Skip to main content

एक चाय पुन्हा बबनशेठसोबत! कोण आहे हा ‘बबन चहावाला’ ज्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला दिग्गज पत्रकार, नाट्यकर्मी, पुढारी एकत्र येताहेत…?

Article in Marathi
Team BaiManus
23 Apr 2026
5 min read
42 views
एक चाय पुन्हा बबनशेठसोबत! कोण आहे हा ‘बबन चहावाला’ ज्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला दिग्गज पत्रकार, नाट्यकर्मी, पुढारी एकत्र येताहेत…?
  • बबनशेठ म्हणजे केवळ दादर रेल्वेस्टेशनला खेटून असलेल्या फुटपाथवर चहा विकणारा माणूस नव्हे, तर मुंबईच्या पत्रकार, नाट्यकर्मी, कलाकार, कामगार, राजकारणी अशा विविध क्षेत्रांतील लोकांच्या विश्वाचा अविभाज्य भाग.


  • चहाच्या कपातून फक्त चव नव्हे, तर माणुसकीचा गोडवा मिळत असे. दादर स्थानकाबाहेरील त्यांच्या टपरीवर चहाच्या कपाभोवती अनेक बातम्यांचे बीज रुजले, अनेक मैत्री जुळल्या आणि असंख्य आठवणी घडल्या.


  • अशा चहावाला ‘बबनशेठ’च्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘एक चाय पुन्हा बबनशेठसोबत…’ असा अनोखा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.



बबनशेठ म्हणजे केवळ दादर रेल्वेस्टेशनला खेटून असलेल्या फुटपाथवर चहा विकणारा माणूस नव्हे, तर मुंबईच्या पत्रकार, नाट्यकर्मी, कलाकार, कामगार, राजकारणी अशा विविध क्षेत्रांतील लोकांच्या विश्वाचा अविभाज्य भाग. त्यांच्या चहाच्या टपरीवर अनेक पत्रकारांच्या गाठीभेटी रंगत, चर्चांना उधाण येत असे.


‘चाय पे चर्चा’ ही संकल्पना सर्वप्रथम त्यांनी नकळत रुजवली होती, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्या चहाच्या कपातून फक्त चव नव्हे, तर माणुसकीचा गोडवा मिळत असे. दादर स्थानकाबाहेरील त्यांच्या टपरीवर चहाच्या कपाभोवती अनेक बातम्यांचे बीज रुजले, अनेक मैत्री जुळल्या आणि असंख्य आठवणी घडल्या. ‘बबनशेठचा चहा’ हीच एक वेगळी ओळख बनली होती.


'एक चाय पुन्हा बबनशेठसोबत…’


दादर रेल्वेस्टेशनला खेटून असलेल्या फुटपाथवरून सुरू झालेल्या ‘बबनशेठच्या चहावाल्या’च्या प्रवासाने अनेक पत्रकार, कलाकार आणि सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात आपलेपणा आणि आठवणींचा ठेवा निर्माण केला. अशा ‘पत्रकारांचा चहावाला’ ‘बबनशेठ’च्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘एक चाय पुन्हा बबनशेठसोबत…’  असा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


मुंबई मराठी पत्रकार संघ आणि बबनशेठ मित्रमंडळाने संयुक्तकपणे “एक चाय बबनसोबत” या कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन केले असून या सोहळ्याला माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार कपिल पाटील आणि बबनशेठ मित्र मंडळाचे निमंत्रक गजानन दुधलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.


“एक चाय बबनसोबत” हा केवळ कार्यक्रम नसून, अनेक दशकांच्या आठवणींचा, नात्यांचा आणि पत्रकारितेच्या अनोख्या संस्कृतीचा उत्सव ठरणार आहे. मुंबईतील पत्रकारांसाठी आणि बबनशेठच्या चाहत्यांसाठी हा सोहळा एक भावनिक क्षण ठरण्याची चिन्हे आहेत. 


