मिसळ ही एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे तिसरं महायुद्ध होईल असं म्हणतात. मिसळ बनवण्याच्या नाना प्रकार आणि त्या त्या ठिकाणाचा खास लहेजा घेऊन मिसळ सगळीकडे तयार होते. कोल्हापूरचे लोक त्यांची मिसळ भारी म्हणतात, तर नाशिकचे त्यांची मिसळ भारी म्हणतात. काही काही जण पुण्याच्या मिसळीला देखील भारी म्हणतात, तर राजकारण्यांना ठाण्याची मामलेदार मिसळी भारी वाटते…असो, मिसळीचे वाद चालत राहतात, सोशल मीडियावर याच रणांगण चालू असतं आणि त्याला काही अंत नाही.
पण तमाम मिसळप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी मराठमोळी मिसळ आता जगातील 50 सर्वोत्कृष्ट स्वादिष्ट नाश्त्यात समाविष्ट झाली आहे. भारतातील तीन खाद्यपदार्थांची 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये निवड झाली आहे. जगभरातील सर्वोत्तम 50 न्याहरीच्या पदार्थांच्या यादीत चटकदार मिसळीला स्थान मिळाले आहे. खाद्यापदार्थांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विख्यात ‘टेस्ट अटलास’ने न्याहरीची ही जागतिक क्रमवारी जाहीर केली. त्यात भारतीय प्रवेशिका 18व्या स्थानी आहे. 
जगातील 50 सर्वोत्कृष्ट स्वादिष्ट नाश्त्यात मिसळीचा समावेश
या क्रमवारीत चवीपेक्षाही स्थानिक संस्कृतीशी जोडणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देण्यात आले. जगभरातील नागरिक दिवसाची सुरुवात या पदार्थाने करतात. जून 2025 च्या क्रमवारीनुसार जगातील पहिल्या 50 पदार्थांमध्ये भारतातील तीन व्यंजने आहेत. यादीनुसार महाराष्ट्रातील मिसळ-पाव 18व्या स्थानी आहे. तर पराठा 23 व्या व दिल्लीतील प्रसिद्ध असे छोले भटुरे 32 व्या क्रमांकावर आहेत. टेस्ट अटलासच्या शंभर पदार्थांच्या यादीत निहारी, श्रीखंड आणि पालक पनीरचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील मिसळीला दाद देताना ‘अटलास’ने ती मसालेदार असायला हवी. तसेच कुरकुरीत खमंग मिसळ ही एखाद्या कलात्मक कामाप्रमाणे दिसते. त्यात अनेक रंग असतात, जसे की लाल, तपकिरी, नारिंगी तसेच हिरवा असे मिसळीचे वर्णन करत त्याची कृतीही दिली आहे.
मिसळीच्या जन्मावरून मतभेद
कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर काय करायचं या गरजेतून जसा ‘भडंग’चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहीतरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही. पण तरीही मिसळ कशी बनली असावी यावर काही ग्रंथात माहिती उपलब्ध आहे.
तसा मिसळ हा काही फार थोर पदार्थ नाही. रूपरंगाने म्हणाल तर तो अस्सल मराठी माणसासारखाच. एक हजार 237 वर्षांपूर्वी उद्योतनसुरी नावाचा एक साहित्यिक होऊन गेला. कुवलयमाला हा त्याचा ग्रंथ. त्यात त्याने मराठी माणसांचे वर्णन करताना त्यांची अत्यंत समर्पक अशी दोन वैशिष्टय़े सांगितली आहेत. तो म्हणतो, ते अहिमाण आणि कलहसील म्हणजे अभिमानी आणि भांडखोर असतात. मिसळ अगदी तशी आहे. गरम आणि भडक माथ्याची. उन्हात रापल्यासारख्या वर्णाची. गुळमाट, गुळचाट या शब्दांशी जन्माचे भांडण असणारी आणि कोल्हापुरी लवंगी मिरचीशी जन्माचे नाते असणारी. या नात्यामुळेही मिसळचा स्वभाव तसा बनला असेल कदाचित.
