(एम्मा जोन्स)
‘सिस्टर मिडनाईट,’ ‘संतोष,’ ‘गर्ल्स विल बी गर्ल्स,’ ‘शॅडोबॉक्स’ आणि ‘ऑल वुई इमॅजिन इज लाईट’ असे चित्रपट, त्या नव्या स्त्री-केंद्रीत भारतीय चित्रपटांचा भाग आहेत जे बॉलिवूडच्या पारंपरिक नायिकेच्या प्रतिमेला आव्हान देत आहेत. यातील स्त्री-पात्रं वेगळी आहेत- कधी खेळकर, कधी बेधडक आणि अनेकदा बोल्ड देखील. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या स्त्रिया त्यांच्या कथेच्या नायिका आहेत, कोणत्या पुरुषाच्या जीवनाचा फक्त एक भाग नाहीत.
या चित्रपटांतील नायिका, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना भारताच्या अशा पात्रांची ओळख करून देत आहेत ज्या पारंपरिक बॉलिवूडी नायिकांपासून खूप वेगळ्या आहेत. पण भारतीय प्रेक्षकांना अशी स्त्री-पात्रं बघायला आवडतील? त्यांना बघण्याची संधी त्यांना मिळेल?
करन कंधारी यांच्या ‘सिस्टर मिडनाईट’ची नायिका आहे उमा. तिच्या इच्छेविरूद्ध तिचं लग्न झालं आहे ज्यात ना तिला रस आहे आणि तिच्या नवऱ्याला. राधिका आपटे यातल्या गृहिणी उमाची भूमिका करत आहे. यातली शेजारीण तिला म्हणते, “नवरे मूर्ख असतात त्यांना काहीही खाऊ घातलं तरी चालतं. फक्त त्यात मिठ-मिरची असलं की झालं.” राधिका आपटे म्हणते की, वेगळे संवाद, हास्यविनोद आणि पॉप म्युझिक यांच्यातून यात अशा एका नायिकेची कथा सांगितली गेली आहे जी भारतातील कोणत्याही चित्रपटात आधी कधी दाखवली गेली नव्हती.
राधिका सांगते, “मी याआधी असं काही वाचलं नव्हतं. मी उमाशी पूर्णपणे जोडली गेली आहे. ते एक विचित्र पण फार विलक्षण पात्र आहे. उमाचं काम करणं फार नाजूक होतं. कधी ती चांगली वाटायची तर कधी वाईट. तिच गोष्ट मला जास्त उत्तेजीत करत होती आणि आव्हान देत होती. मला हे देखील आवडलं की उमा जशी आहे, तशीच आहे, तिला याचा कोणताही पश्चाताप नाही. जशी ती स्वतःचा स्वीकार करत जाते ती अधिक समर्थ होत जाते.”
स्त्री-विरोधी बॉलिवूड
बॉलिवूडचा बॉक्स ऑफिसवर आजवर दबदबा राहिलेला आहे. मागील वर्षीच बॉलिवूडने 1.36 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. पण बॉलिवूड स्त्री-विरोधी असल्याचे आरोपही होत असतात. 2023 च्या एका अभ्यासात हिट चित्रपटांतील लिंगभाव तसंच लैंगिक ठराविकपणा यांच्या आधारावर त्यांचं मुल्यमापन करण्यात आलं. यातून दिसलं की बॉलिवूडमध्ये स्त्री पात्रांसाठी नेहमी एकच अवतार असतो. प्रा. लक्ष्मी लिंगम यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं, “चित्रपटातील मुख्य स्त्री-पात्र हे सडपातळ आणि सुंदर दिसणं महत्त्वाचं मानलं जातं. ती शांत, लाजाळू असावी आणि आपली सहमती तिनं शब्दांतून नाहीतर खाणाखूणांमधून दाखवावी. तिचे कपडे आधुनिक असतात पण तिचे विचार आधुनिक नसतात कारण त्याचा अर्थ तिचे लग्नाआधी कोण्या पुरुषाशी संबंध होते असं समजलं जातं, जे आपल्या समाजात चुकीचं समजलं जातं.”
