Skip to main content

पारलिंगी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे म्हणते, "टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ"...

Article in Marathi
Shantanu Khuje
20 Dec 2025
44 views
पारलिंगी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे म्हणते,  "टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ"...

- शंतनू खुजे

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिली जाणारी प्रतिष्ठित 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' यंदा पारलिंगी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या विजेंद्र टेंभुर्णे यांना जाहीर झाली आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे त्यांना ही फेलोशिप प्रदान करण्यात आली. या फेलोशिपसाठी निवड होणाऱ्या त्या पहिल्या पारलिंगी लेखिका ठरल्या आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून, प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी आपले अनुभव साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचे ठरवले आहे.

चंद्रपुरातील दुर्गापूर भागात राहणारी विजेंद्र यांनी मराठी व समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण  घेतले आहे. यूजीसी नेट परीक्षाही उत्तीर्ण आहे. मराठी विषयात त्या पीएच.डी. करत असून अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. स्वतःची पारलिंगी ओळख स्वीकारल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक जीवनात अनेक अडथळे निर्माण झाले.

विखारी टीका, तिरस्कार, मानसिक दडपण आणि असुरक्षितता या सगळ्यावर मात करत त्यांनी शिक्षण, लेखन आणि सामाजिक कार्याची वाट कधीही सोडली नाही. विजेंद्र यांनी चंद्रपुरातील समाजकार्य महाविद्यालयात तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्या स्वयंप्रेरणेतून टेलरिंगचे काम शिकल्या व निशा फॅशन ब्युटीक सेंटर उभारून आता आत्मनिर्भर झाल्या आहे. राज्यभरातील साहित्यिक, सामाजिक व तृतीयपंथी समुदायातून त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

एकूणच त्यांचे बालपण ते फेलोशिप मिळण्यापर्यंतचा प्रवास, समाजाचा दृष्टिकोन आणि पारलिंगी व्यक्तींच्या समस्या यासंदर्भात ‘बाईमाणूस’ने त्यांच्याशी संवाद साधला. 

संबंधित व्हिडियो : 

साहित्यविश्वात नवा अध्याय | पारलिंगी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे यांची प्रेरणादायी मुलाखत



शारीरिक बदल जाणवले अन् संघर्षाला सुरुवात झाली... 

विजेंद्र यांचा जन्म झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. पाच भावंडांमध्ये त्या सर्वात लहान असल्याने त्या सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांचे वडील त्यांच्यावर खूप प्रेम करायचे, स्वतःच्या ताटात जेवण भरवायचे. एका सामान्य मुलाप्रमाणे त्यांचे बालपण सुरू झाले, ज्याला घरचे 'वंशाचा दिवा' मानत होते. मात्र, जसजसे वय वाढत गेले, तसतसे विजेंद्र यांना स्वतःमध्ये काही वेगळेपण जाणवू लागले. त्यांना मुलांच्या खेळापेक्षा मुलींची कामे करणे जास्त आवडत असे. भांडी खेळणे, पाणी भरणे, स्वयंपाक करणे आणि बांगड्या घालणे या गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळायचा. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापर्यंत त्यांचे आयुष्य सुखात गेले, परंतु त्यानंतर त्यांना जाणवणारे शारीरिक आणि मानसिक बदल आणि समाजाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली.



शारीरिक जखमांवर उपचार होतो, पण मानसिक जखमांचे काय? 

मुलाखतीत विजेंद्र यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल अतिशय गंभीर खुलासे केले आहेत. वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांना लैंगिक आणि मानसिक शोषणाला सामोरे जावे लागले. याविषयी बोलताना त्या म्हणतात की, "बलात्कार हा केवळ शारीरिक नसतो, तर तो मानसिकही असतो. शारीरिक जखमांवर रुग्णालयात उपचार करता येतात, पण मानसिक जखमा भरून काढणे कठीण असते." त्यांची आई आजारी पडल्यामुळे अनेक महिने माहेरी असायची. अशा वेळी घरात एकटे असताना आणि घरातील कामे करत असताना त्यांचा गैरफायदा घेतला गेला. त्या काळात त्यांना काय घडत आहे याची पूर्ण समज नव्हती, पण त्या अनुभवांमुळे त्यांच्या मनात खोलवर भीती निर्माण झाली. शाळेत जातानाही त्यांना उशीर व्हायचा, कारण घरातील कामे आवरून त्यांना जावे लागे. शिक्षकांनी उशिरा येण्याचे कारण विचारल्यावर, त्यांना वास्तव सांगणे कठीण जायचे. हा बालपणीचा काळ त्यांच्यासाठी अतिशय संघर्षाचा होता. 

