा त्रासदायक पर्यटकांची समस्या केवळ भारतीयांपुरती मर्यादित नाही. जगभरातील विविध देशांतील पर्यटकांबाबत अशा प्रकारच्या तक्रारी आणि पूर्वग्रह आढळतात. मात्र, सोशल मीडियाच्या युगात एखादी घटना क्षणार्धात व्हायरल होत असल्याने विशिष्ट देशातील पर्यटकांची प्रतिमा अधिक ठळकपणे चर्चेत येते आणि त्यातून संपूर्ण समाजाबद्दलचे व्यापक निष्कर्ष काढले जातात.


User Image


भारतात परदेश पर्यटनाला चालना का मिळाली?


१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २१व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय पर्यटकांची जगभरात वेगळीच प्रतिमा होती. उदारीकरणानंतर देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या, नव्या उद्योगधंद्यांची भरभराट झाली आणि कोट्यवधी रुपयांच्या स्टार्टअप्समुळे रातोरात कोट्यधीशांची एक नवी पिढी उदयाला आली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या भरभराटीचा तो सुवर्णकाळ होता आणि भारतीय प्रवासी जगभर खरेदीसाठी उत्साहाने फिरत होते.


पॅरिस आणि मिलानमधील नामांकित डिझायनर स्टोअर्समध्ये भारतीय ग्राहक सहज दिसत असत. उच्चभ्रू रेस्टॉरंट्समध्ये जेवण, मेफेअर, दुबई आणि कॅलिफोर्नियामध्ये महागडी मालमत्ता खरेदी करणे, तसेच फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लासने प्रवास करणे ही अनेक भारतीयांची नवी जीवनशैली बनली होती. परदेश प्रवासाने समाजवादी अर्थव्यवस्थेच्या काळातील काटकसरी भारतीयाची प्रतिमा बदलून टाकली.


आजचे चित्र मात्र काहीसे वेगळे आहे. आता मोठ्या महानगरांपुरतेच नव्हे तर लहान आणि मध्यम शहरांतील भारतीयही मोठ्या संख्येने परदेशात फिरण्यासाठी, खरेदीसाठी आणि मनोरंजनासाठी जात आहेत. विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.


भारताच्या शहरी आणि निमशहरी भागातील तुलनेने वेगवान आर्थिक वाढीमुळे प्रवास उद्योगात दोन वेगळ्या प्रकारच्या पर्यटक पिढ्या उदयाला आल्या आहेत. भांडवली बाजार सल्लागार संस्था EY च्या एका अहवालानुसार, या पिढ्यांना ‘जेन ACE’ आणि ‘जेन LUX’ अशी नावे देण्यात आली आहेत. जेन ACE ही ४० वर्षांखालील पिढी आहे. साहसी अनुभव घेणे, आनंद साजरा करणे आणि नवीन गोष्टींचा शोध घेणे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ते बहुधा मित्रमंडळीसोबत प्रवास करतात आणि त्यांच्या प्रवासाच्या निवडींवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असतो. तर जेन LUX ही ४० वर्षांवरील पिढी आहे. या गटातील प्रवासी लक्झरी, वेगळेपणा आणि दर्जेदार अनुभवांना प्राधान्य देतात. ते सहसा कुटुंबासोबत प्रवास करतात आणि विविध ऑफर्स, सुट्ट्यांचे नियोजन आणि आरामदायी पर्यटन यांचा त्यांच्या निर्णयांवर प्रभाव असतो.


परदेश पर्यटनातील ही झपाट्याने वाढ मुख्यतः शहरांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे होणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कारण या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय आर्थिक वाढ झाली आहे. व्हिसा अर्जांच्या प्रवाहाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की टियर-२ शहरांतील पर्यटकांना परदेशात जाण्याची अधिक आवड आहे. या गटातील सुमारे ४० टक्के लोक देशांतर्गत पर्यटनापेक्षा परदेश पर्यटनाला प्राधान्य देतात. याउलट, टियर-३ शहरांतील प्रवासी तुलनेने देशांतर्गत पर्यटनाकडे अधिक आकर्षित होतात.


