मानवाला निसर्गरम्य वातावरणाचा मोह स्वाभाविक आहे. या वातावरणात त्याला मानसिक शांती आणि समाधान लाभते. मनमोहक नंदनवन, त्यातली हिरवळ, त्यात खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सारे माणसाला मानसिक समाधान देते. म्हणूनच सृष्टीच्या निर्मात्याने यशस्वी जीवनाच्या मोबदल्यात मृत्युपश्चात जन्नत अर्थात नंदनवन देण्याचे अभिवचन दिले. जर पर्यावरणात समतोल असेल तर मनवीजीवन निरोगी आणि शांत राहील. परंतु पर्यावरण बिघडले तर जीवन धोक्यात येईल. म्हणून जीवनपद्धतीच्या सर्व बाबीप्रमाणे इस्लाम आपल्याला पर्यावरणाच्या संवर्धनाचे सुवर्ण नियम देखील प्रदान करतो. ज्याद्वारे आपण आपल्या सुखद जीवनासाठी त्याचा पुरेपूर सद्उपयोग करू शकतो.
पर्यावरण समतोलाचा विचार
सृष्टीच्या निर्मात्याने या निसर्गाला अद्भूतरित्या संतुलित केले आहे. जोपर्यंत त्यामध्ये मानवी हस्तक्षेप होत नाही, तोपर्यंत ते संतुलित राहील, कारण अल्लाहने पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असलेला जीवनाचा प्रत्येक घटक विशिष्ट गुणधर्म आणि उपयुक्ततेसह तयार केला आहे. अल्लाहने सूचना दिली की, “आम्ही भूतलाचा विस्तार केला, त्यात पर्वत रोवले, प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य प्रमाणात उगविली आणि त्यात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध केली. (कुरआन 15:19) “आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे. यात पर्वतांच्या रांगा रोवल्या आणि नद्या प्रवाहित केल्या त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळाच्या जोड्या निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करतो. या सर्व वस्तूमध्ये अनेक निशाण्या आहेत या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात. (कुरआन 13:3)

कुरआनमधील या मार्गदर्शनावरून स्पष्ट होते की, अल्लाहने पृथ्वीवर सर्व काही संतुलित पद्धतीने निर्माण केले आहे. त्याने अशा वनस्पतींच्या अनेक प्रजाती निर्माण केल्या ज्या जैविक प्रजातीच्या अन्न व इतर गरजा पूर्ण करत असताना पर्यावरणाचा समतोल राखतात. परंतु जर मनुष्याने या नैसर्गिक घटकांचा बेछूट वापर केल्यास सृष्टीचे संतुलन राखले जाणार नाही आणि पर्यायाने जैवविविधतेच्या गरजा पूर्ण होऊ शकणार नाही. यामुळे सृष्टीवर असंतुलन निर्माण होऊन जीवन कठीण होईल. सृष्टीच्या निर्मात्याने मानवास सृष्टीवर सुखमय वातावरण निर्माण करण्याची व्यवस्था केली.
वरदानाकडून विनाशाकडे
मानवाला निसर्गाची प्रचंड ओढ असतानादेखील आज केवळ भौतिकवाद आणि चंगळवादाच्या जाळ्यात तो आपल्या सर्व नैसर्गिक आणि सामाजिक जबाबदारी विसरून अतिरेकीपणाकडे वाटचाल करत आहे. ही जीवनपध्दती निसर्गाशी विद्रोह करणारी आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत असून जग विनाशाकडे जात आहे. इस्लामने माणसाला समाजाप्रति जबाबदार माणूस बनवितो. परंतु आधुनिक जीवनपद्धतीत व्यक्ती ईश्वरी धर्माच्या बेड्यातून मुक्त झाला आणि पर्यायाने सामाजिक जबाबदारीतूनदेखील मुक्त होत चालला आहे. शारीरिक इच्छापूर्ती आणि वासनापूर्ती हेच त्याच्या जीवनाचे उद्देश झाले आहे. त्यामुळे आज आधुनिक संसाधनाच्या उपयोग शाश्वत विकासाऐवजी पर्यावरणाच्या विनाशात होताना दिसत आहे. भौतिक प्रगतीचे शिखर गाठूनदेखील त्याला आत्मिक समाधान नाही. स्वार्थ आणि शोषणाच्या स्पर्धेत माणूस एवढा पिसाळला आहे की, त्याने बुद्धीचा दुरुपयोग करून विज्ञान आणि तंत्रज्ञानासारख्या वरदानाचा गैरफायदा संपूर्ण मानवतेला विनाशाकडे नेणार्या अणुबॉम्बसाठी केला. जो क्षणार्धात कोट्यावधी लोकांना आणि देशांना बेचिराख करून सोडेल.
