2004 सालची ती घटना होती… मुंबईत गोरेगाव येथे वर्ल्ड सोशल फोरमचे महा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. जगभरातील कार्यकर्ते, एनजीओंचे पदाधिकारी मुंबईत दाखल झाले होते. या वर्ल्ड सोशल फोरमच्या विरोधातच विरुद्ध बाजूला मुंबई प्रतिकार 2004 चे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार या नात्याने दोन्ही कार्यक्रमांचे वार्तांकन मी करत होतो. अरुंधती रॉयला मी पहिल्यांदा या ठिकाणी पाहिले आणि ऐकलेही… साधी सुती साडी, लांब बाह्यांचे ब्लाऊज, पायात साधी चप्पल आणि खांद्यावर शबनम बॅग… 2004 पर्यंत अरुंधती रॉय हे नाव जागतिक स्तरावर दुमदुमत होतं. जगप्रसिद्ध लेखिका, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत होती. इतकं महान व्यक्तीमत्व असूनही त्यांच्या वागण्यात इतकी सहजता होती की त्या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर मला त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. स्त्री पुरुष संबधापासून ते जागतिक राजकारणापर्यंत अनेक विषयावर त्यांची मतं अगदीच ठाम होती. नेमक्या त्याच काळात अमेरिकने इराकवर हल्ला चढवला होता. भारतातील काही विचारवंतांनी अमेरिकेची बाजू घेत इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्यावर टीका केली होती. काहींनी अमेरिकच्या आक्रमणाचा निषेध करतानाच सद्दाम हुसेनच्या हुकुमशाही वृत्तीवर बोट ठेवलं होतं. पण अरुंधती रॉय यांची याबाबतीत अगदी परखड मतं होती. रात्री उशीरापर्यंत त्या अनेकांशी चर्चा करत होत्या, गप्पा मारत होत्या. कोणताही बडेजावपणा नाही की वेगळ्या व्यवहाराची अपेक्षा नाही. अगदी सरळ, साध्या अरुंधती रॉय यांची अशी ही भेट-ओळख त्यामुळे पुढे फार काळ लक्षात राहिली. त्यांच्याशी बोलताना भाषेचा प्रश्न असतो. (आता त्यांनी हिंदीवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवलयं, पण त्यावेळी त्यांना इंग्रजीत संभाषण करणं अधिक सोपं जायचे.) त्यांच्याशी गप्पा मारताना भाषा ही फारशी मोठी अडचण ठरत नाही. समोरचा व्यक्तीला काय बोलायचयं,सांगायचयं, याचा अंदाज त्या अचूकपणे लावतात आणि चर्चा करत राहतात. स्वत: विषयी त्या फार बोलत नाहीत… म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, कॉलेज जीवनाबाबत किंवा कुटुंबाबाबत चर्चा करायला त्यांना आवडत नाही. कदाचित त्यांनी या विषयावर अनेकदा लिहिल्यामुळेही असेल कदाचित… तरीही मी त्यांना या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न केला तर त्या म्हणाल्या की, कोणाचेही आयुष्य हा काही मोठा विषय असता कामा नये, मी तर एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतला… माझं आयुष्य असं काय रोमांचकारी असेल?

पुढे पुढे अरुंधती रॉय मला वारंवार भेटत गेल्या. कधी त्यांच्या लेखांमधून, कधी त्यांच्या मुलाखतींमधून तर कधी थेट रस्त्यावरच्या या देशातील सामान्य माणसांच्या घोळक्यात. त्यांच्या धाडसाचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. माझ्यासारख्या अनेकांना अरुंधती रॉय यांच्याविषयी आकर्षण आहे का, याचा मी अनेकदा विचार करतो. दिसण्यापासून ते प्रत्येक बाबतीत त्यांचं एक वेगळेपण आहे, त्याचं हे आकर्षण असतं का? की हे वैचारिक आकर्षण आहे की त्यांच्या धाडसी विधानांमुळे त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असते की त्या या शासन व्यवस्थेला थेट प्रश्न विचारतात म्हणून हे आकर्षण असतं…? सध्याच्या काळ मोठा कठीण आहे. सत्ताधाऱ्यांना एके-56, एके-47 सारख्या शस्त्रास्त्रांची भीती नाही. त्यांना मिसाइल वा ड्रोन ॲटॅकची भीती नाही. किंबहुना त्यांना न्युक्लिअर बॉम्बचीसुद्धा तितकीशी भीती नाही, पण त्यांना भीती आहे, ती विचारांची. म्हणूनच त्यांचा सगळ्यांत मोठा शत्रू पाकिस्तान नव्हे, अरुंधती रॉयसारखं परखड आणि तर्कशुद्ध विचार करणारं माणूस आहे. अशा ‘डोकं थाऱ्यावर नसलेल्यांना’ संपवण्याचे सत्ताधारी हरघडी मनसुबे रचत आहेत.