उद्योगपती हर्ष गोएंका यांनी सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केले होते. ते छायाचित्र स्वित्झर्लंडमधील ग्स्टाड येथे असलेल्या महागड्या हॉटेल आर्क-ऑन-सिएलमधील व्यवस्थापकाने विशेषतः “भारतातून आलेल्या पाहुण्यांसाठी” लावलेल्या सूचनाफलकाचे होते. त्या सूचनांमध्ये काही गोष्टी ठळकपणे नमूद करण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ, भारतीय पाहुण्यांनी कॉरिडॉरमध्ये आणि बाल्कनीत हळू आवाजात बोलावे, कारण इतर पाहुण्यांना शांतता आवडते. तसेच, न्याहारीच्या बुफेमधील पदार्थ सोबत घेऊन जाऊ नयेत; तसे केल्यास त्यासाठी स्वतंत्र पैसे आकारले जातील, असेही नमूद करण्यात आले होते.


या सूचनांबद्दल प्रतिक्रिया देताना गोएंका यांनी लिहिले होते की, हा फलक पाहून त्यांना “राग आला, अपमानित झाल्यासारखे वाटले आणि त्याचा निषेध करावासा वाटला.” मात्र त्याच वेळी त्यांनी आत्मपरीक्षणाची गरजही अधोरेखित केली. “भारत एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत असताना, आपले पर्यटक हेच आपल्या देशाचे सर्वोत्तम जागतिक राजदूत आहेत. त्यामुळे आपली प्रतिमा बदलण्यासाठी आपण प्रयत्न करूया,” असे ते म्हणाले होते.


आता परदेशात कसे वागावे याचेही प्रशिक्षण सोशल मीडियाने द्यावे


ट्रॅव्हल ट्विस्ट या पर्यटन संस्थेचे संस्थापक आणि मुख्य अतिथी-अनुभव अधिकारी हरजीत सिंग यांचे मत आहे की सोशल मीडिया आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सनी अनेक पर्यटनस्थळांवरील ‘ओव्हरटुरिझम’ला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्यांच्या मते, “सोशल मीडियाने स्वस्त आणि बजेटमध्ये होणाऱ्या परदेश प्रवासाची कल्पना अतिशय आकर्षक पद्धतीने मांडली. त्यामुळे अनेक प्रवासी आता गोवा किंवा केरळसारख्या पारंपरिक पर्यटनस्थळांऐवजी व्हिएतनाम किंवा थायलंडची निवड करतात. त्यांना ऑनलाइन चर्चेचे आणि व्हायरल कंटेंटचे आकर्षण असते. दुर्दैवाने, या प्रवासांमध्ये स्थानिक संस्कृती, परंपरा किंवा त्या समाजाबद्दलचे ज्ञान यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. अनेक जण केवळ ‘परदेशात जाऊन आलो’ हा सामाजिक प्रतिष्ठेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रवास करतात.”


‘एक्स’ किंवा इन्स्टाग्रामवर काही मिनिटे फेरफटका मारला तरी भारतीय पर्यटकांच्या कथित गैरवर्तनाचे असंख्य व्हिडिओ आणि रील्स सहज पाहायला मिळतात. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, स्थानिक नियमांकडे दुर्लक्ष करणे, रांगेचे शिष्टाचार न पाळणे, परदेशी पर्यटनस्थळांवर रील्स बनवताना इतरांना त्रास देणे किंवा सतत घासाघीस करण्याचा प्रयत्न करणे, अशा अनेक प्रकारच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.


User Image


मात्र, यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय पर्यटकांना इतके ‘असभ्य’ किंवा ‘उद्धट’ का मानले जाते? ‘घासाघीस करणारा’, ‘कंजूष’, ‘गोंधळ घालणारा’ किंवा ‘राडेबाज’ अशी लेबले भारतीय पर्यटकांच्या ओळखीला इतकी सहजपणे का चिकटतात?


