अभिजीत तांगडे
- सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगटने भावनिक व्हिडियोच्या माध्यमातून एकामागोमाग एक असे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
- बृजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक छळ झालेल्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये माझाही समावेश आहे, अशी विनेशने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे कबुली दिली आहे. यापूर्वी तिने आपली ओळख गुप्त ठेवली होती.
- ज्या व्यक्तीविरुद्ध लैंगिक शोषणाची लढाई सुरू आहे त्याच्याच घरी जाऊन कुस्ती खेळणे हे माझ्यासाठी कठीण असणार आहे, असे विनेशने सांगितलं आहे.
सर्वांना नमस्कार…
तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, गेल्या दीड वर्षापासून मी कुस्तीच्या 'मॅट'पासून दूर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मी कुस्तीसाठी तयारी करत आहे. मी अत्यंत कठोर परिश्रम आणि पूर्ण निष्ठेने सराव करत आहे. ज्याप्रमाणे मी देशासाठी पदके जिंकली आहेत, ईश्वराच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने मला पुन्हा एकदा कुस्तीच्या मॅटवर परतायचे आहे, देशासाठी अनेक पदके जिंकायची आहेत आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखायचा आहे, अशी मला आशा आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्या सर्वांशी काही विचार शेअर करायचे आहेत. साधारण एक महिन्यापूर्वी, भारतीय कुस्ती महासंघाने एका स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी निवडलेले ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशातील 'गोंडा'. हेच ते ठिकाण जिथे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह वास्तव्यास आहेत. तिथे त्यांचे स्वतःचे एक खाजगी महाविद्यालय आहे. तिथे सहभागी होणाऱ्या प्रत्येक कष्टाळू खेळाडूला त्याचा योग्य तो न्याय मिळेल, ही कल्पनाच अत्यंत अशक्यप्राय किंबहुना जवळपास असंभव वाटते.
‘’गोंडामध्ये कुस्ती खेळणे कठीण होईल’’
कोणत्या सामन्यासाठी कोणता पंच नेमला जाईल? एखादा पंच किती गुण देईल? 'सामना अध्यक्ष' कुठे बसतील? कोणाला विजयी घोषित करायचे आणि कोणाला पराभूत, या सर्व बाबींचे नियंत्रण बृजभूषण आणि त्यांचे साथीदार यांच्याच हाती असेल. सरकार आणि विशेषतः आपले क्रीडा मंत्रालय या संपूर्ण परिस्थितीकडे केवळ एक 'निष्क्रीय प्रेक्षक' म्हणून पाहत आहे.

खेळाडूंना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये. असे वाटते की, बृजभूषण यांना 'मोकळीक' देण्यात आली आहे; मग त्यांचे महिला कुस्तीपटूंकडे पाहण्याचे वर्तन असो किंवा व्यापक कुस्ती विश्वातील त्यांच्या कृती असोत, त्यांना हवे ते करण्याची मुभा देण्यात आली आहे. आणि त्यामागे 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असे एक अलिखित आश्वासन दडलेले आहे. मला अजिबात वाटत नाही की, प्रत्येक कष्टाळू खेळाडूचे वजन निष्पक्षपणे तपासले जाईल; तसेच त्यांच्या कष्टाचे खरे फळ किंवा निकाल कुस्तीच्या मॅटवर प्रामाणिकपणे प्रतिबिंबित होतील, असेही मला वाटत नाही."
‘’बृजभूषणच्या शोषणाची मी देखील बळी आहे:
तीन वर्षांपूर्वी, आम्ही लैंगिक छळाविरुद्ध आमचा आवाज उठवला होता. त्या आरोपांशी संबंधित खटला अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी सहा महिला खेळाडूंनी तक्रारी दाखल केल्या होत्या आणि आपली साक्ष नोंदवली होती; त्या खटल्यातील साक्षींची नोंद सध्या सुरू आहे. कोणत्याही पीडितेची ओळख सार्वजनिक केली जाऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत; कारण तसे करणे हे त्यांच्या प्रतिष्ठेशी आणि सन्मानाशी संबंधित आहे. आज काही अपरिहार्य परिस्थितींमुळे मला सर्वांशी काहीतरी शेअऱ् करायचे आहे. या टप्प्यावर बोलण्याचा माझा कोणताही इरादा नव्हता; कारण हा खटला न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि संपूर्ण सत्य कालांतराने देशासमोर येईलच. तथापि, मला हे उघड करायचे होते की, ज्या सहा पीडितांनी तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यापैकी मी स्वतः एक आहे.
- विनेश फोगट (कुस्तीपटू)
कुस्तीपटू विनेश फोगटचा अत्यंत भावनिक व्हिडियो
सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ तासांपूर्वी ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगटने एका अत्यंत भावनिक व्हिडियोच्या माध्यमातून एकामागोमाग एक असे अनेक धक्कादायक खुलासे केले आणि देशातील क्रीडाविश्व पुन्हा एकदा ढवळून निघाले.
उत्तरप्रदेश येथील गोंडा या ठिकाणी भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने ब्रिजभूषण यांच्या मालकीच्या महाविद्यालयात 10 ते 12 मे दरम्यान सीनियर ओपन रँकिंग कुस्ती आयोजित करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनेश फोगटचा हा व्हिडियो व्हायरल झालायं.

