Skip to main content

‘बंदर’ : खोट्या आरोपांची कहाणी की अनुराग कश्यपची वैचारिक अस्वस्थता?

Article in Marathi
Suraj Patke
Today
6 views
 ‘बंदर’ : खोट्या आरोपांची कहाणी की अनुराग कश्यपची वैचारिक अस्वस्थता?

सुरज पटके


  • अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच एक जुनी पण अस्वस्थ करणारी चर्चा पुन्हा ऐरणीवर आणली आहे ती म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमधील सत्य, खोटे आरोप आणि न्यायव्यवस्थेची भूमिका.


  • बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून हा चित्रपट एका आरोपानंतर उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याची कथा सांगतो. त्यामुळे अनेकांनी हा चित्रपट कलम ३७६ च्या कथित गैरवापरावर भाष्य करणारा म्हणून पाहिले आहे.


  • मात्र ‘बंदर’ केवळ एका खोट्या आरोपाची कथा आहे का, की तो #MeToo नंतरच्या भारतातील वैचारिक संघर्ष, न्यायव्यवस्था आणि सार्वजनिक शिक्षेच्या संस्कृतीवर भाष्य करणारा चित्रपट आहे? या प्रश्नाचा मागोवा.


काही क्षणात तो स्टारवरून आरोपी बनतो… कालपर्यंत ज्याच्या अभिनयाचं कौतुक होत होतं, त्याच्याबद्दल आता टीव्ही स्टुडिओंमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चा सुरू आहेत. न्यायालयाचा निकाल लागलेला नाही, तपास पूर्ण झालेला नाही, पण समाजाने निर्णय देऊन टाकला आहे. अनुराग कश्यपचा ‘बंदर’ याच क्षणापासून सुरू होतो. आरोप आणि दोषसिद्धी यांच्या मधल्या त्या धूसर प्रदेशात तो प्रेक्षकाला घेऊन जातो, जिथे सत्य अद्याप समोर आलेलं नसतं; पण शिक्षा सुरू झालेली असते.


काही चित्रपट हे मनोरंजनासाठी बनवले जातात. काही चित्रपट सामाजिक वास्तव दाखवण्यासाठी. तर काही असे असतात की ते पडद्यावर संपतात, पण त्यांच्याभोवती सुरू झालेली चर्चा अनेक दिवस, अनेक महिने आणि कधीकधी अनेक वर्षे सुरू राहते. अनुराग कश्यपचा ‘बंदर’ हा अशाच प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाची चर्चा त्याच्या अभिनयासाठी, तांत्रिक गुणवत्तेसाठी किंवा बॉक्स ऑफिसवरील कामगिरीसाठी जितकी झाली, त्यापेक्षा जास्त त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांसाठी झाली. अनुराग कश्यपचा ‘बंदर’ हा तसाच एक चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या कथानकाइतकीच चर्चा त्यामागील भूमिकेची, त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची आणि त्याच्या वैचारिक अर्थांची होत आहे.


फ्लॉप असूनही अनुराग कश्यपच्या ‘बंदर’ची इतकी चर्चा का?


‘बंदर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर, चित्रपट समीक्षकांमध्ये आणि राजकीय-वैचारिक वर्तुळात एक प्रश्न सतत विचारला जात आहे. ‘बंदर’ नेमका काय सांगू इच्छितो? हा खोट्या बलात्कार आरोपांवर आधारित चित्रपट आहे का? तो भारतीय न्यायव्यवस्थेवर भाष्य करतो का? की हा अनुराग कश्यपच्या स्वतःच्या वैचारिक अस्वस्थतेचा आणि अनुभवांचा कलात्मक आविष्कार आहे?


User Image


‘बंदर’ची कथा वरवर पाहता एका प्रसिद्ध व्यक्तीभोवती फिरते. एका गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर त्याचं आयुष्य कोलमडतं. माध्यमं त्याच्यावर तुटून पडतात. समाज त्याला दोषी मानतो. न्यायप्रक्रिया सुरू होण्याआधीच त्याची सार्वजनिक शिक्षा सुरू होते. त्याची प्रतिमा, करिअर, संबंध आणि मानसिक संतुलन यांच्यावर परिणाम होतो. ही कथा सांगताना चित्रपट प्रेक्षकांना एक प्रश्न विचारतो, न्यायालयाने दोषी ठरवण्यापूर्वी समाज एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवू शकतो का?


