(साक्षी मेहरा)
अंश फक्त अडीच वर्षांचा होता… नुकताच रडायचा थांबला होता. पाणावलेल्या डोळ्यांनीच तो खालून चाललेली वरात बघत होता. आपल्या वडिलांच्या कुशीत असलेला अंश तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली जात असलेल्या वरातीत डीजेवर नाचणारे लोक बघत होता आणि अचानक एक गोळी त्याचं लहानसं डोकं भेदून निघून गेली. तो आता पुन्हा कधी रडणार नव्हता.
आत त्याची आई स्वयंपाकाची तयारी करत होती. त्याचा काका दुसऱ्या मुलांकडे लक्ष देत होता. खाली वरात अजूनही डीजेच्या गाण्यांवर बेभानपणे नाचत होती. अंश मात्र त्यांना बघू शकणार नव्हता. तो गेला हे लक्षात येताच घरचे त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण आधीच उशीर झाला होता. “माझा एकुलता एक मुलगा मेला. माझी एवढीच इच्छा आहे की कोणत्याही आई-वडिलांवर अशी वेळ येऊ नये,” विकास शर्मा थकलेल्या आवाजात सांगतात. 
नोएडा,गाझियाबाद मध्ये लग्नातील गोळीबारात पाच दुर्घटना
लग्नाच्या झगमगत्या गजबजत्या वरातींमध्ये ही एक जीवघेणी प्रथा मोठ्या जोमाने सुरू झाली आहे, रायफलने गोळ्या चालवण्याची… कधीतरी मोकळ्या मैदानांत त्या उत्सवाचं प्रतीक होत्या पण आता अरुंद गल्ल्यांमध्येही ते शांत मारेकरी ठरत आहेत. कोणतीही बंधनं नसलेली ही गोळीबारी अनेक निर्दोष लोकांच्या जीवावर उठत आहे. कोणीतरी नवीन आयुष्याची सुरूवात करत असतात आणि तिकडे कोणाच्या तरी आयुष्याचा शेवट झालेला असतो. मागील महिन्यात नोएडा आणि गाझियाबाद मध्ये लग्नातील गोळीबारात पाच दुर्घटना घडल्या.
उत्तर भारतात लग्नात बंदुका चालवणं सामान्य प्रथा आहे. यावर कायद्यानं बंदी असूनही गोळ्यांचा आवाज मात्र दबत नाही. बॉलिवूड चित्रपटांनी या प्रथेला आणखी बळकटी दिली आहे. तनू वेड्स मनू, गँग्स ऑफ वासेपूर, ओंकारा, बँडीट क्विन इत्यादी चित्रपटांत लग्नाच्या वरातीत बंदूका चालवणारे आनंदी वराती दिसून येतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती दुःखद असते.
2019 च्या शस्त्र वापर कायद्यानुसार लग्न तसेच सार्वजनिक उत्सवांत बंदूकांवर बंदी आहे त्यामुळे गोळीबारी बेकायदेशीर ठरते. अवैध हत्यारं बाळगण्यावरही बंदी आहे. तरीही या कायद्याची अंमलबजावणी करणं पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे. गाझियाबाद मध्ये हिमांशू चौधरीनं आपल्या लग्नात बंदूकीतून गोळ्या झाडल्या. त्याला अटक करण्यात आली व नंतर जामिनावर सुटका झाली. नोएडाचे डीसीपी राम बदन सिंह म्हणतात, “जर लोकांनी थोडा विचार केला तर त्यांना समजेल की लग्न उत्सवात गोळीबारी करणं बेकार आणि धोकादायक आहे, जीवघेणं आहे. ते थांबायला पाहिजे. पण तसं होत नाही आहे. एनसीआर मध्ये 60 टक्के प्रकरणं ही घरगुती देशी कट्ट्यांशी संबंधीत असतात. त्यांचा वापर पिढ्यानपिढ्या सुरू आहे व त्यांचा शोध घेणं कठीण आहे.”
