- अप्सरा आगा
'एखाद्या विशिष्ट समाजाला लक्ष करणं, त्यांच्याविषयी समाजात द्वेष पसरवणं, त्यांना बागेत प्रवेश नाकारणं. ही कृती म्हणजे अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला पुन्हा जन्माला घालतोय, हे लक्षात येत नाही. याचे आश्चर्य वाटतं. वास्तविक शिस्त मोडणाऱ्यांविरोधात कायदे अस्तित्वात आहेत. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणा आणि व्यवस्था निर्माण करता येणे शक्य आहे. मांसाहारामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत असेल, तर तिथे मांसाहाराला बंदी घालावी, कोणत्याही समुदायांच्या माणसांना नाही.' अशा तीव्र शब्दात मुस्लिम सत्यशोधक मंडळाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्याची सारसबाग बंद ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
पुण्याच्या सारसबागेत ईदच्या दुसऱ्यादिवशी नेमकं काय घडलं?
त्याचं झालं असं की, पुणे महापालिकेने 8 जून 2025 रोजी शहरातील प्रसिद्ध सार्वजनिक जागा सारसबाग उद्यान नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महापालिकेने भाजपच्या राज्यसभा खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी यांच्या एका पत्राच्या आधारावर घेतला. मेधा कुलकर्णी यांनी पत्रात असा आरोप केला होता की, ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाज कुटूंबासोबत सारसबागेत मांसाहार करतात. त्यामुळे ईदच्या दुसऱ्या दिवशी सारसबाग उद्यान बंद ठेवण्याची मागणी केली होती. मेधा कुलकर्णी यांच्या त्या पत्राची दखल घेऊन प्रशासनाने लगेचच ईदच्या दुसऱ्या दिवशी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
या प्रकाराने मुस्लिम समाज प्रचंड नाराज झाला आहे. खासदारांच्या पत्रामुळे सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट धर्माला प्रवेश नाकारणं, एका समाजाला लक्ष करून सार्वजनिक ठिकाण बंद ठेवणं, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न मुस्लिम महिलांबरोबर अनेक कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी त्वरित निषेध पत्रक प्रसिद्ध करून भूमिका मांडली आहे.
ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाकडून “बासी ईद” साजरी केली जाते, ज्यात संपूर्ण कुटुंबियांसोबत सार्वजनिक ठिकाणी जाऊन आनंद साजरा केला जातो आणि दिवसभराच्या मेहनतीनंतर विश्रांती घेतली जाते. पण यंदा पुणे महापालिका आणि उद्यान विभागाने कोणताही कायदेशीर आदेश किंवा जनतेला पूर्वसूचना न देता सारसबाग उद्यान बंद केले. यामुळे केवळ मुस्लिम समाजालाच नव्हे, तर इतर सर्व समुदायांतील नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
संबंधित लेख वाचा: 1) पुढच्या 35 वर्षांत ‘इस्लाम’ हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म… ‘प्यू रिसर्च सेंटर’चा ताजा अहवाल |
मुस्लिमांनी जाऊ नये म्हणून सारसबाग बंद ठेवण्यात आली
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे भूमिका मांडली. ‘मुस्लिम समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या रमजान ईद आणि बकरी ईद सणाच्या काळात महिलावर्गाला स्वच्छता, स्वयंपाक करताना खूप परिश्रम पडतात. त्यातून विश्रांती आणि आनंद मिळवण्यासाठी त्या जवळपासचे बगीचे, चित्रपटगृह किंवा करमणुकीच्या ठिकाणी जातात. यापासून त्यांना वंचित करण्यासाठी आणि बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिमांनी बागेत जाऊ नये म्हणून सारसबाग बंद ठेवण्यात आली. त्यास खासदारांचे आक्षेपार्ह पत्र निमित्त ठरले,’ असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘वास्तविक शिस्त मोडणाऱ्यांविरोधात कायदे अस्तित्वात आहेतच. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणा निर्माण करता येणे शक्य आहे. मांसाहारामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत असेल, तर तेथे मांसाहाराला बंदी घालावी, कोणत्याही समुदायाच्या माणसांना नाही. सर्वसामान्य मुस्लिम समाजाविरोधात संशय, द्वेष, शत्रुभाव निर्माण करणारे असे पत्रक काढणे आणि वर्तन करणे, हे या समाजाचे राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार नाकारणारे आहे,’ असे तांबोळी यांनी या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
सारसबागेत ‘तळ्यातला गणपती’ आहे, त्यामुळे… - खा. मेधा कुलकर्णी
घडलेल्या घटनेवर खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, सारसबागेची संपूर्ण जागा देवस्थानच्या ट्रस्टचा परिसर आहे. ही जागा महापालिकेने भाडेतत्वावर घेऊन बाग केली असली, तरी ज्या जागेमध्ये मंदिर आहे, त्याला आपण ‘तळ्यातला गणपती’ म्हणतो. त्या भागामध्ये मांसाहार करणं हा गुन्हा घडतो. आमच्या धर्माचा हा अपमान आहे. तुम्ही मुद्दाम याठिकाणी याल आणि मांसाहार कराल. इथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. हा सगळा परिसर पेशवेकालीन आहे. इथे हे घडू देणार नाही. हे घडू नये, म्हणून महापालिकेला पत्र दिलं होतं. याचं पालन महापालिकेने केलं. त्यांचं मी अभिनंदन करेन.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. ते म्हणतात,' ईदच्या दुसऱ्या दिवशी पारणे असते. त्यामुळे या दिवशी बहुतांश मुस्लिम मांसाहार करत नाहीत. गोडधोड पदार्थाचे सेवन केले जाते. दररोजच्या कामातून वेळ काढून घराबाहेर पडणे, आनंद घेणे, मुलांचं मनोरंजन करणं, या सर्व गोष्टी कुटूंबासोबत आनंद मिळावा, म्हणून बाहेर जातात. त्यामुळे त्यांना बागेत प्रवेश न देणे किंवा बॅग बंद ठेवणे, ही नैतिकता आहे का? प्रवेश नाकारणे हे कोणत्याच नियमात आणि कायद्यात बसत नाही. संविधानाने या देशातल्या प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. ते अधिकार नाकारणे हे बरोबर नाही.'