हा प्रश्न नवीन नाही. पण #MeToo चळवळीनंतर तो अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. २०१७ मध्ये जगभर आणि त्यानंतर भारतातही #MeToo चळवळीने अनेक प्रभावशाली व्यक्तींवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप सार्वजनिक केले. या चळवळीमुळे अनेक महिलांना पहिल्यांदाच आपले अनुभव सांगण्याचे व्यासपीठ मिळाले. अनेक वर्षे दडपल्या गेलेल्या कथांना आवाज मिळाला. भारतीय चित्रपटसृष्टी, माध्यमविश्व, राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात या चळवळीचे पडसाद उमटले.


परंतु त्याच काळात दुसरी एक चर्चा देखील पुढे आली. आरोप झालेल्या प्रत्येक व्यक्तीला न्यायालयीन प्रक्रियेपूर्वीच दोषी मानले जाऊ लागले का? आरोप आणि दोष सिद्ध होणे यातील फरक समाज विसरू लागला का? एखाद्या व्यक्तीविरुद्धचा आरोप खोटा ठरला तर त्याच्या आयुष्याचे झालेले नुकसान भरून निघू शकते का?


#MeToo नंतरचे बदललेले सामाजिक वास्तव


‘बंदर’ चित्रपट या चर्चेच्या मध्यभागी उभा राहतो. चित्रपट पाहताना लक्षात येतं की त्याचा केंद्रबिंदू पीडित महिला नाही तर चित्रपटाचा फोकस आरोपी व्यक्तीवर आहे. त्यामुळे काही समीक्षकांनी त्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, भारतीय समाजात आधीच लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींकडे संशयाने पाहिले जाते. अशा परिस्थितीत खोट्या आरोपांवर आधारित कथा अधिक प्रभावीपणे मांडल्यास वास्तविक पीडित महिलांच्या संघर्षाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे.


ही टीका महत्त्वाची आहे. कारण भारतात आजही लैंगिक अत्याचाराच्या असंख्य घटना नोंदवल्याच जात नाहीत. सामाजिक बदनामी, कौटुंबिक दबाव, पोलिसांकडील वागणूक, दीर्घ न्यायप्रक्रिया आणि आर्थिक असुरक्षितता यांमुळे अनेक महिला तक्रार करण्यापासून परावृत्त होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास सातत्याने दाखवतात की लैंगिक अत्याचाराच्या बहुतांश घटना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचतच नाहीत.


मात्र त्याच वेळी न्यायालयांनी काही प्रकरणांमध्ये खोट्या तक्रारी, सूडबुद्धीने केलेले आरोप किंवा नातेसंबंध बिघडल्यानंतर निर्माण झालेले गुन्हे यांची नोंदही घेतली आहे. त्यामुळे खोट्या आरोपांचा प्रश्न अस्तित्वातच नाही, असे म्हणणेही वास्तवाशी प्रामाणिक ठरणार नाही.


याच ठिकाणी ‘बंदर’ची खरी गुंतागुंत सुरू होते.


हा चित्रपट कलम ३७६ वर थेट भाष्य करतो का? कदाचित हो… पण तो फक्त कायद्यावर टीका करत नाही. तो समाजाच्या प्रतिक्रियेवरही प्रश्न उपस्थित करतो. आरोप होताच माध्यमांच्या चर्चांमध्ये, सोशल मीडियावर आणि सार्वजनिक क्षेत्रात व्यक्तीची प्रतिमा कशी मोडली जाते, याकडे तो लक्ष वेधतो. डिजिटल युगात न्यायालयापूर्वी समाजाचा निकाल लागतो. ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि न्यूज स्टुडिओ हे अनेकदा न्यायालयापेक्षा वेगाने निर्णय देतात. आरोप सत्य असोत वा असत्य, सार्वजनिक प्रतिमेचं नुकसान तत्काळ होतं. नंतर न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली तरी ती बातमी पहिल्या आरोपाइतकी चर्चेत राहत नाही. ‘बंदर’ या वास्तवाकडे बोट दाखवतो.


User Image


अनुराग कश्यपचा वैचारिक प्रवास


पण या चित्रपटाची चर्चा अनुराग कश्यपशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भारतीय सिनेमात अनुराग कश्यप हे नेहमीच मुख्य प्रवाहाच्या बाहेर उभे राहिलेले दिग्दर्शक राहिले आहेत. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’, ‘देव डी’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’ किंवा ‘रमन राघव २.०’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सतत व्यवस्थेच्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर प्रकाश टाकला. त्यांच्या चित्रपटांमधील व्यक्तिरेखा परिपूर्ण नसतात. त्या चुका करतात, हिंसक असतात, नैतिकदृष्ट्या संदिग्ध असतात. अनुरागच्या सिनेमातील नायक हा अनेकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात न बसणारा, तुटलेला, संघर्ष करणारा किंवा व्यवस्थेचा बळी ठरलेला असतो.