चित्रपटांत खूप काही वेगळं दाखवण्याचा, करण्याचा प्रयत्न केला जात नाही. भारतात जिथं कुटुंबात आणि शाळेत, सेक्स एज्युकेशन, सहमती अशा गोष्टींवर चर्चा होत नाही, तिथं या गोष्टी लोक पुस्तकं आणि चित्रपटांमधून शिकत असतात. 2023 च्या हिट चित्रपटांमध्ये नायकाला ‘मर्द’ म्हणून दाखवलं गेलं आहे जो पिळदार शरीराचा आणि बंदूकीच्या गोळ्या झाडून आपल्या शत्रूचा बदला घेणारा दाखवला आहे. यात शाहरुख खानचे ‘पठान’ व ‘जवान’ आहेत तर रणबीर कपूरचा ‘एनिमल’ चित्रपटही आहे. या चित्रपटावर अत्यधिक हिंसाचार व स्त्री-विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता. संदीप रेड्डा वांगा यानं हा चित्रपट तयार केला होता ज्यानं आधी ‘कबीर सिंह’ तयार केला होता ज्यातला नायक उघडपणे नायिकेला त्रास देताना दाखवण्यात आलाय. तोही चित्रपट हिट ठरला होता.
‘मिशन मंगल’ चित्रपटात स्त्रियांच्या सशक्त भूमिका होत्या, जो स्त्री रॉकेट वैज्ञानिकांवर आधारीत होता. करन जोहर याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यातून जेंडर रोल्सवर भाष्य करण्यात आलं ज्याचं कौतुक करण्यात आलं होतं. इंडियन एक्सप्रेसच्या चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता म्हणतात की, बहुतेक नायिकांना आपल्या भूमिकेविषयी फारसं स्वातंत्र्य मिळत नाही. त्यांची प्रमुख गरज ही त्यांनी ‘विनम्र असणं’ ही असते. “कधी-कधी त्या आपलं म्हणणं मांडतात आणि समर्थही वाटतात पण त्यांना नेहमीच सुंदर दिसावं लागतं. नायकाच्या तुलनेत त्यांना दुय्यम स्थान असतं. नायकाचं त्यांना ऐकावं लागतं. अनेक चित्रपटांत नायिकेचं काम नावालाच असतं. काही प्रसंगातच त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते.”
संबंधित लेख वाचा: 1) सेन्सॉर बोर्डाला ‘संतोष’मध्ये असं काय खटकलं की, थेट सिनेमावर बंदीच घातली…? |
‘संतोष’ आणि ‘सिस्टर मिडनाईट’ अद्याप भारतात प्रदर्शित नाही
अलिकडेच संध्या सुरी यांच्या ‘संतोष’ चित्रपटात एका महिला पोलिसाची कथा दाखवण्यात आली आहे. पदासोबत तिला ताकद आणि अधिकार मिळतात. ही नोकरी तिला तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर मिळते. शहाना गोस्वामी हीने संतोषची भूमिका केली आहे. एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याचा गुन्हा सोडवताना तिला पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचाराची जाणीव होते. संतोषची वरीष्ठ अधिकारी एक स्त्रीच आहे (सुनीता राजवार) जिनं या व्यवस्थेत राहण्यासाठी तडजोड स्विकारली आहे.
2012 साली दिल्लीतील एका बसमध्ये एका मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या घटनेनंतर सूरी यांना हा चित्रपट करण्याची प्रेरणा मिळाली असं त्या सांगतात. त्यानंतर भारतात स्त्रियांच्या सुरक्षेसाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले. पण त्यानंतरही स्त्रियांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं नाही. जवळचे नातेवाईक किंवा नवराच यात जास्त प्रमाणात असतात असंही आढळलं आहे.
