- विठ्ठल साबळे
- वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात कट्टर हिंदुत्वादी घुसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. त्याविरोधात आज राष्ट्रवादीचे नेते विकास लवंडे यांच्यावर आळंदी येथे शाईफेक करण्यात आली आहे.
- या घटनेचा सुप्रिया सुळे रोहित पवार, सुषमा अंधारे आणि वारकरी अभ्यासक श्यामसुंदर सोन्नर यांनी हिंसक प्रतिक्रियेचा निषेध केला आहे.
- शरद पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी विकास लवांडे यांनी लगेचच वारकरी संप्रदायात कथित घुसखोरी करणाऱ्या लोकांची एक यादी प्रसिद्ध केली होती.
वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.
पवार म्हणाले होते, वारकरी संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी होत आहे. समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वारकरी चळवळीत अशा विचारांची वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही काही पुरोगामी विचार मांडणाऱ्या व्यक्तींची नोंद घेण्याचे काम सुरू केले आहे.
सध्या सुमारे 40 जण असे दिसून येतात की जे कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून प्रगत विचार मांडत आहेत. अशा लोकांची संख्या वाढणे आवश्यक असून, समाजप्रबोधनासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
शरद पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी लगेचच वारकरी संप्रदायात कथित घुसखोरी करणाऱ्या लोकांची एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यात किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, गौतम खट्टर, संभाजी भिडे गुरूजी, संग्राम भंडारे, तुषार भोसले, अक्षय भोसले, प्रकाश जवंजाळ, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंडगे, राणा वासकर, चंद्रशेखर देगलूरकर, उदबोध पैठणकर, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज, शाम राठोड, निरंजन कोटेकर या कीर्तनकारांचा समावेश होता. “वारकरी संप्रदायात काही प्रतिगामी आणि मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तींची घुसखोरी झाली आहे,” असं वक्तव्य करत लवांडे यांनी काही कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींवर टीका केली.
लवांडे यांच्या या विधानानंतर वारकरी संप्रदाय, कीर्तनकार, संत महंत आणि विविध हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाद एवढा वाढला की, आज आळंदी परिसरात लवांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण आणखी तापले असून आता या प्रकरणात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
NCP शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक
विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते आहे. विविध राजकीय, सामाजिक आणि वैचारिक मुद्द्यांवर ते माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडत असतात. आक्रमक आणि स्पष्ट वक्तृत्वशैलीमुळे ते अनेकदा चर्चेत असतात. विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक न्याय, फुले शाहू आंबेडकर विचारसरणी आणि राजकीय घडामोडींवर ते सातत्याने भूमिका घेतात.
नेमके वादग्रस्त वक्तव्य काय होतं तर, विकास लवांडे यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायात काही मनुवादी आणि प्रतिगामी विचारांचे लोक शिरल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांशी विसंगत अशा काही प्रवृत्ती वारकरी परंपरेत प्रभाव टाकत आहेत. हे विधान वारकरी संप्रदायातील अनेकांना अत्यंत आक्षेपार्ह वाटले.
हा वाद शिगेला पोहोचत असताना आळंदी येथे आज विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्यात आली. हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचा आरोप केला लवांडे यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संग्राम बापू भंडारे यांच्या समर्थकांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांच्यापैकी 2 व्यक्तीकडे रिव्हॉल्व्हर होते.
आजूबाजूला नागरिक जमा होऊ लागल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे हे प्रकरण केवळ धार्मिक वादापुरते मर्यादित न राहता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर ठरले आहे.
विकास लवांडे
विकास लवांडे आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर सकाळी 10 वा. ते परत येत होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली.
घटनेदरम्यान संग्राम भंडारे हे “आमच्यावर काहीही बोला, पण आमच्या गुरुवर्यांवर टीका करू नका,” असे म्हणत लवांडे यांच्यावर संताप व्यक्त करत असल्याचे दिसून आले. विकास लवांडे यांनी हल्लेखोरांनी आपल्याला पिस्तुल दाखवत जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर ते पळून गेले.
या घटनेनंतर लवांडे यांनी तत्काळ लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात जाऊन संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुणे पोलिस आयुक्तांनी माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त केल्याशिवाय आपण पोलिस स्टेशन सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
माझ्या जीवितास धोका, संरक्षण द्यावे; विकास लवांडेंनी केली होती मागणी
विकास लवांडे यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. विकास लवांडे यांनी ट्विट करत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावसी यांच्याकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे म्हणाले होते की, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र पोलिस आपणास पुनश्च विनंती की, मला संभाजी भिडे यांचे धारकरी आणि काही हिंदुत्ववादी बुवा बाबांचे समर्थक मला फोन करून दररोज शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.