नैतिक मूल्यांचे संवर्धन
दुर्दैवाने प्रदूषणाला लोकांनी वायू प्रदूषण, जलप्रदूषण, जमीन प्रदूषण, अस्वच्छता इ. पर्यत मर्यादित करून ठेवले आहे. वास्तविक पाहता प्रदूषणाची खरी सुरवात ही वैचारिक प्रदूषणाने होते. त्याबरोबरच नैतिक आणि सामाजिक मूल्यांच्या र्हासाला सुरवात होते जेव्हा विचार प्रदूषित होतात तेव्हा आचार प्रदूषित होऊन संपूर्ण वातावरणाला ते प्रदूषित करतात. म्हणून पर्यावरण संवर्धनाची खरी सुरवात ही नैतिक मूल्यांच्या संवर्धनाने होते. ही मूल्ये माणसात सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करतात. परंतु धार्मिक अधिष्ठानाशिवाय नैतिकमूल्ये जोपासू जाऊ शकत नाही. इस्लाम माणसात समाजाप्रति जबाबदारीची भावना निर्माण करतो. किंबहुना, त्याला अनिवार्य कर्तव्य संबोधतो. त्याच्या सर्व उपासनापध्दती देखील सामूहिकरीत्या अदा केले जातात, जेणेकरून समाजात प्रेम व सौर्हाद निर्माण होईल. इस्लाम सर्वप्रथम व्यक्तीच्या विचारांचे शुद्धीकरण करतो. सर्व अशुद्धतेपासून आणि वैचारिक प्रदूषणापासून मुक्त करून त्याला सकारात्मक आणि रचनात्मक विचाराकडे प्रवृत्त करतो. यामुळेच उत्कृष्ट व्यक्ती आणि समाजघडविणारे ‘कुरआन’ हे क्रांतिकारी ‘यशशास्त्र’ आहे.

स्वच्छतेला श्रद्धेचे अधिष्ठान
निसर्ग मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे. म्हणून इस्लाम मानवजातीच्या कल्याणासाठी त्याचे जतन आणि संवर्धन अनिवार्य ठरवितो. आदरणी पैगंबर साहेबांनी सांगितले की, तुम्ही या अप्रतिम सृष्टीचे संरक्षक आहात. निसर्गाच्या संवर्धनावरच माणसाचे जीवन अवलंबून आहे. अल्लाहची ही सृष्टी सर्व सजीवांच्या गरजा भागविण्यासाठी सक्षम आहे. परंतु वायफळ अपेक्षा भागविण्यासाठी नाही. जेव्हा अपेक्षांचा अतिरेक होतो तेव्हा निसर्गाचे संतुलन बिघडते. त्यामुळे इस्लामने मानवाला वायफळ अपेक्षेपासून परावृत्त केले. त्याला स्वार्थी आणि बेलगाम होण्यापासून रोखले आणि एक उत्कृष्ट सामाजिक प्राणी बनविले. निसर्गाच्या र्हास करणाऱ्या सर्व गोष्टीवर प्रतिबंध लावण्यात आला. अस्वच्छता प्रदूषणाला सर्वात जास्त कारणीभूत असते. इस्लामने स्वच्छतेला असाधारण महत्त्व दिले. किंबहुना, स्वच्छतेला श्रद्धेचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग बनविले. संपूर्ण स्वच्छता धारण केल्याशिवाय माणूस नमाज अदा करू शकत नाही. पाण्याच्या आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्यास मज्जाव करण्यात आला. त्याचबरोबर कुरआनने मानवाला सर्व नैसर्गिक संसाधानाच्या माफक वापर करण्याची ताकीद केली. पाण्याच्या अपव्यय करण्यास प्रतिबंध घातला.