जगात चहा बनवणारे करोडो असतील, त्यातले काही लाख लोक उत्तम चहा बनवत असतीलही पण तरीही बबनसारख्या एका अतिसामान्य चहावाल्यावर मुंबईकरांचे इतकं प्रेम का…? असं काय आहे या बबनमध्ये ज्याच्यासाठी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन त्याची पंच्च्याहत्तरी साजरी करताहेत…?


प्रसिद्ध निवेदक आणि लेखक सुधीर गाडगीळ यांच्या ‘मुद्रा’ पुस्तकात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडतात. ‘बबन चहावाला’ असे एक प्रकरण या पुस्तकात आहे. सुधीर गाडगीळ लिहितात, 


कोण आहे हा बबन चहावाला..?


दादर पश्चिम रेल्वेच्या एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडले, की समोर फेरीवाल्यांनी गच्च भरलेला डिसिल्व्हा रोड दिसायचा. आता नजरेआड नवा फ्लाय ओव्हर ब्रिज येतो. स्टेशनच्या पुढ्यातच या ब्रिजखाली रात्री साडेआठ-नवाला एक टेबल मांडले जाते आणि त्यावर स्टोव्ह ढणढणू लागतो. पूर्वी गूळ वगैरे ठेवण्यासाठी, दिवाळीचा फराळ ठेवण्यासाठी, कडी-कुलपाची झाकणे असलेले डबे असत, तसे डबे टेबलावर मांडले जातात. ग्लास धुऊन उपडे पडतात. बाजूला दुधाचे कॅन असतात. पाण्याचा प्लॅस्टिक ड्रम असतो. पाठीमागे पुलाखाली भोवतालच्या मार्केटच्या साऱ्या कचऱ्याची रास लागलेली असते. टेबलालगतच्या उपसलेल्या गटारातला गाळ टोपलीत भरणे चालू असते. समोर पानतंबाखूची टपरी, मागे भुर्जीची गाडी, पलीकडे सँडविचची थप्पी लागलेली.


घामेजलेल्या, दाढी वाढलेल्या बेकारापासून, दहाच्या दहा बोटांत अंगठी घातलेल्या आमदारापर्यंत साऱ्यांची गर्दी ढणढणणाऱ्या स्टोव्हच्या टेबलाभोवती पसरलेली असते. डिसिल्व्हा रोडकडे पाठ करून, बबन स्टोव्हवरच्या चहाच्या पातेल्यात डाव्या हातातल्या डावाने साखर फेकत असतो, किंवा पातेल्यावर पंचा पसरून चहा गाळत असतो किंवा चिमट्याने तापते पातेले उतरवत असतो. 


तेल लावलेय असे वाटावे, असे घामाने ओलसर झालेले केस, प्रमाणबद्ध पांढरा लेंगा, त्यावर फुल बुशकोट. तो मळकटलेला. कष्टाने रापलेला चेहरा, त्यावर ठळक दिसणारी मिशी या अवतारात बबन चहा बनवण्यात तल्लीन असतो. गेली तब्बल चार दशके रोज रात्री नऊ ते सकाळी सातपर्यंत बबनचे क्षणभरही न बसता, रात्र जागवून हे चहा पिलवणे चालू आहे.


User Image


'सारी मुंबई झोपेच्या अधीन व्हायला लागली की दादरच्या या परिसराला जाग यायला लागते. सारा परिसर बबनला ओळखतो, पण त्याचे आडनाव विचाराल, तर तीस-बत्तीस वर्षे येणाऱ्या गिऱ्हाइकालाही माहीत नाही. त्याच्या हातच्या चविष्ट चॉकलेट चहामुळे 'उकळा'मुळे, किंवा कोल्ड कॉफीमुळे (पूर्वी पोह्यांमुळे)च बबन ओळखला जातो.


