जामताडामधली तो दिवस वेगळाच होता. म्हणजे त्यापूर्वी जेव्हा जेव्हा पोलीस गावात धाड टाकायचे तेव्हा पळापळ व्हायची, सगळी तरूण पोरं लपून बसायची, म्हातारे-कोतारे पोलिसांना आडवे जायचे… परंतू तो दिवस वेगळाच होता. जामताडाच्या सियाटांड गावात पोलीस आले खरे मात्र गावातील लोकं नेहमीप्रमाणे लपायला, गर्दी जमवायला किंवा फरार व्हायला गेले नाहीत. पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला नाही, कोणाचा पाठलाग केला नाही. पोलिसांची ही वेगळाच धाड होती…
23 वर्षीय सोनू मंडल सांगतो, “त्या दिवशी पोलिस आम्हाला अटक करायला किंवा कुठे धाड टाकायला आले नव्हते. ते आमच्याशी बोलायला आले होते. पैसे कमावण्यासाठी आम्ही काय करू शकतो, शिकू शकतो ते सांगायला आले होते. त्यांनी आम्हाला एक संधी दाखवली आणि मी ती घेतली.”
पोलिसांनी त्या दिवशी एक शिबीर घेतलं ज्यानंतर सोनू परिसरातील नव्या ग्रंथालयात दाखल झाला. झारखंडच्या जामताडा जिल्ह्यावर लागलेला ‘भारताची सायबर क्राईम कॅपिटल’ हा शिक्का हटवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सामुहिक प्रयत्नांचा एक भाग असलेल्या कार्यक्रमांत सोनू सहभागी झाला आहे.

लायब्ररी, जनजागृती अभियान, साक्षरता… जामताडा आता बदलतयं!
आता जिल्हा स्तरावर सुसज्ज ग्रंथालय व करियर गायडंस सेंटर उघडण्याची प्रशासनाची योजना आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी याचं समर्थन करत म्हटलं की, सायबर क्राईम हा केवळ कायदेशीर नाहीतर सामाजिक प्रश्न आहे. स्थानिक खासदार विजय हंसदक यांनीही जिल्ह्यातील डिजीटल पायाभूत सुविधा व कौशल्य विकास यांची तरफदारी केली आहे. पोलिसांनीही सायबर क्राईम सेल तोडण्यासाठी छापामारी सत्र राबवत 300 हून जास्त लोकांना अटक केली आहे.
प्रोबेशनर आयपीएस अधिकारी राघवेंद्र शर्मा सांगतात, आमचा प्रयत्न आहे की कोणताही सायबर गुन्हेगार सुटता कामा नये व तरुणांना कायदेशीर कामं करण्यासाठी सशक्त केलं जावं. त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. जामताडाचे पोलिस अधिक्षक डॉ. एहतेशाम वकारीब सांगतात, “जामताडा देशात सायबर क्राईममध्ये अव्वल होता. पण आता पोलिसांच्या प्रयत्नांमुळे तो राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रिपोर्टिंग पोर्टलमध्ये 14व्या स्थानावर घसरला आहे. आमचं लक्ष्य आहे की त्याला अव्वल 50 मधूनही कमी करण्याचं.”
पोलीस, प्रशासनाचा अभूतपूर्व प्रयोग
सोनू ज्या ग्रंथालयात जातो ती एका पडक्या इमारतीत आहे जे कधी करमाटांड पोलिस ठाणं होतं. सोनू आर्ट्स ग्रॅज्यूएट आहे पण पुढे काय करायचं त्याला माहित नाही. तोही सायबर गुन्हेगारीच करत होता. याच भागातून 100 हून जास्त लोकांना अटक करण्यात आली होती. सोनू सांगतो, “आम्हाला कोणीच सांगितलं नाही की आम्ही देखील आमच्या आयुष्यात काहीतरी करू शकतो आणि इतरांसारखं सन्मानित आयुष्य जगू शकतो. मला कधी वाटलं नव्हतं की पोलिस स्टेशनमध्ये अभ्यासाची संधी मला मिळेल. या पोलिस स्टेशनमध्ये मी कोणत्याही भीतिशिवाय माझा वेळ घालवत असतो.”
