लहान मुलींचं पहिलं खेळणं म्हणजे बाहुली. आपल्या बाहुलीशी गप्पा मारत बसणं, तिची काळजी घेणं, शक्य असल्यास नेहमी आपल्या जवळ ठेवणं, लहान मुलींना खूपच आवडतं. लहान मुलींच्या बाहुला-बाहुलीच्या या विश्वात सर्वाधिक प्रसिध्द असलेली बाहुली म्हणजे, बार्बी डॉल. अतिशय नाजूक, निरागस डोळे असलेली ही बाहुली आपल्याजवळ असावी, असं जगातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. आणि आपल्या मुलीच्या हाती एखादी चांगली बाहुली असावी या विचारातूनच, रुथ हँडलर या उद्योजिका-आईने जन्म दिला बार्बी डॉलला.
तर अशा या लहान मुलांना आवडणाऱ्या बार्बी गर्लवर आजवर 44 पेक्षा अधिक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बार्बी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
साधारण मध्यमवर्गीय भारतीय घरांमध्ये बार्बीचं आगमन ऐंशीनव्वदच्या दशकात झालं असावं, मुलींच्या खेळण्यात बाहुल्या तर काही शतकांपासून होत्याच. शिडशिडीत, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची ही बार्बी भारतीयच नव्हे तर जगभरातल्या मुलींची लाडकी होती. बार्बीचं वैशिष्ट्य म्हणजे या सहा दशकात ती सतत चर्चेत राहिली, बातम्यांचा विषय झाली, टीकेची धनी झाली, संशोधनाचा विषय झाली.
9 मार्च 1959 ला ‘बार्बी’ जन्माला आली. न्यूयॉर्कच्या एका खेळण्यांच्या प्रदर्शनात बार्बीचे आगमन झाले तेव्हा व्यापारी ही बाहुली विकायला फारसे उत्सुक नव्हते. तेव्हाच्या ‘ठकी’ सारख्या दिसणार्या बाहुल्या आणि रांगणारी ‘बबड्या’ सारखी बाळं हीच खेळणी बाजारातली लोकप्रिय खेळणी होती. पण बार्बी थोड्याच अवधीत लोकप्रिय झाली आणि आज 64 व्या वर्षीही तशीच चिरतरुण आहे.

बार्बीची जन्मकथा
रुथ हँडलर हे बार्बीच्या आईचे नाव! रुथला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. या मुलांच्या खेळण्यांकडे बघताना रुथच्या लक्षात आले की मुलाच्या खेळण्यात सैनीक -डॉक्टर- अंतराळवीर अशी खेळणी असल्याने तो भविष्यात कसा दिसेल याबद्दल स्वप्न रंजन करू शकत होता, पण मुलीकडे असलेल्या बाहुल्या तिला भविष्यात फक्त ‘आई’ ही एकच भूमिका दाखवत होत्या. दुसर्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात अमेरिकेत महिलांच्या सामाजिक भूमिकेत होत असलेले बदल रुथच्या डोळ्यासमोर घडत होते. त्यामुळे आपण पारंपारिक बाहुल्यांपेक्षा मुलीला काहीतरी वेगळे स्वप्न मुलीला द्यावे या विचारातून बार्बीचा जन्म झाला. थोड्याच वर्षात बार्बी घरोघरी पोहचली. मुलींना आपण काहीतरी वेगळे करू शकतो याची स्फूर्ती बार्बीने दिली आणि विचारात क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य एखाद्या खेळण्यातही असू शकते हे सिध्द केले.
रूथ स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर गेल्या असताना तिथे त्यांना एक जर्मन बाहुली दिसली. तिचं नाव होतं लिली. ही बाहुली तरूण मुलीची होती. जर्मन वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या एका व्यंगचित्र मालिकेवर ही बाहुली बेतली होती. तिचं नाव होतं ‘लिली’…लिली मादक होती, आणि कुठल्या ना कुठल्या अडचणीत सापडायची जिथे तिला पुरुषांची मदत घ्यावी लागायची. पुरुषांना घायाळ करेल अशी तिची अदा होती. 1959 साली बार्बी बाहुली बाजारात आली.
बार्बी अगदीच लिली सारखी नव्हती. लिली पुरुषांना आकर्षित करण्यासाठी बनवली होती तर बार्बी लहान मुलींना, विशेषतः किशोरवयीन मुलींना, खेळण्यासाठी बनवली गेली होती. पण काही साम्यस्थळं होती. बार्बीलाही सेक्सी बनवलं गेलं होतं. तिची शरीरयष्टी अमानवी होती. म्हणजे मोठे स्तन, अतिशय बारीक कंबर, सोनेरी केस… त्यावेळी बार्बीला एकच गोष्ट करायची असायची, ती म्हणजे शॉपिंग. तिला सगळं गुलाबी आवडायचं. तिच्या पायात कायम उंच टाचेचे सँडल असायचे. तिची टॅगलाईनही होती, “मला शॉपिंगसाठी पुरेसा वेळ मिळेल ना?”
बार्बी पहिल्यांदा बाजारात आली तीही काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा स्वीमसुट घालून. या बाहुलीची खासियत ही होती की तिच्या ॲक्सेसरीज बदलता यायच्या, नवनवीन गोष्टी तिच्यासाठी विकत घेता यायच्या. मग तिचे कानातले असोत, कॅट-आय गॉगल्स किंवा इटूकले पिटूकले मिनी स्कर्ट. बार्बी हिट ठरली होती. आता बार्बीला बॉयफ्रेंड हवा. मग 1961 साली केन नावाची तरूणाची बाहुली बाजारात आली. बार्बीचं आयुष्य त्या काळात ज्या ज्या गोष्टी बायकी म्हणून समजल्या जायच्या, त्याभोवतीच फिरायचं. त्या गोष्टी गुलाबी वेष्टनात लाखो मुलींना विकल्या जाऊ लागल्या होत्या.