सूरींनी सांगितलं, “त्यावेळी या बलात्काराच्या विरोधात आंदोलनं होत होते. मी एका स्त्री पोलिसाचं छायाचित्र पाहिलं जिला काही स्त्रिया रागानं वेढत होत्या. त्या स्त्री पोलिसाच्या चेहऱ्यावरचे तेव्हाचे हावभाव इतके गूढ होते की ते पाहून मी खूप प्रभावित झाले. तो विरोध दोन शक्तींच्या मधला होता. तिच्याविरोधातही हिंसा होऊ शकत होती आणि त्या युनिफॉर्मसोबत ती स्वतःही हिंसा करू शकत होती. मला हे जाणून घ्यायचं होतं की जर तुम्ही संतोषसारख्या बाईला तिच्या घरात बंद करून ठेवलं किंवा तिला अशा परिस्थितीत आणलं तर तिची प्रतिक्रिया काय असेल? मला असं एक स्त्री-पात्र हवं होतं जे पुरुष होण्याचा प्रयत्न करणार नाही पण तिचं स्वतःचंही शोषण होणार नाही. समाजात तिच्यासाठी काही स्थान असू शकतं का?” ‘
‘संतोष’ हा ब्रिटनचा 2025 च्या ऑस्करसाठीचा प्रवेशप्राप्त चित्रपट होता. ‘संतोष’ आणि ‘सिस्टर मिडनाईट’ दोन्ही भारतात तयार करण्यात आल्या पण त्यांचे निर्माते ब्रिटीश आहेत. ‘सिस्टर मिडनाईट’ अद्याप भारतात प्रदर्शित झाला नाही. तर ‘संतोष’ कदाचित भारतात दाखवण्यात येणार नाही. त्या सांगतात, “आम्ही मुंबई इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात याचं प्रदर्शन केलं आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं. इथल्या लोकांना तो भावला याचा मला आनंद आहे. पण तो भारतात प्रदर्शित होणार नाही. सेंसर बोर्डाने यात इतके कट्स सुचवले आहेत की तो निरर्थक होऊन जाईल.”
सेन्सॉर बोर्डामुळे भारतात नेहमीच वाद घडत असतात. 2017 मध्ये ‘लिपस्टीक अंडर माय बुर्का’ वरही बंदी आणली होती तो फारच महिला-प्रधान असल्याचं कारण सांगून. नंतर ती बंदी काढण्यात आली. अनेक चित्रपटात सेल्फसेन्सॉर लागू होतो, सेक्स असेल तर हमखास. 2021 च्या तेलुगू ‘पुष्पाः द राईज’ मधला एक प्रसंग काढण्यात आला ज्यात नायक, नायिकेच्या छातीला स्पर्श करताना दाखवला आहे. प्रेक्षकांनी यावर आपत्ती घेतल्याचं कारण यामागे होतं. 2024 च्या ‘पुष्पाः द रूल’ देखील वादात अडकला होता.
शुभ्रा गुप्ता म्हणतात की, या चित्रपटातून असा संकेत दाखवण्यात आला होता की नायिकेला आपल्या पतिसोबत सेक्स करायचा आहे. “यातील स्त्री-पात्र तसं खेळकर आणि खोडकर आहे. ती नायकाकडे आकर्षित होते आणि जेव्हा तिला त्याच्यासोबत थोडा वेळ हवा असतो तेव्हा ती खट्याळपणे त्याच्याशी वागते. बाकी वेळ ती नायकाची सेवाच करत असते. आपल्या नवऱ्यानं इतर कोणाशी सेक्स करू नये अशी तिची इच्छा असते. यावरच वाद झाला. कारण आपल्या चित्रपटांत अशा गोष्टींवर नायक-नायिका सहसा बोलत नसतात. आमच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटात अजूनही ही धारणा आहे की एखाद्या स्त्रीनं विवाहबाह्य संबंध ठेवले तर तिची निंदा करण्यात येईल.”
