एका पत्रकाराला रात्री हायवेवर प्रवास करताना अचानक, नाईलाजाने एका ट्रक ड्रायव्हर बरोबर प्रवास करावा लागतो आणि ती दुनिया बघून तो अचंबित होतो! त्यावर लिहिलेल्या लेख ‘रिडर्स डायजेस्ट’मध्ये प्रसिद्ध होतो आणि या अंकाचाचा खप चक्क पंचवीस टक्क्यांनी वाढतो. अमेरिकेत रस्ता सुरक्षा आणि त्यावरचे उपाय यावर चर्चा सुरू होऊन यासंदर्भातील नवे नियम तयार केले जातात.
माझ्याही मनात हा विषय मांडताना तसेच काहीसे आहे… मी रेल्वेची गाडी चालवताना वेगवेगळ्या अपघातांना सततच सामोरा जात असतो. यात व्यवस्थेची चूक अभावानेच असते. जेव्हा रेल्वेच्या अपघातांची चर्चा होते तेव्हा यातला मानवी सहभाग दुर्लक्षित करता येत नाही. भारतात फार पूर्वीपासून रेल्वे हेच एक परवडणारे प्रवासी साधन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर इंग्रजांनी वेगळ्या हेतूने म्हणजे सैनिकांच्या जलद हलचालींसाठी रेल्वेचा पुरस्कार केला.

अंगावरती घेऊन फिरतो अपघातांचा त्रास दिवस
ज्याच्या त्याच्या माथी लिहितो गर्दीचा वनवास दिवस।।
मी मात्र असा गर्दीच्या अनुषंगाने येणाऱ्या विलक्षण अनुभवांना रोजच सामोरा जात असतो. जे रेल्वेचे रुळ आमच्या साठी जीवनदायी असतात त्याच रेल्वे रुळावर माझ्या मित्रांसह अनेकांना मरतानाही फारच जवळून बघितले आहे.
मी सहायक म्हणून काम करत होतो त्यावेळी आमचा एक वरिष्ठ चालक मला खारला ऑफिसच्या बाहेर भेटला, तो नुकताच ड्युटी संपवून घरी जात होता. त्याचे घर बांद्रा रेल्वे कॉलनीत. आम्ही एकत्र चहा वगैरे घेतला आणि तो घराकडे गेला आणि थोड्याच वेळात बातमी आली की आमच्या विभागातला कुणीतरी बांद्राच्या गेटवर लोकलच्या खाली आला आहे. आम्ही तातडीने तिथे पोचलो, तो आमचा सहकारीच होता, ज्याच्या बरोबर नुकताच मी शेवटचा चहा घेतला होता. अक्षरशः दूरवर पसरलेले त्याच्या शरीराचे नुसते तुकडे तुकडे गोळा केलेले आजही आठवते. नुकताच आमचा एक बरोड्याचा चालक असाच इंजिनाची धडक लागून बलसाडला छिन्नविच्छिन्न झाला. त्याच्या पण शरीराचे इतस्ततः विखरलेले अवयव अक्षरशः गोणीत जमा करावे लागले होते. एकही हाड सरळ सापडले नाही. तो आपल्या गाडीचे इंजिन तपासताना हा अपघात घडला होता. एकदा बोईसरला एक मेल सायडींगला घेतली होती. शेड्युल प्रमाणे ऑगस्ट क्रांती पास होणार होती. हा नेमका त्याच ट्रँकवर आला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. पुढच्या काही तासात तो बलसाडला घरी पोचणार होता. तसे त्याचे आपल्या बायकोबरोबर बोलणेही झाले होते, घरी त्याच्या ऐवजी त्याचे प्रेतच येणे घरातले स्विकारायला तयारच नव्हते. त्यावेळी त्याच्या बायकोने फोडलेला टाहो आमचेही काळीज चिरुन गेला होता.
