- समीर परांजपे
ऐतिहासिक नाव पर्शिया ! हा देश आपल्याला लहानपणापासून शाळेच्या पुस्तकातून भेटीला येतो. सध्याचे नाव इराण... भारत आणि इराणचे इतिहासकालापासून चांगले संबंध आहेत. आपल्या मराठी हिंदी किंवा इतर भाषांतून देखील अनेक फारसी शब्द आपण सर्रास वापरतो, परंतु ते मूळचे फारसी आहेत हे आपणाला माहित नसते. सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न हे मूळचे इराण मधील ‘शिराझ’ या शहरातील होते.
दोन हजार वर्षांहून अधिक काळ भारत आणि इराण परस्परांचे शेजारी राहिलेले आहेत. शेजारी राष्ट्रांत बहुदा होतंच असतं तसं एकही युद्ध या दोन देशांत एव्हढ्या प्रदीर्घ कालावधीत कधीही झालं नाही. पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे आज इराणशी आपला प्रत्यक्ष शेजार जरी तुटलेला असला तरी उभय देशांनी परस्परांतील सांस्कृतिक आणि सभ्यतादर्शी संबंध अद्याप प्रेमाने जपून ठेवलेले आहेत. दोन्ही देशांना जोडणारे हे धागे अतूट ठरले आहेत.
भारत आणि इराण या दोन्ही देशांना जोडणाऱ्या धाग्यांमध्ये मुंबई-पुण्यातील इराणी हॉटेल्सने महत्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या अनेक खाद्य पदार्थांवर फारसी संस्कृतीचा प्रभाव आहे. भारतात असणारे अनेक पारशी व इराणी लोक हे मूळचे पर्शिया म्हणजे सध्याच्या इराणचेच. आपल्याला इराणी हॉटेलमध्ये निरनिराळे खाद्य प्रकार तसेच इराणी पाणी कम कटींग चहा हे चांगलेच माहित असतात. परंतु तो देणार्या माणसाचे कुळ हे मूळचे इराणचे आहे हे आपणांस माहित नसते. मुंबईतल्या याच इराणी हॉटेल्सचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत…
दॅट इज नन अदर दॅन इराणी रेस्टॉरंट्स ऑफ मुंबई!
‘क्या चाहिए?’
‘क्या है खानेमे?’
‘ऑम्लेट-पाव, भुर्जी, खिमा, चिकन-मटण पॅटिस, मावा केक, पुडिंग, पेस्ट्री, व्हेज रोल, वॉलनट बिस्किट्स, आलू टोस्ट, जॅम रोल, लेमन टी ब्रेड, जाम कुकीज, पीनट बटर कुकीज, ब्रुनमस्का, बनमस्का, खारी बिस्कीट...!!!’ एवढे सांगूनही वेटर दमत नाही...
ऐकणाराही न दमता नेहमीची परवलीची ऑर्डर देतो, ‘एक पानी कम चाय... मावा केक भी लाना।’
आठवड्यातले सातही दिवस सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत साधारण हाच संवाद तिथे ऐकायला मिळतो. फक्त गिर्हाईक व ऑर्डर घेणारा वेटर हीच पात्रे काय ती अधूनमधून बदलतात. थकले-भागलेल्यांचे, टाइमपास करू इच्छिणार्यांचे, कोलाहलातही शांतता शोधणार्यांचे हक्काचे ठिकाण असते ते... दॅट इज नन अदर दॅन इराणी रेस्टॉरंट्स ऑफ मुंबई!
इराणी हॉटेलचे नाव काढले की, प्रत्येकाच्या स्मृती चक्क जाग्या होतात. पक्का मुंबईकर तर कुलाबा कॉजवेवरील लिओपोल्ड या इराणी हॉटेलपासूनच मनातल्या मनात भ्रमंती करायला लागतो. फोर्टमधील याझदानी बेकरी, कयानी अँड कंपनीचे हॉटेल, मरीन लाइन्सच्या धोबी तलाव येथील सासानियन रेस्टॉरंटकडे धाव घेण्याआधी ब्रेबॉर्न स्टेडियमसमोरच्या स्टेडियम रेस्टॉरंटमध्ये त्याचे मन काही काळ घुटमळते.