इतकं धाडस त्यांच्यात येतं कुठून?
पोलिस-सीबीआयसारख्या तपास यंत्रणा हाताशी धरून दिवस-रात्र डावपेच आखत आहेत. मात्र असे असतानाही अरुंधती रॉय मात्र बोलत असतात, अगदी स्पष्टपणे व्यक्त होत असतात. इतकं धाडस त्यांच्यात येतं कुठून? त्यांना असं चर्चेत राहण्याची सवय आहे, त्यांना हे आवडतं, अगदी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? न्यायालयाच्या अवमानप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली, अशा परिस्थितीत त्या आपल्याला अगदी नॉर्मल म्हणता येईल, अशा स्थितीत भेटतात. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल झाला म्हणून त्या अजिबात विचलित होत नाहीत की याचं भांडवल करुन मुलाखती देत सुटत नाहीत, हा त्यांचा मुळात स्वभावच नाही. जे सत्य आहे आणि आपल्याला ते पटतं, ऐतिहासिक पातळीवर त्याचे पुरावे आहेत, तर मग घाबरण्याची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे काश्मीर प्रश्नापासून ते थेट नक्षलवादी चळवळीपर्यंत त्यांचा वावर असतो. विरोधाभास असा आहे की, त्यांना विरोध करणाऱ्या 99.99 टक्के लोकांनी (इन्क्लुडिंग सत्ताधारी राजकारणी) त्याचं आजवरचं साहित्य, त्यांचं आजवरचं लिखाण बहुधा वाचलेलंच नाही. त्यांचा अनुभवांचा परिसर, त्यांची भाषा, त्यांची अभिव्यक्तीशैली, त्यातले त्यांचे विचार यापैकी काहीही त्यांच्या डोक्यात शिरलेलं नाही, तरीही सत्ता समर्थकांच्या विरोधाची धार कमालीची तीव्र आणि तीक्ष्ण आहे.
‘’बॅन्डिट क्वीन’मधून शेखर कपूरने बलात्काराच्या घटनेचा व्यवसाय केला’’
काही व्यक्तींची सुरुवातच मुळात वादळी असते. अरुंधती रॉय यांच्याबाबतीतही तसचं काहीसं घडलं. तरुण वयात काय करावं, हा प्रश्न त्यांच्याही पुढे होता. त्यांनी चित्रपट, दूरदर्शन माध्यमात काम करण्यास सुरुवात केली. तो 1989 चा काळ होता. त्यांनी “In Which Annie Gives It Those Ones’ या टीव्ही चित्रपटाची पटकथा लिहीली. त्यात त्यांनी अभिनयही केला होता. त्यानंतर 1992 मध्ये आला “Eletric moon’. त्यांच्या पहिल्याच पटकथेला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं. त्याच दरम्यान शेखर कपूरचा फुलन देवीच्या आयुष्यावर आधारित “बॅन्डिट क्वीन‘ प्रदर्शित झाला. सबंध जग शेखर कपूरच्या या कामाचं कौतुक करत असतानाच अरुंधती रॉयने “बॅन्डिट क्वीन’चे परीक्षण लिहिले आणि शेखर कपूरची चांगलीच पिसं काढली. हा सिनेमा शेखर कपूर दावा करतो त्याप्रमाणे सत्य घटनेवर आधारित नाही, शेखर कपूरने फुलनची साधी भेटही घेतलेली नाही, असं लेखात स्पष्ट करत अरुंधती यांनी शेखरला भारतीय जातीव्यवस्थेचं काहीच आकलन नाही, मुळ घटनेपासून हा सिनेमा दूर जातो आणि शेखर कपूरने बलात्काराचा घटनेचा व्यवसाय केला, असा जबरदस्त हल्ला अरुंधती यांना केला. याच काळात त्यांच्यातील लेखिकेची ताकद स्पष्ट होत होती. त्यांच्या लिखाणाला एक वेगळी झूल आहे, वेगळे सौंदर्य आहे हे याच काळात दिसतं होतं. हा प्रवास सुरु असतानाच त्यांनी अगदी करिअर म्हणून याच माध्यमाची निवड केली होती. एका वेगळ्या धाटणीच्या किंवा ज्याला संमातर म्हणतात अशा चित्रपटात काम करण्याची तयारी त्यांनी केली होती. “मैसी साहब’ या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाला अनेक पारितोषिकं मिळाली. हा चित्रपट काही गल्लाभरु नव्हता, पण अरुंधती यांच्या अभिनयाचं, कामाचं कौतुक झालं. काहीही पूर्वानुभव नसताना त्यांनी खेड्यातल्या तरुणीची भूमिका छान पार पाडली होती.