रात्रपाळीचे पत्रकार, छायाचित्रकार, पक्षोपक्षांचे कार्यकर्ते, गणेश मंडळांचे पदाधिकारी, हिशेबाला बसलेले चार्टर्ड अकाउंटंट, 'शो' सुटलेले नट, दुकाने बंद करून घरी परतणारे व्यापारी, शूटिंग पॅकअप केलेले तंत्रज्ञ, बेकार, भिकारी, गुन्हेगार, पोलिस साऱ्यांचा केंद्रबिंदू बबनच असतो. माणसे नि कचऱ्याच्या पसाऱ्यात उभ्या ठाकलेल्या बबनचा चहा पिण्यासाठी गुजराती बायकासुद्धा पतीबरोबर येतात. 'बबन जैसा चहा तुम नही बना सकती' अशी तक्रार त्यांचे 'शेठ' करत असल्याचे त्या हसत बबनला सांगतात. बबन मनापासून हसून उत्तरतो, की, मला तरी घरी असा चहा कुठे बनवता येतो? 'हमारे पपा तुम्हारे 'चाय' की तारीफ करते थे' असे एखादा पोरसवदा तरुण बबनला सांगतो, तेव्हा या प्रशस्तिपत्राने बबन भरून पावतो.


योगासन, मृत्यूंजय, नर्मदा परिक्रमा… बबनशी कोणत्याही विषयावर बोला


निंबाळकरांच्या योगासनावर, शिवाजी सावंतांच्या 'मृत्युंजय'वर किंवा दाभोलकरांच्या नर्मदा परिक्रमावर बबन एखाद्याशी भरभरून बोलू लागतो, तेव्हा 'नवखा' आश्चर्यचकित होतो. अंबरीश मिश्रचे 'शुभ्र काही थोडे...' हे पुस्तक बबनने विकत घेऊन वाचलेले असते. अलीकडे बबनला अध्यात्माचे वेड लागले आहे. क्षीरसागरांचे 'परलोकविद्या', भगवद्गीता, प्रणवोपासना, असे त्याचे आध्यात्मिक वाचन चालू आहे.


"ही साधना वाढली तसा प्रचंड गर्दीतही मी एकटाच असतो. आपण कशासाठी, कोणासाठी काम करतो, कामामागचा हेतू काय, यावर मनाशीच माझा विचार चालू असतो. 'सेवा करणं' हाच कामामागचा हेतू पक्का कळल्यानं राबतो." बबन असा क्वचित बोलतो.


मुंबईची कणमात्र माहिती नसलेले एक परगावचे कुटुंब हैराण होऊन एकदा बबनच्या गाडीपाशी रेंगाळले. चौकशी करता कळले, की, त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला चोरांनी लुटलेय. खिशात फुटकी कवडी नाही, पोटात अन्न नाही, आपल्या गावी परतण्याशिवाय पर्याय नाही; पण परतीच्या तिकिटाचे काय? बबनने पुढाकार घेऊन पैसे जमवले आणि त्या कुटुंबाला परतीचे तिकीट काढून दिले.


के. ई. एम. रुग्णालयात रात्री उशिरा शस्त्रक्रिया झाली. रुग्णासाठी उत्तररात्री अर्जंट दूध हवे होते. त्या रुग्णाच्या मद्रासी नातेवाइकाला रस्त्यावरच्या टॅक्सीवाल्याने ग्वाही दिली, की दादर स्टेशनला जा; बबनकडे दूध नक्की मिळेल. बबन म्हणतो, "मी दूध दिल्यावर त्या मद्रासी माणसाचा तृप्त चेहरा पाहून मी समाधान पावलो."


शिवसेनेचा जन्म आणि बबनची चहाची टपरी


१९६६ मध्ये शिवसेनेचे वारे सुरू झाले. पहिली निवडणूक आली. कामासाठी पोरांची गरज होती. बबन आठवीत होता. भिंतीवर पोस्टर्स चिकटवणे, स्लिपा वाटणे, बोर्ड रंगवणे... नव्या उत्साहात रात्रभर पोरं काम करत. रात्री पोटात काहीतरी ढकलायला म्हणून, ही पोरांची कार्यकर्ते गँग दादर स्टेशनवर येई. त्या वेळी धंद्यात मराठी माणसे फार नव्हती. विजू समेळ, अशोक वैद्य बटाटेवडे विकत. सावंतची फ्रूट प्लेटची गाडी होती. त्यांनी विचारले, "पोरांनो, तुमच्यापैकी कुणी धंदा लावा. जागा देतो."