संबंधित लेख वाचा: 1) एक सांस्कृतिक चळवळ… इंग्लडच्या ‘पब’ची आणि मुबंईतल्या इराणी कॅफेची…! |
त्यानंतर तो ग्रँट रोड पूर्वेला स्टेशनसमोरच असलेल्या मेरवान इराण्याकडील मावा केकची चव अजूनही आपल्या जिभेवर रेंगाळतेय, याची खात्री करून घेत पुढे सरकतो. ताडदेव वगैरे भागातील त्यातल्या त्यात बर्या इराणी हॉटेल्सची आठवण काढत मुंबईकराचे मन पुढे घरंगळत जाते ते दादर पूर्वेच्या हिंदू कॉलनी रेस्टॉरंट, माटुंग्याच्या किंग्ज सर्कलच्या कुलार अँड कंपनी रेस्टॉरंटकडे.
इराणी हॉटेलांची धाव कुठवर, तर शक्यतो जुन्या मुंबईच्या माहिम व शीव या सीमारेषेपर्यंत. वांद्रे पर्यंतइराणी हॉटेलच्या खाणाखुणा आढळतात, पण त्याही तुरळक. अंधेरीत एखादे किंवा आणखी थोडे पुढे कुठे तरी एखादे इराणी हॉटेल तुरळक आढळेलही... हे सगळे आठवत मुंबैकराची नजर काहीतरी शोधत राहते... कुठे गेला तो शिवाजी पार्क कोपर्यावरचा कॅफे आझाद इराणी... खाण्यापिण्याचे साम्राज्य पसरवणारे पण आता आपले राज्य गमावून बसलेले नाक्यानाक्यावरचे असे अनेक इराणी बादशाह मुंबैकराला आठवू लागतात.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या चार वर्षांनंतरची आकडेमोड बघितली तर त्या वेळी मुंबईतील नाक्यानाक्यांवर उघडल्या गेलेल्या इराणी हॉटेलची संख्या होती तब्बल साडेतीनशे! मात्र, सध्या मुंबईमध्ये अस्सल इराणी हॉटेलांची संख्या उरली आहे उणीपुरी पंचवीस! म्हणजे आता ही हॉटेल्स हेरिटेज वास्तू म्हणून मिरवायला मोकळी झाली, इतकी मॅच्युअर झालीत... कारण या प्रत्येक हॉटेलचे सरासरी वय आहे किमान शंभर वर्षे…
इराणी झोरोस्ट्रियनना तीन शहरे अधिक भावली… मुंबई, पुणे आणि हैदराबाद
इराणमध्ये कजार राजवटीच्या काळात (सन 1794 ते 1925) याज्द, केरमन प्रांतातील इराणी झोरोस्ट्रियन नागरिकांचा धार्मिक छळ होत होता. कजार राजवटीच्या पहिल्या शंभर वर्षांत तर या छळाची परमावधी झाली होती. त्याला कंटाळून इराणी झोरोस्ट्रियन आपल्या देशातून पलायन करून दुसर्या देशांत स्थायिक होत होते. त्यापैकी अनेक जणांचे पाय भारताकडे वळले. इराणी झोरोस्ट्रियनना भारतात तीनच शहरे अधिक भावली ती म्हणजे मुंबई, पुणे आणि हैदराबाद... त्यातल्या त्यात मुंबई जास्त.
भारतात इंग्रजी राजवट स्थिरावल्यानंतर इराणी झोरोस्ट्रियनांमधील मुळातच असलेल्या उद्यमशीलतेला अधिकच बहर आला. हे लोक पहिल्यापासूनच कामसू. पारश्यांनी बँकिंग, व्यापार, उद्योगांत आपले बस्तान बसवले; तर इराणी झोरोस्ट्रियनांनी बेकिंग आणि मॉडर्न कॅफे रेस्टॉरंट सुरू करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. वेगळ्या अर्थाने त्यांनी इराणची चायखाना संस्कृती मुंबई व आणखी एक-दोन शहरांमध्ये रुजवली.