‘ऑल वुई इमॅजिन इज लाईट’... सेक्सवरची चर्चा
पायल कपाडीया यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन इज लाईट’ या चित्रपटात सेक्ससारख्या गोष्टीवर योग्य पद्धतीनं चर्चा आहे ज्यामुळे हा चित्रपट आणखी धाडशी होतो. कान्स चित्रपट महोत्सवात ग्रां प्री जिंकणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. यात प्रभा नावाच्या नर्सची कथा आहे जी आपल्या लग्नानंतरही एकटी आहे. तिची रुममेट अनू हिंदू आहे व तिच्या मुस्लिम प्रियकरासोबत तिला सेक्स करायचा आहे. हा विषयही आपल्या इथं संवेदनशील आहे. चित्रपटात लग्नाआधीची कोणतीही चर्चा नाही.
कपाडीया सांगतात, “हा चित्रपट त्या गोष्टींवर आहे ज्या मी स्वतः अनुभवत होती. भारतात बायका आर्थिकरित्या स्वतंत्र झाल्या तरीही त्यांना खासगी आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजूनही नाही. त्यांना अजूनही लहान समजलं जातं. तुम्ही पंचविशी गाठता, तुमच्या कमाईवर घर चालवता पण तुम्हाला कोणासोबत रहायचं आहे किंवा लग्न करायचं आहे हे ठरवू शकत नाही.”
या चित्रपटाला भारताकडून ऑस्करमध्ये पाठवण्यासाठी निवडण्यात आलं नव्हतं. कारण तो ‘भारतात तयार झालेला युरोपियन चित्रपट वाटतो’ असं मत ज्युरींनी व्यक्त केलं होतं. २०२४ च्या शुचि तलाती यांच्या ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ चित्रपटातही सेक्सवर चर्चा आली आहे. एका बोर्डींग स्कूलमधली ही कथा आहे ज्यात एक 18 वर्षांची मुलगी पहिल्यांदाच एका मुलाच्या प्रेमात पडते आणि तिची प्रेमकथा आपल्या आईमुळे अपूर्ण राहते. या चित्रपटाला सन डान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षक पुरस्कार मिळाला होता. गुप्ता म्हणतात की आंतरराष्ट्रीय प्रेक्षक आणि भारतीय प्रेक्षक यांच्या आवडी फार वेगळ्या आहेत. “आम्ही ज्या चित्रपटांचा विचार करतोय ते स्वतंत्र भारतीय चित्रपटाचा भाग आहेत आणि त्यांच्यातच वेगळे आणि विलक्षण प्रयोग होत आहेत. भारतासाठीच नाहीतर जगभरातील चित्रपटांसाठीही हे खरं आहे.
पायल कपाडीया यांचा ‘ऑल वुई इमॅजिन इज लाईट’ हा चित्रपट चांगला गाजला आणि भारतातही तो प्रदर्शित झाला पण त्याची बॉक्स-ऑफिस कमाई मला माहिती नाही. भारतीय प्रेक्षकांना ‘सिस्टर मिडनाईट’ची उमा किंवा संतोष सारखी नायिका फार वेगळी वाटेल कारण असे पात्र नेहमीच्या चित्रपटांपेक्षा फार वेगळे आहेत. संतोष सारखी एक दलित महिला नायिका होईल यावरचा त्यांचा विश्वास बसणार नाही. भारतात असा चित्रपट चालणं फारच कठीण गोष्ट आहे. तो विकताही येणार नाही मूळात. आणि उमा काही आज्ञाधारक बायको नाही. ती आपल्या पद्धतीनं जगते आणि बरीच बेपर्वाही आहे. हे चित्रपट ओटीटीवर चालतीलही पण तिथं त्यांची प्रेक्षकसंख्या मर्यादीत असेल. त्यांची कमाईही कमीच होईल.”
बंगाली भाषेतील ‘शॅडोबॉक्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक तनुश्री दास आणि सौम्यनंद यांनाही वाटतं की प्रेक्षकांची विचारसरणी बदलण्यासाठी ठराविक साचे मोडण्याची जास्त गरज आहे. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता. यात मायाची कथा आहे जिची भूमिका तिलोत्तमा शोम हीने केली आहे. ती अनेक नोकऱ्या करून कुटुंबाचा घरखर्च भागवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिचा नवरा, एक माजी सैनिक आहे आणि मानसिकरित्या अस्वस्थ आहे. त्यामुळे त्याला समाजात अपमानित व्हावं लागतं.