प्रियांशू त्यागीच्या पोटात घुसली, आता तो कोमात आहे…
गाझियाबादच्या मुरादनगरात राजेश कुमार यांनी आपल्या निवृत्तीची पार्टी व मुलाच्या साखरपुडा दोन्हीसाठी भव्य समारंभ आयोजित केला होता. सारे घरापासून दूर एका मैदानात जमले होते. रात्री कोणीतरी हवेत गोळ्या चालवण्याचं ठरवलं. एक गोळी अचानक २१ वर्षांच्या प्रियांशू त्यागीच्या पोटात घुसली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तो आता कोमात आहे. तो कधी शुद्धीवर येईल, न येईल कोणालाच माहीत नाही. त्याच्या आईला याची माहिती नाही आणि कोणी तिला खरं सांगायची हिम्मत करत नाही.
गोळी कोणी चालवली, बंदूक कोणाची होती, कोणालाच माहिती नाही. एक जण म्हणतो की गोळी कोणी चालवली हे प्रियांशूच सांगू शकतो. पोलिसांत तक्रार नोंदवली आहे पण आरोपी अजून सापडलेला नाही. राजेश कुमार यांच्या घरीही या घटनेमुळे सर्वांना धक्का बसलेला आहे. मुलगा सोनू ज्याचं लग्न झालं तो याविषयी काही माहिती नाही असं सांगतो. त्याची आईही तेच सांगते.
हिमांशू चौधरीची आई मीडिया आणि पोलिसांच्या सततच्या भेटींनी वैतागली आहे. “माझ्या या परिस्थितीसाठी मीडिया जबाबदार आहे,” त्या सांगतात. “मी हार्टची पेशंट आहे. मला काही झालं तरी त्याची जबाबदारी कोण घेणार? कृपया मला एकटं सोडा. आधीच खूप सोसलं आहे आम्ही.”
19 फेब्रुवारीला हिमांशूचं लग्न झालं होतं. लग्नात त्यानं एक पिस्तूल काढून गोळी झाडली. मग सूरज नावाच्या एका तरुणानं दोन बंदूका आणखी आणल्या. नवरा-नवरीला त्यानं गोळी झाडायला उचकवलं. हिमांशूनं पुन्हा गोळ्या झाडल्या आणि त्याच्या बायकोनं, तनू चौधरीनंही गोळी झाडली.
याचा व्हिडीयो व्हायरल झाल्यावर पोलिसांनी हिमांशूला अटक केली. बँक्वेट हॉलचे मालक गौरव पुनिया सांगितलं की त्यांनी असं होऊ नये यासाठी प्रयत्न केला होता पण, “दारू पिल्यानंतर कोणीच आमचं ऐकत नाही. आम्ही रात्री 10 वाजता डीजेचं कनेक्शन कापलं आणि संगीत बंद करण्यासाठी पोलिसांनाही बोलावलं.” पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर नवऱ्याला कलम 51 अंतर्गत अटक केली आणि नवरीला कलम 41 खाली सोडून दिलं. पुनियांना वाटतं की ही शिक्षा कठोर आहे व यामुळे कोणाचा फायदा होणार नाही.
सर्वांनाच तसं वाटत नाही. अंशच्या वडिलांचं आयुष्य तो गेल्यानंतर बदलून गेलं. मुलगा गेल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि शहर सोडून आपल्या गावी, संभलला गेले. तिथं त्यांना जास्त सुरक्षित वाटत आहे. ते म्हणतात, “गोळी मलाही लागू शकली असती आणि लागली असती तर माझं कुटुंब उध्वस्त झालं असतं. घरात कमावणारा मी एकटाच आहे. माझ्या मागे घरच्यांचं काय झालं असतं?” अंशला लागलेली गोळी हितेश उर्फ हॅप्पी आणि दीपांशू कुमार यांनी चालवलेल्या बंदूकीतली होती.