हे प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरतात कारण भारताचा परदेश पर्यटन बाजार आज अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. २०२३ या एका वर्षातच भारतीय पर्यटकांनी परदेश प्रवासावर तब्बल ३३.३ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे आकडे सांगतात. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी भारतीय पर्यटकांच्या आर्थिक क्षमतेची दखल घेतली आहे. भारतीय प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ई-व्हिसा सुविधा, सुलभ व्हिसा प्रक्रिया आणि विशेष पर्यटन मोहिमा राबवल्या जात आहेत. या पर्यटनवाढीमागे अनेक घटक कार्यरत आहेत. कमी किमतीच्या विमानसेवांनी परदेश प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा केला आहे. त्याचबरोबर बॉलिवूड चित्रपट, सोशल मीडिया आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स यांच्या प्रभावामुळे आग्नेय आशियातील देश भारतीय पर्यटकांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत.


एकेकाळी परदेश प्रवास हा मोजक्या उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित अनुभव मानला जात असे. मात्र आज थायलंड, व्हिएतनाम, बाली, मलेशिया, सिंगापूर किंवा दुबई यांसारखी ठिकाणे भारतीय मध्यमवर्गाच्या पर्यटन नकाशावर सहजपणे आली आहेत. परिणामी, भारतीय पर्यटकांची संख्या जितकी वाढत आहे, तितक्याच वेगाने त्यांच्या वर्तनाविषयीच्या चर्चा, टीका आणि पूर्वग्रहही जागतिक स्तरावर वाढताना दिसत आहेत.


आपल्याला ‘जुगाड’ किंवा शॉर्टकट शोधण्याची सवयच लागली आहे


मात्र, परदेशातील सामाजिक शिष्टाचार, स्थानिक नियम आणि नागरी वर्तनाच्या अपेक्षांशी अपरिचित असलेला भारतीय प्रवासी केवळ आपली बॅगच घेऊन परदेशात जात नाही; तो आपल्या देशात सहज चालून जाणाऱ्या अनेक सवयीही सोबत घेऊन जातो आणि याच सवयी परदेशात अनेकदा वादाचे कारण ठरतात. मानसोपचारतज्ज्ञ आणि हेड स्पेस हीलिंगच्या संस्थापक जया सुकूल यांच्या मते, अशा वर्तनाची मुळे भारतीय उपखंडाच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवात दडलेली आहेत. त्या म्हणतात की, “आपल्या उपखंडातील सामाजिक नियम आणि युरोप, अमेरिका किंवा आग्नेय आशियातील समाजव्यवस्था यांच्यात मोठा फरक आहे. लहानपणापासूनच आपल्याला ‘जुगाड’ किंवा शॉर्टकट शोधण्याची सवय लागते. नियम वाकवून काम काढणे, त्यातून सुटून जाणे, ही एक प्रकारची सामाजिक संस्कृतीच बनते.”


त्या पुढे स्पष्ट करतात, “मला काहीही करून चालून जाईल, अशी मानसिकता अनेकदा दिसून येते. पोलिसांचा दंड शंभर-दोनशे रुपयांची लाच देऊन टाळता येईल, रस्त्यावर कचरा टाकला तरी कोणीतरी तो उचलून नेईल, नियम मोडले तरी त्याची फारशी किंमत मोजावी लागणार नाही. अशा प्रकारच्या अनुभवांतून ही मानसिकता तयार होते. आपल्या देशात आपण असेच वागतो, पण त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.”


रांगेत घुसणे ही भारतीय समाजातील एक जुनी आणि परिचित सवय मानली जाते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याइतकीच ती सर्वसामान्य असल्याचे अनेकांचे मत आहे.


कोविड महामारीच्या काळात घडलेली एक घटना याचे उदाहरण म्हणून वारंवार दिली जाते. भारतीय वंशाचे सिंगापूरचे नागरिक जसविंदर सिंग मेहर यांनी चांगी विमानतळावरील एका हॉटेलमध्ये “कोरोना, कोरोना” अशी आरोळी देत जमिनीवर थुंकल्यामुळे सिंगापूरच्या न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सिंगापूरसारख्या देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १,००० ते ५,००० सिंगापूर डॉलर्सपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या कठोर नियमांची कल्पना भारतातील अनेक नागरिकांना, अगदी उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्थलांतरित झालेल्यांनाही अवघड वाटते.