दास सांगतात, “जेव्हा आम्ही कामकरी वर्गातील वंचित स्त्रियांची गोष्ट करतो तेव्हा त्यांना अनेकदा परीघावरील बायका समजलं जातं. परीघावरील हे लोक लोकसंख्येचा मोठा भाग असतात. पण त्यांच्या कथा आम्हाला का दिसत नाहीत? आता वेळ आली आहे ती ठराविक साचे तोडण्याची. त्यामुळे अधिकाधीक स्त्रियांनी आपल्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मला वाटतं की चित्रपट निर्माते आणि वितरक यांना हे समजत नाही की स्त्री प्रेक्षकांची संख्या किती जास्त आहे आणि त्यांना असे चित्रपट बघायला आवडतील का ज्यात त्यांचं जगणं दिसेल, असे नाही की ज्यात त्या नावालाच असतील.”
ओटीटी एक सशक्त माध्यम
कोविड काळात ओटीटीने स्त्री-केंद्रीत तसेच धाडशी विषयांच्या चित्रपटांना एक व्यासपीठ दिलं आहे. जिथे प्रेक्षक हवा तो सिनेमा थेट बघू शकतात. २०२१ मध्ये जियो बेबी यांचा मल्याळम चित्रपट, ‘द ग्रेट इंडियन किचन’ नीस्ट्रीम ऐपवर हीट झाल्यानंतर तो हिंदी आणि तामिळ भाषेत तयार करण्यात आला होता. पारंपरिक लग्नाची गोष्ट असलेल्या या चित्रपटात घरगुती काम, त्रास देणारे सासरचे लोक आणि एक निष्काळजी नवरा यांचं चित्रण होतं. एका स्त्री समीक्षकेनं याविषयी म्हटलं की, हा चित्रपट पितृसत्तेला आव्हान देतो जो कुटुंब आणि धर्म या संस्थांचा आधार आहे.
किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ (यावर्षी भारताकडून ऑस्करमध्ये धाडण्यात आलेला चित्रपट) अनैच्छिक लग्नावर आधारीत होता. ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलटची कथा सांगते. हे दोन्ही चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले. गुप्ता सांगतात, “सामान्य प्रेक्षक असे चित्रपट बघत नाहीत. 15 ते 35 वयोगटातील तरुण हे चित्रपट बघतात व त्यांच्यातही पुरुषांचं प्रमाण जास्त असतं. फिल्म इंडस्ट्री अजूनही बॉईज् क्लबच आहे.”
2023 मध्ये चांगली कमाई केली असली तरीही बॉलिवूडचा एकूण भारतीय बॉक्स ऑफिसमध्ये 40 टक्के इतकाच सहभाग होता. गुप्ता म्हणतात की बॉलिवूडच्या ‘फॉर्मुला फिल्म्स’मुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. “लोकांना काहीतरी वेगळं बघायला हवं आहे,” त्या सांगतात, “पण अडचण अशी आहे की प्रेक्षकांच्या विचारसरणीला डावलून चित्रपट तयार केले तर ते बघायला येणार नाहीत.
दुर्दैवानं आम्ही असं संतुलन बनवलं आहे की ज्यात प्रेक्षकांनी अशी स्त्री-पात्रं बघू नयेत जी स्त्रीवादी असतील किंवा अशा स्त्रिया ज्या समाजाच्या चांगल्या स्त्रीच्या व्याख्येला आव्हान देऊ पाहतात. पण हा बदल घडवून आणण्यासाठी फक्त स्त्री-पात्रांनाच वेगळ्या पद्धतीनं दाखवणं गरजेचं नाही. तुम्हाला पुरुष पात्रांनाही वेगळ्या पद्धतीनं दाखवावं लागेल. त्यामुळे प्रत्येकच पैलू बदलणं खूप गरजेचं आहे.”
(सौजन्य - बीबीसी हिंदी)
अनुवाद - प्रतिक पुरी