पण हे क्षेत्र त्यांच्यासाठी नव्हतचं… नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील कॉलेज विद्यार्थांना घेऊन आम्ही काही तरुण नर्मदा खोऱ्यात गेलो होतो. अरुंधती रॉय यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांनी नर्मदा आंदोलनाला पाठिंबा दिला होता. परंतू अरुंधती रॉय यांनी नर्मदा खोऱ्यातील आदिवासींना फक्त पाठिंबा देऊन आपली मध्यमवर्गीय जबाबदारी पार पाडली नाही तर त्या प्रत्यक्षात आंदोलनात उतरल्या. नर्मदा खोरे असो की त्यासाठी दिल्लीत करावे लागणारे आंदोलन असो अरुंधती प्रत्यक्ष सहभागी झाल्या होत्या. अरुंधती पुन्हा इथेच थांबत नाहीत तर मोठी धरणं आणि आदिवासींचं विस्थापन यावर त्या सखोल, मुद्देसुद आणि सडेतोड लिखाणं करतात. देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या या विकासविषयक भूमिकेची दखल घेतली. या आंदोलनाला त्यांनी एक नैतिक अधिष्ठान मिळवून दिलं.

वीस वर्षांपूर्वीच तमाम हिंदुत्ववादी मंडळींचं शत्रुत्व ओढवून घेतलं.
‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पहिल्याच कादंबरीसाठी अरुंधती रॉय यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. पुरस्कारामुळे मोठी रक्कम त्यांना प्राप्त झाली. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर खरं तर त्यांना एक उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगता आलं असतं किंवा परदेशात जाऊन स्थायिक होता आलं असतं. परंतू बुकर पुरस्कारची मोठी रक्कम त्यांनी नर्मदा बचाओ आणि मानवी हक्क आंदोलनासाठी दिली आणि असं भक्कम आणि आर्थिक सुबत्ता देणारं आयुष्य त्यांनी जाणीवपूर्वक नाकारलं. ही सोपी बाब नसते, यासाठी मोठी किंमत मोजावी लागते आणि तेवढा प्रामाणिकपणा आणि जनेतेसाठी लढण्य़ाची एक अंतरिक प्रेरणा लागते. अरुंधती रॉय त्यात खऱ्या उतरल्या आहेत.
एखाद्या विषयावर मुद्दाम वाद निर्माण व्हावा, म्हणून अरुंधती राय यांनी कधीच विचार मांडले नाहीत किंवा उगाच कोणाला खांद्यावर घेतलं नाही. त्यांच्या आजवरच्या मंथनातून, विवेकपूर्ण चिंतनातून त्यांची जी जडणघडण होत गेली, विचारधारा बनत गेली, भारतीय समाज व्यवस्थेविषयी ठोस मतं बनत गेली, त्यानुसारच त्या व्यक्त होतात. सरकार कोणाचं आहे, हा तसा त्यांच्यासाठी महत्वाचा विषय नाही. त्यांनी आजवर काँग्रेस सरकारच्या धोरणांवर प्रखर टीका केलेली आहे. 1998 च्या मे महिन्यात अटलबिहारी वाजपेयी सरकारने पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून पोखरणच्या आखातात अणुचाचण्या केल्या. केवढा गहजब माजला. केवढा जल्लोश जाहला. ‘हिंदूबॉम्ब’ हाती आल्याने भारतवर्षाला हर्षवायू व्हायचाच तेवढा शिल्लक राहिला. ‘ही तर केवळ झलक आहे, अजून 999 चाचण्या शिल्लक आहेत’, असा अहंकार राष्ट्रप्रेमींमध्ये ऊतू जाताना त्या वेळी जगाने पाहिला. पण, त्या उन्मादी अवस्थेला ‘एंड ऑफ इमॅजिनेशन’ शीर्षकाचा निबंध “हिंदू’दैनिकात लिहून रॉय यांनी टाचणी लावली. उपरोध आणि सात्त्विक संतापाची धार अधिकच तीव्र असलेल्या या निबंधात, ‘मी तोंडावर पडायला तयार आहे, मी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन स्वत:ची अवहेलना करवून घ्यायलाही तयार आहे, कारण वेळच तशी आली आहेे. आताच्या स्थितीत मूग गिळून गप्प बसणं भविष्यासाठी अवघड होऊन बसणार आहे. दी एअर इज थीक, वुईथ अग्लिनेस, अँड देअर्स दी अनमिस्टेकेबल स्टेंच ऑफ फॅसिझम ऑन दी ब्रीझ… म्हणजेच वाऱ्याला दडपशाहीचा दर्प येऊ लागलाय…’ असं म्हणून त्यांनी वीस वर्षांपूर्वीच तमाम हिंदुत्ववादी मंडळींचं शत्रुत्व ओढवून घेतलं.