या चर्चांमधून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते. परदेशात भारतीय पर्यटकांविषयी निर्माण झालेली प्रतिमा ही केवळ काही स्वतंत्र घटनांची बेरीज नाही. ती आपल्या सामाजिक सवयी, नियमांविषयीचा दृष्टिकोन, सार्वजनिक शिस्तीबाबतची उदासीनता आणि ‘काहीही करून निभावून नेण्याची’ मानसिकता यांच्याशी जोडलेली आहे. त्यामुळे प्रश्न फक्त परदेशातील प्रतिमेचा नाही, तर भारतीय समाजात नागरी शिष्टाचार आणि सार्वजनिक जबाबदारी यांविषयी किती गांभीर्याने विचार केला जातो, याचाही आहे.


भारतीय पर्यटकांच्या नकारात्मक प्रतिमेला जगासमोर ठळकपणे आणणाऱ्या सुरुवातीच्या व्हिडिओंपैकी एक व्हिडिओ विशेषतः लक्षात राहणारा आणि अनेक भारतीयांसाठी लज्जास्पद मानला गेला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या त्या व्हिडिओमध्ये बालीतील एका हॉटेलमधील कर्मचारी भारतीय कुटुंबाला चोरीच्या संशयावरून अडवत असल्याचे दिसत होते. हॉटेल कर्मचारी त्या कुटुंबाला हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी त्यांचे सामान तपासण्यासाठी थांबवतात. सामानाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये हॉटेलमधील आरसे, कपडे टांगण्यासाठी वापरले जाणारे हँगर्स, सजावटीच्या वस्तू, हेअर ड्रायर आणि अगदी साबण ठेवण्याचे डिस्पेन्सर्सही आढळल्याचा दावा करण्यात आला होता. चोरी उघडकीस आल्यानंतर त्या कुटुंबातील एका महिलेने पोलिसांना बोलावू नये, अशी हॉटेल व्यवस्थापनाकडे विनंती केल्याचे आणि चोरी केलेल्या वस्तूंचे पैसे देण्याची तयारी दर्शवल्याचेही त्या व्हिडिओमध्ये दिसत होते.


अशा प्रकारच्या घटना सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असल्याने भारतीय पर्यटकांविषयीचे वांशिक आणि सांस्कृतिक ठोकताळे अधिक दृढ होत चालल्याची चिंता व्यक्त केली जाते. भारतीय पर्यटक म्हणजे गोंधळ घालणारे, अस्वच्छ, नियम मोडणारे किंवा सार्वजनिक शिस्त न पाळणारे लोक अशी प्रतिमा अनेकदा तयार केली जाते.


अलीकडेच लोकप्रिय पॉडकास्टर रवी हांडा यांनीही या विषयावर भाष्य केले होते. नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्याऐवजी व्हिएतनामची निवड केलेल्या हांडा यांनी एक्सवर लिहिले की, गोवा असो किंवा परदेश, काही उत्तर भारतीय पर्यटकांचे वर्तन इतरांसाठी त्रासदायक आणि असंवेदनशील ठरते. त्यांनी स्वतःचे काही अनुभवही शेअर केले. त्यापैकी एका घटनेत व्हिएतनाममधील रेल्वेप्रवासादरम्यान काही भारतीय प्रवासी इतर भारतीय दिसताच मोठ्या आवाजात “भारत माता की जय” च्या घोषणा देऊ लागल्याचे त्यांनी नमूद केले. देशभक्तीची भावना वेगळी असली तरी सार्वजनिक ठिकाणी इतर प्रवाशांच्या शांततेचा विचार न करता अशा घोषणा देणे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


