- टीम बाईमाणूस
- जयपूरमधील ३८ वर्षीय बबिता धाकड या महिलेच्या अटकेने सुरक्षा यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. एका सामान्य कुटुंबातील, शांत स्वभावाच्या महिलेने सोशल मीडियावरील कुतूहलातून बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क कसा साधला?
- तपास यंत्रणांच्या मते, वैयक्तिक आयुष्यातील एकाकीपणा, समाजाविषयीचा भ्रमनिरास आणि ऑनलाइन माध्यमातून मिळालेला भावनिक आधार यामुळे ती जहाल विचारसरणीच्या प्रभावाखाली गेली.
- मात्र, या प्रकरणातील बहुतांश दावे अद्याप तपास यंत्रणांचे असून न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची पडताळणी होणे बाकी आहे.
३८ वर्षीय बबिता धाकडच्या शेजाऱ्यांना चांगलाच धक्का बसलाय. ते म्हणतात,’’बबिता अतिशय शांत स्वभावाची होती. क्वचितच घराबाहेर दिसायची आणि दिसलली तरी तिच्या वागण्यात काहीही संशयास्पद किंवा वेगळं जाणवत नव्हतं.’’
बबिता धाकड ही जयपूरची आहे. बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून २२ जून रोजी राजस्थानच्या अँटी-टेररिझम स्क्वॉड (ATS) ने बबिता धाकडला बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत अटक केली. सात दिवसांच्या रिमांडनंतर तिची आता तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
जैश-ए-मोहम्मद (JeM) सारख्या जहाल दहशतवादी संघटनेच्या थेट वरिष्ठ नेतृत्वाशी बबिताने संपर्क केल्यामुळे तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ या कथित संबंधांबाबतच नव्हे, तर जयपूरच्या टोंक रोडलगत नव्याने विकसित झालेल्या निवासी वसाहतीत राहणारी एक सामान्य महिला देशातील सर्वाधिक वाँटेड दहशतवादी नेटवर्कपैकी एका संघटनेशी संवादापर्यंत कशी पोहोचली, याचाही तपास सुरू आहे.
कुतूहलातून जहाल विचारसरणीच्या सोशल मीडिया गटांपर्यंत
मात्र, तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, बबिताचे कथित ऑनलाइन आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. अतिरेकी विचारसरणीशी तिचा संपर्क आणि ऑनलाइन संवाद इतका गुप्त होता की, बबिताच्या कुटुंबीयांनाही रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या त्या संभाषणांची कोणतीही कल्पना नव्हती. तपास अधिकाऱ्यांच्या मते, याच संभाषणामुळे पुढे तिच्या विरोधातील तपास सुरू झाला आहे.

आयुष्याबद्दल आणि एकूणच समाजाविषयी निर्माण झालेल्या भ्रमनिरासामुळे बबिता धाकडने अशा प्रकारचे दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित केले असावेत. बबिताचा २०१७ मध्ये विवाह झाला होता; मात्र हा संसार अवघ्या महिनाभरातच संपुष्टात आला. त्याच वर्षी तिने संगणकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर ती इंटरनेटवर बराच वेळ घालवत होती, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी बबिताने "जिहादी आणि देशविरोधी" स्वरूपाच्या सोशल मीडिया पेजेस, हँडल्स आणि प्रोफाइल्सशी संवाद साधण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला हे केवळ "कुतूहलापोटी" केले गेले होते.
"बबिता अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायची, ज्यातील व्यक्ती तिला धाडसी आणि करिष्माई वाटत होत्या," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बंदुका असलेले फेसबुक पेजेस बबिताला आवडायचे…
मात्र, तपास अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, जसजशा बबिता या जहाल विचारसरणीच्या अधिक प्रभावाखाली जाऊ लागली, तसतसं तिने जैश-ए-मोहम्मद (JeM), पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) तसेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यांच्याशी संबंधित सोशल मीडिया पेजेसना पसंती (लाईक) देणे आणि त्यांच्याशी संवाद साधणं सुरू केलं. विशेषतः प्रोफाइल फोटोमध्ये बंदुका असलेल्या पेजेस बबिताला अधिक आकर्षित करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
"तिने सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या ३०० हून अधिक ग्रुपमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तिने काही व्यक्तींशी मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण केली आणि पुढे व्हॉट्सअॅप व फेसबुक मेसेंजरद्वारे त्या गटांमागील व्यक्तींशी संवाद सुरू केला," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तपासादरम्यान तिच्या मोबाईलमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संपर्क क्रमांकही आढळल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
"मुळात एका व्यक्तीने तिच्या सौंदर्याचे, डोळ्यांचे आणि व्यक्तिमत्त्वाचे सतत कौतुक करून तिचा विश्वास संपादन केला. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या संवादांमुळे दोघांमध्ये जवळीक वाढली. पुढे स्वतःची ओळख ‘अबू उबैदा’ अशी करून देणाऱ्या त्या व्यक्तीशी लग्न करण्याची बबिताची इच्छा निर्माण झाली. त्या व्यक्तीने स्वतःला जैश-ए-मोहम्मद (JeM) या संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख मसूद अझहर याचा निकटचा सहकारी असल्याचे सांगितले होते," असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
ऑनलाइन मैत्री, प्रेमाचे आमिष आणि 'अबू उबैदा'शी संपर्क
याशिवाय, ती आणखी एका व्यक्तीच्या संपर्कात होती. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख युसूफ अझहर उर्फ मोहम्मद सलीम, म्हणजेच मसूद अझहरचा मेहुणा, अशी करून दिली होती, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ७ मे रोजी करण्यात आलेल्या कारवाईत युसूफ अझहर ठार झाल्याचे सांगितले जाते.
