चंबळचं खोरं… राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना एकमेकांशी जोडणारे चंबळ खोरे परिसर हे कित्येक वर्षे डाकूंचा बालेकिल्ला राहिलेला होता. आजही या खोऱ्यात कुख्यात डाकूंचे अनेक किस्से गावागावात ऐकवले जातात. चंबळच्या डाकूंचं पुनर्वसन करण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले.
1920 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज आणि नंतरच्या काळात विनोबा भावे, जयप्रकाश नारायण आणि गांधीवादी नेते सुब्बा राव यांच्या प्रयत्नांमुळे चंबळच्या 654 पेक्षा जास्त डाकूंनी आत्मसमर्पण केलं. डाकूंच्या आत्मसमर्पणाचं सत्र 1960 ते 1980 च्या दशकापर्यंत सुरू होतं. यादरम्यान सुमारे 1 हजार डाकूंनी आत्मसमर्पण केलं. त्यानंतरच चंबळ खोरे हे डाकूंच्या दहशतीपासून मुक्त होऊ शकलं. मात्र चंबळची भिती काही गेली नाही.
त्या-त्या वेळी या घटनांकडे एक प्रकारची क्रांती म्हणून पाहिलं गेलं. अशा ठळक घटनांव्यतिरिक्तही दरोडेखोरांच्या पुनर्वसनाचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतात. अनेकदा कोणतेही वलय नसलेल्या साध्यासुध्या लोकांकडून केले जाणारे हे प्रयत्न दीर्घकाळ, शांतपणे होत असतात. एक स्वतंत्र घडामोड म्हणून त्यांची नोंद घेता येत नाही. त्यांचा एकत्रित परिणाम मात्र चकित करणारा असतो. असेच काहीसे घडले आहे राजस्थानच्या करौली जिल्ह्यामध्ये. शांत जीवनासाठी सुरू झालेला हा संघर्ष जलप्रवासाचीही एक गाथा ठरला आहे.
करौली (राजस्थान) हे याच चंबळ खोऱ्यातील एक गाव. एकेकाळी जिथं डाकूंचं राज्य होतं, जिथं बायकांना रात्री नव्हे तर दिवसाही भीतीने उंबऱ्याबाहेर पाऊल टाकायचं धाडस व्हायचं नाही, तिथंच आज हिरवाई फुलू लागलीय. राजस्थानच्या करौली जिल्ह्यातल्या महिलांनी केवळ निसर्गाशी लढा दिला नाही, तर आपल्या पतींच्या आयुष्यालाही नवं वळण दिलं. डाकूंच्या हातात बंदुकीऐवजी नांगर दिला…
पाण्याअभावी रखरखीत झालेल्या माळरानावर या महिलांनी झाडं उगवली आणि मनात आशा. आजमितीला इथं 500 हून अधिक पोखरं खोदली गेलीयेत. ही फक्त जलसंवर्धनाची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे त्या स्त्रीशक्तीची, जी काळोख्या भयाच्या छायेतून निघाली आणि नव्या जीवनाची दिशा घडवू लागली.
डकैतांचा प्रदेश झाला आता हिरवाईचा परिसर
चंबळच्या खोऱ्याचं नाव ऐकताच ‘डकैत’ हा शब्द सहज डोळ्यासमोर येतो. तिथं राहणाऱ्या महिलांवर त्याचे अनेक परिणाम झाले. करौली जिल्ह्यामध्ये सुमारे 25 वर्षांपूर्वीपर्यंत पर्जन्यमान सामान्य होतं. हवामान बदलामुळे हळूहळू त्यामध्ये घट होत गेली. आकडेवारीत सांगायचे तर 1951 ते 2000 या कालावधीत सरासरी वार्षिक पर्जन्यमान 722.1 मिमी इतकं होतं. ते 2001 ते 2011 या कालावधीत 563.94 मिमी इतकं कमी झालं.
संबंधित लेख वाचा: 1) या शेताचा आता लळाच राहिलेला नाही… शेती करणाऱ्याांच्या संख्येत विक्रमी घट |
या भागात बारमाही नद्या जवळपास नव्हत्याच. पण घटत्या पावसामुळे पावसाळ्यातही नदीला पाणी राहिनासं झालं. वारंवार पडणारा दुष्काळ, आटलेल्या नद्या आणि इतर जलस्रोत याचा परिणाम शेती आणि पशुपालनावर झाला. उत्पन्नाचे अन्य साधन नव्हते. परिणामी अनेक पुरुष दरोडेखोरीकडे वळाले. हवामान बदलामुळे इथली जमीनही बंजर झाली, जनावरं दगावली, आणि शेवटी हतबल पुरुषांनी डाकूपणाची वाट धरली.
