- संजना खंडारे
घटना पहिली - “मला आजही आठवतं दोन महिन्यांपूर्वी ‘साहेब, माझी मुलगी सापडेल ना?
हा प्रश्न जव्हार पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना विचारताना 17 वर्षीय जयश्रीच्या (नाव बदलले आहे) आईचा आवाज थरथरत होता. पोलीस स्टेशनमध्ये उभं असलेलं ते कुटुंब केवळ एक तक्रार नोंदवायला आलेलं नव्हतं, तर आपली मुलगी पुन्हा मिळावी यासाठी धडपडत होतं. ‘मुलीचा शोध लागला की फोन करून कळवतो’ असे पोलिसांनी कुटुंबाला सांगून घरी जायला सांगितलं. त्या कुटुंबाला सावरण्यासाठी मी ही त्यांच्या घरी गेलो. त्यादिवशी घरात कुणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता, आणि प्रत्येक मिनिटाला फोनकडे पाहत बसलेले डोळे आता थकले होते. मुंबईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात आज अशी दृश्य सामान्य होत चालली आहेत.” असे जव्हार मधील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रवी बुधर बाईमाणूसशी बोलतांना सांगतात….
घटना दुसरी - “पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एका आदिवासी पाड्यावरची 14 वर्षांची मुलगी होती.. हातात बाहुली धरायच्या वयात तिच्या हातात मेहंदी लावली गेली. एजंट ने तिच्या आई-वडिलांना सांगितलं, ‘मुलगा चांगला आहे, नोकरी करतो, तिचं आयुष्य सुखात जाईल तुम्हाला ही पैसे मिळतील’ या आश्वासनांवर तिच्या आई-वडिलांनी डोळ्यांत पाणी आणून होकार दिला. काही हजार रुपयांची रक्कम हातात पडली आणि त्या बदल्यात मुलीचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या ताब्यात दिलं गेलं. तिच्या लग्नानंतर तिच्या आई-वडिलांशी तिचा काहीच संपर्क नाही. एजंटने दिलेला नंबर बंद असतो. मुलगी कुठे राहते? काय करते? कशी आहे? याबद्दल तिच्या आई-वडिलांना गेली दीड वर्षे झाली काहीच माहित नाही. दीड वर्षानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये एजंट विरोधात तक्रार केली…” असं वाडा तालुक्यातील किशोर खोरांगडे यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितलं..
या फक्त दोन घटना नाहीत तर पालघरच्या आदिवासी भागातल्या असंख्य मुलींची व्यथा आहे…
पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, जव्हार, भिवंडी या आदिवासीबहुल भागात अल्पवयीन मुलींच्या लग्नाच्या नावाखाली सर्रास सौदे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एजंटांच्या माध्यमातून मुलींची ‘निवड’ केली जाते. वय, शिक्षण, आरोग्य याचा कोणताही विचार न करता केवळ आर्थिक व्यवहार केला जातो. 50 ते 80 हजार रुपयांत एका मुलीचं भविष्य विकत घेतलं जातं, तर नवरामुलाकडून मात्र एजंट लाखो रुपये उकळतात.
एजंटचे जाळे आणि आदिवासी कुटुंबाची फसवणूक…
या संपूर्ण व्यवहारामागे सक्रिय असलेली एजंटांची टोळी अधिक भयावह आहे. हे एजंट आदिवासी पाड्यांवर फिरून अशिक्षित, गरीब कुटुंबांना हेरतात. ‘मुलगा नोकरीला आहे’, ‘मुलगी सुखात राहील’, ‘शहरात चांगलं घर आहे’ अशी स्वप्नं दाखवून आई-वडिलांना आमिष दाखवलं जातं. आर्थिक अडचणी, कुपोषण, आजारपण आणि उपासमारीने त्रस्त असलेली कुटुंबं या आश्वासनांना बळी पडतात. प्रत्यक्षात मुलीला कुठे दिलं जातंय, तो व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय याची साधी माहितीही पालकांना दिली जात नाही.