User Image


भारतीय पर्यटकांनी परदेश प्रवासावर खर्च केले तब्बल ३१.७ अब्ज डॉलर्स 


या पर्यटकांची सामाजिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी पाहिली तर ती आजचा भारत कुठे आणि कसा जगतो याचेच प्रतिबिंब असल्याचे दिसते. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या २ कोटी ८२ लाखांवर पोहोचली. हा आकडा कोविडपूर्व २०१९ मधील २ कोटी ६९ लाखांच्या विक्रमालाही मागे टाकणारा होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२४ या आर्थिक वर्षात भारतीय पर्यटकांनी परदेश प्रवासावर विक्रमी ३१.७ अब्ज डॉलर्स खर्च केले. त्यापैकी सुमारे १७ अब्ज डॉलर्सचा खर्च आंतरराष्ट्रीय पर्यटनावर झाला, जो मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २५ टक्के अधिक होता. फिक्कीच्या एका अहवालानुसार, भारतीय पर्यटक आंतरराष्ट्रीय सहलींसाठी सरासरी ७,००० डॉलर्सपर्यंत (सुमारे ६ लाख रुपये) खर्च करण्यास तयार असतात. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील नागरिक परदेश प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत आघाडीवर आहेत.


मात्र, भारतीय पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यांची खर्च करण्याची क्षमता यांच्यासोबत काही सांस्कृतिक सवयी आणि वर्तनाचे प्रश्नही चर्चेत येत आहेत. एका आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपनीसाठी काम करणारे आणि युरोप-अमेरिकेतील गट सहलींचे मार्गदर्शन करणारे राजेश मित्तल (नाव बदललेले) याबाबत काही अनुभव सांगतात. त्यांच्या आवाजात निराशा स्पष्ट जाणवते. ते म्हणतात, “पहिल्यांदा अशा गटासोबत परदेशात गेलो तेव्हा अनेक गोष्टी मला विचित्र वाटल्या. काही लोक घरूनच लोणची, थेपले आणि इतर खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात घेऊन आले होते.”


त्यांच्या मते, पर्यटन बस एखाद्या ठिकाणी थांबताच काही महिला हातात रिकाम्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन लगेच बाहेर पडतात आणि जवळच्या रेस्टॉरंटच्या स्वच्छतागृहांमधील नळांमधून त्या भरू लागतात.


“त्या मोठ्या आवाजात बोलतात, हसतात आणि त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. कधीकधी रेस्टॉरंटचा व्यवस्थापक त्यांना रागावतो. मग दोन्ही बाजू शांत करण्याची जबाबदारी माझ्यावर येते. एका बाजूला रेस्टॉरंटचे कर्मचारी असतात आणि दुसऱ्या बाजूला माझे ग्राहक, ज्यांना आपण चुकीचे काय केले हेच समजत नाही. त्यांना वाटते त्यांचा अपमान झाला आहे. अशा वेळी मला भारतीय असल्याची लाज वाटते,” असे ते सांगतात.


मित्तल यांच्या अनुभवांमधून एक मनोरंजक विरोधाभास समोर येतो. भारतीय पर्यटक आज पूर्वीपेक्षा अधिक श्रीमंत आहेत, अधिक खर्च करू शकतात आणि जगभर प्रवास करत आहेत; परंतु आर्थिक प्रगतीसोबत जागतिक नागरी शिष्टाचार, सार्वजनिक वर्तन आणि स्थानिक संस्कृतीबद्दलची संवेदनशीलता याच प्रमाणात विकसित झाली आहे का, हा प्रश्न अजूनही उपस्थित केला जात आहे. कारण परदेशातील पर्यटन उद्योगासाठी भारतीय पर्यटक हे आता केवळ वाढती बाजारपेठ नाहीत, तर जागतिक पर्यटन व्यवस्थेतील एक प्रभावी शक्ती बनत आहेत. त्यामुळे त्यांच्या वर्तनाविषयीची चर्चा ही केवळ वैयक्तिक शिष्टाचारांची बाब राहिलेली नसून, ती भारताच्या बदलत्या सामाजिक वास्तवाची आणि जागतिक प्रतिमेचीही एक महत्त्वाची कहाणी बनली आहे.