बबन सांगतो, "मी, शशी पेडणेकर, वाळिंबे- आम्ही शंभर-दीडशे रुपये जमवले. मी आणि पेडणेकरने धंदा सुरू केला. पण पहिल्याच आठवड्यात पेडणेकरच्या घरून प्रेशर सुरू झालं, की, रस्त्यावरचा धंदा नको. मी एकटाच उरलो. मलाही घरून विरोधच होता. तरी विरोध थोडा कमी होण्यासाठी मी शाळेत पण लक्ष द्यायचो. रात्री एकपर्यंत चहा देऊन सकाळी अकरा वाजता शाळेत जायचो.


User Image


"शेवटच्या बाकावर जाऊन झोपणारा कोण, तर 'बबन', अशी शाळेत चर्चा व्हायची. तरी मी नववी-दहावी पूर्ण केले. किंग जॉर्ज शाळेत होतो. पण शेवटी वडिलांनी घराबाहेर काढलेच. आई लहानपणीच गेलेली. तिचा चेहराही मी पाहिलेला नाही. मग मी एकटाच! त्या वेळी दादर स्टेशनजवळ कांदा, बटाटा मार्केट नवे झालेले. खोकी पडलेली असत. ती नीट लावून, मी माझं सामान तिथं ठेवून तिथंच झोप काढायचो, पैसे जमल्यावर सामंत लोणीवाल्यांच्या वरती विष्णू लॉजमध्ये रहायला गेलो.


"विष्णू लॉजच्या मुक्कामात मला मित्रमंडळी भेटल्यानं माझं एकटेपण जरा दूर झालं. 'पापे' नावाचा एक फिल्म फोटोग्राफर होता. रामेश्वर त्यागी नावाचा दिल्लीचा गीतकार होता. गाणी-गप्पा-भटकण्यानं धंद्याच्या कष्टाचा सारा शीण पळून मस्त दिवस जात असे. रामेश्वर हा गीत लिहिताना एखाद्या शब्दावर अडे. कधी 'लय' सुटे. ते मीटर बनवण्याचं काम मी करायचो. 'शब्द' टाकायचो. नेमका बसला तर ठीक, नाहीतर 'चलो यार घुमने जायेंगे, मूड नहीं' म्हटलं, की आम्ही बस पकडायचो. शेवटचं तिकीट काढून शेवटच्या बाकावर बसून उलटसुलट फिरायचो. कधी चौपाटीवर मैफल जमायची.


"मुलं कधी चहाच्या ठेल्यावर येतात का?"


"रात्रभर दादर स्टेशनबाहेर स्टोव्हच्या पुढ्यात मुक्काम असे. मात्र तिथंसुद्धा काही दिलासा देणाऱ्या गोष्टी घडत. विवेक हे जुने नट नियमित येत. नाना पाटेकर येत असे. सतीश दुभाषी येत. गप्पा मारत. मंगेश कुलकर्णी गाडीवर चक्कर टाकत असे."


"१९७२ मध्ये लग्न झालं व वडिलांनी घरी बोलावलं. पण नंतर कधी नात्याची खरी मैफल जमली नाही. मी 'सगळ्यात राहून' एकटाच असायचो. पुस्तकात रमायचो. पुस्तकांनी मनाचं एकटेपण जाणवू दिलं नाही."


बायकोला हा रस्त्यावरचा धंदा पसंत होता का?


"तिच्याशी लग्नापूर्वी बोलणंच झालं नाही. गावाकडे जाऊन वडिलांनी लग्न ठरवलं. माझ्या हातात थेट माझ्या लग्नाची पत्रिकाच आली. मी बायकोला थेट लग्नातच पाहिली."


"मूळ गाव कुठलं?"


"सोलापूरजवळचं 'सावरगाव'."


"बायको-मुलं गावाकडे असतात का?"


"नाही, इथेच मुंबईत नालासोपाऱ्याला असतात. दोन मुलं आहेत. मोठा सतीश सिव्हिल इंजिनिअर झालाय. धाकटा कॉमर्स करतोय. अजून दोन वर्ष बाकी आहेत. मग माझी जबाबदारी संपली."