त्यामुळे ‘बंदर’कडे पाहताना अनेकांनी एक प्रश्न विचारला, हा चित्रपट खरोखरच एका सामाजिक प्रश्नावर भाष्य करतो आहे की तो अनुराग कश्यपच्या स्वतःच्या अनुभवांमधून आलेली वैचारिक प्रतिक्रिया आहे?


हा प्रश्न विचारण्याचं कारणही आहे. काही वर्षांपूर्वी अनुराग कश्यप स्वतः लैंगिक अत्याचाराच्या आरोपांच्या वादात अडकले होते. त्यांनी ते आरोप फेटाळले होते. या पार्श्वभूमीवर ‘बंदर’मधील कथानक अनेकांना वैयक्तिक वाटतं. अर्थात, चित्रपट एखाद्या विशिष्ट घटनेवर आधारित असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. तरीही कलाकाराच्या आयुष्याचा त्याच्या कलेवर परिणाम होत असतो, हेही तितकंच खरं आहे. यामुळे ‘बंदर’चा सर्वात रंजक पैलू समोर येतो. तो म्हणजे हा चित्रपट कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर देत नाही. उलट तो अनेक प्रश्न निर्माण करतो. उदाहरणार्थ, खोट्या आरोपांचा बळी ठरणाऱ्या व्यक्तीची वेदना आपण मान्य करू शकतो का आणि त्याच वेळी लैंगिक अत्याचाराच्या वास्तविक पीडितांच्या संघर्षालाही न्याय देऊ शकतो का?


हा प्रश्न अनेकदा सार्वजनिक चर्चेत हरवतो. कारण समाजाला स्पष्ट बाजू आवडतात. ‘पुरुष विरुद्ध स्त्री’, ‘स्त्रीवाद विरुद्ध पुरुष हक्क’, ‘विश्वास ठेवा किंवा संशय घ्या’ अशा द्वंद्वात्मक चौकटींमध्ये चर्चा अडकते. प्रत्यक्ष वास्तव मात्र इतकं सोपं नसतं. एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल आणि तिला न्याय मिळत नसेल, तर ती अन्यायाची बळी आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर खोटा आरोप झाला असेल आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल, तर तोही अन्यायाचाच बळी आहे. न्यायव्यवस्थेचं काम या दोन्ही प्रकारच्या अन्यायांपासून संरक्षण देणं आहे.


यामुळे ‘बंदर’ पाहताना खरा प्रश्न कलम ३७६ आहे की नाही, हा राहत नाही. खरा प्रश्न आहे आपली न्यायव्यवस्था, तपासयंत्रणा आणि सार्वजनिक संवाद इतके सक्षम आहेत का की ते सत्य आणि असत्य यातील फरक संयमाने शोधू शकतील? भारतातील अनेक गाजलेल्या प्रकरणांनी दाखवून दिलं आहे की न्यायालयीन लढाई ही केवळ कायदेशीर नसते; ती सामाजिक आणि मानसिकही असते. आरोप करणारी व्यक्ती आणि आरोप सहन करणारी व्यक्ती दोघेही अनेकदा दीर्घकाळ सार्वजनिक तपासणीच्या केंद्रस्थानी राहतात. या प्रक्रियेत दोघांच्याही आयुष्यावर खोल परिणाम होतात. 


या चित्रपटाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तो भारतीय पुरुषांच्या बदलत्या मानसिकतेवर अप्रत्यक्ष भाष्य करतो. गेल्या दशकात स्त्रियांच्या हक्कांबद्दलची जागरूकता वाढली. कार्यस्थळांवरील नियम बदलले. संमती या संकल्पनेबद्दल अधिक चर्चा होऊ लागली. हे बदल आवश्यक होते. मात्र त्याच वेळी काही पुरुषांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यांना वाटू लागलं की आरोप झाल्यास स्वतःचं संरक्षण कसं करायचं? या भीतीचा सामाजिक आणि मानसशास्त्रीय अभ्यास फार कमी झाला आहे.


‘बंदर’ या भीतीलाही पडद्यावर जागा देतो. यामुळेच हा चित्रपट अनेकांना अस्वस्थ करतो. कारण तो स्पष्ट उत्तरं देत नाही. तो प्रेक्षकांना एका नैतिक धूसर प्रदेशात घेऊन जातो. जिथे आरोपी पूर्णपणे खलनायक नाही आणि व्यवस्था पूर्णपणे निष्पाप नाही. जिथे प्रश्न अधिक आहेत आणि उत्तरं कमी.


