जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आयपीएल गेल्या दोन महिन्यांपासून धमाक्यात सुरु आहे. हा फुल्ल पैसा वसूल सोहळा अनेकांसाठी लॉटरी असतो. इंडियन प्रीमियम लीगला इंडियन पैसा लीग पण म्हणतात. अडीच महिने चालणाऱ्या या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या स्पर्धेत पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात येतो. एकेका खेळाडूवर कोट्यवधी रुपयांची बोली कशी लागली याची नाक्यानाक्यावर चर्चा होत असते. एकीकडे आयपीएलमध्ये हा पैशांचा पाऊस आणि दुसरीकडे इतर खेळांची पुरती बोबं असे आपल्या देशाचे हाल आहेत आणि त्यात जर अपंग खेळाडू आणि त्यांच्या स्पर्धा हा विषय असेल तर काही बोलायची सोयच नाही.
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करगनी गावातील सचिन सर्जेराव खिलारी याचा शालेय जीवनात अपघात झाला, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. गँगरीनमुळे सचिनने कोपराचे स्नायू गमावले आणि अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात बरा झाला नाही. मात्र, आज सचिन खिलारी गोळाफेकी मध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे. गोळाफेकीत एफ-46 गटात त्याने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे. सचिनने गेल्या वर्षी हांगझो पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णयश संपादन केले होते. सचिन खिलारीने सलग दुसऱ्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्समध्ये गोळा फेकीतील ‘एफ 46’ गटात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

जागतिक स्तरावर इतके घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे सचिनवर बक्षिसांचा वर्षाव झाला तर खरा परंतू ती फक्त घोषणाच ठरली, प्रत्यक्षात हाती काहीच आले नाही. सांगलीच्या या युवकाला पहिल्याच जागतिक यशानंतर केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या बक्षिसाची प्रतीक्षाच आहे.
सचिनने गतस्पर्धेपेक्षा जास्त खडतर आव्हान असतानाही सोनेरी कामगिरी केली. मात्र, केंद्र सरकार देणार असलेले वीस लाख आणि राज्य सरकार देणार असलेले तीन लाख रुपयांचे बक्षिस अजून त्याच्यापर्यंत पोहोचलेलेच नाही. ‘पहिल्याच स्पर्धेत जिंकलेल्या जागतिक विजेतेपदाच्या बक्षिसाची अजून प्रतीक्षा आहे. दुसऱ्या विजेतेपदानंतरच्या बक्षिसाबद्दल कसे बोलू शकणार? केंद्राकडून मला वीस लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, तर राज्य सरकारकडून तीन लाख. मात्र, ही रक्कम अजून मिळालेलीच नाही,’ असे सचिन म्हणतो.
सचिनला बक्षिसाची आशा आहे; पण त्यासाठी तो सराव सोडण्यास तयार नाही. ‘मी बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करतो; पण त्यासाठी सराव सोडता येत नाही. दुसऱ्या जगज्जेतेपदानंतरच्या पारितोषिक रकमेसाठीही प्रयत्नही करता येणार नाहीत. त्यासाठी वेळच कुठे आहे. या स्पर्धेपाठोपाठ पॅरालिम्पिक आहे. बक्षिसापेक्षाही पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक माझ्यासाठी मोलाचे आहे,’ असेही तो म्हणाला.
आटपाडी तालुक्यातील सचिनला सायकलवरून पडल्यामुळे जखम झाली. त्यातून गँगरीन झाले आणि त्यामुळे डाव्या हातात अपंगत्त्व आले. या 34 वर्षीय युवकाला जागतिक विजेतेपद राखल्याचा आनंद आहे. ‘गतस्पर्धेपेक्षा स्पर्धा खडतर होती. वातावरणही सतत बदलत होते. कधी पाऊस होता तर कधी थंडी… या परिस्थितीतून यश मिळवले, याचा जास्त आनंद आहे,’ असे त्याने सांगितले.

सचिन खिलारी याने जपानच्या कोबे येथील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेकीतील ‘एफ 46’ प्रकारातील सुवर्णपदक राखण्यात बुधवारी यश मिळवले. त्याने जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत ही कामगिरी करताना आशियाई विक्रम केला. त्याच्या यशामुळे भारताने आता या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सचिनने 16.30 मीटर अंतरावर गोळाफेक केली. त्याने हे यश मिळवताना 16.21 मीटरचा आशियाई विक्रम मोडीत काढला. लहानपणी सायकलवरून पडल्यामुळे त्याला गँगरीन झाले होते.
या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार याची खात्री होती. त्यात यश आल्याचे समाधान आहे. या यशामुळे पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळवली आहे. तिथेही सुवर्णपदक जिंकण्याचे विश्रांतीन लक्ष्य आहे, असे तो म्हणाला.






