जून महिना सुरू झाला की माझं शालेय मन अगदी उल्हासून जायचं. उन्हाची काहिली कमी झालेली असायची, अर्थात आजच्या इतकी तीव्रता तेव्हा नव्हती. 13 जून शाळेचा पहिला दिवस, वह्या पुस्तकांना कव्हर घालणं, पावसाच्या कोसळणाऱ्या हलक्या सरी, तर कधी मधी मुंबईचा धो धो कोसळणारा पाऊस, सण वार घेऊन दारात उभा असणारा श्रावण मास आणि आमच्या चाळीत खमंग चर्चा चालू असलेला वटपौर्णिमेचा सण.
आम्हाला ते व्रत वगैरे समजत नव्हतं आमच्यासाठी तो सणच असायचा. करवंद जांभळं, आंबा फणसांचे गरे, पेरू, केळी यांची अगदी लय लूट असायची वाण देण्याघेण्याच्या निमित्ताने. आदल्या दिवशी बाजारातली तुडुंब गर्दी. प्रत्येक सत्यवानाच्या खांद्यावर तीन-चार किलोचा आकार उकार नसलेला, कुठेतरी पोक आलेला तर कुठेतरी खपाटीला गेलेला तो फणस आणि चार आण्याची फांदी 20 पैशाला घेतली म्हणून आनंदलेली ती सावित्री.

जाम भारी वाटायचं ते वार्षिक दृश्य. तर्क सुसंगत विचार करण्याचे ते वयच नव्हते त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी नटून थटून लयबद्ध चालीने वडाला गुंडाळणाऱ्या दोराच्या माध्यमातून ती आपली मानसिक गुलामी अधिक दृढ करते हा विचार मनाला कधी शिवलाच नाही. पुढे मग वय वाढलं, क्षितिज, विचारांच्या कक्षा रुंदावल्या, शिंगं फुटली. बालपणी वाटणाऱ्या त्या सणाच्या आनंदाचे रूपांतर चिंतेत झालं.
हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा येते. ह्या दिवशी जवळपास 55 ते 60 टक्के स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. परंतु झपाट्याने होणारे शहरीकरण, महिलांचे नोकरीचे वाढते प्रमाण, रोजची धावपळ, दगदग आणि स्वतःची सोय त्यामुळे पावित्र्य कुठले?
वटपौर्णिमेच्या दोन दिवस आधीच वडाच्या झाडाच्या फांद्या तोडायला सुरुवात झालेली असते.वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य जीवनामध्ये सुख आणि संपत्ती प्राप्त होते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे, यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. मात्र या गृहीतकांची सत्यता पटवणारा कुठलाही डाटा आज उपलब्ध नाही. तरीही या व्रताच्या कृतीचे संक्रमण आज पिढ्यानपिढ्या निरंतर चालूच आहे. 40 ते 50 वर्ष सलग व्रत करून सुद्धा अखंड सौभाग्य न लाभलेल्या स्त्रिया आपल्याला समाजामध्ये दाखवता येतील. त्यामुळे अखंड सौभाग्याचा हा दावा देखील तितकाच चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.
आता मुद्दा येतो संपत्ती प्राप्तीचा ग्रामीण भागात देखील हे व्रत तितक्याच मोठ्या प्रमाणावर केले जाते जितके की शहरात. शेतकऱ्याची बायको शेतातही राबते घरातही राहते आणि तितक्याच मनोभावे न चुकता वटपौर्णिमेचे व्रतही करते तरीसुद्धा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही, अखंड सौभाग्य ही नाही आणि संपत्तीही नाही म्हणजे तेलही गेल, तूपही गेलं हाती धुपाटणे आलं. खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीनं यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, ही गोष्ट जर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत होत असती, तर तमाम डॉक्टरांची फार सोय झाली असती.
हॉस्पिटलच्या दारामध्ये वडाचं एक झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला ऑपरेशनला घेतलं असतं, त्या वेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये सुताची एक गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं, ‘तू झाडाभोवती सूत गुंडाळ आणि वड पूज… कारण त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे. एका बाजूला डॉक्टर करत असलेलं ऑपरेशन, दुसऱ्या बाजूला व्रत; कशानं का होईना, पण निश्चित प्रकारे गुण येईल’. परंतु या सगळ्यातला फोलपणा कळत असतानादेखील आजही सुशिक्षित स्त्री वटसावित्रीचं व्रत करते तेव्हा व्यर्थ गेला तुका तसंच व्यर्थ घालवली सावित्रीबाई असं खेदाने म्हणावं लागतं.