16 फेब्रुवारीला गुरूग्राम मधली एक वरात नोएडाच्या अगहपूर गावात पोहोचली तेव्हा दोघांनीही गोळ्या झाडल्या. 24 वर्षीय दीपांशूला अटक झाली तर 25 वर्षीय हॅप्पी फरार झाला. त्याला नंतर पकडण्यात आलं. डीसीपी सिंह म्हणतात, “मात्र आता लग्न उत्सवात गोळ्या चालवणं तसं कमी झालं आहे आणि काही दिवसांतच ते पूर्णपणे बंद होईल. बदल व्हायला जरा वेळ लागतो. ही प्रथा एका अंधश्रद्धेवर आधारीत आहे. लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे पण तो आता संपत चालला आहे.”
शाहपूर बम्हेटा गावातील तालमीत शालेक यादव जुन्या दिवसांची आठवण काढतात जेव्हा लग्नात रात्रभर गोळ्यांचे आवाज गरजत राहायचे. बम्हेटा हे पैलवानांचं गाव समजलं जातं आणि इथं ही परंपरा जुन्या काळापासून आहे आणि गोळ्या चालवण्याला अभिमान आणि शक्तीचं प्रतीक समजलं जातं. यादव सांगतात की, पूर्वी खूप गोळ्या चालायच्या. आता हे जवळपास बंद पडलंय. सरकारनं बंदी आणली आहे आणि लोकही आता नियमांचं पालन करतात.
लग्नात बंदुकीच्या गोळ्या झाडण्याची प्रथा नेमकी का आहे?
लग्नात गोळ्या चालवण्याची परंपरा भारतीय उपखंड, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, मध्य आशियात सामान्य आहे. इथं राजकीय अस्थिरता होती त्यामुळे लोक हत्यारं बाळगायचे. लग्नात ते गोळ्या झाडून हेही सांगायचे की ते हत्यारबंद आणि आपल्या सुरक्षेसाठी तयार आहेत. ‘इंडियन्स फॉर गन्स’ या एनजीओचे संस्थापक अभिजीत सिंह सांगतात, “वसाहती शासनात कडक कायदे होते ज्यामुळे हत्यारं फक्त अभिजन वर्गाकडेच असायची. त्यामुळे त्यांचं प्रदर्शन करणं एक स्टेटस सिंबॉल बनलं. आताही भारतात हत्याराचं लायसेंस मिळणं कठीण असल्यामुळे ते आत्मरक्षेऐवजी दबदबा निर्माण करण्यासाठी जास्त वापरलं जातं.” 
1973 मध्ये राम बदन सिंह यांच्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा वरातीत झाडलेल्या गोळ्यांपैकी काही जवळच्या निंबाच्या झाडाला लागल्या आणि त्याच्या फांद्या खाली पडल्या. ते म्हणतात, “युपीत ही प्रथा खूप जुनी आहे. पण आता ती ओसरत आहे. लहान बंदूकीतून गोळी चालवली तर ती लोकांना लागण्याची शक्यता असते. पण मोठ्या रायफलीतून गोळ्या चालवल्या तर असं सहसा होत नाही.”
शालेक यादव यांच्या लग्नातही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. वरात रात्रीच्या वेळी निघायची आणि रस्त्यात कधी काय होईल ते सांगता यायचं नाही त्यामुळे लोकांकडे आणि नवरदेवाकडेही बंदुका होत्या. यादव यांच्याकडे एक जुनी, लांब नळी असलेली बंदूक अजूनही आहे. १९९२ मध्ये त्यांनी याचं लायसेंस तयार केलं होतं. पण बंदुक आता गंजली होती, तिच्यावर धूळ जमली होती. तिचा उपयोग कोणी करत नव्हतं हे स्पष्ट होतं. “शेवटचा उपयोग मीच केला होता,” यादव सांगतात, “माझा नातू जन्माला आला होता, तीन नातींच्या पाठीवर. तेव्हा मी बाल्कनीतून वरती हवेत तीन गोळ्या झाडल्या. ही सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर मी बंदूकीला हातही लावला नाही.” आम्ही फक्त उत्सव साजरा करण्यासाठी गोळया झाडतो असं यादव यांची बायको सांगते. पण आता तेही थांबलं आहे.