भारतीयांनी विमानातच कांदे, कोथंबीर कापून भेळ बनवली


सिद्धांतला आठवणारा एक प्रसंग भारतीय पर्यटकांच्या वर्तनाबाबतच्या चर्चेत अनेकदा उद्धृत केला जाऊ शकतो. परदेशातील एका विमानप्रवासादरम्यान त्याने काही महिला प्रवाशांना त्यांच्या हँडबॅगमधून कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आणि इतर भाजीपाला बाहेर काढताना पाहिले. तो सांगतो, “त्या इतक्या निर्धास्त होत्या की त्यांनी विमान परिचारिकेकडे चक्क सुरी आणि चॉपिंग बोर्ड मागितला, जेणेकरून विमानातील जेवणाऐवजी त्यांना भेळ किंवा तत्सम काहीतरी बनवता येईल. क्रूने मदत करण्यास नकार दिल्यावर त्यांनी प्लास्टिकचा पट्टा (रूलर) काढला आणि त्याच्याच साहाय्याने भाज्या चिरायला सुरुवात केली.”


त्याच्या मते, या प्रकारामुळे केवळ संपूर्ण केबिनमध्ये तीव्र वास पसरला असे नाही, तर आणखी एक गमतीशीर गोंधळ निर्माण झाला. “त्या कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या सीटवर बसले होते. त्यामुळे एकमेकांकडे साहित्य पोहोचवण्यासाठी ते मोठमोठ्याने ओरडत होते. अखेर अचानक सुरू झालेल्या या ‘हवेतल्या भाजी मंडई’मुळे विमान परिचारिकाही त्रस्त झाली आणि तिने त्यांना हा प्रकार थांबवण्यास सांगितले. हा सगळा प्रकार इतका विचित्र होता की मला हसू आवरणे कठीण झाले होते.”


कंटेंट रायटर ध्वनीलाही स्वित्झर्लंडमधील असाच एक अनुभव आठवतो. अनेक आठवडे परदेशात फिरल्यानंतर तिला भेटलेला पहिला भारतीय पर्यटक माउंट टिट्लिसच्या रस्त्याकडेला उभा राहून लघुशंका करत असल्याचे तिने पाहिले होते.


मानसशास्त्राचे प्राध्यापक रजत मित्रा यांच्या मते, “अशा वर्तनामागे एक प्रकारची हक्काची भावना (sense of entitlement) असते. पैसा खर्च करत असल्यामुळे सभ्यतेचे नियम पाळण्याची गरज नाही किंवा पैशामुळे सर्व काही विकत घेता येते, अशी मानसिकता काही लोकांमध्ये दिसते.”


ते पुढे म्हणतात, “समस्या केवळ अज्ञानाची नाही; अनेकदा स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची इच्छाही नसते. नवीन संस्कृती समजून घेण्याऐवजी स्वतःच्या सवयी आणि अपेक्षा इतरांवर लादण्याची वृत्ती दिसून येते. त्यामुळे भारतीय पर्यटक अनेकदा वेगळे ठरतात, पण दुर्दैवाने सकारात्मक अर्थाने नाही.”


२३ वर्षीय इन्स्टाग्राम ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर रेहा अडाणीi, जी नियमितपणे परदेश प्रवास करते, तिच्या मते भारतीय पर्यटकांच्या काही वर्तनपद्धतींचे परिणाम केवळ वैयक्तिक लाजिरवाणेपणापुरते मर्यादित राहत नाहीत. ती म्हणते, “परदेशात आपल्याकडून दिसणारे कमीपणाचे किंवा असभ्य वर्तन केवळ आपल्याला लज्जास्पद ठरत नाही, तर त्याचे व्यापक परिणामही होतात.”


याबाबत मानसोपचारतज्ज्ञ जया सुकूलl म्हणतात, “आपल्या संस्कृतीतील अनेक गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो. मात्र, आपल्या वर्तनामुळे नकळत आपल्या स्वतःच्या लोकांविरुद्ध हिंसा, भेदभाव किंवा दडपशाहीला कशी चालना मिळू शकते, याचाही विचार करणे आवश्यक आहे. प्रश्न केवळ तुम्ही व्यक्ती म्हणून कोण आहात याचा नसतो; तर तुम्ही कोणत्या देशातून आलात याचाही असतो. जग अनेकदा व्यक्तीला नव्हे, तर त्याच्या देशाच्या प्रतिमेला पाहून प्रतिक्रिया देत असते.”


