- मोहिनी घारपुरे देशमुख
काही दशकांपूर्वी रेखा, कबीर बेदी या उभयतांचा 'खून भरी मांग' हा चित्रपट खूप गाजला होता. रेखाच्या संपत्तीवर डोळा ठेवून कबीर बेदी तिच्याशी लग्न करतो. रेखाची मैत्रीण कबीर बेदीची खरी प्रेयसी असते. ते दोघे मिळून नंतर रेखाचा काटा काढतात, तिला नदीतून बोटिंगचा आनंद घेण्याचं आमीष दाखवतात आणि नदीच्या मधोमध बोट येते तेव्हा तिचा पती ज्याच्यावर तिने विश्वास ठेवलेला असतो आणि तिची जीवाभावाची मैत्रीण दोघे मिळून एका बेसावध क्षणी तिला बोटीतून पाण्यात ढकलून देतात.
जेणेकरून पाण्यात असलेली मगर तिला खाऊन टाकेल आणि तिच्या श्रीमंतीचा उपभोग या दोघांना घेता येईल असा तो कट ते विनासायास अमलात आणतात. पुढे ती मगरीच्या हल्ल्यातून वाचते आणि स्वतः स्वतःला बदलत मोठ्या हिमतीने त्या दोघांना चांगलाच धडा शिकवते आणि अखेर स्वतःची सगळी सत्ता श्रीमंती परत मिळवते.
हा चित्रपट जेव्हा आला तो काळ आणि अलीकडच्या काळातील या चित्रपटाच्या कथानकाच्या विरुद्ध घडत असलेल्या घटनांचा जर परामर्श घेतला तर अंगावर काटा येतो. प्रेम प्रकरण आणि जबरदस्तीने किंवा मनाविरुद्ध झालेला विवाह आणि त्यानंतर त्यामुळे घडलेले गुन्हे याच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
'सोनम गुप्ता बेवफा है'
नुकतंच झालेलं राजा रघुवंशी हत्याकांड हे तर कलियुगाचं जणू प्रत्यक्ष उदाहरण आहे. सुरुवातीला जेव्हा राजा रघुवंशीच्या पत्नीने हे हत्याकांड घडवून आणल्याबाबत बातम्या बाहेर येऊ लागल्या, तेव्हा ते सगळं केवळ अविश्वसनीय वाटत होतं. कारण अगदी दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता आणि ते दोघं हनिमूनसाठी फिरायला मेघालयमध्ये आली होती. अशा गोड सुखद क्षणांमध्ये एखादी पत्नी इतक्या क्रूरपणे आपल्या जोडीदाराचा ‘काळ’ ठरेल ही कल्पना सुद्धा अंगावर काटा आणणारीच आहे.
त्यामुळेच की काय सुरुवातीपासूनच पत्नीने अर्थात सोनम गुप्ता हिने आपला नवविवाहित जोडीदार राजा याचा खून केला असल्याची वार्ता ही सपशेल खोटीच वाटत होती. तिचे वडील तर अजूनही आपल्या मुलीने एवढं मोठं हत्याकांड रचलं यावर विश्वास ठेवू शकत नाहीयेत. सबळ पुरावे आणि आता खुद्द सोनम आणि तिच्या साथीदारांनी गुन्ह्याची कबुली देऊनही तिचे वडील मात्र भाबडेपणाने सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत यातच आपण भारतीय लोक नातेसंबंधांना, विवाह संस्थेला किती मनापासून मानतो आणि जपतो त्यानुसार आचरण करतो हे स्पष्ट दिसून येते.
असं असतानाही कलियुगात मात्र हे सगळं चित्र विचित्र पद्धतीने विकृतीकडे वाटचाल करू लागलं आहे याबाबत अत्यंत खेद वाटतो. एकीकडे वटपौर्णिमेचं व्रत बहुसंख्य स्त्रिया मनोभावे करतात आणि जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावाव आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या पतीवर कोणतेही संकट येऊ नये यासाठी सावित्रीची पूजा करतात, जिने सत्यवानाचे प्राण परत आणले त्या सावित्रीचे स्मरण करतात.