परंपरा आणि कालबाह्य रुढी, वृत्तवैकल्य, नवसाच्या कल्पना,उपवास आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात असं लोकांना वाटतच नाही. वटसावित्रीची कथा, किंवा छटपूजा, करवा चौथ इत्यादी कथा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न आपण जर महिला शिबिरात किंवा अन्य ठिकाणी समुदायाला विचारला, तर महिला समुदायामध्येदेखील कोणीही ती कथा नीट सांगू शकणार नाही. कोणत्याही प्रथेच्या संक्रमणात अडथळे निर्माण करणे, शंका घेणे हे आपल्या गळी उतरतच नाही. ती कथा थोडक्यात अशी आहे, अश्वपती नावाच्या राजाला 18 वर्षं तप आणि व्रत केल्यानंतर एक सुरेख मुलगी होते. तिचं नाव असतं सावित्री. ही सावित्री म्हणे इतकी रूपवान असते, इतकी देखणी असते की, तिला वरायला, तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नसे. परंतु आत्ताचा काळ असा आहे की रूपाची खाण असली की शिक्षण नोकरी या बाबी साईड ट्रॅकवर जातात.
कारण तिच्याकडे शेवटी भोग वस्तू या मानसिकतेतूनच पाहिले जातं. शेवटी सावित्रीनं स्वत:चा वर स्वत:च निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो. सावित्री या राज्यातनं त्या राज्यात, या जंगलातनं त्या जंगलाकडे जात असते. एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो. तो राज्य गेल्यानं परागंदा झालेला राजा असतो. त्याचे वडील महाराज असतात. तेही त्या वेळी जंगलातच राहत असतात. ते आंधळे झालेले असतात; आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याची वेळ, म्हणजे हा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो.
सत्यवानाला बघितल्यानंतर सावित्री म्हणते, “मी याच्याशीच लग्न करणार’’. काहीच जमेची बाजू नसताना कुठली मुलगी असं स्थळ निवडेल? ज्या वेळेला तिच्या वडलांना हे कळतं, त्या वेळी तिच्या वडलांना आनंद होतो की, ‘चला, आपल्या मुलीनं आपला वर निवडला’. अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याचेच हाल असलेला जावई पसंत केल्यानंतर सुद्धा वडिलांना आनंद झाला. मुलगी हे परक्याचे धन, लवकरात लवकर तिला उजवून टाकलेली बरी, या श्रद्धेला आजही आपण धक्के द्यायला तयार नाही. त्याच्यानंतर प्रत्यक्षात लग्न होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद सावित्रीच्या वडलांना सांगतो की, “बाबा रे, तुझ्या मुलीनं जो वर निवडलेला आहे, तो एक वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे.
एक वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे. तेव्हा हे लग्न तू करू नकोस’’. परंतु तरीदेखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदानं, थाटामाटात अश्वपती आपल्या मुलीचं लग्न लावून देतो. एक वर्षातच आपला जावई मरून आपल्या मुलीच्या आयुष्याची होरपळ होईल कारण त्या काळात पुनर्विवाह राज घराण्यात तरी होत नसावा, तरी बाप लग्न लावून देतो? त्याच्यानंतर एक वर्ष होतं. यम येतो. तो सत्यवानाला घेऊन जायला लागतो. त्याच्या मागोमाग सावित्री जाते. यम तिला परोपरीनं परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही. मग शेवटी यम तिला तीन वर मागायला सांगतो.
पहिला वर ती मागते, “माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळू दे आणि परत मिळालेलं राज्य पाहण्याचं भाग्य लाभू दे’’. दुसरा वर मागते, “माझ्या नि:संतान पित्याला शंभर पुत्र होऊ देत’’. आणि तिसरा वर मागते, “आम्हा उभयतांना दीर्घ आयुरारोग्य लाभून माझा संसार सुखाचा होऊ दे’’. यम ‘तथास्तु’ म्हणतो. आता राज्य परत मिळवायचं म्हणजे लढाई लढावी लागायची त्या काळात, यमाने वर दिल्याने राज्य कसे मिळणार? कुठल्याही वैद्यकीय उपचाराशिवाय आंधळ्या सासर्याला दृष्टी कशी येणार आणि तो मिळालेले राज्य कसे बघणार? दुसरा वर होता शंभर पुत्र होऊ देत म्हणजे तिथे तेव्हाही पितृसत्ताक पद्धती होती की काय? राजा काय निःसंतान नव्हता. सावित्री मुलगी त्याला होतीच ना. म्हणजे या कथेत अनेक ठिकाणी स्त्रि दुय्यमत्व अधोरेखित केले गेले आहे आणि पुरुषसत्ताक पद्धतीची पकड घट्ट होत गेल्याचे दिसून येत आहे.