User Image

फक्त परदेशातच नाही तर भारतातही विदेशी पर्यटकांसोबत छेडछाड


२००५ मध्ये परदेशी पर्यटकांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर भारत सरकारने ‘अतिथी देवो भव’ ही मोहीम सुरू केली होती. पर्यटन मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, या मोहिमेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांमध्ये पर्यटकांविषयी आदराची भावना निर्माण करणे हा होता. विशेषतः पर्यटन उद्योगाशी संबंधित जे घटक आहेत जसे की, टॅक्सीचालक, पर्यटन मार्गदर्शक, इमिग्रेशन अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि पर्यटकांशी थेट संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात आला होता. मात्र, या मोहिमेनंतरही परदेशी पर्यटक, विशेषतः महिला पर्यटक, अनेकदा गुन्हेगारी आणि लैंगिक छळाचे लक्ष्य ठरत असल्याची वास्तवता बदललेली दिसत नाही.


यावर्षी ७ मार्च रोजी दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळ हम्पीजवळ दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. त्यापैकी एक महिला इस्रायली पर्यटक होती. त्या इतर काही प्रवाशांसोबत रात्री ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी गेल्या असताना हा गुन्हा घडल्याचे वृत्त होते. यापूर्वी मार्च २०२४ मध्ये झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ती आपल्या पतीसोबत पश्चिम बंगालहून नेपाळकडे मोटारसायकल प्रवास करत असताना ही घटना घडली होती.


राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरोच्या (NCRB) २०२२ च्या अहवालानुसार, देशभरात परदेशी नागरिकांविरुद्ध विविध प्रकारचे १४७ गुन्हे नोंदवले गेले होते. त्यापैकी २५ प्रकरणे बलात्काराची होती. या आकडेवारीमध्ये परदेशी पर्यटक आणि इतर परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मात्र, आकडेवारीत दिसणारे चित्र हे संपूर्ण वास्तव नसल्याचे अनेकांचे मत आहे. कारण परदेशी महिलांवर होणाऱ्या शाब्दिक छेडछाड, अश्लील टिप्पणी, पाठलाग करणे, लैंगिक सूचक वक्तव्ये करणे किंवा अवांछित लक्ष देणे यांसारख्या अनेक घटना कधीच पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात अशा घटनांची संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नजर टाकली तर परदेशी महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या भारतीय पुरुषांचे अनेक व्हिडिओ सहज आढळतात. काही व्हिडिओंमध्ये परदेशी महिलांबाबत अपमानास्पद टिप्पणी केली जाते, तर काही ठिकाणी रशियन दिसणाऱ्या कोणत्याही महिलेला वेश्याव्यवसायाशी जोडणारे अश्लील विनोद किंवा “६००० रुपये”सारख्या अपमानास्पद उल्लेखांचा वापर होताना दिसतो. याशिवाय, अनेक पर्यटनस्थळांवर परदेशी पर्यटकांचा सतत पाठलाग करून “एक सेल्फी प्लीज!”, “आपण मित्र होऊ शकतो का?” अशा विनंत्या केल्या जातात. वरकरणी निरुपद्रवी वाटणारे हे वर्तन अनेकदा त्या पर्यटकांसाठी त्रासदायक, अस्वस्थ करणारे आणि भयावह ठरू शकते.


या प्रकारांमुळे भारतातील पर्यटन अनुभवावर नकारात्मक परिणाम होतो. भारताची सांस्कृतिक विविधता, ऐतिहासिक वारसा, आदरातिथ्य आणि पाहुणचार याबद्दल जगभर कौतुक केले जाते; परंतु काही व्यक्तींच्या गैरवर्तनामुळे परदेशी पर्यटकांच्या मनात निर्माण होणारी असुरक्षितता त्या सकारात्मक प्रतिमेला धक्का पोहोचवते.