इराण्याच्या हॉटेलात पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे आरसेच आरसे लावलेले. त्या आरशांवर पानाफुलांची वेलबुट्टी रंगवलेली. गोल आकाराची सागवानी लाकडाची टेबले. संगमरवरी दगडाचा पांढरा पृष्ठभाग असलेल्या प्रत्येक टेबलाभोवती मांडलेल्या, गोल आकाराची बैठक असलेल्या व काळे पॉलिश चढवलेल्या सागवानी लाकडापासून बनवलेल्या चार खुर्च्या. प्रत्येक टेबलावर मिरी पावडर, मिठाचे दोन शेकर, पाण्याने भरलेला जग आणि दोन-तीन ग्लास ठेवलेले. अशा जामानिम्यासह इराणी हॉटेलवाला गिर्हाइकांच्या स्वागतासाठी सज्ज असतो.
या हॉटेलमध्ये गेलात की कधी ते एकदम हाऊसफुल्ल दिसेल, तर कधी एकेका टेबलावर दोन-तीन माणसे किंवा कधी कोणी एकटाच बसलेला दिसेल. खाण्याचेही पदार्थ असेच अबरचबर सदरात मोडणारे. पुष्कळ जुन्या लोकांनी लिहून ठेवलेय, की इराण्याच्या हॉटेलमध्ये एक चहा घेऊन तुम्ही काही तास सहज बसू शकता. इराणी मालकही इतका सहिष्णू, की तो ‘कामाशिवाय बसू नये’ अशी पाटी सहसा लावण्याच्या विरोधातच असायचा. असा माहोल असेल तर गप्पिष्ट, टाइमपासवाले, क्रांती, क्रिएटिव्हिटीच्या चर्चांचे चर्चिल यांना इराणी हॉटेल म्हणजे महापर्वणी वाटली नसेल तरच नवल…
इराणी हॉटेलमध्येच घडली मुंबईची सांस्कृतिक चळवळ
1970च्या दशकापर्यंत तरी मुंबईचा गिरगाव भाग मराठी माणसांचा बालेकिल्ला होता. तेथील स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचे ‘व्हॉईसरॉय’ व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नाव बदललेले ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ हे इराणी हॉटेल हिंदी, मराठी अभिनेते, साहित्यिकांच्या गप्पाष्टकांचा खास अड्डा होता. या हॉटेलमध्ये 1940च्या दशकात दिलीपकुमार बर्याचदा येत असत. त्यानंतरच्या काळात अभिनेते बबन प्रभू, लेखक जयवंत दळवींपासून अनेक नामवंत या हॉटेलात अधूनमधून हजेरी लावून जात असत. गिरगावात मौज, मॅजेस्टिक वगैरे सारखे मोठे प्रकाशक आहेत.
मुंबई मराठी साहित्य संघ, भारतीय विद्या भवन सारखे नाट्यकर्मींना ऊर्जा देणारे मोठे स्रोत होते. त्यामुळे काहीतरी करायचेय, अशी खुमखुमी असलेले सगळे नवे-जुने कलाकार, रंगकर्मी, तंत्रज्ञ गिरगाव नाहीतर फोर्ट, व्हीटीतल्या इराणी हॉटेलांचा तासन्तास चालणार्या क्रिएटिव्ह डिस्कशनसाठी आसरा घ्यायचे. त्या वेळी इराणी हॉटेलात सिग्रेटी विकत मिळत. सिगारेटचे झुरके मारत चहाचा घुटका घेत या चर्चा खूप रंगायच्या.