‘’कित्येक वर्षापासून ज्या व्यक्तीविरुद्ध लैंगिक शोषणाची लढाई सुरू आहे त्याच्याच घरी जाऊन कुस्ती खेळणे हे माझ्यासाठी कठीण असणार आहे आणि मला वाटत नाही की मी माझे 100 टक्के देऊ शकेन. एका मुलीसाठी हे खूप कठीण असेल. मी आणि माझी टीम स्पर्धा लढू, जर कोणासोबत काही चुकीचे घडले तर त्याची जबाबदारी भारत सरकारची असेल. कारण सध्याचा कुस्ती महासंघ २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी तिच्या पुनरागमनाला अडथळा आणण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करत आहे,’’ अशी भिती विनेश फोगटने व्यक्त केली आहे.
तिने सांगितलं की, कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक छळ झालेल्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये तिचा स्वतःचाही समावेश आहे. या मोठ्या प्रकरणात स्वतःला पीडित म्हणून विनेशने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे कबुली दिली आहे. यापूर्वी तिने आपली ओळख गुप्त ठेवली होती. विनेशने सांगितलं की “काही विशिष्ट परिस्थितींमुळे” तिने हा खुलासा करण्याचा निर्णय घेतला.
बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप
२०२३ मध्ये नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात विनेश फोगाट या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होती, जिथे सर्वांनी मिळवून बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. 18 जानेवारी 2023 रोजी पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर धरणे देऊन बृजभूषण यांच्यावर महिला पैलवानांसोबत लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यावेळी विनेश फोगाट यांनी रडत सांगितले होते की, बृजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षक नॅशनल कॅम्पमध्ये महिला पैलवानांचा लैंगिक छळ करतात. विनेश यांनी हे देखील सांगितले होते की बृजभूषण खेळाडूंच्या हॉटेलमध्ये थांबत होते, जे नियमांच्या विरोधात आहे.
या आरोपांवर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते- कोणत्याही प्रकारचा छळ झालेला नाही. जर झाला असेल, तर मी फाशी घेईन. त्यांनी धरणे आंदोलनाला प्रायोजित असल्याचे सांगत यामागे हरियाणा काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा यांचा हात असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, आता हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरही खेळण्यास पात्र राहिलेले नाहीत.
‘’कुस्ती महासंघ बरखास्त करा’’
दरम्यान, ऑलिंम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर, विनेशचे बालपणीचे प्रशिक्षक महावीर फोगाट त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. महावीर म्हणाले की, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दीर्घकाळापासून आंदोलन सुरू असूनही महासंघात कोणताही विशेष बदल झालेला नाही. सध्याचे प्रमुख संजय सिंह हे बृजभूषण यांची केवळ एक बाहुली आहेत.

महावीर फोगाट म्हणाले की, जेव्हा दिल्लीच्या आसपास पुरेसे पायाभूत सुविधा आणि खेळाडूंची मोठी संख्या उपलब्ध आहे, तेव्हा गोंडा येथे या स्पर्धेचे आयोजन करणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. यावरून हे सूचित होते की केंद्र सरकारही भारतीय कुस्ती महासंघातील (WFI) परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही करू शकली नाही. बृजभूषण अजूनही महासंघाच्या प्रमुखांच्या जवळचे असल्यामुळे पडद्यामागून सूत्रे सांभाळत आहेत. क्रीडा मंत्रालयाने डब्ल्यूएफआय आणि इतर महासंघांचा ताबा घ्यावा, जे "भेदभाव आणि भ्रष्टाचाराच्या सडलेल्या आणि कुप्रसिद्ध पद्धतींनी ग्रासलेले आहेत."
विनेशच्या सुरक्षेची पूर्ण हमी
दरम्यान WFI अध्यक्ष संजय सिंह यांनी कुस्ती स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची विनेश फोगाटची मागणी फेटाळून लावली आहे. विनेशच्या सुरक्षेची पूर्ण हमी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. ते म्हणाले की, स्पर्धेत युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे मान्यताप्राप्त रेफरी सामने आयोजित करतील. सर्व ट्रायल सामन्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल, जेणेकरून पक्षपाताची शक्यता राहणार नाही. ते म्हणाले की, ठिकाण आणि वेळापत्रक बदलल्यास सुमारे 1500 खेळाडूंना त्रास होईल.
तीन वेळा ऑलिम्पिक गाठणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतासाठी अनेक पदकं जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. तिने एशियन गेम्समध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक जिंकलं तर कॉमनवेल्थ खेळांमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकली. 2024 मध्ये, विनेश हरियाणातून काँग्रेस पक्षाची आमदार झाली.