"व्हिडिओ कॉलदरम्यान अबू उबैदा नेहमी आपला चेहरा झाकून ठेवायचा. सुरक्षेच्या कारणास्तव आपली ओळख उघड करू शकत नसल्याचे तो तिला सांगायचा. बबिता त्याच्याशी विवाह करण्यास इच्छुक असल्याने एका मुस्लिम धर्मगुरूमार्फत विवाहपूर्व धार्मिक विधीची व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी तिला धर्मांतरासाठी कलमा पठण करण्यास सांगण्यात आले आणि तिला 'खदीजा' हे इस्लामिक नाव देण्यात आलं. तसेच तिला नमाज अदा करण्याचेही शिक्षण देण्यात आलं," असं संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, "स्वतःच्या समाजाकडून उपेक्षित असल्याची भावना आणि आयुष्याबद्दल निर्माण झालेल्या भ्रमनिरासामुळे ती या विचारसरणीशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली." उदाहरण म्हणून अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिने पसंती दिलेल्या सोशल मीडिया पेजेसपैकी एकाचं नाव 'दुनिया धोकेबाज' असं होत. तसेच, ऑनलाइन चॅटमधून तिला ज्या व्यक्ती "धाडसी योद्धे" वाटत होते, त्यांच्याकडून तिला भावनिक आधार मिळाल्याची भावना निर्माण झाली होती, असा तपास यंत्रणांचा दावा आहे.
क्रिप्टो, सिमकार्ड आणि जम्मू-काश्मीर एफआयआरशी जोडलेले धागे
"कदाचित पाकिस्तानमध्ये आपलं आयुष्य अधिक चांगलं असेल, अशी तिची समजूत झाली होती आणि तिला तेथे जाण्याचीही इच्छा होती," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बबिता धाकडने कला शाखेची पदवी (बी.ए.) पूर्ण केली होती; मात्र तिच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती. याशिवाय, तिचा घटस्फोटाचा खटला आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल एक प्रकरण न्यायप्रविष्ट होते. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.
त्यानंतर तिला नेपाळ–सौदी अरेबिया–संयुक्त अरब अमिराती (यूएई) या मार्गाने पाकिस्तानमध्ये पोहोचवता येईल, असं सांगण्यात आलं होतं, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. मात्र, आपल्याकडे ना व्हिसा आहे, ना पासपोर्ट, शिवाय त्यासाठी पैशांचीही आवश्यकता आहे, असे बबिताने सांगितल्यानंतर, "क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे पाठवले जातील. त्यानंतर बेकायदेशीर मार्गाने तिचा प्रवास घडवून आणण्याची योजना होती," असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.
तथापि, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिच्या अटकेपूर्वी अशा प्रकारचा कोणताही आर्थिक व्यवहार प्रत्यक्षात झाल्याचे पुरावे समोर आलेले नव्हते. अटकेच्या वेळी राजस्थान अँटी-टेररिझम स्क्वॉड (ATS) चे पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी यांनी सांगितलं होतं की, सोशल मीडियावरील तिच्या "संशयास्पद" हालचालींमुळे पोलिसांचे लक्ष तिच्याकडे गेलं. त्यानंतर सखोल तपास केला असता, ती ऑनलाइन माध्यमातून "देशविरोधी" कारवायांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला होता.

तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तिच्या ऑनलाइन हालचालींवर काही काळापासून लक्ष ठेवलं जात होतं. मात्र, या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा तेव्हा समोर आला, जेव्हा ती २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झालेल्या एका संवेदनशील ‘एफआयआर’ शी संबंधित काही मोबाईल क्रमांकांच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळले.
बबिता धाकडच्या विरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत कलम ३८ (दहशतवादी संघटनेचे सदस्यत्वाशी संबंधित गुन्हा) आणि कलम ३९ (दहशतवादी संघटनेला मदत किंवा पाठिंबा देण्याशी संबंधित गुन्हा) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम पुरावे नष्ट करणे किंवा पुरावे लपविण्याशी संबंधित आहे.
यूएपीए अंतर्गत गुन्हा; तपास यंत्रणांच्या मते 'प्राथमिक टप्प्यातच' कारवाई
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अटकेच्या वेळी तिला अद्याप कोणतेही विशिष्ट "काम" किंवा "मिशन" सोपविण्यात आलं नव्हतं. तसेच, तिने कोणतीही गोपनीय किंवा संवेदनशील माहितीही कथितरीत्या कोणाशी शेअर केली नव्हती. तपास यंत्रणांच्या मते, कारवाई झाल्यावेळी हे संपूर्ण प्रकरण अद्याप प्राथमिक टप्प्यात होते.
मात्र, तपासादरम्यान बबिता धाकडने काही सिमकार्ड खरेदी केल्याचे समोर आले असून, त्यांचा वापर इतर काही व्यक्तींकडून व्हॉट्सअॅपसाठी केला जात असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. तपास यंत्रणांनी बबिता धाकड यांचे वर्णन "अत्यंत कट्टर विचारसरणीच्या प्रभावाखाली गेलेली" आणि "भविष्यात मोठा धोका ठरू शकणारी व्यक्ती" असे केले आहे.
शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ती क्वचितच घराबाहेर दिसत असत आणि तिच्याशी झालेला संवादही अत्यंत मर्यादित स्वरूपाचा होता. दुसरीकडे, पोलिसांचा दावा आहे की, तिच्या आई-वडिलांनाही रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या त्यांच्या ऑनलाइन संभाषणांची कोणतीही माहिती नव्हती.
राजस्थान एटीएसचे पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी यांनी अटकेनंतर सांगितले होते, "तपासात असे उघड झाले आहे की, भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्य करणाऱ्या काही परदेशी नागरिकांच्या संपर्कात ती होती."