काश्मिरी जनतेच्या स्वतंत्र होण्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा
युद्धखोरी, दहशतवाद, अमेरिकी साम्राज्यवाद यावर अरुंधती सातत्याने हल्लाबोल करत असतात. अमेरिकेच्या पाठिंब्यावर इस्त्रायलची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी दादागिरी सुरू असते त्यावर अरुंधती यांनी जागतिक पातळीवर आवाज उठवला होता. लेबनॉनवरील इस्त्रायलच्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला होता. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर अमेरिकी विचारवंत नॉम चॉस्की यांच्यासह जगभरातील मान्यवरांच्या सहीने त्यांनी जागतिक समुहाला आवाहन करणारं पत्र प्रसिद्ध केलं होतं. इस्त्रायल हे एक दहशतवादी राष्ट्र आहे, ही त्यांची भूमिका आजही कायम आहे. या विषयावरील त्यांच्या भूमिकेत कधीही बदल झाला नाही, उलट ती भूमिका अधिकच प्रखर होत गेली. इराकवरील अमेरिकचं आक्रमण, अफगाणिस्थानमध्ये अमेरिकचा हस्तक्षेप यावर अरुंधती नेहमीच बोलत असतात. त्यामुळेच 2006 मध्ये जॉज बूश यांच्या भारत भेटीला त्यांनी विरोध केला होता. जॉज बूश हे युद्ध गुन्हेगार आहेत, असं त्याचं स्पष्ट मत होतं. ऑगस्ट 2008 मध्ये त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत दिली होती. पत्रकार परिषदही आयोजित केली. काश्मिरी जनतेच्या स्वतंत्र होण्याच्या मागणीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. एकीकडे भारतीय सैन्य आणि दुसरीकडे पाकिस्तानी दहशतवादी यांच्या कचाट्यात काश्मिरी जनता भरडली जात आहे, तेव्हा काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे, अशी त्यांची भूमिका. या भूमिकेवर त्यांना देशभर खूप टिकेला सामारे जावं लागलं. पण त्यांनी आपले विचार मागे घेतले नाहीत. पुन्हा 2010 मध्ये त्यांनी काश्मिरी जनतेचं स्वातंत्र्य हाच काश्मिरी समस्येवरचा एकमेव मार्ग असल्याचे एका भाषणात सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासह देशभरातील अनेक मान्यवरांनी टिका केली. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पण आजही त्यांचा काश्मिरी जनतेच्या स्वातंत्र्याला पाठिंबाच आहे. याच भूमिकेतून त्यांनी संसदेवरच्या हल्ल्याचा आरोपी अफजल गुरुच्या फाशीला विरोध केला होता. अफजल गुरुला न्याय मिळाला नाही, त्याच्यावर पक्षपातीपणे खटला चालविण्यात आला, असा त्यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर अभिनेता-खासदार परेश रावल यांनी ‘काश्मिरात दगडफेक्या निदर्शकांपेक्षा अरुंधती रॉयलाच लष्कराच्या जीपला बांधायला हवं’, असं विखारी वक्तव्य करून अरुंधती वर होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यास धग दिली होती.