खरेतर रुळावर कुणी येऊ नये अशीच व्यवस्थेची अपेक्षा असते. आता तर रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला सहा सहा फुटाच्या भिंती बांधण्याचे काम संपूर्ण भारतीय रेल्वेत सुरू आहे. पण लोकांना शॉर्टकटच हवा असतो, मग ती मंडळी धाडस करून रुळ ओलांडतात. माझ्या गाडीच्या अगोदर रेल्वे रुळ पार करणाऱ्यांना मी रोजच बघत असतो. आजकाल तर लोक सतत धावत असतात आणि प्रत्येकाला गाडी येण्याअगोदर रेल्वे रुळांच्या पार व्हायचे असते. प्रत्येकालाच कसलीतरी घाई असते पण रुळ ओलांडून गेल्यावर मात्र तो अगदीच निवांत होऊन जातो मग ती जी रुळ ओलांडून जाण्याची घाई होती ती कशासाठी? याचा काही अंदाजच येत नाही. अच्छा जी माणसे हे धाडस करतात ती दिसायला, वागायला अगदीच सामान्य असतात.

रेल्वे रुळावर मरणे फारच सोपे असल्याने निराश मने अशा मरणाचा आसरा घेतात. एकदा उधना स्टेशनच्या अलिकडे एक तरूण खांबाला टेकून बसून मोबाईल वर बोलत होता. गाडी जवळ येताक्षणी त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि आपली मान माझ्या भरधाव गाडीखाली ठेवली. इतक्या वर्षात सरावाने आम्हालाही आत्महत्या करण्यासाठी येणाऱ्या लोकांचा जरा अगोदरच अंदाज येतो. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही पण आटोकाट प्रयत्न करतो. तो क्षणाचा झटका ओसरल्यावर त्यालाही कदाचित जगायचे बळ मिळत असेल. पण हे फारच कमी वेळा घडते. मरणारा अगदी ठरवून मरतो. ट्रँकच्या मधे मरणाची वाट बघत झोपलेला बऱ्याचदा चटकन दिसतही नाही, नुसता एक आवाज येतो. आमचे बाबा मयताला जाताना उत्साहाने सळसळत असायचे. ते म्हणायचे सर्वात कंटाळवाणा भाग म्हणजे माणसाची कवटी फुटस्तोवर थांबणे. तर अगदी परवा रात्री राजधानी चालवताना अंधारात कटकन आवाज आला, सहाय्यकला विचारले तर म्हणाला दोन्ही रुळांच्या मधे अंगाचे मुटकुळे करून कुणीतरी झोपला होता. आम्ही सतत समोर बघत असतो पण रुळांच्या आत कुणीतरी झोपलेला चटकन दिसेल असे नाही. कटकन आवाज त्याच्या कवटी फुटल्याचा होता. पुढे जायला आम्ही मोकळे नसतो. माणूस उडाला तर नंतरचे सोपस्कार पार पाडावेच लागतात. वेगातली गाडी जागेवर थांबणे शक्यच नसते. पाच सहा किलोमीटर पुढे जाऊनच गाडी उभी राहते मग इंजिन तपासून घेऊन उडालेल्या माणसाचे काही अवयव वगैरे चिकटले असतील तर ते तिथेच काढून ठेवून जवळपास असलेल्या स्टेशन मास्टरला सविस्तर कल्पना दिली जाते.