ज्याप्रमाणे वड असंख्य फांद्या आणि पारंब्यांनी हळूहळू मोठा होत आपला विस्तार करतो आणि त्याची मुळं ही जमिनीच्या आत विस्तारलेली असतात, पक्की असतात ती जणू आपल्यापासून आपण सुरू केलेल्या नव्या कुटुंबाचीच रचना कशी असावी याची साक्ष देतात. ही अशी आपली आपल्या परंपरांवरची निष्ठा ! मात्र सोनमसारख्या उत्च्शृंखल, लोभी आणि चरित्रहीन मुली मात्र या सगळ्याला गालबोट लावतात.
काही महिन्यांपूर्वी मेरठमधील आर्मी ऑफिसर सौरभ याची देखील हत्या त्याच्याच पत्नीने तिच्या प्रियकराबरोबर मिळून केली असल्याची बातमी माध्यमांमधून आली तेव्हा सुद्धा असचं ह्रदय पिळवटून निघालं होतं. मुस्कान ही त्याची बायको, सौरभ त्याच्या एनिवर्सरीच्या साठी सुट्टी घेऊन घरी आला होता. आदल्या रात्री त्याने आपली प्रिय पत्नी आणि छोटी मुलगी यांच्याबरोबर दणक्यात सेलिब्रेशन केलं होतं. पण त्याला ठाऊक नव्हतं की हीच त्याची शेवटची एनिवर्सरी आहे.
मुस्कानने तिच्या प्रियकराबरोबर मिळून सौरभसारख्या उमद्या जवानाचा अतिशय थंड डोक्याने आणि क्रूरपणे खून करून त्याच्या देहाचे तुकडे निळ्या रंगाच्या ड्रम मध्ये भरून ठेवले होते. जेव्हा ही घटना उघड केस आले त्यानंतर निळा ड्रम म्हणजे अवदसा इतका तीव्र परिणाम समाजावर झाला. कोणीही आपल्या घरात निळा ड्रम ठेवण्याची हिम्मत करेनासे झाले.
तसंच सोनम राजा रघुवंशीच्या हत्येत मुख्य आरोपी असल्याच्या बातम्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा लोकांना कोरोनाच्या काळात एक दहा रुपयाची नोट जिच्यावर कोणीतरी 'सोनम गुप्ता बेवफा है' असं लिहून ठेवलं होतं तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आठवलं आणि तीच ही सोनम गुप्ता असावी अशा चर्चांना आणि बातम्यांना पेव फुटलं. दुर्दैवाने आता सोनमनेही आपणच राजाच्या हत्येचा सगळा कट रचल्याची कबुली दिली आहे आणि लोकांच्या मनातील शंकाच अखेर खरी ठरली आहे.
प्यार कोई खेल नही..
दिवसागणिक सौरभसारख्या आणि राजा रघुवंशी सारख्या निष्पाप मुलांच्या हत्या किंवा याउलट घटना, नव्हे नव्हे हत्याकांड घडू लागलेत. हल्लीच्या तरुण मुला-मुलींना प्रेम जणू खेळ वाटू लागला आहे की काय असे वाटते. प्रेम, पैसा यामध्ये प्रेमाच्या जाळ्यातून पैसा गिळणे आणि तेवढ्यावरसुद्धा न थांबता अक्षरशः दुसऱ्याला ठार मारण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.
बरं सामान्य घरातील किंवा कोणत्याही सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीतील ती व्यक्ती असो खुनाचे कट रचून ते पद्धतशीरपणे अवलंबण्यात यांना काडीचीही भीती वाटेनाशी झालेली आहे. कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही कारण 'पैसा बोलता है' हे डोक्यात पक्कं बसलेलं आहे. या सगळ्यात क्राईम थ्रिलर्स पाहून खुनाचे कट रचल्याच्या आणि ते यशस्वीपणे अमलात आणल्याच्या अनेक घटना ठळकपणे आढळून येतात.