22 वर्षीय रंजन मंडलही पदवीधारक आहे आणि नोकरीसाठी संघर्ष करतोय. रेल्वेत नोकरी करण्यासाठी कोचिंग सेंटरचा त्यानं शोध घेतला पण ते रांचीमध्येच होतं ज्याचा खर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा होता. आता तो पुस्तकं उधार घेऊन या ग्रंथालयात येतो आणि पोलिस अधिकारी त्यांना गाईड करतात. सामान्य ज्ञान, राज्यशास्त्र, स्पर्धा परीक्षेशी संबंधीत 150 पुस्तकं इथं आहेत. रंजन सांगतो, “माझ्या वडिलांनी मला या लायब्ररीविषयी सांगितलं. आमचे शेजारीही इथं येतात. जेव्हा मी पोलिस अधिकाऱ्यांना माझ्या स्वप्नाविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी रेल्वे परीक्षेसाठी कशी तयारी करायची याचं स्टडी प्लॅनिंग मला करून दिलं.”
सायबर क्राईममध्ये जामताडा जिल्हा होता अव्वल
एक असा घोटाळा ज्यामुळे देशात त्यांचं नाक कापलं जाईल. त्यांचा जिल्हा बदनाम होईल. जामताडा लवकरच सायबर क्राईमसाठी कुप्रसिद्ध झालं. दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यानं त्यावर नेटफ्लिक्स सिरीज तयार केलीः ‘जामताडाः सबका नंबर आयेगा’ (2020). यातला एक प्रसिद्ध संवाद होता, “जामताडा का सबसे बडा एक्सपोर्ट है कॉन्फिडेन्स.” जो कधी जामताडाच्या गौरवाशी संबंधित होता पण नंतर त्याच्या बदनामीशी जोडला गेला.
राजू तिर्कीसारख्या नोकरीची इच्छा ठेवणाऱ्या तरुणांसाठी जामताडातील हा बदल फार गरजेचा होता. कामासाठी जिल्ह्याबाहेर गेल्यावर प्रत्येक ठिकाणी इथला कलंक व संशयही त्याच्यासोबत जायचा. जो दूर करणं कठीण होतं. त्यामुळे कंपन्या त्याला काम द्यायला उत्सूक नसायच्या कारण त्याचं घर याच भागात आहे. तो सांगतो, “मी भोपाळला कामासाठी गेलो होतो. पण जामताडाचा असल्यामुळे मला नोकरी मिळाली नाही. हॉटेलमध्ये मी जेव्हा पत्ता लिहीला त्यानंतर त्यांनी मला ऑनलाईन पेमेंट करण्यास मनाई केली.”

जामताडाचे नाव ऐकल्यावर नोकरी मिळत नाही
विकास मंडलनं आता हे काम सोडलं आहे. तो गावात आता किराण्याचं लहानसं दुकान चालवतो. त्यात पैसे कमी आहेत म्हणून तो नाराज आहे पण रोज रात्री पोलिसांची भीति न बाळगता तो आता झोपू शकतो. मंडल सांगतो, “तेव्हा काही आठवड्यातच मी 2-3 लाख रुपये कमावले होते. त्यातून हे किराणा दुकान उघडलं. आता मी इमानदारीनं पैसे कमावतोय.” त्याच्या प्रमाणेच अनेक सुधारलेल्या गुन्हेगारांनी आपली अवैध कमाई वापरून वैध व्यवसाय सुरू केले आहेत. एक जण सांगतो, “त्या लोकांनी आपल्या गैरकमाईतून घरं बांधली, एसी-फ्रिज विकत घेतले आणि जेव्हा पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं तेव्हा ते यातून बाहेर पडले आणि लहानसहान कामं करू लागले. काही जण अजूनही कोर्टात केस लढत आहेत.”
लोकप्रिय युट्युबर्स जामताडाला दाखवला मार्ग
जामताडाचा 19 वर्षीय युट्यूबर उत्तम कुमार पंडित ज्याचे 4 हजार सबस्क्रायबर्स आहेत, सांगतो, “मला आपल्या व्हिडीयोवर चांगले व्ह्यूज मिळण्यासाठी वर्षभराचा वेळ लागला. मी सतत पुढे जात होतो. मला माहित होतं की मी कंटेंट करत राहिलो तर यशस्वी होईन म्हणून. लोक आता मला ओळखतात, मला लग्नात बोलावलं जातं. मी आता पैसे कमावणंही सुरू केलं आहे. ते जास्त नाहीत पण अवैधही नाहीत. आणि त्यात हळूहळू वाढ होईलच.”