पूर्वी ज्युक बॉक्स असायचे इराणी हॉटेलांमध्ये. त्यात ठरावीक नाणे टाकून आपले आवडते गाणे ऐकण्याचा शौक अनेक लोक पुरा करताना दिसायचे. मात्र हळूहळू काळ बदलत गेला तसतसा इराणी हॉटेलमधील माहोलही बदलत गेला. काळाने संघर्ष इतका तीव्र केला की, या हॉटेलांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. आजही लोक आवर्जून शोधत शोधत इराणी हॉटेलमध्ये जातात. तिथला ब्रुन, बन मस्का व गर्रर्रर्रम चाय यांचा आस्वाद घेत इराणी साम्राज्याच्या गतकालीन वैभवाच्या आठवणी काढतात... हे साम्राज्य लयाला का जाऊ पाहात आहे. त्यामागचे नेमके कारण काय आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात रेंगाळतात...
स्वातंत्र्योत्तर काळात 1980च्या दशकापर्यंत मुंबई शहरामध्ये सामाजिक, राजकीय, तसेच कामगार क्षेत्रातील, साहित्य प्रांतातील चळवळी जोमात होत्या. विविध प्रवाहांच्या विचारांची घुसळण या काळात जोमाने होत होती. मात्र, या निमित्ताने झडणारे वादविवाद, चर्चा हे सगळे साग्रसंगीत साजरे व्हायचे ते मुंबईतील फोर्ट, व्हीटीपासून ते पार माहिम, शीवपर्यंतच्या इराणी हॉटेलांमध्ये! मराठी साहित्य विश्वात लिटिल मॅगझिनचे युग 1960च्या दशकात अवतरले.
त्या वेळी या युगाच्या प्रवर्तकांनी विचारमंथनासाठी आसरा घेतला, तो मुख्यत्वे या इराणी हॉटेलांचाच. इराणी हॉटेलांशी मराठी साहित्यिकांचा जो ऋणानुबंध होता, त्याच्या रम्य आठवणी ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांच्याकडे आहेत. काळसेकर म्हणतात, ‘व्ही. टी. रेल्वे स्थानकाजवळ जिथे आता मॅकडोनाल्ड आहे, तिथे पूर्वी ‘न्यू एम्पायर’ नावाचे इराणी हॉटेल होते.
‘कामाशिवाय बसू नये’ असा प्रकारच इराणी हॉटेलमध्ये नसतो
लिटल मॅगझिन चळवळीत सहभागी असलेल्यांपैकी चंद्रकांत खोत, वसंत गुर्जर, राजा ढाले, अरुण कोलटकर, मी, प्रदीप नेरूरकर, नारायण बांदेकर अशा सगळ्यांचा ‘न्यू एम्पायर’हा हक्काचा अड्डा होता. मराठी साहित्यातले विद्रोही विचारांचे लोकच येथे जमत, असे नाही; तर ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर, अशोक जैन, कुमार केतकर यांच्यासारखे दिग्गज पत्रकार, साहित्यिक तसेच ग्रंथाली वाचक चळवळीतील प्रमुख मंडळीही ‘न्यू एम्पायर’मध्ये नेमाने येत असत. सगळ्या विचारधारेच्या लोकांना हे इराणी हॉटेल समभावाने सामावून घेत असे.
इराणी हॉटेलमध्ये ‘पानी कम’ चहा व ब्रुन किंवा बन मस्का घेऊन तासन् तास बसता येत असे. त्याबद्दल इराणी हॉटेलचे मालक गि-हाइकांना कधीही काहीही बोलत नसत. ‘कामाशिवाय बसू नये’ हा उडुपी वगैरेसारख्या बाकीच्या हॉटेलांचा दंडक असतो. मात्र, ‘कामाशिवायही मनसोक्त बसावे’ ही फक्त इराणी हॉटेलांची खासियत होती. या हॉटेलांमध्ये ‘सोस्यो’ हे शीतपेयही हमखास मिळे, जे इतर हॉटेलांत पटकन नजरेत भरत नसे.
