आयटी क्षेत्रांत आठ वर्ष काम केल्यानंतर संकरीने आपल्या मुलाकडे लक्ष देता यावं म्हणून नोकरी सोडली. वर्षभरानंतर त्या पुन्हा नोकरीसाठी आल्या तेव्हा त्यांच्यासाठी कोणतीही जागा नव्हती. त्या आता सर्वांसाठी केवळ एक ‘गृहिणी’ झाल्या होत्या. त्या सांगतात, “मी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायंस मध्ये इंजिनियरिंग केलं आहे. डाटा एंट्रीसाठी मला नोकऱ्या मिळत होत्या. माझ्या मुलाला जन्म देतेवेळी मी आयटी सेक्टरमध्ये माझ्या करियरच्या सर्वोच्च स्थानावर होती. मग त्यापेक्षा खालच्या जागेवर मी नोकरी का करायची?”
त्यांच्या सौम्य शब्दांतही त्यांचा संताप सहजपणे दिसून येत होता. आई झाले म्हणून कमी पगाराची नोकरी स्वीकारायला तयार नसलेल्या संकरीने आपलं नेटवर्क, आयटी स्किल्स यांचा उपयोग केला आणि स्वतःचं एक जॉब पोर्टल सुरू केलं, ‘ओव्हरक्वॉलिफाईड हाऊसवाईव्ज’ नावाचं. ही ऑगस्ट 2021 ची गोष्ट आहे. आता त्यांच्यासोबत पाच लोक काम करतात. त्यांनी आजवर 2500 स्त्रियांना जॉब स्किल्स शिकवले आहेत आणि 500 हून जास्त स्त्रियांना आयटी, हेल्थ सर्विस, आणि अन्य क्षेत्रांत नोकरी मिळवून दिली आहे. त्यांच्या पोर्टलवर वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्स वर्क आणि एकरकमी पेमेंट यांना प्राधान्य देण्यात येतं. यातून या स्त्रियांना त्यांची आर्थिक संधी देण्याचं काम त्या करत आहेत.
पण संकरीसाठी हे सोपं नव्हतं. त्यांना अनेक पूर्वग्रहांशी लढावं लागलं. ज्या बायकांना मुलं असतात त्यांना कामावर ठेवणं, त्यांचा पगार, त्यांची कार्यक्षमता यावरून त्यांचं नेहमीच नुकसान होतं. याला ‘मातृत्त्व शिक्षा’ असंही म्हटलं जातं. ‘नॅशनल ब्युरो ऑफ इकोनॉमिक रिसर्च’, अमेरिका यांच्या संशोधनानुसार, ‘मातृत्त्व शिक्षे’मुळे जगातील चारपैकी एक बाई, आपल्या पहिला मुलाला जन्म देताच वर्षभरात वर्किंग कल्चरमधून बाहेर पडणार आहे.

आई झाले म्हणून काय झालं…?
भारतात तर असा दबाव घरातूनच सुरू होतो. ग्रेट लेक्स इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चेन्नई येथील अर्थशास्त्राच्या प्राध्यापक, विद्या महांबरे सांगतात, “लिंगाधारीत सामाजिक मापदंडात पुरुष हा कुटुंबातील पैसा कमावणारा माणूस असतो आणि स्त्रियांकडे घरकाम आणि चुल-मूल सांभाळण्याची जबाबदारी असते. स्त्रियांना तसं करण्यासाठी प्रोत्साहीतही केलं जातं पण त्यांतूनच कामाच्या ठिकाणी त्यांना संधी मिळणं कमी होत जातं.” या इन्स्टिट्यूटचा असा कयास आहे की, 2022-23 मध्ये शहरी भारतात केवळ 28 टक्के महिलाच कार्यरत होत्या. याच काळात 25-54 वयोगटातील 96 टक्के पुरुष काम करत होते. बायकांसाठी हीच टक्केवारी 37 इतकीच होती. ही लैंगिक असमानता गंभीर स्वरुपाची आहे. 2022 च्या वर्ल्ड बँक ग्लोबल स्टडीज् सांगतात की, भारतात 15 वर्षांहून जास्त वयाच्या केवळ 24 टक्के महिला नोकऱ्या करतात. महांबरे म्हणतात, “हीच परिस्थिती राहिली तर जगात सर्वांत जास्त कष्टकरी वयोगट असूनही भारतात येत्या 20 वर्षांत नोकरदार महिलांची संख्या फारच कमी असेल.”
