कानबाई शिवजी हिरानी ही 80 वर्षांची वयोवृद्ध महिला युट्युबवर रिल्स बघत बसली होती. तेवढ्यात तिचं लक्ष एका व्हिडियोकडे गेलं, ‘’ पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानी ड्रोन भूज येथील भारतीय हवाई क्षेत्रात घुसलं आहे…’’
हा व्हिडियो बघताच कानबाईच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली आणि तिचं मन झर्रकन थेट भुतकाळात गेलं, जिथे कानबाईने एक वेगळाच मोर्चा सांभाळला होता… त्या घटनेला आता 50 पेक्षा अधिक काळ लोटला परंतू कानबाईला एकेक लहान गोष्ट आजही लक्षात आहे, जसं हे सगळं कालच घडलं की काय…! सायरन, ब्लॅकआऊट, विस्फोट हे त्या व्हिडियोतील शब्द एकेकाळी कानबाईनेही अनुभवले होते.
व्हिडियोवरची ती बातमी बघताच कानबाईने लगेचच फोन उचलला आणि आपल्या दोन मैत्रिणींना कॉल केला… समुबेन विश्राम बांदेरी आणि शामभाई खोखानी. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर आता या तिघीच जिवंत राहिल्या होत्या, जेव्हा पाकिस्तानी जेट विमानांनी भारतीय लष्कराचा तळाच्या भूजमधल्या विमानतळावर मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव केला ज्यामुळे धावपट्टीचे प्रचंड नुकसान झाले. एकही धावपट्टी त्यावेळी वापरण्याजोगी नव्हती.
भूजच्या माधापार गावात राहणाऱ्या तेव्हाच्या या तरुणी सैनिक नव्हत्या मात्र जेव्हा प्रशासनाने गावात येऊन मदत मागितली तेव्हा एक सेकंदही न दवडता कानबाई, समुबेन आणि शामभाई या तीन मैत्रिणी सर्वप्रथम पुढे सरसावल्या…
80 वर्षांच्या तीन मैत्रिणींची गोष्ट…
इतक्या वर्षानंतरही त्यांच्या मैत्रीचे पाश अजून सुटलेले नाहीत हे विशेष. हसत हसत हिरानी म्हणाली, गेल्याच आठवड्यात आम्ही तिघी भेटलो आणि चाय पे चर्चा केली.
संबंधित लेख वाचा: 1) काय फायदा आपण जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल असूनही..? 200 पेक्षा जास्त वैमानिक तर गमावले! |
हिरानीने आपल्या मैत्रिणींना विचारलं, ‘’जर सरकारने पुन्हा आपल्याला मदतीसाठी बोलावलं तर तुम्ही पुन्हा जाणार का…? बंदेरीने लगेच उत्तर दिलं, ‘’ मीतर अगदी आनंदाने जाईन आणि सोबत गावातील युवा पिढीलादेखील सोबत घेऊन जाईन.’’
1971… जेव्हा पाकिस्तानच्या विमानांनी भूजा रन वे पूर्ण उध्वस्त केला
1971 साली पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तानविरुद्ध, म्हणजे आताच्या पाकिस्तानविरुद्ध असंतोष इतका वाढला होता की पाकिस्तान सरकारला तो शमवणं कठीण होत चाललं होतं. 25 मार्च 1971… पाकिस्तानचे हुकूमशाह याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तानातल्या बंगाली जनतेच्या उठावाचा बिमोड करण्याचे आदेश लष्कराला दिले. बंगबंधू शेख मुजिबुर रेहमान यांना अटक झाली आणि भारतात निर्वासितांचे लोंढे धडकू लागले. एकीकडे पाकिस्तानी लष्कराकडून बंगाली जनतेवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या जशा वाढू लागल्या, तसा दुसरीकडे लष्करी हस्तक्षेप करण्यासाठी भारतावर दबावही वाढू लागला.
3 डिसेंबर 1971… पाकिस्तानी हवाई दलाची सेबर जेट विमानं आणि स्टार फायटर विमानं भारतीय अवकाशात संध्याकाळी 5:40च्या सुमारास झेपावू लागली. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर आणि आग्रा इथल्या हवाई दलाच्या तळांवर बाँबहल्ले सुरू केले यानंतर भारताकडे युद्धात उतरण्याव्यतिरिक्त कुठलाच पर्याय उरला नव्हता.