शिक्षणात आले अनेक अडथळे... 

विजेंद्र यांना शिक्षणाची प्रचंड ओढ होती, परंतु त्यांना शिक्षण पूर्ण करणे सोपे नव्हते. शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. जोपर्यंत त्यांनी स्वतःचे बाह्यरूप मुलांसारखे ठेवले नाही, तोपर्यंत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. वडिलांना अभ्यासाची खूप आवड होती, पण सुरुवातीला विजेंद्र यांना अभ्यासात गती नव्हती. एकदा  बेरीज वजाबाकी येत नसल्यामुळे वडिलांनी रागाच्या भरात त्यांना उचलून फेकून दिले होते. त्यावेळी त्यांच्या आईला वाटले होते की आता हे बाळ वाचणार नाही. मात्र, या प्रसंगानंतरही विजेंद्र यांची शिक्षणाची जिद्द कमी झाली नाही. नववी इयत्तेनंतरचा त्यांचा प्रवास अधिक खडतर झाला. घरात आणि समाजात वावरताना स्वतःची ओळख लपवून शिक्षण घेणे हे एक मोठे आव्हान होते. तरीही त्यांनी जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले, कारण त्यांना माहित होते की या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग शिक्षण हाच आहे.



व्यक्त होण्यासाठी निवडला लेखणीचा मार्ग... 

स्वतःच्या व्यथा आणि मनातील घालमेल व्यक्त करण्यासाठी विजेंद्र यांनी लेखनाचा मार्ग निवडला. सुरुवातीला त्या स्वतःचे अनुभव लिहायच्या, पण घरच्यांना हे समजले की ते कागद फाडून किंवा जाळून टाकत असत. त्यामुळे त्या लपून-छपून लिहू लागल्या. अनेकदा लिहिलेले लपवून ठेवावे लागे किंवा आपण काहीच लिहित नाही असे भासवावे लागे. त्यांच्या एका शिक्षकांनी त्यांना सल्ला दिला होता की, "रोजचे अनुभव लिहून काढल्याने मनातील दुःख हलके होईल." या सल्ल्यानुसार त्यांनी लिहायला सुरुवात केली. लिहिताना अनेकदा त्या भावूक व्हायच्या, डोळ्यांतून पाणी यायचे आणि लिहणे थांबवावे लागे. मात्र, लेखनाने त्यांना एक शस्त्र दिले. पुढे जाऊन आशिष वाघमारे आणि अभिनव यांसारख्या मार्गदर्शकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी विजेंद्र यांना सांगितले की, तुमचे अनुभव हे केवळ तुमचे नाहीत, तर ते संपूर्ण पारलिंगी समाजाचे वास्तव आहेत आणि ते जगासमोर येणे गरजेचे आहे.

आणि फेलोशिपसाठी निवड झाली.... 

एक लाख रुपये रक्कमेची ही फेलोशिप विजेंद्र टेंभुर्णे यांना पुस्तक लेखनासाठी प्राप्त झाली असून 'त्याच्यातली मी' हे आत्मकथन यातून प्रकाशित होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'साठी अर्ज करताना विजेंद्र यांच्या मनात प्रचंड द्विधा मनस्थिती होती. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी रात्रभर विचार केला. त्यांना भीती होती की, आपले सत्य जगासमोर आल्यावर घरचे आपल्याला स्वीकारतील का? समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने बघेल? परंतु, मार्गदर्शकांच्या सांगण्यावरून आणि पारलिंगी समाजासाठी काहीतरी ठोस काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी अर्ज भरला.