पालघरची सामाजिक परिस्थिती…
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भाग आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. कुपोषण, बालमृत्यू, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, आरोग्यसेवांची कमतरता या सगळ्यांमुळे इथली कुटुंबं सतत संघर्षात आहेत. जन्मापासूनच जगण्यासाठीची लढाई सुरू होते. या परिस्थितीत मुली म्हणजे ओझं, अशी भावना काही ठिकाणी रुजवली जाते, आणि त्याचाच फायदा एजंट घेतात.
"मुलगी सासरी गेली… आणि कायमची संपर्काबाहेर.."
यासंदर्भात बाईमाणूसने पालघर जिल्ह्यातील काही स्थानिकांशी संपर्क केला. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रवी बुधर यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले, “पालघर जिल्ह्यातील आदिवासी त्यांची संस्कृती तशी समृद्ध आहे. या भागात मुलींची संख्या काही भागात मुलांपेक्षा जास्त तर काही भागात मुलांइतकीच आहे. पण बदलत्या काळानुसार आदिवासी समुदायातील लोक त्यांच्या मुलीला शिकलेला, नोकरीवाला चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्याही धर्मामध्ये - जातीमध्ये लग्न करून द्यायला तयार होतात. आणि इथेच एजंट पोहचतात… मुलीला ,मुलीच्या आई-वडिलांना पैशाचे-नोकरीचे आमिष दाखवतात आणि लग्न करून देतात. मुलगा कोण आहे कुठला आहे याची खरी माहिती ते काही देत नाहीतआणि एकदा मुलगी सासरी गेली की त्यानंतर तिचा कोणाशीच संपर्क राहत नाही. अश्या अनेक घटना गेल्या पाच वर्षात पालघर जिल्ह्यात घडत आहेत.”
शाळेत जाणाऱ्या मुलीही सुरक्षित नाहीत - किशोर खोरांगडे
पालघर जिल्ह्यातीलच वाडा तालुक्यातील परळी येथे राहणारे किशोर खोरांगडे यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितलं, “पालघर मध्ये एजंट मार्फत तर मुली फसवून नेल्या जातात मात्र अनेक मुलींचं अपहरण देखील या भागात झालं आहे. शाळेत जाणाऱ्या, पाणी भरायला जाणाऱ्या अनेक मुलींचं अपहरण झालेलं आहे. या कारणामुळे अनेक पालकांनी मुलींना शाळेत पाठवणं ही बंद केलंय.”
पोलीस भरतीची तयारी करणारी मुलगी, दलालांच्या तावडीत उद्ध्वस्त…
पालघर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अमोल कातकरी यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले, “विक्रमगड मधली एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती मात्र तिला एका दलालाने फसवले. सहा महिने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला गुजरातला नेण्यात आलं होतं. ती मुलगी कशी तरी त्या दलाच्या तावडीतून सुटून पुन्हा तिच्या गावी आली आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ही दाखल केली. मात्र अश्या ज्या परत आलेल्या मुली असतात यांच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतात. म्हणजे एकेकाळी ज्या मुलीला पोलीस बनायचं होतं ती आता घराच्या बाहेर पडायला ही घाबरते. अशी परिस्थिती सध्या विक्रमगड ला आहे.”
मुली बेपत्ता होण्याचं वाढतं प्रमाण…
राज्यात, विशेषतः मुंबई आणि परिसरात, मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत. अनेक प्रकरणांत मुली परत येतात, पण त्या काळात त्यांच्यावर काय बीततं, याचा विचार होत नाही. बालतस्करी, जबरदस्तीने कामाला लावणं, भीक मागायला लावणाऱ्या टोळ्या हे सगळं एकमेकांशी जोडलेलं भयावह चित्र आहे.
राजकीय पातळीवरची चर्चा…
या गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. लहान मुलं आणि मुली पळवण्याचं प्रमाण वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. केवळ आकडेवारी देऊन प्रश्न सुटत नाही, तर मुळात अशा टोळ्या कार्यरत कशा होतात, यावर ठोस कारवाई हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या पत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुली परत सापडतात, असं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, आकडेवारीपेक्षा वास्तव अधिक भयावह आहे. अनेक तक्रारी नोंदवल्याच जात नाहीत. ग्रामीण आणि आदिवासी भागात भीतीमुळे पालक पुढे येत नाहीत.