User Image


‘बंदर’बद्दल अनुराग म्हणतो,


अनुराग कश्यपने ‘बंदर’बद्दल बोलताना हा चित्रपट #MeToo चळवळीविरोधात किंवा महिलांच्या हक्कांविरोधात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच्या मते, हा चित्रपट लैंगिक अत्याचाराच्या खोट्या आरोपांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. कश्यपने विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, न्यायव्यवस्थेतील त्रुटी, तपास प्रक्रियेतील गुंतागुंत आणि आरोप झाल्यानंतर समाजाकडून दिली जाणारी तात्काळ शिक्षा या गोष्टी त्याला अस्वस्थ करत होत्या. त्याच्या मते, एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्याआधीच त्याची सार्वजनिक प्रतिमा नष्ट होते. दोषी आणि निर्दोष याचा अंतिम निर्णय न्यायालयाने घ्यायचा असताना समाज आणि माध्यमं अनेकदा आधीच निकाल देऊन टाकतात. ‘बंदर’ ही त्या प्रक्रियेची कथा असल्याचं तो सांगतो.


कश्यपच्या मते, या चित्रपटाचा केंद्रबिंदू स्त्रिया आणि पुरुष यांच्यातील संघर्ष नसून न्याय आणि अन्याय यांच्यातील संघर्ष आहे. त्याने असंही म्हटलं आहे की, लैंगिक अत्याचाराच्या वास्तविक पीडितांना न्याय मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच निरपराध व्यक्तीला खोट्या आरोपांपासून संरक्षण मिळणंही आवश्यक आहे. समाजात या दोन मुद्द्यांपैकी एखाद्याची बाजू निवडण्याची प्रवृत्ती वाढत चालली असताना ‘बंदर’ या दोन्ही वास्तवांमधील तणाव समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे हा चित्रपट कोणत्याही चळवळीविरोधातील प्रतिक्रिया नसून, आरोप, सार्वजनिक प्रतिमा आणि न्यायव्यवस्था यांच्या गुंतागुंतीवर प्रश्न उपस्थित करणारी कलाकृती म्हणून पाहावी, अशी भूमिका कश्यपने मांडली आहे.


‘बंदर’ याच अस्वस्थ वास्तवाकडे पाहण्यास भाग पाडतो. चित्रपट म्हणून त्याच्या मर्यादा असतील. काही जणांना तो एकतर्फी वाटू शकतो. काहींना तो धाडसी वाटेल. काहींना तो पुरुषी असुरक्षिततेचं चित्रण वाटेल. तर काहींना न्यायव्यवस्थेवरील कठोर भाष्य. पण एक गोष्ट नाकारता येणार नाही. ‘बंदर’ने एक वादग्रस्त चर्चा पुन्हा सुरू केली आहे. आजच्या भारतात असा समाज घडवण्याचं आव्हान आहे जिथे लैंगिक अत्याचाराची शिकार झालेली महिला तक्रार करण्यास घाबरणार नाही आणि त्याच वेळी एखादी निरपराध व्यक्ती खोट्या आरोपाच्या भीतीने जगणार नाही. या दोन टोकांमधील समतोल साधणे हे कोणत्याही लोकशाही न्यायव्यवस्थेचं अंतिम ध्येय असायला हवं. 


कदाचित म्हणूनच ‘बंदर’चं महत्त्व त्याच्या कथानकात नाही, तर त्याने निर्माण केलेल्या चर्चेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना सोपी उत्तरं देत नाही. उलट तो त्यांना अस्वस्थ प्रश्नांसमोर उभं करतो. आणि कदाचित कलाकृतीचं सर्वात मोठं यश हेच असतं. ‘बंदर’ खोट्या आरोपांची कहाणी आहे की अनुराग कश्यपची वैचारिक अस्वस्थता, याचं उत्तर प्रत्येक प्रेक्षक वेगवेगळं देईल. पण या चित्रपटाने न्याय, आरोप, सार्वजनिक प्रतिमा आणि सत्याच्या शोधाबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू केली आहे, हे मात्र निर्विवाद.