50च्या जवळपास गावकरी त्याचं बोलणं ऐकत होते. एकानं म्हटलं, “आमची अनेक मुलं आधीच तुरुंगात आहेत. त्यांच्या मुलांसोबतही असं व्हावं अशी आमची इच्छा नाही.” विकास मंडल सांगतो, “जेव्हा पोलिस आले तेव्हा आम्हाला वाटलं की पुन्हा काहीतरी गडबड झाली आहे. पण यावेळी ते आमच्या मुलांना काही चांगलं शिकवण्यासाठी आले होते. गावातील प्रत्येक मुलगा यात सहभागी होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न केले.”
‘’आम्ही त्यांना रस्ता दाखवू शकतो, पण पुढे मात्र…’’
या कामात सहभागी असलेला एक स्थानिक पोलिस शिपाई सांगतो, “आम्ही त्यांना रस्ता दाखवू शकतो, पण तो त्यांना कुठवर घेऊन जाईल याची खात्री देऊ शकत नाही.” पण सध्यातरी पुस्तकांची उपलब्धता, मार्गदर्शनासाठी जबाबदार अधिकारी, स्टडी प्लॅनिंग या पायाभूत गोष्टींमुळेच ही मुलं गुन्ह्यांपासून दूर होत आहेत ही आशावर्धक गोष्ट आहे. कारण पोलिस मागील पाच वर्षांपासून जामताडाची बदनामी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यात आता काही चांगले बदल होताना दिसत आहेत.
‘फ्यूचर क्राईम रिसर्च फाऊंडेशन’ने एक आकडेवारी सादर केली ज्यातून कळतं की जामताडाला मागे टाकून आता राजस्थानातील भरतपूर जिल्हा सायबर क्राईममध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे जिथं देशातील 18 टक्के सायबर क्राईम होत असतो. जामताडा आता 9.6 टक्के गुन्ह्यांसोबत पाचव्या क्रमांकावर आहे. पण अजूनही इथं फिशिंग व आर्थिक लबाडी सुरूच आहे.
जिल्हा न्यायपालिकेच्या एका सदस्यानं सांगितलं, “ही चांगली गोष्ट आहे की जामताडा प्रशासन सायबर क्राईम कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर देश पातळीवर हे काम व्यवस्थित सुरू नाही आहे. सायबर क्राईम एका जिल्ह्यातून दुसरीकडे जात आहे. सायबर गुन्हेगारही तिथं जात आहेत. जागा बदलत आहे पण समस्या तशीच आहे.” नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर जामताडा सध्या 14व्या क्रमांकावर आहे पण आता पहिल्या क्रमांकावर हरियाणाचं नूह आहे. मग राजस्थानचं डीग, झारखंडचं देवघर, राजस्थानचं अलवर व बिहारचं नालंदा येतं.

सायबर क्राईममध्ये जामताडापेक्षा आता हरियाणाचा नूह जिल्हा आघाडीवर
आयजी रँकचे वरिष्ठ अधिकारी, दर महिन्यात क्राईम रिव्यू मिटिंग घेतात. यात इतर जिल्हे व राज्यातील पोलिसांशी समन्वय साधला जातो. यातूनच डीके बॉस टोळीतील एक गुन्हेगार सापडला जो सोनूच्या सियाटांड गावातील होता. शर्मा सांगतात की त्याला आधी फिशींगसाठी अटक झालेली होती. तुरुंगातून सुटल्यावर तो पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातून काम करत होता. सियाटांडमध्ये मात्र आता लोक त्या तरुणांचं कौतुक करत नाही जे मोबाईलवरून पैसे कमवायचे. ते आता बदलत आहे. तरुणाई आता पुस्तकांत लक्ष देत आहे. सोनू आपलं जीकेच्या पुस्तकाची पान उलटवत म्हणतो, “मी पहिल्यांदाच आपलं भविष्य यात बघू शकतोय.”