8 डिसेंबर 1971… भारताच्या पूर्व सीमेवर युद्ध सुरू होतं, त्याचवेळी पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवरही हल्ला केला. पाकिस्तानच्या सेबर जेट विमानांनी कच्छवर नापामसारखे अत्यंत ज्वलनशील पदार्थ असणारे बाँब टाकायला सुरुवात केली. पाकिस्तानी हवाई दलानं भूज विमानतळावर 63 बाँब टाकले आणि धावपट्टी उद्ध्वस्त केली. भारतीय लष्कराचा तळ असलेल्या भूजमधल्या विमानतळावर पाकिस्ताननं हल्ला करून तिथली धावपट्टी उद्ध्वस्त केली. बाँबिंगनंतर धावपट्टीवर भलामोठा खड्डा पडला होता. तो दुरुस्त केल्याशिवाय भारतीय विमानं उड्डाण करूच शकत नव्हती. एका मुकादमाला धावपट्टी पूर्ववत करायला सांगण्यात आलं तर त्याने या कामाला किमान 6 महिने तरी लागतील असं सांगितलं. यापूर्वी इतकं मोठं नुकसान कधीच झालं नव्हतं त्यामुळे कुणालाच ते कसं भरून काढायचं याची कल्पना नव्हती.
जेव्हा कच्छच्या महिला भारतीय वायुदलाच्या मदतीला धावून आल्या
हवाई दलाचे अधिकारी आणि भूज विमानतळाचे तत्कालीन प्रमुख विजय कर्णिक यांनी कच्छच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे यासाठी मदत मागितली. भारताचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी एन. गोपालस्वामी 1971 मध्ये भूजचे जिल्हाधिकारी होते. धावपट्टी दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. एन. गोपालस्वामी यांनी लगेचच घटनेपासून जवळ असलेल्या माधापर गावाचे सरपंच असलेल्या व्ही.के. पटेल यांना ही गोष्ट कळवली.
कानबाई हिरानीला आजही ती गोष्ट लख्ख आठवते. ती म्हणते की, कलेक्टर आमच्या सरपंचांकडे आले आणि म्हणाले की गावातले स्थानिक लोकं आम्हाला मदत करू शकतील का? सरपंचांनी आम्हाला विचारलं आणि आम्ही म्हटलं, आमच्या देशासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. ’’
सरपंचांनी मग गावातल्या महिलांना ही धावपट्टी दुरुस्त करण्याची जबाबदारी दिली. "दुसऱ्या दिवशी आमच्या माधापरमधल्या अनेक शेजारच्याच वथाण खेड्यात जमल्या, तिथून आम्हाला भूज विमानतळावर नेलं गेलं. बांधकामात कुशल अशा जवळपास 300 जणी आम्ही तिथे होतो. बांधकाम आणि दुरुस्तीचं सगळं साहित्य आम्ही बरोबर आणलं होतं. विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांना धावपट्टी लवकरात लवकर दुरुस्त करायला सांगितली होती. हल्ल्यांचा धोका आहे हे ही त्यांना सांगण्यात आलं होतं." कानबाई आपल्या आठवणी सांगत होती.
300 महिलांचे श्रम फळाला आणि अवघ्या 72 तासांमध्ये ‘रन वे’ तयार
पुढची माहिती बंदेरी द्यायला लागली.’’पाकिस्तानकडून हवाई तळावर पुन्हा हल्ला होण्याचा धोका टळला नव्हता त्यामुळे ठराविक अंतरानं धोक्याची सूचना देणारे भोंगे वाजवले जायचे. आम्ही दुरुस्तीचं काम हाती घेतलं आणि दरवेळी भोंगे वाजले की जवळच्या बाभळीच्या झाडाखाली लपायचो आणि भोंगे वाजणं थांबलं की पुन्हा काम सुरू करायचो. शत्रूंच्या विमानांपासून बचावण्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या घातल्या होत्या. पाकिस्तानी जेट विमानांनी केलेला हल्ला मोठा होता. बॉम्ब हल्ल्यामुळे धावपट्टीवर 22 पेक्षा जास्त खड्डे पडले होते. आम्ही आमच्या लहान मुलांना घरीच सोडून आलो होतो. सासरची मंडळी प्रचंड घाबरली होती. परंतू देशबक्ती माझ्या रक्तातून वाहत होती… मला इतर कोणत्याही गोष्टीची त्या क्षणी पर्वा नव्हती, मला फक्त सोपावण्यात आलेलं देशसेवेचं काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचं होतं…’’
३०० महिलांचे श्रम फळाला आले आणि अवघ्या ७२ तासांमध्ये युद्धाच्या छायेत त्या महिलांनी ती धावपट्टी दुरुस्त केली.