बार्बीच्या फिगरवर सुरू झाली टीका
दिवस सरले तसे लहानमोठे बदल बार्बीत होत गेले. सत्तरचं दशक संपलं तेव्हा महिला अधिक स्वतंत्र, सामर्थ्यवान झाल्या होत्या, त्याचं प्रतिबिंब बार्बीत पडलं. अंतराळवीर बार्बी बाजारात आली. अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांची चळवळ जोर धरायला लागली तेव्हा कृष्णवर्णीय बार्बी आली. वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारी बार्बी दिसायला लागली पण बार्बीचं ‘दिसणं’ बदललं नाही. ती तशीच राहिली. पुरूषी सोंदर्याच्या कल्पनेत जखडलेली. सडपातळ, भरीव स्तन आणि अतिशय बारीक कंबर असणारी.
बार्बी जरी लहान मुलींसाठी बाहुली असली तरी ती प्रौढ व्यक्तीच्या रूपात होती. तिचं शरीर त्या वेळच्या सौंदर्याच्या परिमाणांमध्ये बसणारं होतं, किंवा असंही म्हणता येईल की बार्बीसारखं ‘प्रमाणबद्ध’ शरीर हळूहळू तरुण मुलींना हवं झालं. स्त्रीवादी चळवळीने अर्थात यावर टीका केली. बार्बीच्या कामापेक्षा तिच्या कपड्यांकडे जास्त लक्ष वेधलं जात होतं. त्यामुळे बार्बीचे लहान मुलींच्या मनावर होणारे परिणाम यावर चर्चा झडायला लागल्या.

कृष्णवर्णीय बार्बीपासून हिजाब गर्ल बार्बीपर्यंत…
… प्रचंड टीका झाल्यावर मात्र हळूहळू बार्बीचं रुप बदलायला लागलं. जन्माला आल्यानंतर 21 वर्षांनी, 1980 मध्ये पहिली कृष्णवर्णीय बार्बी बाजारात आली. आजच्या घडीला बार्बी घ्यायची तर ती सात रंगांची त्वचा, 22 रंगांचे डोळे, आणि 24 केशभूषा इतकी विविध रूपांमध्ये आहे. बार्बीने गेल्या काही वर्षांत आपली इमेज बदलायचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या कर्तृत्ववान महिलांवर आधारित बाहुल्या आणल्या.या प्रख्यात टेनिसपटू नाओमी ओसाकावर आधारित बाहुली असेल किंवा तेरा वर्षांची स्केटबोर्डर स्काय ब्राऊन हिच्यासारखी दिसणारी बार्बी असेल, गेल्या काही बार्बीचं कित्येक दशक टिकून राहिलेलं ‘नाजूकसाजूक गुलाबी राजकन्या’ हे रूप बदलताना दिसतंय. 2016 साली बार्बीच्या तीन वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या बाहुल्या काढल्या गेल्या. उंच, गुबगुबीत आणि बुटकी. लवकरच अमेरिकेतील बाजारात हिजाब घातलेली बार्बी बाहुली विक्रीसाठी ठेवली जाणार आहे. या नव्या रुपातल्या बार्बीला हनीफाने हिजार्बी असे नाव दिले आहे. इतकचं नव्हे तर गेल्या काही वर्षात ऐकण्यासाठी कानाला उपकरण लावलेली, कृत्रिम अवयवरोपण झालेली, व्हीलचेअरवर बसलेली अशा विविध स्वरुपातल्या बार्बी तयार केल्या होत्या.
बार्बीची आता साठी उलटलेय. मोठ्या स्तनांची, छोटे गुलाबी मिनीस्कर्ट घालणारी, जराशी मंद बार्बी जी सतत तक्रार करायची की गणित किती अवघड असतं बाई… ती जाऊन आता कोव्हीड-19 वर लस शोधणारी बार्बी बाजारात आलीये. बार्बी आता मानवी हक्क, LGBTQ समुदायाचे हक्क यावरही बोलते. याचा फायदा तिच्या निर्मिती कंपनी मॅटेलला होताना दिसतोय.

1959 अशी दिसत होती पहिली बार्बी !

1965-अंतराळवीर बार्बी

1967 सेलेब्रिटी बार्बी

1968 क्रिस्टी बार्बी

1971 -बार्बी कॅम्पर

1980 -नव्या मैत्रीणी

80 च्या दशकात

1992 -प्रेसीडेंट बार्बी

सन 2000 आणि पुढे