नाही म्हणायला हिम्मत लागते…
एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशा घटना हल्ली समाजात घडताना दिसतात. 'प्रेम' या संकल्पनेचं मातेरं झालेलं दिसतं. बरं आजवर एकतर्फी प्रेमातून प्रेयसीची हत्या अशा घटना हादरवून टाकत होत्या आता तर विवाहबाह्य संबंधातून आपल्या वैवाहिक जोडीदाराचीच हत्या घडवून आणल्याच्या घटना सुन्न करून टाकत आहेत. अशा प्रसंगी अनेक प्रश्न उपस्थित राहतात. जर तुम्हाला ती व्यक्ती तुमचा पती किंवा पत्नी म्हणून पसंतच नव्हती तर तुम्ही लग्न का करता? तुम्हाला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
कोणत्याही दबावाखाली येऊन जन्मभरासाठी आपल्याला पसंत नसलेला जोडीदार जर आपण निवडतोय तर याचाच अर्थ आपण जोडीदार नव्हे तर त्याचं प्रतिष्ठित घराणं आणि त्याची श्रीमंती पाहून लग्नाला होकार दिलाय हे मनोमनी ओळखून स्वतःची लाज कशी नाही वाटत ? जोडीदार पसंत नसेल तर सरळ नकार द्या, त्याच्या खुनाचे कट रचायला वापरली जाणारी कुबुद्धी, खर्च होणारा पैसा हे असलं कांड रचताना तुमच्या अंगात बरी हिम्मत येते मग हेच बळ तुम्हाला नकार देताना कसे येत नाही? याचाच अर्थ हल्लीच्या तरुणांची डोकी किती विकृत आणि स्वार्थी होत चाललेली आहेत याकडे समाज म्हणून मी लक्ष वेधू इच्छिते. 
माध्यम शिक्षण महत्त्वाचं…
कटकारस्थानानं भरलेल्या टीव्ही मालिका आणि त्याहून प्रभावी आणि भडक पद्धतीने आणि मुख्य म्हणजे ३ तासात अथं पासून इती पर्यंत जणू एखादा कट रचून तो पूर्णत्वास कसा नेता येईल याचं प्रशिक्षणच देणारे चित्रपट याचा उपयोग विकृत डोक्याची मंडळी हमखास प्रत्यक्ष आयुष्यात करताना दिसत आहेत आणि त्यामुळे अत्यंत निर्दयीपणे कोणाचाही खून करण्यापर्यंत यांची मजल जाते हे किती दुर्दैवी आहे. यासाठीच माध्यम शिक्षण फार फार महत्त्वाचं ठरत आहे. राजा रघुवंशी हत्याकांडातही त्याची पत्नी सोनम हिने तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी 'हमराज' या चित्रपटा पासून प्रेरित होऊन हे सगळं हत्याकांड रचलं असं स्पष्ट झालं आहे.
‘हमराज’ या चित्रपटात अमिषा पटेल हिने नायिकेची भूमिका साकारली होती. तिच्या पतीच्या भूमिकेत बॉबी देओल होता तर तिचा प्रियकर म्हणून अक्षय खन्नाने काम केले होते. लग्न करून आपल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवायचे मग थोडे दिवस त्याची विधवा म्हणून राहायचे आणि नंतर आपल्या प्रियकराशी लग्न करायचे म्हणजे नवऱ्याची संपत्ती देखील मिळेल आणि आपल्या प्रियकराबरोबर पुढे आयुष्यभर संसार थाटता येईल. विनासायास मिळालेल्या संपत्तीतून पुढे दोघांना आयुष्यभर मजा मारता येईल असे या चित्रपटाचे कथानक होते.
मात्र, चित्रपटात सुद्धा शेवटी विवाहानंतर जेव्हा प्रियकर त्या आपल्या प्रेयसी वर ठरल्याप्रमाणे आता वैवाहिक जोडीदाराचा खून करण्याचा दबाव आणू लागतो तेव्हा तिचं देखील एका क्षणी आपल्या विवाहाच्या संस्कारांनी मन परिवर्तन घडतं. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी आता आपण निष्ठा राखून आहोत हा ठोस संदेश ती तिच्या प्रियकराला देते आणि वेळीच स्वतःला सांभाळते. तिचा पती देखील तिचं मन परिवर्तन झालेलं पाहून तिला पुन्हा आपलीशी करतो. याचाच अर्थ चित्रपटातही एक योग्य संदेश दिलेला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र सोनमने राजाच्या हत्येचं कांड आणि अखेर त्याला बळी दिल हे एवढं धारिष्ट तिच्या अंगी कसं आलं हे निव्वळ अनाकलनिय आहे.