इस्लाममधील वृक्षसंवर्धन
इस्लामने वृक्षसंवर्धनाचे अद्भुत मार्गदर्शन केले. सबळ कारणाअभावी वृक्ष तोडण्यास मनाई करण्यात आली. किंबहुना युद्धासारख्या आणीबाणीच्या परिस्थित देखील विनाकारण झाडे तोडण्यास सक्तीने मनाई करण्यात आली. इस्लामने वृक्षरोपणास आणि संवर्धनास मोठे पुण्य ठरविले. जोपर्यंत त्या झाडाचा फायदा मनुष्य आणि पशुपक्षी घेत राहणार, तोपर्यंत त्या व्यक्तीला त्याचे पुण्य मिळेल. तसेच त्या झाडावर बसणाऱ्या आणि त्याच्या फळावर जोपासणाऱ्या पशुपक्ष्यांचे पुण्य व्यक्तीला लाभेल. त्याच्या सावलीखाली विश्रांती घेणाऱ्या माणसाचे पुण्यदेखील त्याला लाभेल. म्हणून झाडाचे संवर्धन इस्लाममध्ये महान पुण्यकर्म ठरविले गेले आहे. हे पुण्य सातत्याने त्याला मिळत राहील. जोपर्यंत मानवजात आणि प्राणी त्याच्यापासून फायदा घेत राहतील. पैगंबर साहेबांनी वृक्ष रोपणाचे महत्त्व विषद करताना इथपर्यंत सांगितले की, तुमच्या हातात झाड आहे. आणि तुम्हाला ते लावायचे एवढ्यात कयामत अर्थात प्रलय आला, तरी तुम्ही त्याचा विचार करू नका. झाड लावा. निश्चितच त्याचा पुण्य तुम्हाला मिळेल. एवढे असाधारण महत्त्व इस्लामने पर्यावरण संवर्धनला दिले आहे.

पर्यावरण हा वारसा
वास्तविक पाहता निसर्ग ही मानवाजवळ त्याच्या पुढील पिढीची अमानत आहे. ज्या प्रकारे आपण भौतिक गोष्टीमध्ये त्यांच्या भविष्यांची पुरेपूर काळजी घेतो. तेवढीच आपण त्यांच्या आरोग्यासाठी निसर्गाची उत्तम काळजी घेणे देखील आवश्यक आहे. इस्लामने पर्यावरणपूरक अर्थात शाश्वत विकासाची कल्पना मांडली. त्याच्या सदुपयोगानेच हा वारसा पुढील पिढीकडे अबाधित जात असतो, जर या पर्यावरणाचा र्हास झाला, तर सृष्टीवर मानवजीवन कठीण होईल, ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी त्याचे काळजीपूर्वक संर्वधन करून आपल्याला दिले त्याचप्रमाणे आपणदेखील आपल्या भावी पिढीसाठी हा वारसा द्यावा आपल्या तात्कालीन इच्छापूर्तीसाठी पुढील पिढ्यांच्या विनाशासाठी कारणीभूत होऊ नये. याचप्रमाणे इस्लामने पशुपक्ष्यांचे केवळ स्वत:च्या आनंदासाठी शिकार करण्यास अथवा त्रास देण्यास मनाई केली आहे. जैवविविधता हा निर्सगाचा अविभाग्य भाग आहे. कुरआनात अल्लाहने सांगितले की, प्राणीमात्रावर दया करा आणि त्यांचे रक्षण करा.
सर्व शक्तिमान अल्लाहची इच्छा आहे की, माणसांनी या अप्रतिम आणि सुंदर सृष्टीचा यथायोग्य आणि यथोचित सद्पुयोग करून जीवन सफल करावे. सदाचाराने येथे शांती आणि सौहार्द स्थापित करून जगाला जन्नतचे प्रतीक बनवावे.
(लेखक अहमदनगर स्थित वास्तूरचनाकार, प्राचार्य असून इस्लाम धर्माचे अभ्यासक आहेत.)