15 वर्षांपूर्वीपर्यंत करौलीमधल्या संपत्ती देवी आणि इतर अनेक महिला आपल्या पतींच्या नशिबाविषयी सतत भीतीत असायच्या. गावात दरोडे टाकून ते ते जंगलात पोलिसांपासून पळत होते. साधारण 2010 पर्यंत हे असंच सुरू होतं. आपला पती एकदा भेटून गेल्यावर पुन्हा दिसेल की नाही या भीतीमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या या बायका या अस्थिर आयुष्याला कंटाळल्या.
त्यांनी आपले आयुष्य पुन्हा आपल्या हातात घेण्याचा निर्धार केला. जंगलातून बाहेर येऊन शस्त्रं खाली ठेवावीत आणि सामान्य आयुष्य जगावं यासाठी त्यांनी आपापल्या पतीचं मन वळवलं. त्यासाठी दरोडेखोरीच्या मूळ कारणावर उपाय करणं आवश्यक होतं. त्यामुळे पुढील संघर्ष होता पाण्याचा, पाणी मिळवण्याचा आणि ते टिकवण्याचा.
बदलाची पहिली पालवी, एका बाईच्या निर्धारातून
संपत्ती देवी म्हणतात, “तो परतच आला नसता… मीच त्याला खेचून आणलं.” त्यांचा पती जगदीश (वय 58) यांनी शेतीच्या नव्या वाटेकडे वळण्याचा निर्णय घेतला. अलवरस्थित ‘तरुण भारत संघ’ (TBS) या संस्थेच्या मदतीने त्यांनी आणि इतर गावकऱ्यांनी जुने कोरडे तलाव पुन्हा जिवंत केले, नवीन पोखर खोदली. पोखर म्हणजे राजस्थानातील पारंपरिक पावसाचे पाणी साठवण्याचे जलाशय.
2015-16 मध्ये आलमपूर गावाजवळ डोंगराच्या पायथ्याशी एक पोखर बांधण्यात आलं. पावसात ते भरलं आणि तिथून पुन्हा शेतीला पाणी मिळायला लागलं. “आता आम्ही मोहरी, गहू, बाजरी, भाज्या उगवतो,” असं संपत्ती अभिमानाने सांगतात. त्या हे पोखर सिंघाडा शेतीसाठी इतरांना भाड्यानेही देतात. एका हंगामात साधारणतः एक लाख रुपयांची कमाई होते!
या कामात त्यांना साथ मिळाली अलवरस्थित 1975 पासून जलसंवर्धनासाठी काम करणाऱ्या तरुण भारत संघ या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेची. तरुण भारत संघाच्या मदतीने ठिकठिकाणी बुजलेल्या तळ्यांचे आणि पोखरांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. हे तलाव सामान्यतः बंधाऱ्यांलगत बांधले जातात. पाणी साठवणे, सिंचन आणि इतर कारणांसाठी त्यांचा वापर केला जातो. गावातील विहिरींप्रमाणे हेही बहुतेक वेळा सामूहिक मालकीचेच असतात. तर काही पोखरवर खासगी मालकी असते. कोरड्या प्रदेशात पाणी व्यवस्थापनात ते फार महत्त्वाची भूमिका बजावतात.
करौली जिल्ह्यात 500 हून अधिक अशा जलसाठ्यांची निर्मिती झाली असून, फक्त आलमपूरच्या आसपासच्या जंगलात 16 पोखर आहेत. डोंगरातून वाहून येणारं पावसाचं पाणी या पोखरांत अडवलं जातं, ज्यामुळे दुष्काळ आणि अचानक येणाऱ्या पुरांपासून दोन्हींपासून संरक्षण मिळतं.