ही परंपरा नक्की कशी सुरू झाली याविषयी प्रत्येकाकडे एक गोष्ट आहे. एकानं म्हटलं की पूर्वी जेव्हा वरात मुलीच्या घरी पोहोचायची तेव्हा नवरदेवाकडचे दोन गोळ्या झाडायचे आणि नवरीकडचे चार गोळ्या झाडायचे. नवरा आल्याची ही एकप्रकारची घोषणा असायची. आणखी एक जण सांगतात की हा फक्त संपत्ती व सत्ता यांचं प्रदर्शन होतं. बम्हेटाचे एक पैलवान ब्रह्म सिंह मात्र यासाठी आधुनिक लग्नांना दोषी धरतात. “लोक दारू पितात, जोरदार संगीतावर नाचतात आणि गोळ्या झाडतात. डीजेवर बंदी लादली पाहिजे.”
बंदूक ठेवणं आणि फायरींग करणं एक स्टेटस सिंबॉल
भारतात बंदूक ठेवणं बेकायदेशीर नाही पण त्याचं लायसेंस मिळवणं फार कठीण आहे. त्यामुळेच बंदूक ठेवणं आणि फायरींग करणं एक स्टेटस सिंबॉल झालं आहे. अभिजीत सिंह यांनी ‘द प्रिंट’ला सांगितलं, “1992 मध्ये दिल्लीत 45 हजार लायसेंसधारी लोक होते. आज लोकसंख्या वाढूनही ही संख्या 30 हजारावर आली आहे. लोकांचा उत्साह ओसरलेला नसून लायसेंस मिळण्याची किचकट प्रक्रिया याला जबाबदार आहे.” सिंह यांची एनजीओ 2000 च्या दशकात सुरू झाली होती. सिंह सांगतात की बंदूक संस्कृतिला उत्तेजन मिळेल असं काही आम्ही करत नाही. जागरूकता, जबाबदारी आणि पर्याय उपलब्ध व्हावे यासाठी ही संस्था आहे. लग्नात बंदूक चालवणं दहशत आणि दबदबा वाढवण्यासाठी आहे पण सिंह म्हणतात की या गोष्टी चुकीच्या धारणेतून आल्या आहेत.
बंदूक स्वतः चांगली किंवा वाईट नसते. भारतात बंदूक संस्कृतिची भिन्नता आढळून येते. उत्तरेत दक्षिणेच्या तुलनेत जास्त वैध बंदूका आहेत कारण इथं सैन्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश सैन्यात अर्धे पंजाबीच होते. पिढ्यानपिढ्या लोक सैन्यात जात आहेत त्यामुळे बंदूका त्यांच्या जगण्याचा भाग आहे. दक्षिणेत मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. लग्नात गोळ्या झाडणं हा उत्तर भारतीयांसाठी आपला भूतकाळ जगण्यासारखं असतं.
त्यामुळेच ही परंपरा अजूनही नाहीशी झालेली नाही. 2007 मध्ये उत्तराखंडमध्ये भगवान सिंह यांनी एका लग्नात उत्साहाच्या भरात गोळ्या झाडल्या. त्यात दोन जखमी झाले आणि दोन मरण पावले. सिंह याला नंतर पोलिसांनी अटक केली. पंजाब मध्ये 2016 साली 25 वर्षीय एक गरोदर डांसर बठींडाच्या एका लग्नात नाचत होती. लग्नात कोणीतरी चालवलेल्या गोळीनं तिचा जीव गेला. तिच्या कुटुंबानं अपराध्याला शासन व्हावं म्हणून न्यायालयीन लढाई लढवली. 2023 मध्ये गोळीबार करणाऱ्या लकी कुमार याला आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 
कायदे काय आहेत?
