जामनगर आणि वनतारा या दोन शब्दांनी सगळं विश्वच व्यापून टाकलेलं दिसतयं. सगळीकडे वनताराचीच चर्चा… प्रसारमाध्यमांत, सोशल मीडियावर, बॉलिवूडमध्ये इतकंच काय तर गावागावात लोकं यावरच बोलताहेत. प्रख्यात अब्जाधीश आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांचा धाकटे पूत्र अनंत अंबानी यांच्या विवाहाचा प्री वेडिंग समारंभ आजपासून गुजरातच्या जामनगर येथे सुरु होत आहे. या सोहळ्याला जगभरातील नामवंत मंडळी वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहिली आहेत. आणि याच समारंभात अनंत अंबानी यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट लॉंच केला आहे, ज्याचे नाव आहे वनतारा… जंगली प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी ‘वनतारा’ प्रकल्प लॉंच करण्यात आला आहे. रिलायन्सच्या जामनगरातील कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये वनतारा प्रकल्पासाठी 3000 एकराची जमिन देण्यात आली आहे. संपूर्ण वन्यप्राण्यांसाठी समर्पित असलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
रिलायन्सने सुरू केलं देशातील पहिले प्राणी बचाव पुनर्वसन केंद्र
वनतारा प्राणी पुनर्वसन प्रकल्पात 200 हत्तींसह अनेक जंगली प्राण्यांना जीवनदान दिले जाणार आहे. यात अनेक पशुपक्षी आणि सरपटणारे जीव सुद्धा आहेत. गेंडे, चित्ते आणि मगरींसह अनेक प्राण्यांचे पुनर्वसन केले जात आहे. येथे भारतातीलच नाही तर जगभरातील उपेक्षित प्राण्यांचे पालनपोषणासाठी आणले आहेत. ‘वनतारा’ प्रकल्पात हत्तींसाठी विशेष शेल्टर तयार केले आहे. हत्तींना अंघोळ करण्यासाठी खास जलाशय बनविला आहे. हत्तींना जॅकुझी आणि मसाजची सुविधा मिळणार आहे. 200 हुन अधिक हत्तींच्या सेवेसाठी 500 हून अधिक कर्मचारी आणि माहुत येथे तैनात असणार आहेत. या शिवाय वनतारात एक्स-रे मशिन, लेझर मशिन, हायड्रोलिक पुली आणि क्रेन, हायड्रोलिक सर्जिकल टेबल आणि हायपरबेरिक ऑक्सीजन चेंबर आणि हत्तींच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा असणार आहे. येथे हतींवर उपचार करण्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल असणार आहे. ते 25 हजारचौरस फूट जागेवर उभारले आहे. अन्य प्राण्यासाठी 650 एकर जागेवर पुनर्वसन केंद्र उभारले आहे. तसेच 1 लाख चौरसफूट जागेवर हॉस्पिटल देखील बांधले आहे.

…तरीही टीका का होतेय?
एकीकडे अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ या ड्रीम प्रोजेक्टबद्दल चहूबाजूने कौतुकांचा वर्षाव होत असला तरी टीकेचा सूरही उमटत आहे. वनतारामधील हत्तींसाठी खास जॅकुझी आणि मसाजची सुविधा असल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत ते हत्ती आपल्या महाराष्ट्रातून गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या खासगी संग्रहालयाचे भूषण वाढवण्यासाठी गुजरातच्या जामनगरला पाठवण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प हे महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून शोभणारे हे ठिकाण आहे. नक्षलवाद्यांच्या माहेरघर समजल्या जाणाऱ्या कमलापूर या गावाला हत्तीकॅम्प मुळेच नवी ओळख प्राप्त झाली आहे. सन 1980 च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिली सभा कमलापूर येथेच घेतली. त्यामुळे नक्षलवाद्यांचे माहेरघर हीच ओळख कमलापुरला चिकटली. मात्र, वनविभागाच्या शासकीय हत्ती कॅम्पमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आणि कमलापूर गावाला महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेलं गाव म्हणून ओळखला जाऊ लागला. आता एका खाजगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी कमलापूर येथील हत्तींना गुजरात येथे हलविण्याचा कट रचला गेला आहे.

गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या खासगी संग्रहालयाचे भूषण वाढवण्यासाठी…?
या संदर्भात हत्तीच्या स्थलांतरणाचा राज्य सरकारने घातलेला घाट आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाला नोटीस पाठवण्यात आल्याने यात राज्य सरकारचे उद्योगपतीवरील प्रेम जिंकणार की स्थानिकांचे हत्तीवरील प्रेम जिंकणार हे लवकरच कळणार आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि अॅड. बोधी रामटेके यांनी गडचिरोलीतील हत्ती स्थलांतराविरोधात केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कमलापूर हत्ती कॅम्प हा महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पातानील या ठिकाणीसुद्धा काही हत्तींचा अधिवास आहे. जिल्ह्यातील हत्तींना गुजरात येथील रिलायन्स कंपनीच्या खासगी प्राणी रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात येत आहे. हे हत्तींचे स्थलांतरण प्राणी हक्कांविरोधात असून स्थानिकांना निर्माण होणाऱ्या उपजीविकेवरसुद्धा गदा आणणारे आहे, अनेक वर्षांपासून कमलापूर, पातानील या ठिकाणी हत्तींचे वास्तव्य आहे. प्राणी आपला अधिवास निश्चित करत असतो. अशावेळी पूर्णपणे रमलेल्या हत्तींना खासगी संग्रहालयात पाठविल्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
मे 2022मध्ये महाराष्ट्रातले सहा हत्ती गुजरातच्या जामनगरला नेण्यात आले आणि आणखी सात हत्ती नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वन विभाग अशा सगळ्या परवानग्या मिळाल्यामुळे कार्यवाही सुरूच राहिली. शेवटी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ‘स्यू मोटो’ म्हणजे स्वत:हून दखल घेत याविरोधात याचिका दाखल करून घेतली. ज्या हत्तींना हलवलं गेलं ते हत्ती होते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातले 6 (4 नर, 2 मादी), आलापल्ली विभागातले 3 (2 नर, 1 मादी) आणि सिरोंचातल्या कमलापूर पार्कमधले 4 (1 नर, 3 मादी). या तेरा हत्तींना गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स समुहाकडून उभारण्यातआलेल्या या वनतारा प्रकल्पात हलवण्यात आले आहे.

न्यायालय फैसला देणार
महाराष्ट्रात कमलापूर इथं खूप पूर्वीपासून हत्ती राहत होते. लाकूड वाहून नेण्याच्या कामी पूर्वापार त्यांचा उपयोग होत होता. तिथेच या हत्तींसाठी निवारा केंद्र उभारण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रकल्प होता. त्या निमित्ताने गडचिरोलीत पर्यटनाची सोय होऊन स्थानिकांना रोजगार मिळाला असता. हा प्रकल्प बासनात गुंडाळून उलट इकडचे हत्ती राज्याबाहेर पाठवण्यालाही स्थानिकांचा विरोध आहे.
गडचिरोलीमध्ये स्थानिकांनी विरोध केला. आंदोलनंही झाली. पण, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मधल्या काळात हत्तींना हलवायला राज्य सरकारने परवानगी दिली आणि केंद्राने ना हरकत प्रमाणपत्र दिलं. शेवटी वन विभागाने मे महिन्यात एक पत्रक काढून हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू केली.
वन विभागाच्या पत्रकात त्यांनी म्हटलंय की, ‘हत्तींना आरोग्य आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय देखरेखेसाठी प्रशिक्षित तसंच अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यां मार्फत उपचाराची सोय मिळावी. त्याचबरोबर त्यांची उत्तम आणि आधुनिक पद्धतीने देखभाल व्हावी यासाठी हत्तींना जामनगर स्थित प्रशस्त जागा असलेल्या राधेकृष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे सोपवण्यात येत आहे. या हत्तींना प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार नाही’

प्राण्यांच्या हस्तांतरणाचा कायदा काय सांगतो?
देशातली जैव विविधता सांभाळली जावी, तिचं संवर्धन व्हावं आणि त्यातून पर्यावरणाचा तोलही सांभाळला जावा यासाठी देशात बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002 अस्तित्वात आला. म्हणजेच जैव विविधता कायदा 2002. यातलं एक कलम स्पष्टपणे असं सांगतं की, त्या त्या भागातली जैव विविधता आणि जैविक स्त्रोतांच्या संवर्धनाचे अधिकार स्थानिक लोकांकडे पर्यायाने स्थानिक प्रशासनाकडे असावेत. इथं सिंरोचातल्या जिल्हा परिषदेनं तिथल्या हत्तींच्या हस्तांतरणाला विरोध केलेला आहे. मग असं असताना हस्तांतरण प्रक्रिया का सुरू राहिली याचं उत्तर आता वन विभागाला न्यायालयात द्यावं लागणार आहे. शिवाय अनाथ-अपंग अशाच प्राण्यांना प्राणी संग्रहालयात पाठवता येतं. हे हत्ती चांगले सुदृढ आहेत. मग त्यांना गुजरातला हलवणं हा त्यांच्या प्राणीहक्कांचा अपमान आहे असंही प्राणी संघटनांचं म्हणणं आहे. या हत्तींचा नैसर्गिक अधिवास पाच किलोमीटरचा आहे, तर प्राणीसंग्रहालय अडीचशे एकर म्हणजे तुलनेनं खूप कमी जागेत वसलेलं असेल. त्यामुळे मुक्त भटकंती हा स्थायीभाव असलेले हत्ती प्राणी संग्रहालयात रमतील का हा आणखी एक प्रश्न आहे. शिवाय घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार प्राण्यांनाही मुक्त आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.