दरम्यान गार्डला ती बॉडी जर दिसली, सापडली तर त्याची अवस्था आणि ट्रँक मोकळा आहे हे सगळे कळवल्यावरच पुढे जायचे असते. जखमी असेल तर गार्ड किंवा आम्ही त्याला तिकडे तसेच सोडून जाऊ शकत नाही. आजकाल 108 या आपत्कालीन अँम्ब्युलन्सची सेवा एकदम तत्काळ उपलब्ध होते, स्टेशनमास्टर देखील आम्ही कळवलेली जागा जर स्टेशनपासून दूर असेल तर 108 ला कळवतात, मग पोलीस वगैरे येऊन त्यांच्या पध्दतीने ते सगळे काम पुढे नेतात. नातेवाईकांनी जर कधी क्लेम वगैरे केला तर एखाद्या वेळी आम्हाला कोर्टात वगैरे हजर व्हावे लागते. दरवेळी पोलिस आमचा जबाब वगैरे नोंदवतात. रेल्वेच्या हद्दीत घडलेले सगळे मृत्यू आत्महत्या या सदरात टाकून रेल्वे मोकळी होत नाही. अपघाती मृत्यू अशी नोंद केल्यानंतर आम्ही काय लिहून देतो तेही महत्त्वाचे असते. अनेकदा माणूस तर अपघातात जातोपण त्यांच्या नातेवाईकांना विमा वगैरे मिळण्यासाठी आमच्या जबाबाची मदत होत असते. आम्ही कुणालाही तो मेला आहे हे जाहीर करू शकत नाही कारण आम्ही डॉक्टर नाही. एकदा एका माणसाचे अक्षरशः दोन तुकडे झालेले तरीही गार्ड पोचला तेव्हा त्याचे डोळे उघडझाप करत होते, गार्डने हलक्या हाताने त्याचे डोळे मिटले तेव्हा त्याने प्राण सोडला. डोंबिवली मधील एका वरिष्ठ चालकांनी त्यांच्या पुस्तकात एक अनुभव लिहिला आहे की समोर त्यांच्या गाडीने उडालेला माणूस मरायला टेकलेला, रुळावरून त्याला बाजूला करताना त्याने चक्क हात जोडून मोटरमन काकांचे आभार मानले आणि मगच प्राण सोडले. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते… मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.. अशीच त्याची भावना असावी.

पटणा गाडी ही बांद्राहून सुटते आणि वापीला तुडुंब भरून जाते. उत्तरप्रदेशात जाणाऱ्या गाड्या बारमाही प्रवाशांच्या गर्दीने ओथंबलेल्या असतात. वापी स्टेशनवर यांच्या मंडळाची माणसे मोठे मोठे दांडके घेऊन उभी असतात. बरेच दिवस याचे कारण कळत नव्हते, एकदा सहजच एकाला विचारले आणि ऐकून चमकलोच. तो सांगत होता या उत्तर भारतीय लोकांनी वापीत एक मंडळ तयार केले आहे. छोटे मोठे उपक्रम करत असताना दरमहा ठराविक रक्कम मंडळात जमा करतात. दंडुकेधारींचे काम इतकेच की गाडी आल्यावर फलाटावरील प्रवाशांना आत कोंबणे! अक्षरशः ठूस ठूस के भरना.. तर ही गाडी पूर्वी वापीला तीन नंबर फलाटावर घेऊन राजधानीला पुढे जाण्यासाठी मोकळा रस्ता दिला जायचा. एकदा काही तांत्रिक अडचणींमुळे गाडी राजधानीच्या मागेच एक नंबर फलाटावर घेतली होती. गाडी प्लँटफॉर्मवर येताक्षणी बेफाम प्रवासी रेल्वे रूळावर उड्या मारून गाडी पकडायला धावायला लागले. इतक्यात विरुद्ध दिशेने एक भरधाव मालगाडी वापी स्टेशन पार करु लागली आणि चक्क 13 माणसं उडाली. नंतरच्या हळहळण्याला काहीच अर्थ असत नाही. माझ्या सहकाऱ्याची ज्याने गाडी घेऊन आला होता त्याची बरेच दिवस चौकशी सुरू होती. त्यावेळी कार्यरत स्टेशनमास्टरची अशा कुठल्या तरी टोकाच्या स्टेशनवर बदली केली गेली की तो आयुष्यात पुन्हा अशी चूक करूच शकत नाही. खरे तर तांत्रिक अडचण होती यात त्या मास्टरची फार काही चूक नव्हती पण स्टेशनमास्टर हा स्टेशनचा मुख्य असतो, चांगल्या वाईटाची सगळी जबाबदारी त्याचीच असते, लोकांच्या बेफिकीरीचा, बावळटपणाचा फटका त्याला बसला.
असेच एकदा लोकलमधून धूर येतो या अफवेने घाबरून अनेक बायकांनी कांदीवली जवळ पोयसर नाल्यावर खाली उड्या मारल्या आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलला धडकून हकनाक मेल्या. ज्या मोटरमनच्या लोकलसमोर हे घडले तो नंतर कित्येक दिवस या आठवणीने व्यथित व्हायचा. एकदा ठाणे स्टेशनवर अशाच बायका मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी कुठवर आली आहे हे बघण्यासाठी मुंबईहुन गाडीकडे पाठ करून उभ्या होत्या. त्यांना येणाऱ्या गाडीचे भानच नाही उरले आणि अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा घटना आमच्याही काळजावर चरे उमटवून जातात.