समाज बदलत आहे याचे संकेत या घटनांमधून मिळतात. न्यायालयांची कारवाई सांगतेय की बेजबाबदार परंपरांना आधुनिक भारतात स्थान नाही. कायदे जितके कडक होत आहेत या परंपरा उतरणीला लागल्या आहेत. लग्नात गोळ्या झाडण्याऐवजी मोठे फटाके फोडले जातात. हे सुतळी बॉम्ब असतात. गोळ्या झाडणं मात्र आता धोकादायक झालं आहे. त्यासाठी दोन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड बसू शकतो.
सरकारने हत्यार कायदाही कडक केला आहे. बंदूकीचा चुकीचा वापर झाला तर लायसेंस रद्द होतं शिवाय बंदूकांची संख्याही आता 3 ऐवजी 2 करण्यात आली आहे. शिक्षा कठोर आहे आणि लोकांना लायसेंस गमवायचं नाही आहे. कारण एकदा ते गेलं की पुन्हा मिळवणं आणखी कठीण होतं. पण या सर्व प्रकरणात ज्यांचा जीव गेला त्यांचं काय?
विकास त्रिपाठी युपीतील आपल्या गावात लहान भावाच्या लग्नाच्या वरातीत नाचत होते. अचानक एक आवाज आला आणि नंतर समजलं की त्यांच्या मोठ्या भावाला गोळी लागली आहे. त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन लहान मुलं होती. इतकी लहान की त्यांना पुढे कदाचित आपल्या वडिलांचा चेहराही लक्षात राहणार नाही. विकाससाठी बंदूका फक्त हत्यारं नव्हती तर एक परंपरा होती. त्यांच्या गावात जोवर लग्नात गोळ्या झाडल्या जात नाही तोवर लग्न झाल्याचं मानलं जात नाही. “आज लोक जसे फटाके फोडतात तसं आम्ही गोळ्या झाडायचो. आनंद साजरा करणं हाच उद्देश असायचा,” विकास सांगतात.
विकासच्या मोठ्या भावाकडे एक बंदूक होती. त्यांच्या साळ्याकडेही होती. त्रिपाठींच्या गावात जवळपास प्रत्येक घरात बंदूका होत्या, काही वैध बऱ्याच अवैध. ते सांगतात, “बिहारमध्ये गावात 100 घरं असतील तर किमान 85 घरांत बंदूका असतात.” विकास दहावी-बारावीत असताना त्यांनी पहिल्यांदा हातात बंदूक धरली होती. हातात फक्त लोखंडाचं वजन नव्हतं तर एक वेगळी सणसणी जाणवत होती. एक ताकद होती ती. ते म्हणतात, “याचा हिंसाचाराशी काही संबंध नव्हता. हे होतं मनाई करण्याविषयी. एखाद्या गोष्टीची मनाई केली गेली तर तिच गोष्ट कराविशी वाटते.” लग्न समारंभांत विकास व त्यांचे मित्र हातात पिस्तूलं घेऊन फिरायचे, हवेत फायरींग करायचे आणि लोकांची प्रशंसा लुटायचे. त्यांना कोणी थोपवलं नाही. कोणी प्रश्न विचारले नाही. 
तेव्हा लग्नात आनंद साजरा करण्याची हीच पद्धत होती. पण आता काळ बदलला आहे. एक ट्वीट, एक व्हिडीयो, एक पोस्ट आणि पोलिस तुमच्या दारात हजर होतात. विकास यांच्याकडे एक लायसेंसची बंदूक आहे पण आता त्यांचे विचार बदलले आहेत. ती आता सुरक्षेसाठी आहे. ती पकडताना त्यांना पूर्वीची जाणीव होत नाही. माणूस प्रगल्भ होत जातो, असं ते म्हणतात. लग्नात फायरींग करण्याविषयी ते म्हणतात की हे फक्त एक प्रतीक आहे, जसं महागडं लग्न किंवा लक्झरी कार. पण ते एका आयुष्यापेक्षा अधिक किंमती आहे का? “नाही, कधीच नाही.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