इराणी हॉटेलांमधील खाद्यपदार्थांचे दरही सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे होते. इतकी सर्व अनुकूल परिस्थिती असल्याने, आम्ही लिटल मॅगझिनवाले इराण्यात गराडा टाकून बसलेलो असायचो. इराण्यात बसून आम्ही कविता लिहिल्या, लेख लिहिले. आमच्यापैकी प्रत्येक कवीच्या कवितासंग्रहात इराण्यात बसून लिहिलेली त्याची एक तरी कविता नक्कीच आढळेल. इराणी हॉटेलच्या मालकांच्या जुन्या पिढीतील लोकांना आपण धंद्यातून खूप नफा कमवावा, अशी असोशी नव्हतीच फार. त्यामुळे त्यांचे वागणे हे आम्हा चळवळ्या लोकांसाठी पथ्यावर पडणारेच होते.’
इराण्याच्या हॉटेलमधील वातावरण कविता, लेख लिहिण्याकरिता कसे पोषक होते, याची वर्णने 1970च्या दशकात साहित्य वर्तुळात नव्याने वावरू लागलेल्या अनेकांकडून ऐकण्यासारखी आहेत. कवी अरुण कोलटकर यांनी तर इराण्याच्या हॉटेलवर एक नितांतसुंदर कविताच लिहिली आहे. फोर्टमध्ये पीपल्स बुक हाउसच्या शेजारी एक इराणी बेकरी होती. ती जागा तशी लहान होती. पण तेथे मिळणारे पुडिंग आणि चहा यांचे अनेक लोक चाहते होते. पाव बनवल्यानंतर त्याची लादी कापताना जो चुरा उरतो, तो दुधात मिसळून त्याचे पुडिंग केले जाते.
त्याचा चहाबरोबर आस्वाद घेण्यासाठी अनेक साहित्यिक, कलाकारांचे पाय या इराणी बेकरीकडे वळत. फोर्टमध्ये स्ट्रँड बुक स्टॉलच्या जवळ एक इराणी हॉटेल होते. तिथे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमून ब्रुन मस्का, बन मस्का व चहाच्या सोबतीने तावातावाने चर्चा करीत. कधीकधी या चर्चेतून काही वादंग उद्भवून वातावरण तप्त बनायचे... मग काही वेळातच ही सारी वितंड-वादळे पानी कम चहाच्या पेल्यामध्ये विरून जायची.
फोर्टमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयामागे हीरो रेस्टॉरंट म्हणून इराण्याचे हॉटेल होते. व्ही. टी., फोर्ट भागात नोकरी, व्यवसाय करणार्यांपैकी ज्यांना ट्रेकिंगला जाण्यासाठी शनिवारी रात्री शेवटची लोकल पकडायची असे, त्यांची आपापल्या सॅकमध्ये ट्रेकिंगसाठी लागणारे सामान, खाण्यापिण्याचे पदार्थ प्लास्टिक बॅगांमध्ये भरून घेण्याची सारी पूर्वतयारी हीरो रेस्टॉरंटमध्ये होत असे. हीरो रेस्टॉरंटचा मालकच अनेकदा या ट्रेकर्सना या पूर्वतयारीसाठी स्वत:हून मदत करायचा.
1980च्या दशकात मात्र कालानुरूप काही गोष्टी धंदेवाईक दृष्टीने इराणी हॉटेलशी जोडल्या गेल्या. त्यामुळे फोर्ट, व्ही.टी., चर्नी रोड, ग्रँट रोड, तसेच माहिम, शीव येथील काही इराणी हॉटेलांमध्ये कालांतराने बिअरही मिळू लागली. त्याबरोबर चकन्याच्या विविध पदार्थांचीही तेथे चलती सुरू झाली. गिरगाव चौपाटीसमोरील विल्सन कॉलेजच्या मागच्या बाजूला तसेच तेथील भारतीय विद्या भवन इमारतीच्या पुढील चौकामध्ये बिअर विकणारी दोन इराणी हॉटेल आजही सुरू आहेत.