पोरींनो, स्वतःला सांभाळा…
खरंच मला मान्य आहे खूप दबाव आहे. असं वाग तसं वागू नको, अशीच रहा तशी राहू नको, आम्ही म्हणतो त्याच मुलाशी लग्न कर, मुळात लग्नाशिवाय राहूच नकोस, लग्न न झालेली बाई म्हणजे नक्कीच तिची लफडी असणार, लग्न करूनही मित्रांशी बोलते म्हणजे नक्कीच ती उठवळ असणार, मनमोकळ वागते हसते बोलते म्हणजे ती 'चालू' आहे, अशा असंख्य टॅक्स खाली तुम्हाला सतत दाबलं जात असतं. जिला जे हवंय ते तिला नाकारण्यात या समाजाला आनंद मिळतो पण असं असलं तरीही आज असंख्य पालक आपल्या मुलींचं मन जपू लागले आहेत.
मुलगी जन्माला आली तर आनंद सोहळे साजरे केले जातात एवढा मोठा सामाजिक बदल झालेला आहे. तेव्हा तुमच्यावर कोणताही मानसिक दबाव येत असेल तर कोणाशी तरी मनमोकळा संवाद साधा. ही व्यक्ती जबाबदार नागरिक असावी आणि तिला विश्वासार्हता असावी याची खबरदारी घ्या.
सोनम आणि मुस्कान प्रियकर आणि पती यांची जर तुलना केली तर सहज लक्षात येईल की यांचे पती खरोखरच किती घरंदाज आणि सुसंस्कारी पुरुष होते. ते पैसा प्रतिष्ठा आणि चारित्र्य या तिन्ही निकषांवर त्यांच्या प्रियकरांपेक्षा श्रेष्ठ होते. असं असताना केवळ भावनेच्या आहारी जाऊन या दोन्ही मुलींनी आपल्या प्रियकरालाच कवटाळले. जे प्रियकर आपल्या प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीच्या हत्येच्या कटात सामील होतात आणि ज्यांचे हात एखाद्या माणसाचा खून करताना थरथर कापत नाहीत, ज्यांची डोकी पैसा पाहून हलतात, ज्यांच्या मेंदूला पैशाची झिंग चढते हे असे पुरुष तुम्हाला तरी कसे सुखी ठेवतील हा साधा विचार करून पहा.
दुसऱ्याला ठार मारताना ज्या पुरुषाला आपल्या कुटुंबाची, आई बहीण वडील या कोणत्याही रक्ताच्या नात्याची तसूभरही आठवण येत नाही, आई वडिलांचे संस्कार आठवत नाहीत, बहिणीचं भविष्य डोळ्यापुढे दिसत नाही असले करंटे तुम्हाला काय सुख देणार हा साधा विचार सुद्धा पोरींनो तुमच्या मनात येत नाही हे दुर्दैव!
समाज म्हणून स्त्री आणि पुरुष यांनी दोघांनी आपली जबाबदारी उचलणं आणि ती निष्ठेने पेलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मधला बराच काळ हा आपण ' फेक फॅमिनिझम' च्या आहारी गेलेलो आहोत. स्त्रीवादी असणं म्हणजे पुरुषांचा द्वेष करणं किंवा त्यांचा छळ मांडणा हा चुकीचा विचार मधल्या काळात फार झपाट्याने आपल्या मनावर बिंबवला गेला आणि तिथूनच आपला -हास सुरू झाला. पण आता यातून बाहेर पडूया आणि हे समजून घेऊया की समाज म्हणून स्त्री आणि पुरुष एकमेकांना जितके पूरक राहतील आणि जितकं सुंदर खेळीमेळीने जीवन जगतील तितकाच आपला समाज होईल.