‘’मुलांबाळांसोबत सारसबागेत पोहचले तर बागच बंद’’
मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या आरोपानंतर प्रशासनाच्या या निर्णयावर पुण्यातील अनेक मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. गृहिणी असलेल्या शकिरा मुजावर म्हणतात,' आमच्या दोन्ही सणाला आम्हाला खूप काम असतं. सारखी स्वच्छता ठेवावी लागते. या दिवसात आमचं खान-पान वेगळं असतं. रमजानचा महिना आम्हाला खूप त्रासदायक जातो. दिवसभर रोजा असतो. घरात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे रोजे असतात. त्या सगळ्यांसाठी लवकर ऊठून ‘सहरी’ म्हणजे जेवण बनवावं लागतं. त्यांच्यासाठी रात्रीच सर्व तयारी करावी लागते. कसलाच अराम मिळत नाही. बकरी ईदला पण तसंच असतं. त्यामुळे ईद झाल्यानंतर आराम मिळावा, म्हणून विरुंगुळ्यासाठी बाहेर परिवारासोबत फिरायला जातो. एक दिवसासाठी बाहेर कुठं जायचं म्हणून आम्ही जवळ असलेल्या दरवर्षी सारसबागेत जातो. पण, यावेळी सारसबाग बंद होती. त्यामुळे आम्हाला कुठेच जायला मिळालं नाही. दुसरीकडे जायच म्हटलं, तर ते परवडणार नाही. त्यामुळे आम्ही सारसबागेत जातो. यावेळी जाता आलं नाही.'
परवीन जमादार सांगतात, 'एक तर ईदच्या अगोदर आणि ईदनंतर आम्ही खूप थकलेलो असतो. घरात बसून बसून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आम्हाला कुठे तरी बागेत जाऊन आराम मिळावा. म्हणून ईद झाली की दुसऱ्या दिवशी परिवारासहित बाहेर फिरायला जातो. पुण्यात भरपूर उद्यान आहेत, पण सारसबागेत मुलांना खेळायला साधन आहे, तसेच महिलांची संख्या जास्त असते. त्यामुळे काय वाटत नाही. मुस्लिम समाजातील महिला जास्त करून सारसबागेतच जातात. पण यावेळी सारसबाग बंद होती. बंद का ठेवली, काय माहीत. दरवर्षी बंद ठेवली तर आम्ही कुठे जायचं.?' 
‘मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन’चे संचालक अन्वर शेख सांगतात, 'ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाकडून 'बासी ईद' साजरी केली जाते, ज्यात संपूर्ण कुटुंबियांसोबत सार्वजनिक ठिकाणी जाऊन आनंद साजरा केला जातो आणि दिवसभराच्या मेहनतीनंतर विश्रांती घेतली जाते. पण यंदा पुणे महापालिका आणि उद्यान विभागाने कोणताही कायदेशीर आदेश किंवा जनतेला पूर्वसूचना न देता सारसबाग उद्यान बंद केले. यामुळे केवळ मुस्लिम समाजालाच नव्हे, तर इतर सर्व समुदायांतील नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.'
अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सची मागणी
पुण्याचे नवनियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बासी ईदला जाणून बुजून सारसबाग बंद ठेवून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा जातीवादी महापालिका आयुक्तांना या पदाच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी केली आहे.
सदर आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करणे, या घटनेची स्वतंत्र न्यायिक चौकशी करणे, सर्व अधिकाऱ्यांना धार्मिक सहिष्णुता व संविधानिक मूल्यांचे प्रशिक्षण देणे आणि महानगरपालिकेने मुस्लिम समाजाची क्षमा मागणे आणि स्पष्टीकरण देणे इत्यादी मागण्या महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स केल्या आहेत.