"पोरं कधी चहाच्या ठेल्यावर येतात का?"


"मी येऊ देत नाही. फक्त शिक्षणात त्यांनी ध्यान द्यावं, ही इच्छा आहे. म्हणून त्यांना धंद्यासाठी उभं केलं नाही. आपण भोगलं ते जिणं त्यांना नको. दोघं स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची वाट बघतोय, मग मीही थांबेन."


उजाडण्यापूर्वी बबनचे सारे मराठी पेपर वाचून झालेले असतात. त्यामुळे कुणाच्या अंकात काय कमी होते, ते चहात आले टाकताटाकता बबन बिनदिक्कत सांगतो. परस्परविरोधी पक्षनेत्यांची बबनच्या गाडीपुरती एकी असते. बबनच्या लेखी सारे समान असतात. त्याला कोणत्याच नेत्याकडून काही मागायचे नसते.


रविवारी बबन पूर्ण सुट्टी घेतो. दादरच्या मूळच्या ५ बाय १० च्या खोपट्यावर चक्कर टाकतो. नाटक किंवा सिनेमा पाहतो. त्यातला कुणी कलावंत ठेल्यावर आला तर त्याला स्पष्ट अभिप्राय नोंदवतो. कुणा नट-पत्रकाराला पुरस्कार मिळाला तर त्याच्या घरी जाऊन स्वखर्चाने मिठाई देतो.


कितीही वर्षांनी एखादा कलावंत बबनच्या ठेल्यावर गेला, तरी बबन पटकन त्याला नावाने हाक मारतो. बाजूच्या बॉक्समधून दोन बर्फाचे गोळे काढतो, ते कॉफीत टाकतो आणि या कोल्ड कॉफीची सवय लावतो.त्याला पैशाची फार हाव नाही. मुले मार्गी लागली, की नालासोपाऱ्याला जाऊन तो पुस्तकात डोके खुपसून बसेल. दादर स्टेशनवर यायचे विसरेल, पण दादर परिसरातले 'निशाचर' रोज चहाचा घोट घेताना गाडीवर 'न' दिसणाऱ्या 'बबन'ची आठवण काढतील…


बबनरावांची निवृत्ती अन् पोरकी झालेली चहाची टपरी


बबनच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबईचे अभ्यासक समीर परांजपे यांनीही त्यांच्या आठवणनींना उजाळा दिला आहे. परांजपे म्हणतात, मंतरलेली चैत्रवेल असते तसे बबनरावांच्या अवतीभवती वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जमलेले असायचे. त्यामध्ये नाट्य कलावंत, पत्रकार तर होतेच पण सामान्य माणसेही होती. तिथे आलेला प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या लोकांबरोबर घोळक्याने गप्पा मारत असायचा. बबनरावांनी आपल्याला चहा दिला की त्या गप्पा आणखीन रंगत, आणखीन वाफाळत. बबनरावांचा चहा, त्यांनी बनवलेले बटाटा पोहे, त्यावरती डाळिंबाच्या दाण्यांची केलेली पखरण, नंतर घातलेली थोडी भुरभुरीत शेव अशा सगळ्या गोष्टी मन मोहुन टाकायच्या.


जगात चहा बनवणारे करोडो असतील, त्यातले काही लाख लोक उत्तम चहा बनवत असतीलही पण बबनराव यांच्यासारखी मनमोहक वृत्ती सगळ्यांनाच मिळत नाही ना. बबनराव यांच्याकडे जिव्हाळ्याने चहा प्यायला येणारे लोक, काही तर फक्त त्यांच्याशी दहा मिनिटे गप्पा मारायला येणारे...असा तो सगळा कारभार होता. रात्री नऊ वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत हा विठ्ठल सलग उभा असायचा. मी नेहमी त्यांच्या पायाखाली वीट दिसते का म्हणून गमतीने बघायचो इतके ते त्या जागेशी एकरूप झालेले होते. त्यांचा वेष म्हणजे पांढरा लेंगा आणि टिपिकल बबनराव शैलीत शिवून घेतलेला अंगरखा. त्यामुळे या मूर्तीची नजाकत काही वेगळीच होती.