भारतात बाळंतपणानंतर बायकांना लाभ देणाऱ्या अनेक सरकारी योजना आहेत. मातृत्व लाभ अधिनियम 2017 द्वारे स्त्रियांना सहा महिन्याची बाळंतपणाची सुट्टी मिळते. यात घरूनच काम करण्याची सुविधाही आहे. पण संकरीचं म्हणणं आहे की बदलाची सुरूवात घरूनच व्हायला हवी. त्या म्हणतात, “योजना आहेतच पण बदल घरूनच व्हायला हवेत. माझ्या कुटुंबाने माझ्या पुन्हा नोकरी करण्याला आक्षेप घेतला नाही पण लोक विचारायचे की आता पुन्हा लगेच काम कशाला करायचं? आणखी थोडी वाट बघता आली नसती का? संधी कोणाची वाट बघत नसते हे त्यांना माहिती नाही.”
संकरी पुन्हा नोकरी शोधत होती तेव्हा तो निराशाजनक अनुभव होता. पण मातृत्त्व शिक्षेच्या त्या एकमेव बळी नव्हत्या. त्या म्हणतात, “मी अनेक बायकांना या काळात भेटले ज्या शिक्षणात आणि त्यांच्या कामात अव्वल होत्या पण आई झाल्यामुळे त्या आता घरी बसल्या होत्या. मला नवल वाटत होतं. त्यातूनच मी असा एक प्लॅटफॉर्म बनवण्याचं ठरवलं ज्यातून त्यांना योग्य काम मिळू शकेल.” त्यांना भेटलेल्या अनेक बायकांची एकसारखीच कथा होती. कंपन्यांमध्ये कागदावर अशी कोणतीही पॉलिसी नाही की ज्यातून या बायकांशी भेदभाव केला जावा तरीही अलिखित नियम तर आहेतच. एका एचआर मॅनेजरनं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, “एखादी नोकरदार बाई आई झाली की कामातून ब्रेक घेते. सरकारने मॅटर्निटी लिव्हबाबत कडक नियम केले आहेत. एखादी बाई माझ्याकडे नोकरीसाठी आली तर मी तिला म्हणणार नाही की ती मागे आहे. मातृत्त्वामुळे त्यांना शक्ती मिळते, त्या दुबळ्या होत नाहीत. मुलांसाठी, कुटुंबासाठी वेळ देता यावा म्हणून सुट्टी मिळावी म्हणून आम्हाला विनंतीअर्ज मिळतात पण हे कोणाहीबाबत घडू शकतं.”
पण अनेक कंपन्या सरकारी नियमांचं उल्लंघन करतात आणि त्यामुळे बायकांना त्या गर्भवती होण्याआधीच याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. ब्रिटनमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, पाच पैकी एक एचआर मॅनेजर त्या बाईला कामावर घेत नाही जी आई होण्यास उत्सुक असते किंवा लग्न करणार असते. मातृत्त्व लाभ अधिनियम 2017 द्वारे 50 हून जास्त कर्मचाऱ्यांच्या कंपनीला डे-केअर सेंटर सुरू करणं बंधनकारक आहे पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. संकरी सांगतात, “एखादी आई पुन्हा काम सुरू करण्याची तयार दाखवू लागली तर सर्वांत आधी तिला घरूनच विरोध होतो. त्यांना त्यासाठी समर्थन मिळालं तरीही कंपन्या त्यांना योग्य ती मदत करत नाहीत.”