जेव्हा त्यांना फोन आला की त्यांची निवड झाली आहे, तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. कारण अनेकजण वर्षानुवर्षे या फेलोशिपसाठी प्रयत्न करतात. निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. या फेलोशिपच्या माध्यमातून त्या आता अशा गोष्टी लिहिणार आहेत, ज्या समाजाला माहित नाहीत. विशेषतः घरात राहणाऱ्या पारलिंगी व्यक्ती आणि समाजामध्ये राहणाऱ्या पारलिंगी व्यक्ती यांच्या जगण्यातील फरक त्या या लेखनातून मांडणार आहेत.



टाळी वाजून जास्त पैसे कमावण्यापेक्षा सन्मानाचे दहा हजार कधीही चांगले... 

विजेंद्र यांनी यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्या म्हणतात, "समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळते, पण आम्हाला त्याहूनही खालची वागणूक मिळते." अनेक पारलिंगी व्यक्तींना नोकरी न मिळाल्यामुळे नाईलाजाने भीक मागणे किंवा देहविक्री यांसारख्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. त्या आपल्या समाजातील लोकांना सांगतात की, "तुम्ही रस्त्यावर टाळी वाजवून महिना १ लाख रुपये कमवाल, पण त्यापेक्षा 10 हजार रुपयांची नोकरी करून सन्मानाने जगणे जास्त महत्त्वाचे आहे." परंतु, यासाठी समाजाने आणि सरकारने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे.

बाबासाहेबांमुळे माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली... 

विजेंद्र टेंभुर्णे यांनी आपल्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले. त्या म्हणतात की, "आम्हाला जगण्याचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे. मी इतर कोणत्याही नेत्यावर किंवा व्यक्तीवर भाष्य करणार नाही, पण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली." 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातून त्यांना प्रेरण मिळाली की, केवळ स्वतःसाठी प्रसिद्ध होण्यापेक्षा समाजाचे देणे लागतो या भावनेने काम केले पाहिजे. समाजातील इतर घटक जसे की स्त्रिया किंवा पुरुष यांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण पारलिंगी व्यक्तींसाठी मनापासून आणि निरपेक्ष काम करणारे लोक दुर्मिळ आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.



पारलिंगी व्यक्तींना उच्च शिक्षण मोफत मिळायला हवं... 

पारलिंगी व्यक्तींमध्ये जन्मतःच कला असते, असे विजेंद्र यांचे मत आहे. विशेषतः नृत्यासारख्या कलांमधून त्या स्वतःला व्यक्त करू शकतात. त्या स्वतः कथ्थक शिकत आहेत आणि नृत्याच्या माध्यमातून कथा सांगणे हे त्यांना प्रभावी वाटते. त्यांचे म्हणणे आहे की, पारलिंगी व्यक्तींना केवळ मनोरंजनाचे साधन न समजता त्यांच्या कलेचा आदर केला पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी एक ठोस मागणी केली आहे. त्या म्हणतात की, पारलिंगी व्यक्तींना किमान पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण मिळायला हवे. कारण अनेकदा घरच्यांकडून आर्थिक पाठबळ मिळत नाही आणि स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. जर शिक्षण मोफत असेल, तर अनेकजण शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि टाळी वाजवण्याऐवजी पेन हातात घेतील. विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घेऊन विशेष सवलती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आम्हाला स्वीकारायचंय तर प्रत्यक्ष कृतीतून स्वीकारा.... 

समाजाच्या मानसिकतेवर भाष्य करताना विजेंद्र यांनी समाजाचा दुतोंडीपणा उघड केला. लोक तोंडावर म्हणतात की "आम्ही तुम्हाला स्वीकारतो," पण प्रत्यक्षात कृतीतून तसे दिसत नाही. "जोपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या ताटात जेवायला देणार नाही, तोपर्यंत आमचा स्वीकार झाला असे म्हणता येणार नाही," असे त्या आवर्जून सांगतात.