मेसेज करत आहेत, फोन करून त्रास देत आहेत. मी कुठेही कोणाचाही कसलाही अवमान केलेला नाही. मी वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे. भागवत वारकरी संप्रदायाच्या संदर्भात तात्विक वैचारिक मांडणी करत आहे. मात्र माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच पंढरपूर, श्रीरामपूर, नेवासा इत्यादी ठिकाणी माझ्या विरुद्ध खोट्या निराधार तक्रार अर्ज देऊन गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज
यासंदर्भात ‘बाईमाणूस’शी बोलताना ह.भ.प. कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज सांगतात की, विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक आणि कथित हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
वैचारिक मतभेद असले तरी त्याचा प्रतिवाद विचारांनीच केला पाहिजे, असे सांगताना त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील ‘जे खळांची व्यंकटी सांडो…’ या ओळींचा दाखला दिला. “हल्ला कुणावर झाला हे महत्त्वाचे नाही, पण हल्ला होणे हेच चुकीचे आहे. एखाद्याचे विचार पटत नसतील, तर त्यांना उत्तर विचारांनी देता येते, असे ते म्हणाले.
लवांडे यांनी केलेल्या विधानाशी असहमती असली तरी शाईफेक किंवा हिंसक प्रतिक्रिया देणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज हा प्रकार विकास लवांडे यांच्यासोबत झाला.. हाच प्रकार संग्राम बापू भंडारे यांच्यासोबत झाला असता, तरी मी त्याच शब्दांत त्याचा निषेध केला असता, असे त्यांनी सांगितले...
राज्यभर संतप्त प्रतिक्रिया
विकास लवांडे यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार, मठाधीश, दिंडी प्रमुख आणि भाविकांनी निषेध व्यक्त केला. आळंदी, पंढरपूर, देहू आणि पुणे परिसरात नाराजी उघडपणे व्यक्त करण्यात आली.
विकास लवांडे यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. काही वारकरी नेत्यांनी असा आरोप केला की, धार्मिक परंपरेला राजकीय रंग देणे योग्य नाही. संतांच्या परंपरेचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली.
सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी काय म्हटले?
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दुपारपर्यंत एफआयआर दाखल झाला नाही तर मी स्वतः पोलीस स्टेशनला जाईन, असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत.
या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी, असे ते म्हणालेत.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विकास लवांडेंवर हल्ला करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे उघड आहे अशी भावना व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार (@NCPspeaks) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला.

हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे.
भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, असे त्या म्हणाल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचा निषेध करत सांगितले की, संत परंपरा माणसाला राग, लोभ, मोह, अहंकार आणि मत्सर यांसारख्या मनातील वाईट प्रवृत्तींपासून दूर राहण्याचा संदेश देते.
एखाद्याचे विचार पटत नसतील, तर त्याला उत्तर शांतपणे आणि विचारांनी द्यावे; शाईफेक किंवा हिंसक प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वारकरी संप्रदायाचा मूलभूत संदेश संयम, सहिष्णुता आणि परस्पर आदराचा आहे. शाईफेक झाल्यामुळे एका अर्थाने विकास लवांडे यांचीच भूमिका अधिक ठळक झाली असून, वैचारिक पातळीवर ते जिंकले, असे त्यांनी म्हटले.
कायदेशीर पैलू
या प्रकरणात दोन वेगवेगळे कायदेशीर मुद्दे आहेत. एकीकडे विकास लवांडे यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे त्यांच्यावर झालेल्या शाईफेक आणि धमक्यांबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांचा तपास आणि नोंदवला जाणारा गुन्हा यावर पुढील घडामोडी अवलंबून राहतील.या प्रकरणात एफआयआर नोंदवला जातो का, संबंधितांवर काय कारवाई होते, आणि वारकरी संप्रदायाची पुढील भूमिका काय राहते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विकास लवांडे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्रातील श्रद्धा, राजकारण आणि वैचारिक संघर्ष या तिन्ही मुद्द्यांना एकाच वेळी केंद्रस्थानी आणले आहे.
वारकरी संप्रदायासारख्या संवेदनशील विषयावर केलेल्या टिप्पणीमुळे निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर झालेली शाईफेक ही घटना लोकशाहीतील संवाद, संयम आणि परस्पर आदर यांची गरज पुन्हा अधोरेखित करते. आता या प्रकरणाचा शेवट कायदेशीर आणि राजकीय पातळीवर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