नक्षलवादी खरे देशभक्त आहेत, असा दावा
काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष किंवा इतर संसदीय पक्षांची भारताच्या आदिवासी, आणि दलितांबाबत सारखीच भूमिका असल्याचं ठामपणे अरुंधती सांगतात. पी. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांच्यावर अरुंधती यांनी कठोर शब्दात टीका केली होती. चिदंबरम देशी- विदेशी भांडवलदारांचे दलाल आहेत, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे मध्य भारतातील दंडकारण्यात सुरु असलेल्या आदिवासींचा लढा म्हणजेच नक्षलवादी चळवळ चिरडून टाकण्यासाठी चिदंबरम यांनी सैन्य कारवाई केली, असं स्पष्ट करुन नक्षलवादी खरे देशभक्त आहेत, असा दावा त्यांनी केला होता. अत्याधुनिक हत्यारे घेऊन भारतीय सैन्य दंडकारण्यात कारवाई करत आहेत तर त्यांच्याविरोधात लढणाऱ्या, आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या आदिवासींकडे पांरपारिक हत्यारे आहेत. त्यामुळे हा लढा असमान असून आदिवासींच्या लढ्याला पाठिंबाच दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेवरही देशभर टिकेचे मोहोळ उठलं होतं. पण त्या एवढ्यावर थांबल्या नाहीत, तर त्यांनी थेट दंडकारण्यात प्रवेश केला. तिथ जाऊन नक्षलवादी कार्यकर्ते, स्थानिक आदिवासी यांच्यासोबत काही दिवस-रात्र घालवली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं जगणं अनुभवलं आणि जंगलातून बाहेर आल्यावर त्यांनी ‘वॉकिंग विथ द कॉम्रेड्स’,‘कॅपिटलिझम- ए घोस्ट स्टोरी’ असे आदिवासींना नागवणाऱ्या भांडवलदारांच्या विरोधात सविस्तर लेख लिहून आपली भूमिका मांडली.
अण्णा हजारे यांच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले
लोकशाहीवादी असलेल्या अरुंधती रॉय प्रवाहासोबत वाहून जात नाहीत, मान्यताप्राप्त किंवा प्रसिद्ध असलेल्या एखाद्या व्यक्तीबाबत ठोस भूमिका घेण्यास, टीका करण्यास त्या कचरत नाहीत. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे अण्णा हजारे… अण्णांनी दिल्लीत लोकपाल बिलासाठी उपोषण सुरु केले तेव्हा अरुंधती रॉय यांनी देशातील लोकशाहीवादी जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. अण्णा हजारे यांना अभिप्रेत असलेले लोकपाल विधेयक हे भारतीय संसदीय लोकशाही व्यवस्थेला छेद देणारे आहे, असं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलं होतं. फक्त लोकपालच नव्हे तर अण्णा हजारे यांच्या प्रामाणिकपणावरच अरुंधती रॉय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अण्णा हजारे यांना धर्मनिरपेक्ष मानण्यास त्यांनी नकार दिला होता. हे आंदोलनच नव्हे तर अण्णांच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी पोषक आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. भ्रष्टाचाराबाबत अण्णांची भूमिका अर्धवट आहे. त्यांना आणि टीम अण्णांना या देशातील परिस्थितीचे भान नाही, असं सांगून या आंदोलनाला मिळालेल्या प्रसारमध्यमांच्या पाठिंब्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला होता. अण्णा हजारेंच्या या आंदोलनानंतर लगेचच नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केलं. तेव्हा अरुंधती रॉय यांनी आपल्या खास शैलीत विश्लेषण केलं होतं. नरेंद्र मोदी यांची उमेदवारी म्हणजे या देशाचं दुर्देव आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. मोदी हे या देशातील बड्या उद्योग घराण्यांचे उमेदवार आहेत, कारण ते अतिशय आक्रमक आहे… त्यांना सैन्याचा आणि प्रसारमाध्यमांचा पाठिंबा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे म्हणजे या देशातील सर्व घटनात्मक संस्थांचा ऱ्हास आणि बहुसांस्कृतिक देशाचं हिंदूकरण अशी मांडणी त्यांनी केली होती.