कॉर्पोरेट कंपन्यांची बनेलगिरी
लिंक्डइनवर बायका लवचिक कामाच्या संधी नसणं, डे-केअर सेंटर, कामाचे लांबलेले तास यावरच जास्त बोलतात. संकरीने तिच्या एका मैत्रिणीचा आई झाल्यानंतरचा काम मिळवण्याचा संघर्ष पाहिला होता. तिला तेव्हा वाटलं की आपल्यासोबत असं काही घडणार नाही. तिचीही मातृत्त्वाच्या दंडातून सुटका झाली नाही. ती म्हणते, “मातृत्त्व ही विलक्षण गोष्ट आहे पण आई होण्यासाठी खूप तडजोडी कराव्या लागतात. तिचं स्वतःचं जगणं, स्वप्न, सारं काही थांबतं. मुलाला जन्म दिल्यावर मला सारं काही हरवल्याची जाणीव झाली. माझ्या आई होण्याची ती शिक्षा होती.” निराशेच्या त्या काळात असताना त्यांनी पेपरमध्ये एक बातमी वाचली की भारतात अयोग्य गृहिणींची संख्या सर्वांत जास्त आहे. त्यांनी या बायांना काम मिळवून देण्याचं ठरवलं. त्यांनी जाणीवपूर्वक हाऊसवाईव्ज हा शब्द ठेवला कारण त्यांतून त्यांची जी अवहेलना होत होती तिला त्यांना उत्तर द्यायचं होतं. अनेकांनी यावर आक्षेपही घेतला पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. या नावानेच त्यांना नवी ओळख मिळाली. लोक लवकरच त्यांना ‘दुसऱ्या बायकांची मदत करणारी बाई’ म्हणून ओळखू लागले. त्यांचे शेजारी त्यांच्याविषयी पेपर आणि मासिकांतून वाचू लागले. ‘दीना थनाथी’ मासिक (स्त्रियांना आत्मसन्मान देणारी) ‘जोश टॉक्स’ (संकरी को सुनो) तसेच दूरदर्शनवरही बोलण्याची संधी मिळाली. शशी थरूर यांच्यासोबत व्यासपीठ शेयर करत त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षण आणि रोजगार यांच्यातील अंतर कमी करण्याच्या धोरणांविषयी चर्चा केली. कॉलेजांतही त्यांना भाषणांसाठी बोलावण्यात येतं. पण काही ठिकाणी त्यांना वाईट अनुभवही आले. एका कॉलेजातील विभाग प्रमुखाने त्यांना म्हटलं की “तरुण बायकांची हीच समस्या आहे. मी इथं 30 वर्षांपासून काम करत आहे आणि सारं काही मॅनेज करत आहे.” पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की जग आता बदललं आहे. एकल महिलांना तर घर चालवण्यात अनंत अडचणी येतात.
संकरीच्या जॉब पोर्टलवर सध्या भारत आणि परदेशातील 600 हून जास्त कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. विविध कामांचे 25 पर्याय इथं उपलब्ध आहेत. स्किल लेवल आणि अनुभव यांच्या आधारावर ज्या बायकांना पोर्टलवरून काम मिळालं आहे त्या सध्या 18 ते 60 हजार रुपये महिना कमवत आहेत. त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांकडून संकरी या महिलांच्या वार्षिक पॅकेजच्या 8.33 टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतात. बायकांकडून त्या कमिशन घेत नाहीत. यापुढच्या काळात त्यांना आपला व्यवसाय अधिक वाढवायचा आहे. त्या म्हणतात, “उच्च मध्यम वर्गातील लोक घरी नोकर ठेऊ शकतात. त्यामुळे ते घरूनच काम करतात. मध्यम आणि निम्नमध्यम वर्गातील लोकांना हे शक्य नसतं. अनेकदा कमावणारा एकच माणूस असतो. मला या वर्गासाठी काम करायचं आहे.” त्या त्यांच्या घरातूनच ऑफिसचं काम सांभाळतात. बाकीचे कर्मचारी त्यांच्या त्यांच्या घरूनच काम करतात. कंपनीच्या वेबसाईटवर संदेश आहे – स्त्रियांना त्यांच्या घरून कामाच्या ठिकाणी पुन्हा नेणं. यात दोन टॅब्स आहेत, पहिला नोकरीच्या शोधात असलेल्या बायकांसाठी आणि दुसरा, त्यांना कामावर ठेवायला तयार असलेल्या कंपन्यांसाठी.
मातृत्त्वाच्या शिक्षेपासून सुटकेचा उपाय
‘द सोशल कंपनी’चे चीफ ऑफ स्टाफ शिव कुमार सांगतात, “आम्हाला जबाबदार आणि अनुभवी लोकांची गरज होती जे आमच्यासाठी चांगलं काम करतील. आम्ही कँपस दौरे केले, प्लेसमेंट्स एजेंसीकडे गेलो पण ओव्हरक्वॉलिफाईड हाऊसवाईव्जचा आमचा अनुभव चांगला होता. ही आम्हा दोघांसाठीही चांगली गोष्ट होती. त्या जॉब-हॉपिंग करणार नाहीत, दीर्घकाळ आमच्यासोबत काम करतील. आमच्यामुळे त्यांना घरबसल्या काम मिळत आहे.” चेन्नईच्या खासगी ब्रँडींग एजन्सीने ब्रँड एक्झिक्युटीव्ह, कंटेंट लीड, ऑपरेशन्स लीड इत्यादींसाठी हाऊसवाईव्जमधून ६ जणींना कामावर घेतलं आहे. ओव्हरक्वॉलिफाईड हाऊसवाईव्जमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येकीची संकरी आणि त्यांची टीम आधी मुलाखत घेतात. त्यामुळे त्यांना नक्की कोणतं काम करायचं आहे याची स्पष्टता दोघांनाही येते. पेरियार युनिवर्सिटीने ज्या बायकांना नोकरी दिली आहे त्यापैकी अनेकांच्या घरी स्वयंपाकीण बाई, आया, ड्रायव्हर नाही, त्यामुळे त्यांनाच या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतात. वर्किंग लाईफमध्ये परत यायला त्यांना जास्तीची मेहनत करावी लागेल.