आठवड्याभरानंतर, पाकिस्तानी सैन्यानं शरणागती पत्करली. पाकिस्तानच्या 90 हजारांहून अधिक सैनिकांनी ढाकामध्ये शरणागती पत्करली आणि भारताच्या पूर्वेला 'बांग्लादेश' हा नवा देश जन्माला आला.
माधापार गावाच्या प्रवेशद्वारावरच 'विरांगना भवन…
1971च्या युद्धानंतर, गुजरातचे राज्यपाल डॉ. श्रीमन नारायण यांनी माधापरला जाऊन ती धावपट्टी दुरुस्त करणाऱ्या महिलांची भेट घेतली. गावाच्या विकासासाठी त्यांनी 50 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून माधापर ग्रामपंचायतीच्या आवारात 'विरांगना भवन'ची उभारणी केली गेली. वायुसेनेचे तत्कालीन प्रमुख एअर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी माधापरच्या महिलांच्या योगदानाची दखल घेत त्यांना लढाऊ विमानाची प्रतिकृती भेट दिली. 2015 साली, तेव्हाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विरांगना स्मारकाचं उद्घाटन केलं.
माधापार गावाच्या प्रवेशद्वारावरच आजही एक विशाल प्रतिकृती दिसते. ज्यात महिला धावपट्टीवर काम करताहेत, आपल्या हातांनी धावपट्टीवरे खड्डे बुजवत आहेत असे चित्र साकारले आहे. याच चित्रांच्या आधारे गुजराती भाषेत प्रतिकृतीवर ‘वीरांगना स्मारक’ असं कोरण्यात आलं आहे.
ज्या महिलांना कधीच युद्धाचे प्रशिक्षण मिळालं नाही, मात्र जेव्हा देशाला गरज होती तेव्हा त्या मदतीसाठी धावल्या अशा महिलांची ही शौर्यगाथा…
‘ऑपरेशन सिंदुर’ मुळे आमच्या या कहाण्या परत एकदा जिवंत
हिरानी म्हणते,’’ आता आमच्यातील अनेकजण या शिल्लक नाही राहिले, परंतू लहान मुलं आजही ती कहाणी ऐकण्यासाठी आमच्याकडे येतात. या नव्या ऑपरेशनमुळे ‘ऑपरेशन सिंदुर’ मुळे आमच्या या कहाण्या परत एकदा जिवंत झाल्या आहेत.
तिथेच खेळत असलेला 12 वर्षांचा सागर दोन-तीन वेळा या वृद्ध महिलांकडे येऊन विचारणा करत होता. ‘’नानी तुम्ही किती बॉम्ब बघितले? मिसाईल होते की ड्रोन? १९७१ साली पण असंच ब्लॅकआऊट झालं होतं का? तुम्ही इतक्या लवकर रन वे कसा बनवला?
हिरानी पण त्याला तेच तेच उत्तर देण्यास थकत नव्हती. ती म्हणते, मला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे मी अतिशय गांभीर्याने उत्तर देते. आपल्या या युवापिढीला देशाबद्दल प्रेम, अभिमान वाटला पाहिजे आणि हेच आपले कर्तव्य आहे.
हिरानीच्या घराची सफेद भिंत अनेक प्रशस्तीपत्रकांनी आणि पुरस्कारांनी भरलेली आहे. 80 वर्षांची ही दादी म्हणते, त्या काळातले ब्लॅकआऊट एकदम खतरनाक असायचे. बॉम्ब टाकल्यानंतरही पाकिस्तानी विमाने आमच्या डोक्यावर घिरटी घालत असे. सायरन वाजला की आम्ही जवळच्या झुडुपांत लपून बसायचो. भिती वायाटची, पण ही भिती आम्हाला रोखू शकली नाही. जीव धोक्यात घालून आम्ही भारतामातेचे रक्षण करण्यासाठी सेवा बजावली आहे…’’