खऱ्या विचारवंताचं लक्षण काय असतं? भविष्याचा वेध घेणं आणि सद्यस्थितीशी त्याची सांगड घालणं, विश्लेषण करुन जनतेला सज्ञान करणं… हे जर विचारवंताचं काम आणि लक्षण असेल तर अरुंधती रॉय त्यात आघाडीवर आहेत. अरुंधती रॉय फार पूर्वीपासून या देशातील ब्राम्हण्यवादाबाबत एक वेगळी मांडणी करत आहेत. त्यासंबंधी खरं तर देशात खूप चर्चा होणं गरजेचं होतं, परंतू अरुंधती रॉय यांच्या मतांना आणि विचारांना ज्याप्रमाणे प्रसिद्धी मिळाली, त्यांची सकारात्मक, नकारात्मक दखल घेतली तशी त्यांच्या ब्राम्हण्यवादाबाबतच्या विचारांची दखल घेण्यात आली नाही. स्वातंत्र्यानंतर या देशातील सत्तेचे, शासक व्यवस्थेचे चारित्र्य हे ब्राम्हणी आहे असे त्या मानतात. त्यामुळे जिथे जिथे अब्राम्हणी हितसंबध आले तिथे शासक व्यवस्थेने बळाचा, खरं तर सैन्याचा वापर करुन अब्राम्हणी लढे मोडून काढले. या देशातील आदिवासी, दलित आणि कामगार हे अब्राम्हणी आहेत. काश्मिरी जनता असेल किंवा इशान्य भारतातील जनता, हे सर्व अब्राम्हणी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर स्वातंत्र्यानंतर सैन्य कारवाई करण्यात आली, असा एक वेगळा तर्क अरुंधती यांनी मांडला. आपल्या या वक्तव्यावर तब्बल आठ वर्षांनी त्यांनी “”आपण सर्वच जण जीवनात कधीतरी चुकून असे काही बोलून जातो जे मुर्खपणाचे असते, चुकीचे असते. माझ्या वक्तव्यामध्ये जर कोणालाही काही चुकीचे वाटले असेल तर मी त्यासाठी माफी मागते.” अशा शब्दांत माफीही मागितली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही
अनेक आंबेडकरी, समाजवादी, डावे विचारवंत भारतीय शासक व्यवस्थेचे अरुंधती रॉय यांच्याप्रमाणे विश्लेषण करत नाहीत. हा त्यांचा विचार अदखलपात्र करुन दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला असण्याचीच दाट शक्यता आहे. अलिकडच्या काळात अरुंधती रॉय प्रमख आंबेडकरवादी झालेल्या आहेत. भारतीय जातीव्यवस्था समजून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही, असं त्या मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “अनहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने अरुंधती रॉय यांनी एका ग्रंथाचा परिचय करुन देणारी 120 पानांची पुस्तिका लिहीली. “द डॉक्टर अँन्ड द सेंट: रेस, अनहिलेशन ऑफ कास्ट, द डिबेट बिटवीन डॉ. आंबेडकर अँन्ड एम. के. गांधी’ असं या पुस्तिकेचे शिर्षक आहे. भारतीय जातीव्यवस्थेकडे गांधीवादी आणि इतरांनी केलेले दुर्लक्ष, भारतातील जातीय शोषण, हिंदूराष्ट्रवाद अशा ज्वलंत प्रश्नांवर अरुंधती आपल्याला आंबेडकरी विचारांचा परिचय करुन देतात. या पुस्तिकेवरूनही मोठा वाद सुरु आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जातीव्यवस्था नष्ट करण्य़ासाठी आंबेडकरांनी जो संघर्ष केला त्याला इतिहासात तोड नाही, असं स्पष्ट करतानाच अरुंधती रॉय महात्मा गांधींच्या या विषयांवरील प्रयत्नांवर सडकून टीका करतात. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची अशी तुलना अनेकांना मान्य नाही. आंबेडकर यांचं योगदान मान्य करताना अरुंधती महात्मा गांधींवर अन्याय करीत आहेत, खरं तर त्यांनी ही पुस्तिका महात्मा गांधी यांच्यावर टीका करण्यासाठीच लिहली, असाही आरोप काही विचारवंतांनी केला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांची एकूण चळवळ याबाबत अरुंधती यांनी केलेलं विश्लेषण कोणालाही नाकाराता येत नाही. त्या केवळ पुस्तिका लिहून थांबल्या नाहीत तर जगभर फिरुन या पुस्तिकेवर बोलत आहेत, परिषदा घेत आहेत आणि भारतीय जातीव्यवस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती जगभर सांगत आहेत. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की एकाही आंबेडकरी विचारवंताने अरुंधती यांचे जाहीर समर्थन केलेले नाही. आपल्याकडे असा कोतेपणा नेहमीच केला जातो.