त्या वेळी या बदलाने इराणी हॉटेलांचे पारंपरिक शौकीन काहीसे दुखावले गेले. इराणी हॉटेलांमध्ये चहा व ब्रुन मस्का, ऑम्लेट पाव मागवून काही तास बसण्याची जी चंगळ होती, तिला तरुण पिढीतील इराणी हॉटेल मालकांच्या हिशेबी वृत्तीने चाप बसला. हळूहळू इराणी हॉटेलांमध्ये चायनीज फूड, काही ठिकाणी चक्क मसाला डोसा, इडली हे पदार्थही मिळायला लागले. मुंबईत जागोजागी उगवलेल्या उडुपी रेस्टॉरंटच्या स्पर्धेत टिकून राहणे इराणी हॉटेल व्यावसायिकांना दिवसेंदिवस अडचणीचे ठरू लागले. त्यातूनच सुरू झाला इराणी हॉटेल बंद करून ती जागा अन्य व्यावसायिकांना विकण्याचा सिलसिला. 
…आणि इराणी हॉटेलने मान टाकली!
व्ही.टी.चे ‘न्यू एम्पायर’ बंद होऊन तिथे ‘मॅकडोनाल्ड’ आले. अंधेरी पश्चिम येथे स्टेशनसमोर असलेले इराण्याचे हॉटेल बंद होऊन तिथेही मॅकडोनाल्ड सुरू झाले. माहिमच्या क्राऊन बेकरी अँड रेस्टॉरंटनेही अशीच मान टाकली. इराणी हॉटेल मालकांच्या 2010च्या दशकातील युवा पिढीला हॉटेल धंद्याचे अजिबात आकर्षण नाही. त्यातील अनेक युवा-युवती उच्च शिक्षण घेऊन एक तर परदेशात गेले आहेत, किंवा भारतात राहून अन्य उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे आपल्या मालकीच्या इराणी हॉटेलांमधील भव्य जागा हीच त्यांच्या मनाला भावणारी एकमेव गोष्ट. ती विकून किंवा तिचा अन्य उद्योगधंद्यांसाठी वापर करून अधिक पैसा कसा कमावता येईल, याकडे या युवा पिढीचे लक्ष लागले आहे.
सध्याचे व्यावहारिक जग लक्षात घेता, या तरुण पिढीचा दृष्टिकोन साफ चुकीचा आहे, असेही म्हणवत नाही. जग त्याच्या वेगाने बदलत असते. या बदलाच्या जात्यात आता ग्रँट रोड पूर्व येथील मेरवान हे इराणी हॉटेलही आले आहे. मुंबईतील कशीबशी तग धरून असलेली पंचवीसहून अधिक इराणी हॉटेल्स अजूनही सुपात आहेत. ती कधी तरी जात्यात येतीलच. मुंबईचे हे लोण पुणे, हैदराबादकडेही सरकले आहे. पुण्यामधील लकी हे इराण्याचे हॉटेल अस्तंगत झाले. कॅम्प भागातले नाझ व डेक्कन जिमखान्यावरचे कॅफे गुडलक ही इराणी हॉटेल आजही उत्तम व्यवसाय करत असली तरी त्यांचा इराणी हॉटेलचा पारंपरिक बाज केव्हाच हरवला आहे.
पूर्वी पुण्यात प्रभात कंपनी होती त्या वेळी देव आनंदसहित अनेक प्रख्यात कलाकार मंडळी आवर्जून कॅफे गुड लक तसेच लकी रेस्टॉरंटमध्ये अड्डा जमवायला जात असत. पुढचा काळ कदाचित असा येईल, की मुंबई, पुणे, हैदराबाद या तीन शहरांमध्ये ज्या नाक्यांवर जिथे जिथे इराणी हॉटेल होती व नंतर ती बंद झाली, तिथे या हॉटेलांचा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांना सांगण्यासाठी फलक लावावे लागतील... ‘इथे एक इराणी होता...’