पवित्रा पेरास्वामी जेनेटिक्सच्या पदवीधारक आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी एक वर्षांचा ब्रेक घेतला. त्याआधी त्या एका स्टार्ट-अप कंपनीत काम करत होत्या. त्या म्हणतात, “मी अनेकदा सी-सूट अधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी माझ्या मुलाला दुध पाजलं आहे, त्याला झोपवलं आहे. असं करताना कामाप्रती तडजोड केली नाही. तुम्ही जर स्वप्नं बघत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा कमी काम करण्यावर समाधानी राहण्याची काही गरज नाही. आपल्याला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. मग भलेही त्यासाठी आव्हानं स्वीकारावी लागतील, आराम सोडून कष्ट करावे लागतील.” पेरास्वामी यांना आई झाल्यानंतर नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्यांनी लेखिका होण्याचं ठरवलं. त्या सध्या हाऊसवाईव्ज सोबत फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करत आहेत. त्यांचं काम मुलाच्या अवतीभवती गुंफलेलं आहे. आपल्या नवऱ्यासोबत ते मुलाची काळजी घेत आहेत. त्या म्हणतात, “मुलगा झोपलेला असतो तेव्हा मी विचारात वेळ घालवते. आई झाल्यानंतर मला वेळेचं महत्त्व समजू लागलं. आता माझ्यासाठी प्रत्येक क्षण किंमती आहे.”
डेटा विश्लेषक गायत्री नेपोलियन यांच्यासाठीही पुन्हा करियर करणं आई होण्याइतकंच अवघड होतं. त्यांना डाटा एनालिस्ट म्हणून काम होतं. लग्न होऊन त्या जेव्हा आई झाल्या तेव्हा त्यांना आपलं काम सोडावं लागलं. त्यांची कंपनी त्यांना घरून काम करू द्यायला तयार नव्हती. त्या मुलाला सोडून कामावर जायला तयार नव्हत्या. पण आपली आर्थिक स्वतंत्रता गमवायला त्या तयार नव्हत्या. त्या नंतर लेखिका म्हणून काम करू लागल्या. त्या म्हणतात, “लहानपणापासूनच मी एक स्वतंत्र व्यक्ती होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी मी शिकले. आई झाल्यानंतर नोकरी गेली तेव्हा वाटलं की मी याची शिक्षा भोगत आहे. नवऱ्याला पैसे मागणं मला आवडत नव्हतं. त्यामुळे मी नोकरीच्या शोधात होते आणि तेव्हा हाऊसवाईव्ज भेटली.” कोणत्याही चांगल्या व्यावसायिकाप्रमाणेच संकरी यांच्याकडेही आपल्या व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना तयार आहेत. जास्त बायका, जास्त नोकऱ्या, जास्त वेग – त्यांच्या व्हॉट्सएप वॉईस नोट स्पिडसारखाच. त्या कधीकधी मुलासोबत वेळ घालवण्यासाठी आणि घरच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी कामातून सुट्टी घेतात. तरीही त्यांना आपला आउटपुट वाढवायचा आहे. त्यांना आता 500 नाही तर 1 लाख स्त्रियांना काम द्यायचं आहे. त्या म्हणतात, “आम्ही स्त्रियांच्या स्किल अपग्रेडींगवर खूप लक्ष ठेवतो. कारण बाजार वेगानं वाढत आहे आणि आम्हाला त्या वेगाशी बरोबरी साधावी लागेल.” व्हॉट्सएपवर त्यांचा वॉईस नोट स्पिड 2x आहे.
अनुवाद – प्रतिक पुरी
साभार – द प्रिंट