संपत्तीदेवींचे पती जगदीश 58 वर्षांचे आहेत. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी दरोडेखोरी सोडली आहे. ‘‘मी आतापर्यंत मेलो असतो. तिने मला परत येऊन पुन्हा शेती सुरू करण्यास सांगितले,’’ असे ते सांगतात. शस्त्रे सोडून शांतता निवडण्याचा त्यांना चांगला परिणाम दिसत आहे. भूरखेडा गावातील 55 वर्षीय प्रेम यांचा विवाह लहानपणीच झाला होता. त्यांनी स्वतःची चार बिघे जमीन पोखर बांधण्यासाठी गावाला दिली. प्रेम यांचे पतीही एकेकाळी दरोडे घालत असत. आता तेही सर्वसामान्य जीवन जगत आहेत.
राजस्थानात दरोडेखोरांचा सर्वाधिक उपद्रव असलेल्या जिल्ह्यांमध्ये करौलीचा समावेश होतो. मात्र, पाण्याच्या या संघर्षाने दरोडेखोरांच्याही जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश ज्योती उपाध्याय सांगतात की, जलसंवर्धनाच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे या भागात आता पुन्हा स्थैर्य अनुभवायला मिळत आहे. खरंतर गेल्या वर्षी 1,900 मिमीहून अधिक पावसामुळे अचानक पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती, पण हीच पोखरं आता पाणी साठवून संकट कमी करताहेत.
भूजल वाढलं, नदी पुन्हा वाहू लागली
पूर्वी दिवाळीनंतर कोरडी पडणारी सेरनी नदी आता बारमाही झाली आहे. TBS चे रणवीर सिंह सांगतात, “नदीच्या काठावर सुमारे 150 जलसंरचना उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्यातही पाणी मिळतं. भूजल पातळी 5-10 फूटांनी वाढली आहे. हा भाग खडकाळ आहे. त्यामुळे पावसानंतर पाणी उतारावर वाहून जातं, ते जमिनीमध्ये झिरपायला फारसा वाव नसतो. त्यामुळे पाणी अडवणं, जिरवणं आणि टिकवणं यासाठी हुशारीपूर्वक विशेष प्रयत्न करावे लागतात. येथील लोकांनीही तेच केलं.
गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत तरुण भारत संघ आणि स्थानिकांनी आलमपूर गावामध्ये एकूण 16 पोखर बांधले आहेत. संपूर्ण करौली जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या साधारण 500 इतकी आहे. डोंगरांच्या उतारावरून येणारे पाणी या पोखरांमध्ये साठवल्यांमुळे आता करौलीची भूजलपातळीही जमिनीखाली 5 ते 10 फूट इतकी वर आली आहे. इतकेच नव्हे तर येथील शेरनी या हंगामी नदीचे रुपांतर बारमाही नदीत झाले आहे. अगदी दशकभरापूर्वी, दिवाळीनंतर या नदीला पाणी नसे. आता अगदी ऐन उन्हाळ्यातही नदीला भरपूर पाणी आहे.
नदीच्या पात्रामध्ये आणि अवतीभवती 150 जलसंवर्धनाची कामे केली आहेत, त्यामुळे हा परिणाम झाल्याची माहिती तरुण भारत संघाचे कार्यकर्ते रणवीर सिंह यांनी दिली. या भागातून दुष्काळ जवळपास नाहीसा झाला आहे असे म्हणता येईल. खरे तर साधारण 40 वर्षांपूर्वी ही नदी बारमाही वाहत असे, पण हवामान बदलामुळे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे तिचे स्वरूप बदलत गेले. आता तिला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त झाले आहे.
एक कथा चंबळची, पण प्रेरणा संपूर्ण देशासाठी
हे फक्त जलप्रश्नाचं उत्तर नाही; हे सामाजिक परिवर्तनाचं निदर्शक आहे. डाकूंपासून शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास केवळ आर्थिक गरजेमुळे नाही, तर स्त्रियांच्या संकल्पामुळे शक्य झाला. करौलीच्या महिलांनी दाखवून दिलं की, स्त्रीच्या धैर्यापुढं दु:ख, संकटं, भूक काहीही टिकत नाही. बंजर माळरान हिरवळीत बदली जाऊ शकतो आणि बंदुकीचा आवाज, शेतीच्या रोंजारणाऱ्या पाण्याच्या निनादात विरू शकतो. ही केवळ चंबळची गोष्ट नाही, ही प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे, जिला घराची आणि जगाचीही नव्याने उभारणी करायची आहे.