 

त्यांच्या स्टॉलवर वेगवेगळ्या लोकांच्या घोळक्यामध्ये विविध विषयावर गप्पा रंगलेल्या असल्या तरी मध्येच कोणीतरी बबनराव, आम्ही जे बोलतोय त्यावर तुमचं मत काय असे त्यांना हटकून विचारणारच. मग बबनराव स्मितहास्य करायचे. त्यानंतर एखाद मार्मिक वाक्य बोलायचे.


१९९९पासून ते आता २०२६पर्यंत मी आजही बबनरावांच्या स्टॉलवर जातो. ते आता तिथे व्यवसाय करत नाहीत. पण त्यांच्याबरोबर काम केलेल्या दत्ता याला बबनरावांनी एकही पैसा न घेता ती आपली जागा चहाचा व्यवसाय करण्यासाठी देऊन टाकली.आज तो तिथे शांतपणे व्यवसाय करतो. बबनरावांचे ग्लॅमर त्याला नाहीये. पण तो त्या जागेची आणि व्यवसायाशी एकनिष्ठ आहे हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. बबनरावांनी जो वसा दिला तो दत्ताने उत्तमप्रकारे सांभाळून ठेवला आहे.


User Image


बबनराव यांच्याबद्दल विचार करायला लागलो की जुन्या आठवणींच्या मोहजालात स्वखुषीने अडकतो. दादर पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक एकवरुन बाहेर पडले की, फेरीवाल्यांच्या घोळक्यात बबनरावांचा चहाचा स्टाॅल तेथील स्वच्छता व आकर्षक मांडणीमुळे खुलून दिसायचा. गेली ४० वर्षे ते दादर येथे हा चहाचा व्यवसाय करीत होते. 


बबनराव केमकर यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेक पुस्तके आहेत. हा माणूस आध्यात्मिक असल्याने तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई यांच्या साहित्याचे त्यांनी अक्षरश: पारायण केले आहे. समकालीन साहित्यकृतींमध्येही त्यांना तितकाच रस आहे. योगासनावरील सदाशिवराव निंबाळकरांचे पुस्तक, शिवाजी सावंत यांचे `मृत्युंजय', `युगंधर', नर्मदा परिक्रमेवरील दाभोळकरांचे पुस्तक अशी विविध प्रकारची पुस्तके त्यांनी अगदी बारकाईने वाचलेली आहेत. समांतर धाटणीचे चित्रपट पाहाणे, त्यांच्याविषयीची पुस्तके वाचणे, गिर्यारोहण हाही त्यांचा आवडता छंद आहे. पुन्हा प्रत्येक पुस्तकावर मार्मिक टिप्पणी करण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे पत्रकार, साहित्यिक, नाट्यकलाकारांमध्ये बबनराव केमकर या व्यक्तीबद्दल नितांत आदर आहे. 


सुमारे ४० वर्ष चहाचा व्यवसाय केल्यानंतर बबनराव केमकर यांनी निवृत्ती घेतली. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित असून त्यांना उत्तम नोकऱ्या आहेत. बबनराव सध्या टिटवाळा येथे मुलाकडे राहतात. त्यांचे जे परमपूज्य दादर आहे त्याच्यापासून जवळजवळ सव्वा तास दूर अंतरावर. पण त्यांना आजही सतत दादर खुणावत असते. त्यांची प्रकृती उत्तम आहे. काटक माणूस. दर आठवड्यातून चार ते पाच वेळातरी ते टिटवाळा ते दादर प्रवास करतात. दादरला रमतात आणि पुन्हा संध्याकाळी पक्षी जसा आपल्या घरट्यात परततो तसे ते टिटवाळा येथे परततात...ते आता ७५ वर्षाचे झालेत. बबनरावांनी चहाचा व्यवसाय अनेक वर्षांपूर्वी सोडला पण त्यांच्या ठायी असलेली माणुसकी अजूनही तशीच कायम आहे. 


(सौजन्य - मुद्रा, लेखक - सुधीर गाडगीळ)

Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...