विविधतेतील एकता… मिसळीचा उगम हा भारतीय परंपरेतूनच
एक मात्र खात्रीपूर्वक सांगता येईल की मिसळीचा उगम हा भारतीय परंपरेतूनच झालेला आहे. विविधतेतील एकता हे भारतीय परंपरेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्टय़. विविध वंश, धर्म, पंथ, जाती, भाषा, संस्कृती, रीतिरिवाज अशा मिसळीतूनच भारतीय परंपरा नावाचे जे घट्ट रसायन आहे ते तयार झाले आहे. मिसळीने तीच विविधतेची जिवंत, रसरशीत परंपरा अभिमानाने अगदी नावापासून जपली आहे. मिसळ हा मूळ शेवेचा पदार्थ. त्यात नंतर काहीही, अगदी पोहे आणि उकडलेले बटाटेसुद्धा घालण्यात येतात. पण तिचा पाया रस्सा असेल, शिखरावर र्ती असेल, तर इमारतीत शेव येतेच. या शेवेचा इतिहासही अगदी प्राचीन आहे.
महाराष्ट्रात यादवकाळात कोणते पदार्थ खाल्ले जात असत याची माहिती महानुभाव वाङ्मयातून मिळते. त्यात शेवेचा समावेश आहे. म्हणजे ज्ञानेश्वर, चक्रधरांच्या काळामध्ये मराठी माणसाच्या खाण्यात शेव होती. ती सोजीची असे. बेसनाची तिखट शेव हा त्यानंतरचा शोध असावा. या शेवेची भाजी हा उत्तर महाराष्ट्रातील एक आबालवृद्धप्रिय प्रकार आहे. हल्ली तोही मराठमोळ्या उपाहारगृहांतून मिळतो. या शेवेच्या भाजीमध्ये मिसळीचा पूर्वावतार शोधता येईल. अर्थात खाद्यपदार्थाचे मूळ शोधण्याऐवजी त्यांचा स्वाद चाखण्यातच खरी मौज असते.
महाराष्ट्रात मिसळची प्रत्येकाची स्वतःची एक रेसिपी
महाराष्ट्रात मिसळची प्रत्येकाची स्वतःची एक रेसिपी आहे, गोष्ट आहे...त्यामुळे हा पदार्थ केवळ चवीशीच नव्हे तर प्रांतीय अस्मितेशी देखील निगडीत आहे. पुण्याच्या गोडसर वाटणाऱ्या मिसळीची नाशिककर चेष्टा करतील तर, नाशिकच्या काळ्यारश्यापेक्षा लई भारी जाळ चवीची मिसळ, ती आमचीच असे म्हणत एखादा कोल्हापूरकर मिशीवर ताव मारेल. तर तिकडे खान्देश अन् अहमदनगर पट्ट्यातले लोक दावा करतील की तुमच्या चवी कितीही भारी असल्या तरी अस्सस मिसळ ती आमचीच. त्यामुळेच एकाच जातकुळीतल्या वेगवेगळ्या चवीच्या मिसळींची गोष्ट ही तिच्या चवी इतकीच न्यारी आहे.
मिसळ खाण्याची प्रत्येकाची ठरलेली अशी ठिकाण असतात. मात्र, जर तुम्ही मिसळीचे शौकीन असाल अन् त्यात दडलेल्या चवींची वैविध्यता चाखायची असेल तर, उत्तम ठिकाण म्हणजे कोणत्याही एस.टी.स्टँडवर असलेले कॅन्टिन, किंवा त्या परिसरात असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलमधे किंवा मग कोणत्याही सरकारी कचेरीत असलेल्या कॅन्टिनमधे उत्तम मिसळ मिळते. साधारणपणे, मटकी किंवा मूगाची पाणीदार उसळ, त्यावर फरसाणच्या थरातून डोकावणारे कांदा-कोथिंबीर अन् वरून पडणारा गरमागरम रस्सा अथवा कट आणि त्यावर पिळले जाणारे लिंबू...पावासोबत घाम पुसत अन् वरून पुन्हा पुन्हा रस्सा त्यात घेत खायचा असा हा देखणा पदार्थ आहे.
प्रत्येक हातानुसार मिसळीची चव बदलते तशीच प्रत्येक शहरानुसारही मिसळीचे खास वैशिष्ट्य चाखायला मिळते. मुंबईत विनय, पणशीकर, तांबे, नगरी मिसळीचा स्वाद देणारे मारोतराव, वैदर्भीय मिसळीचा झटका देणारे मिसळ मसाला, मिसळ किचन, छान चवदार, अशी मुंबईतील काही नावाजलेली ठिकाण आहेत तर ठाण्यामधे मामलेदार, आमंत्रण अन् डोंबिवलीत मुनमून मिसळीचा स्वाद घेणे मिसळ प्रेमींसाठी अत्यावश्यक आहे. नवी मुंबईत मिसळ मसाला, वसई-पालघर परिसरात नाना मिसळ, कल्हई मिसळ, चुलीवरची मिसळही आपली चव राखून आहेत.
मिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री! 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच.
कोट्यवधींची रस्सेदार मिसळ…
मिसळीचे अर्थकारण तिच्या इतकेच रंजक आहे. टपरीवजा हॉटेलमधे जे पदार्थ विकले जातात त्यात प्रत्येक चार पदार्थामागे एक मिसळ ऑर्डर केली जाते. तर, मुंबई किंवा कोणत्याही नागरी, किंवा ग्रामीण भागतही अनेकवेळा लोकांना जर बाहेर जेवायची वेळ आली तर दुपारच्या जेवणासाठी मिसळ ही हमखास ऑर्डर केली जाते. 
साधारणपणे कोणत्याही मध्यम श्रेणीच्या हॉटेलचा जरी अंदाज घ्यायचा झाला तरी, तिथे दिल्या जाणाऱ्या पहिल्या पाच पदार्थांत मिसळीचा अंतर्भाव आहे. त्यामुळे अशा मध्यमश्रेणीच्या कोणत्याही हॉटेलमधून दिवसाकाठी सरासरी 80 ते 100 च्या आसपास मिसळ प्लेटची विक्री होते. तर जी निव्वळ मिसळीची विक्री करणारी हॉटेल्स आहे तिथे दिवसाकाठी 250 ते तब्बल एक हजारपेक्षा जास्त प्लॅटचीही विक्री होते. मिसळीच्या किमती देखील हॉटेलच्या दर्जानुसार असून सरासरी किंमत ही 22 रुपये ते 150 रुपयांपर्यंत आहे.
कडधान्य पोटात घेऊन जाणारा, चवीला भन्नाट, खिशाला परवडणारा आणि जेवणाइतकेच पोट भरविणारा हा पदार्थ सरत्या दोन दशकांत इतका लोकप्रिय झाला आहे की, अनेकांनी आता केवळ मिसळीची खास दुकाने सुरू केली आहे. यामधे चुलीवरची मिसळ, ठेचा मिसळ, तंदुरी मिसळ अशी खासियत उपलब्ध करून देतानाच, एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील विविध प्रांतातील मिसळ ग्राहकाला चाखता यावी, याकरिता पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खान्देश येथील मिसळीचा स्वाद उपलब्ध करून दिला आहे. यामधे लाल रस्सा,काळा रस्सा, हिरवा रस्सा चाखता येतो. तर, नुसत्या मूग-मटकीसोबत पोहे, कुस्करलेला बटाटा अशा विविध शहरांमधील पद्धतीनुसार ती मिळते. त्यामुळेच, प्रत्येक हातानुसार चव बदलली तरी तितकाच स्वादिष्ट अन् पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे मिसळ !
आजवर अगदी मराठी माणसानेही मिसळीवर दर्जाच्या बाबतीत अन्यायच केला आहे. अनेक जण आजवर मिसळीला कदान्न असेच लेखत आले आहेत. एकीकडे ताटलीभर मिसळ, पाच-सहा पाव आणि त्या पावांसाठी तर्रीच्या फैरीवर फैरी असा आडवा हात मारायचा. त्याने झालेला अंगजाळ शमविण्यासाठी वर ताकाचे दोन प्याले रिचवायचे आणि उदर तृप्त तृप्त झाले तरी मनाने मात्र मिसळीला मराठी खाद्यजगतात खालचाच मान द्यायचा हा अस्सल दुटप्पीपणा झाला.
हा गुण त्या कवी उद्योतनसुरीला माहीत नव्हता म्हणून बरे. नाही तर मराठी माणसांच्या गुणदर्शनात त्याने याचीही भर टाकली असती. अर्थात आता मिसळीला विलायती प्रमाणपत्र मिळाले आहे आणि पाश्चात्त्यांनी नावाजल्याशिवाय सोन्यालाही सोने न म्हणण्याची आपली परंपराच असल्याने तिला जागून आता तरी मिसळीला मराठी खाद्यपदार्थाच्या पंक्तीत मानाचे पाट, खरे तर ताट, मिळेल यात शंका नाही.