मध्यंतरी ब्रिटनमध्ये असताना याच विषयावर त्यांचे भाषण झालं. तिथेही त्यांना काही लोकांनी अनेक प्रश्न विचारले. प्रश्न विचारण्यास अरुंधती याची काहीच हरकत नसते आणि अशा प्रश्नांवर डगमगून जाण्याचा त्यांचा स्वभावही नाही. मात्र तिथे त्यांच्या ब्राम्हण असण्यावरून बरीच टीका सुरू झाली. अरुंधती या टीकेवर प्रचंड चिडल्या आणि मी ब्राम्हण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे असे मोठे लेखक, विचारवंत हे ब्राम्हण समाजाचेच असतात, असं मानण्याची प्रथाच पडलेली आहे. त्यामुळे अरुंधती ब्राम्हणच असाव्यात, असा काही लोकांचा समज होता. मात्र आपण ब्राम्हण नाही, असं अरुंधती यांनीच स्पष्ट केल्यामुळे खरं तर हा प्रश्न मिटायला हवा होता, मात्र तो अधिकच चिघळला. सोशल मीडियावर त्यांच्या ब्राम्हण असण्यावरुन प्रचंड गदारोळ सुरु आहे. खरं आजच्या घडीला अरुंधती रॉय जात, धर्म, वंश, वर्ग याच्या कितीतरी पुढे निघून गेल्या आहेत… ही प्रक्रिया सोपी नसते. भल्याभल्यांना ते शक्य होत नाही. “डी कास्ट’ आणि “डी क्लास’ होणं ही एक स्वत:मध्येच घडणारी मोठी प्रक्रिया असते. या देशात “डी क्लास’ होणे सोपे जाईल, पण “डी कास्ट’ होणं फार अवघड आहे. अरुंधती रॉय यांचे लिखाण, त्यांची या देशाच्या लोकशाही मुल्यांबाबत असलेली आस्था आणि त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी, प्रसंगी तुरुंगवास भोगण्याची मानसिकता आणि सामान्य माणसांविषयी त्यांच्या मनात, विचारात असलेली स्पष्टता, तळमळ …या साऱ्यांचा आपण विचार केला तर एक वेगळ्या अरुंधती आपल्याला भेटतात.
अरुंधती ब्राम्हण नाहीत तर मग आहेत तरी कोण? त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांच्या व्यक्तिमत्वाला असे वेगळे पैलू कसे पडले, त्यांच्यात असे धाडस कसं निर्माण झाले? अशी हिंमत, ताकद आणि क्षमता अरुंधती रॉय यांनी मात्र पुन:पुन्हा दाखवली आहे. याची मुळं- शिलॉँग शहरात अतिशय सामान्य घरात झालेला जन्म आणि बालपण… सिरियन ख्रिश्चन आई आणि धर्माने हिंदू बाप, वयाच्या दुसऱ्याच वर्षी ते विभक्त झाल्याने वाट्याला आलेलं दुभंगलेपण, नातेवाइकांच्या दयेवरचं समाजातल्या अन्य पीडित वर्गासोबतचं काटकसरीचं जगणं, वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून बाहेर पडून स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी केलेली अहोरात्र धडपड, त्या धडपडीतून विकसित होत गेलेली समाजिक जाण आणि सौंदर्यदृष्टी, या सौंदर्यदृष्टीचे नगर नियोजन आणि वास्तुशास्त्राच्या शिक्षणात, पुढे चित्रपट कथा-पटकथा आणि कादंबरी लेखनात उमटलेले प्रतिबिंब या साऱ्यांत दडलेली आहेत.

‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ कादंबरी लिहिण्यासाठी अरुंधती यांनी चार वर्षे घेतली. त्यांच्या या पहिल्याच कांदबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. आपल्या आयुष्याची वाट शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अरुंधती रॉय यांना आता आपला मार्ग सापडला होता. त्यांच्या या कांदबरीने जगभरात विक्रीचे विक्रम केले. काही महिन्यातच जगभरातील 20 भाषांत या कांदबरीच्या अनुवादाचे करार झाले. अरुंधती करोडपती झाल्या होत्या. पण एवढे मोठे यश पदरात पडल्यानंतर अरुंधती रॉय या लेखकाचा “लेखकराव’ झाला नाही तर त्या अधिकच समाजात मिसळत गेल्या, अधिक सामाजिक होत गेल्या… त्यांची एक राजकीय भूमिका होतीच, ती अधिक प्रगल्भ होत गेली आणि म्हणूनच आज जगातील त्या एक प्रमुख लेखिका म्हणून ओळखल्या जातात. जगभरातील प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचं लिखाण प्रसिद्ध होतं असतं. गेल्या दोन दशकात म्हणजे अरुंधती यांच्या समकालिन असलेले अनेक भारतीय वंशाच्या लेखकांच्या पुस्तकांना जगभरी मागणी आहे. सलमान रश्दी, विक्रम शेठ, आर. के. नारायनन, राजा राव, अनिता देसाई, किरण देसाई वगैरेंची नावे त्यात घेता येतील, पण या साऱ्यांपेक्षा अरुंधती रॉय यांचं वेगळेपण उठून दिसतं. आजवर त्यांचा किती पुरस्कारने सन्मान झाला, हा प्रश्न आता महत्वाचा नाही. त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला सुमारे आठ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. पुस्तकांची मिळणारी रॉयल्टीही कोट्यवधी रुपयांची आहे. त्यामुळे आता अरुंधती पुरस्कारांच्या पुढे गेल्या आहेत, असं म्हणावं लागेल.
काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली त्यांची ‘दी मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ ही कादंबरी. काश्मिरी फुटीरवाद- मध्य भारतातला नक्षलवाद, गुजरातपासून मुजफ्फरनगरपर्यंतच्या जातीय दंगली, विकासाच्या चेहऱ्याआडून घडलेलं हिंदुत्ववादी सत्तांतर असा या कादंबरीचा आशय-विषय. त्यातली कब्रस्थानात आपलं जगणं सावरणारी तृतीयपंथी अंजुम, तिचा दलित सोबती, आंधळा इमाम, अल्पसंख्य समुदायाचं प्रतिनिधित्व करणारा काश्मिरी फुटीरवादी मुसा, मुसाच्या प्रेमातली बंडखोर विचारांची तिलोत्तमा उर्फ तिलो, गुजरात दंगलीत हिंसा अनुभवल्यानंतर सद्दाम हुसेन असं नाव धारण केलेला खालच्या जातीतला हिंदू तरुण, निष्ठुर नोकरशहा असलेला बिप्लव दासगुप्ता, ही पात्रं आणि त्यांची डोकं भंजाळून टाकणारी कहाणी… हे सारं अरुंधती रॉय यांच्या ‘राष्ट्रद्रोहा’चा आणखी एक पुरावा ठरावा इतकं ठोस आहे.
अरुंधती रॉय तत्त्वाच्या ताठर आहेत. अनेकांच्या मते, तर्ककर्कश आणि खूप विक्षिप्तही आहेत. एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात ‘ओल्ड मॉन्क’चा ग्लास, ही त्यांची विरोधकांच्या नजरेतली प्रतिमा आहे. त्यांचं पीडितांसाठीचं झुरणं भरल्यापोटी त्यांनी काढलेले दु:खाचे कढ आहेत. पण महाराष्ट्रात, भारतात असे लाखोच्या संख्येने तत्त्वाचे कठोर बाया-पुरुष आहेत. तेही तितकेच तर्ककर्कश आहेत. इंग्रजाळलेले, सुखी माणसाचे सदरे चढवलेलेही आहेत. पण यातले किती जिवाची, पदाची, प्रतिष्ठेची पर्वा न करता हिंसेने घेरलेल्या नक्षलींसोबत दिवस काढण्याची हिंमत राखून आहेत? किती रक्तरंजित काश्मीरमध्ये जाऊन दहशतवादाची प्रत्यक्ष झळ अनुभवण्याची मानसिक-भावनिक ताकद राखून आहेत? किती जण जात-धर्मापलीकडे जाऊन मानवतेचा धागा न सोडता हे सगळं तर्कसंगतपणे मांडण्याची बौद्धिक क्षमता राखून आहेत? आणि किती जणांकडे ‘मी कुणी शुद्ध-पवित्र नाही. इतरांप्रमाणेच माझ्यातही दोष आहेत. परस्परविरोधी गोष्टी माझ्यातही ठासून भरल्यात. मी गांधीजी नाही किंवा गांधीजींसारखीही नाही…’ असं बेधडकपणे सांगण्याचा प्रामाणिकपणा शिल्लक आहे? त्यामुळे अरुंधती यांची पुस्तके, लेख, प्रबंध वाचले न् वाचले, ते समजले न् समजले, अरुंधती रॉय नावाची ही “पंगेवाली बाई’ वर्तमानाच्या संदर्भात समजून घेणं नितांत तातडीचं आहे.