आता ही सगळी कल्पना काय आहे, असा प्रश्न 21 व्या शतकातील तमाम शिक्षित अर्धशिक्षित,, उच्चशिक्षित महिलांनी कधी विचारला का? समजा, आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर चटकन सांगून मुलं येत नाहीयेत, तर वडील स्वत: आणखी व्यापक प्रयत्न करतील की, एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वत:च्या स्वयंवरासाठी पाठवतील? लग्न जमवण्यासाठी आता कितीतरी संस्था, दलाल व्यापारी पद्धतीने काम करत आहेत.
त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की, एक वर्षानं नवरा मरणार आहे, असं जर निश्चितपणे कळलं – ते आज कळू शकतं. उदाहरणार्थ, कुणी जर येऊन सांगितलं की, ‘अहो, तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय, पण तुम्हांला माहीत आहे का की, नवऱ्या मुलाला कॅन्सर सारखा आजार आहे आणि तो आजार अंतिम टप्प्यात आहे . तर ते लग्न ती मुलगी करेल का? आणि तिचे आईवडील ते करू देतील का?

किंवा आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं, तर धंद्यामध्ये पूर्ण संपत्ती गेलेली असल्यानं एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि त्याच्या आंधळ्या बापालाही भविष्यात सांभाळावं लागणार असणाऱ्या मुलाशी आजच्या काळातली एखादी मुलगी लग्न करेल का? आणि ती लग्न करते म्हणाली, तर तिचे आईबाप त्या लग्नाला होकार देतील का? कथेच्या अनुषंगाने अनेक प्रश्न मनाला सतावतात अर्थात कथेची चिरफाड केली तरच मूढपणे कथा स्वीकारली तर प्रश्नच निर्माण होत नाहीत. आणि मग मुकी बिचारी कोणीही हाका अशांच्या पंक्तीत आपण अलगद जाऊन बसतो अश्वपती राजानेही आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जंगलात का लावून दिलं? त्यानं ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं? आणि ते लावल्यानंतर त्यानं आपल्या मुलीच्या सासरकडच्यांना मदत का केली नाही? त्यानं आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्यांना आणून राजधानीमध्ये का ठेवलं नाही? हे प्रश्नदेखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत.
रूढी परंपरेच्या ओझ्याखाली आपण किती नागवले जातो याचे सावित्री आणि तिचा बाप राजा अश्वपती एक ठसठशीत उदाहरण आहे. परंपरेचं हे दडपण इतकं जास्त होतं की, तिनं यमाला काय मागितलं? पहिला वर स्वत:च्या सासऱ्यासाठी मागितला. दुसरा वर स्वत:च्या वडलांसाठी मागितला आणि तिसरा वर स्वत:च्या नवऱ्यासाठी मागितला. म्हणजे तिनं तीनही गोष्टी पुरुषांसाठी मागितल्या. स्वतःसाठी काहीच नाही. आजही 80 ते 85 टक्के स्त्रियांच्या जीवनात केंद्रस्थानी त्यांचा नवरा आणि मुलेच असतात, त्यामुळे हे व्रत ज्या वेळी करता, त्या वेळी त्यातला गर्भितार्थ असा की, बाईनं आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण पुरुष वर्गाशी संबंधित असलेल्या बाबींसाठी – मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल – केलं पाहिजे.
हे सगळंच्या सगळं आजच्या आधुनिक विचारांशी पूर्णपणे विसंगत आहे; आणि ही विसंगती अनेक वेळा किती हास्यस्पद आणि चुकीच्या तर्कांवर आधारित असते. भारतामध्ये लग्न ही संस्था बारा ते पंधरा हजार वर्षांपासून चालत आलेली आहे मात्र आता अपेक्षा, समानतेचे मूल्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी मूल्ये मिलेनियर पिढी साठी जोडीदाराची विवेकी निवड करताना खूप महत्त्वाची आहेत. हा बदल होतानाही दिसत आहे. त्यामुळे या कथेमध्ये सावित्री आणि सावित्रीच्या पालकांनी केलेलं वर संशोधन, यमाकडे मागितलेले तीन वर, आणि सत्यवानाचे वाचवलेले प्राण हे कुठल्याही कसोटीवर खरे ठरणारे नाही, त्यापेक्षा ज्योतिबाच्या सावित्रीची वाट चोखळली तर निम्मा आकाश व्यापून टाकणाऱ्या आपण सगळ्याजणी एक इतिहास रचू शकतो.