तसेच, पारलिंगी व्यक्तींकडे पाहण्याचा अंधश्रद्धाळू दृष्टिकोनही त्यांनी खोडून काढला. समाजात असा समज आहे की पारलिंगी व्यक्ती देवीचे रूप असतात. यावर विजेंद्र स्पष्टपणे सांगतात की, "हे सर्व थोतांड आहे. आमच्या रक्तातही लाल रंगच आहे. कोणाचे बोलणे लागत नसते. फक्त जेव्हा तुम्ही कोणाला खूप दुःख देता आणि त्यांच्या मनातून तळतळाट बाहेर पडतो, तेव्हा त्याचे परिणाम दिसू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे काही दैवी शक्ती आहे." त्यांनी लोकांना आवाहन केले की, आम्हाला देवी किंवा शाप देणारे न समजता एक सामान्य माणूस म्हणून स्वीकारा.



फेलोशिपचा वापर समाजप्रबोधनासाठी करणार.... 

या फेलोशिपचा उपयोग त्या केवळ स्वतःची आत्मकथा लिहिण्यासाठी करणार नाहीत, तर समाजाचे प्रबोधन करण्यासाठी करणार आहेत. त्यांचे लेखन हे त्या सर्व पारलिंगी व्यक्तींचा आवाज असेल जे आजही अंधारात जगत आहेत. घरात राहणाऱ्या पण समाजाच्या भीतीमुळे बाहेर न पडणाऱ्या, आणि दुसरीकडे कम्युनिटीमध्ये राहून आपली ओळख जपणाऱ्या अशा दोन्ही स्तरांतील पारलिंगी व्यक्तींचे जगणे त्या मांडणार आहेत. त्यांच्या मते, साहित्य हे केवळ वाचण्यासाठी नसते, तर ते क्रांती घडवण्यासाठी असते. आपल्या लेखनातून वाचकांचा दृष्टिकोन बदलावा आणि तरुण पिढीला या विषयाची संवेदनशील माहिती मिळावी, हा त्यांचा उद्देश आहे.

विजेंद्र टेंभुर्णे यांची ही मुलाखत केवळ यशोगाथा नाही, तर इथल्या संकुचित मानसिकता असलेल्या समाजाला दाखवलेला आरसा आहे. त्यांचा प्रवास हा अपमान, अत्याचार आणि अवहेलनेतून सन्मानाकडे जाणारा आहे. शिक्षण, रोजगार आणि सन्मान या त्रिसूत्रीवर त्यांनी दिलेला भर महत्त्वाचा आहे. शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या माध्यमातून तयार होणारे त्यांचे साहित्य निश्चितच मराठी साहित्य विश्वात आणि सामाजिक क्षेत्रात एक नवा अध्याय लिहील यात काडीमात्रही शंका नाही.

 

Share this article
एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या  ट्रान्स पीडितेची कहाणी...
LGBTQIA+

एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या ट्रान्स पीडितेची कहाणी...

जेफ्री एपस्टीन प्रकरणातील अनेक पीडित महिलांच्या कथा जगभर चर्चेत आल्या. त्यांना न्यायासाठी पाठिंबा मिळाला, त्यांच्या वेदनांवर चर्चा झाली आणि त्यांचे अनुभव लाखो लोकांपर्यंत पोहोचले. मात्र या प्रकरणात एवा कॉर्डेरो नावाची एक ट्रान्स महिला अशी होती, जिने अल्पवयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली, पण तिची कथा मुख्य प्रवाहातील चर्चेत फारशी कधी आलीच नाही. एवा कॉर्डेरोच्या बालपणापासून ते जेफ्री एपस्टीनविरोधातील न्यायालयीन लढ्यापर्यंत, माध्यमांकडून झालेल्या वागणुकीपासून ते तिच्या आजच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास बाईमाणूसच्या या विशेष लेखातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

8 min read
S
Shonali Samarth
‘ट्रान्स’ समुदायामध्येही शिरला जातीयवाद… दलित पारलिंगी महिलेवर जातीय हल्ला
LGBTQIA+

‘ट्रान्स’ समुदायामध्येही शिरला जातीयवाद… दलित पारलिंगी महिलेवर जातीय हल्ला

३१ मार्च २०२६ रोजी म्हणजेच ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिनाच्या दिवशी केंद्र सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी एक नवीन कायदा लागू केला. याच कायद्याला विरोध करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने ३ एप्रिल २०२६ रोजी एका राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण याच बैठकीत दिल्लीतील बैठकीत कार्यकर्त्या ग्रेस बानू यांच्यावर जातीयवादी हल्ला करण्यात आला.