मानसशास्त्रज्ञ रजत मित्रा यांच्या मते, भारतीय समाजात गोऱ्या वर्णाच्या महिलांविषयी अनेक गैरसमज आणि मिथकं खोलवर रुजलेली आहेत. ते म्हणतात, “भारतात गोऱ्या महिलांबद्दल अनेक समजुती प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या लैंगिकदृष्ट्या अधिक मोकळ्या किंवा सहज उपलब्ध असतात. माझ्या जवळपास सर्व गोऱ्या महिला मैत्रिणींना भारतात असताना एखाद्या भारतीय पुरुषाने ‘मॅडम, तुमच्यासोबत एक फोटो काढू का?’ अशी विनंती केलेली आहे. हा अनुभव जवळपास सर्वव्यापी आहे.”


भारतीय पर्यटकांविषयीचे सर्वच आरोप खरे आहेत, असे म्हणता येणार नाही. जगात 'अग्ली टुरिस्ट' ही समस्या केवळ भारतीयांची नाही. चिनी, ब्रिटिश, अमेरिकन किंवा युरोपीय पर्यटकांबाबतही अशाच तक्रारी जगभर ऐकू येतात. शिवाय, अनेकदा वर्ण, राष्ट्रीयत्व आणि पूर्वग्रह यांचाही या चर्चांवर प्रभाव असतो. तरीही एक गोष्ट नाकारता येत नाही की परदेशात जाणारा प्रत्येक भारतीय हा केवळ एक व्यक्ती नसतो; तो नकळतपणे आपल्या देशाचाही प्रतिनिधी असतो.


भारतीयांची आर्थिक ताकद वाढत आहे. पासपोर्ट अधिक शक्तिशाली होत आहे. जगातील अनेक देश भारतीय पर्यटकांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. पण जागतिक नागरिकत्व केवळ पैसा, व्हिसा किंवा विमानतिकीटाने मिळत नाही. त्यासाठी सार्वजनिक शिस्त, स्थानिक संस्कृतीचा आदर, सामाजिक संवेदनशीलता आणि जबाबदार वर्तनाचीही गरज असते. प्रश्न इतकाच आहे की, जग पाहण्यासाठी घराबाहेर पडताना आपण फक्त सुटकेस घेऊन निघतो आहोत की आपल्यासोबत आपल्या काही जुन्या सवयीही जगभर घेऊन फिरत आहोत? कारण अखेरीस परदेशात भारतीयांची ओळख त्यांच्या पासपोर्टवरून नव्हे, तर त्यांच्या वर्तनावरूनच ठरणार आहे.


(सौजन्य - दी न्यू इंडियन एक्स्प्रेस)


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable
मोबाईलच्या नेटवर्कमध्येही आता गरीब-श्रीमंत भेदभाव… टेलकॉम कंपन्यांची मनमानी!
ताज्या घडामोडी

मोबाईलच्या नेटवर्कमध्येही आता गरीब-श्रीमंत भेदभाव… टेलकॉम कंपन्यांची मनमानी!

गर्दीच्या रेल्वे स्थानकांपासून स्टेडियमपर्यंत मोबाईल नेटवर्क जाण्याचा अनुभव सर्वसामान्य वापरकर्त्यांना नेहमी येत असतो. अशा पार्श्वभूमीवर एअरटेलने ‘प्रायोरिटी पोस्टपेड प्लॅन’ सादर करून चांगल्या नेटवर्कचा दावा केला आहे. कंपनीचा युक्तिवाद असा की, यामुळे नेटवर्क कार्यक्षमता वाढेल आणि ग्राहकांना स्थिर सेवा मिळेल. मात्र या मॉडेलमुळे इंटरनेटमध्ये ‘क्लास-बेस्ड’ विभागणी निर्माण होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा केवळ नवीन टेलिकॉम प्लॅन नसून भविष्यातील ‘डिजिटल डिव्हाईड’चा संकेत आहे का, अशी चर्चा तीव्र झाली आहे.

6 min read
S
Shekar Patil

Comments

Comments are currently disabled or loading...