Share this article
सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण: 'सक्षमचा धाकटा भाऊ गैरवर्तन करत होता' - आंचल मामीडवारचा गंभीर आरोप
ताज्या घडामोडी

सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण: 'सक्षमचा धाकटा भाऊ गैरवर्तन करत होता' - आंचल मामीडवारचा गंभीर आरोप

नांदेडमधील गाजलेल्या सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणात नवे वळण आले आहे. सक्षमचे घर सोडल्याबद्दल टीकेचा सामना करणाऱ्या आंचल मामीडवारने प्रथमच माध्यमांसमोर येत गंभीर आरोप केले आहेत. सक्षमचा धाकटा भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता आणि तक्रार करूनही विश्वास ठेवला गेला नाही, असा दावा आंचलने केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर प्रकरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

3 min read
T
Team BaiManus
माझ्या वडिलांना कुठे नेताय? लेकीची गाडीसमोर धाव.. निष्पाप  शिक्षकाचा पोलीस-वाळूमाफियाकडून अमानुष अंत
ताज्या घडामोडी

माझ्या वडिलांना कुठे नेताय? लेकीची गाडीसमोर धाव.. निष्पाप शिक्षकाचा पोलीस-वाळूमाफियाकडून अमानुष अंत

A shocking incident in Sangli has raised serious concerns about law and order in Maharashtra after 14-year-old Vedant Bandgar was shot dead inside his home in Abhaynagar. The attackers allegedly entered the residence intending to target local leader Balasaheb Bandgar, but opened fire on the teenager when they failed to find him. The tragedy has reignited debate over rising organized crime, easy access to illegal firearms, and the effectiveness of policing in the state. As investigations continue, the case has become a symbol of growing public anxiety about safety, especially for children and families caught in the crossfire of criminal rivalries.

3 min read
V
Vitthal Sable
सांगलीमध्ये 14 वर्षीय वेदांत बंडगर या अल्पवयीन मुलाची गोळ्या झाडून हत्या…
ताज्या घडामोडी

सांगलीमध्ये 14 वर्षीय वेदांत बंडगर या अल्पवयीन मुलाची गोळ्या झाडून हत्या…

शहरातील अभयनगर येथील भरवस्तीमध्ये घरात घुसून गोळीबार करत एका 14 वर्षीय चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत बंडगर असं ठार झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे. वेदांत हा माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू होता. व्यावसायिक वादातून हल्लेखोरांनी बंडगर यांच्या घरामध्ये घुसून हा हल्ला केल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

5 min read
T
Team BaiManus
जिच्या प्रेमाला सलाम केला, तिच्याच निर्णयावर समाजाचा खटला… ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या ‘सक्षम’ची ‘आंचल’ आज आरोपीच्या पिंजऱ्यात का?
ताज्या घडामोडी

जिच्या प्रेमाला सलाम केला, तिच्याच निर्णयावर समाजाचा खटला… ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या ‘सक्षम’ची ‘आंचल’ आज आरोपीच्या पिंजऱ्यात का?

नांदेडमधील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणानंतर मृत प्रियकराशी विवाह करणारी आंचल मामीडवार देशभर चर्चेत आली होती. मात्र काही महिन्यांनी तिने सक्षमचे घर सोडल्यानंतर तिच्याविरोधात सार्वजनिक न्यायनिवाडा सुरू झाला. आंचलच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, माध्यमांच्या भूमिकेचा आणि ऑनर किलिंगच्या मूळ प्रश्नाचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट.

5 min read
S
Sanjana Khandare
‘मुलगाच हवा' या समाजाच्या अट्टाहासावर सुप्रीम कोर्टाकडून तीव्र चिंता व्यक्त
ताज्या घडामोडी

‘मुलगाच हवा' या समाजाच्या अट्टाहासावर सुप्रीम कोर्टाकडून तीव्र चिंता व्यक्त

समाजातील पुरुषप्रधान मानसिकता बदलेपर्यंत 'पीसीपीएनडीटी' कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी. आजही समाजात पडद्यामागे छुप्या पद्धतीने लिंगनिदानासारखे बेकायदेशीर प्रकार सुरू. जोपर्यंत लोकांच्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात संपूर्ण बदल होत नाही, तोपर्यंत स्त्री-भ्रूणहत्या रोखणाऱ्या या कायद्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

2 min read
T
Team BaiManus
आम्हाला फेक म्हणू नका, तरुणांचे म्हणणे ऐका; अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार
ताज्या घडामोडी

आम्हाला फेक म्हणू नका, तरुणांचे म्हणणे ऐका; अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार

नीट व सीबीएसई पेपरफुटीमुळे १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात तीव्र आंदोलन. - सरकार चर्चा करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांना बदनाम करून तरुणांचा आवाज दाबत आहे. - हे आंदोलन गांधी आंबेडकरांच्या अहिंसक विचारांवर असून, पुण्यानंतर नागपूर, लखनौ आणि बेंगळुरू येथेही आंदोलन केले जाईल.

3 min read
A
Apsara Aga

Comments

Comments are currently disabled or loading...