5 min read
S
Shonali Samarth
ऑलिम्पिकमध्ये यापुढे ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंना बंदी… निर्णयामागे डोनाल्ड ट्रम्पचा हात
LGBTQIA+

ऑलिम्पिकमध्ये यापुढे ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंना बंदी… निर्णयामागे डोनाल्ड ट्रम्पचा हात

अगोदर क्रिकेट, मग अॅथलेटिक्स, हळूहळू बॉक्सिंग, जलतरण, फुटबॉल अस करता करता अखेर जगातील सर्वोच्च क्रीडा स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिकमधूनही ट्रान्सजेंडर खेळाडूंना हद्दपार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन पात्रता निकषानुसार पारलिंगी (ट्रान्सजेंडर) महिला खेळाडूंना आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. हा निकष २०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकपासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धास्तीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

5 min read
S
Shonali Samarth
Transgender Rights Amendment Bill : ‘’आता कुठे सन्मानाने जगायला सुरूवात करत होतो, सरकारने पुन्हा काही दशके मागे लोटले’’...देशभरात संतापाची लाट
LGBTQIA+

Transgender Rights Amendment Bill : ‘’आता कुठे सन्मानाने जगायला सुरूवात करत होतो, सरकारने पुन्हा काही दशके मागे लोटले’’...देशभरात संतापाची लाट

केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्क संरक्षण) दुरुस्ती विधेयक २०२६ कोणत्याही चर्चेविना सादर केले. हे विधेयक ट्रान्सजेंडर व्यक्तींचा सन्मान, स्वायत्तता आणि घटनात्मक संरक्षणावर आघात करणारे असल्याने ट्रान्स समूहामध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारचे हे विधेयक मागे घेण्यासाठी देशभरातून तीव्र मोहीम सुरू करण्यात आली आहे.

7 min read
S
Shonali Samarth
 No Means No… पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष रक्तदान करु शकत नाहीत, केंद्र सरकार भूमिकेवार ठाम!
LGBTQIA+

No Means No… पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष रक्तदान करु शकत नाहीत, केंद्र सरकार भूमिकेवार ठाम!

केंद्र सरकारने संभाव्य रक्तदात्यांच्या यादीमधून पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष आणि देहविक्रीच्या व्यवसायात असलेल्या महिलांना वगळ्याच्या निर्णयाचं ठामपणे समर्थन केलं आहे. सदर निर्णय भेदभाव करणारा नसून आरोग्यविषयक अभ्यासातील निष्कर्षांवर अवलंबून असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेत ट्रान्सजेंडर व्यक्ती, एमएसएम आणि देहविक्रेत्या महिलांना रक्तदात्या होण्यापासून वगळण्यात आले होते आणि न्यायालयाला ते असंवैधानिक म्हणून रद्द करण्याची विनंती केली होती.

4 min read
K
Komal Thombre
खरचं हिजडे लहान मुलं पळवतात? खरंच ते खलनायक आणि विकृत असतात? मग सिनेमा-मालिकांमध्ये तसं का दाखवलं जातं…?
LGBTQIA+

खरचं हिजडे लहान मुलं पळवतात? खरंच ते खलनायक आणि विकृत असतात? मग सिनेमा-मालिकांमध्ये तसं का दाखवलं जातं…?

चित्रपट आणि वेब सिरीजमधील पारलिंगी पात्रांचं सादरीकरण समाजात कसे गैरसमज, भीती आणि नकारात्मक प्रतिमा निर्माण करतं, याचा सखोल वेध घेणारा हा लेख आहे. योग्य प्रतिनिधित्व, वास्तव अनुभव आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून LGBTQIA समुदायाकडे पाहण्याची गरज तो ठळकपणे अधोरेखित करतो.

6 min read
S
shonali

Comments

Comments are currently disabled or loading...