माझे एक वरिष्ठ सहकारी एकदा माझ्या बरोबर होते. मी थोडा गुमसुम, मनावर त्या अपघाताचे मळभ घेऊन शांत शांत बसलेला बघून ते अचानक म्हणाले क्या हुआ? गाडी से कोई उड गया था क्या? मी काही उत्तर न देता उदासपणे त्यांच्याकडे बघितले त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले पाठीवर थोपटले, म्हणाले ये तो होता रहेगा, उसको पकडके नहीं बैठने का;आगे बढनेका! जीवनाचे सारच ते सांगत होते. ते भले तसं म्हणाले पण सावरणे इतके सोपे नसते. हे सगळं निगरगट्टपणे स्विकारायला काळ जावा लागतो. लहानपणी अनुप जलोटांची भजनं सतत कानावर पडायची. त्यातले जब प्राण तनसे निकले.. आमच्या उदयपूरच्या प्रशिक्षण केंद्राची सिग्नेचर ट्यून असल्यासारखे तिथे तिन्हीत्रिकाळ हेच भजन कानावर पडायचे. काही काही ओळी मनाचा ठाव घ्यायच्या. ती भजने गाताना अनुप जलोटा निवेदन करताना काही ओळी गुणगुणायचे की माणसाला श्वास घ्यायला शरीरात दहा दरवाजे असतात तसेच श्वास बाहेर सुध्दा यातल्याच कुठल्या तरी दारातून बाहेर पडतो. श्वास कुठून बाहेर गेला यावर माणसाचे श्रेष्ठत्व ठरत असते. सर्वात वर टाळूच्या तिथून प्राण निघाला तर त्याला उच्च प्रतीची गती प्राप्त झाली आहे असे म्हणतात. हे येरागबाळ्याचे काम नव्हे. म्हणून आपण सगळे अंत्यसंस्कार होताना माणसाच्या कवटी फुटण्याची वाट बघतो, नंतरच स्मशानातून बाहेर पडतो. हे सगळे त्या वयात काहीच कळत नव्हते, आता साक्षात ती सगळी घटना डोळ्यासमोर घडताना बघता येते, त्याचे संदर्भ लक्षात येतात. माझ्या वरिष्ठांनी भले मला सांगितले की पुढे सरकायला हवे वगैरे पण त्यालाही बराच काळ जावा लागला.

आमच्या भोवताली मृत्युचे सावट सदोदित असते. गाडीचा वेग वाढला बऱ्याच गोष्टी बदलल्या पण लोकांच्या बेफिकिरीत किंचितही बदल झाला नाही. अगदी छोट्या छोट्या स्टेशनवर पण सरकते जिने, पूल बसवले गेले आहेत, गेट बंद झाले आहेत.त्याठिकाणी वरुन किंवा खालून पूल अथवा रस्ते बनवले गेले आहेत. आम्ही बघतोय सुरूवातीला मुंबई अहमदाबादच्या दरम्यान तब्बल 309 वगैरे गेट होते,आता त्यातले फक्त पन्नास एक उरले असतील, जे आहेत तिथेही कामे सुरु आहेत आणि येणाऱ्या काळात तेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. रुळांच्या बाजूला सहा सहा फुटांची भिंत उभारली आहे पण तरीही माणसांचा जथ्थाच्या जथ्था रुळ ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घालत असताना बघतो तेव्हा आमचा जीव नुसता कावराबावरा होऊन जातो. अच्छा हे करताना पलिकडे काही महत्त्वाचे काम वगैरे असेल तर तेही नाही, निव्वळ सिगारेट/विडी पिणे एवढ्या साठी देखील रूळ ओलांडणारे महाभाग आहेत. काही – काही लोकं तर निव्वळ आम्ही हॉर्न वाजवत रहावा यासाठी किंवा हवा खाण्यासाठी रूळ ओलांडतात. आम्ही व्यवस्थेनं बांधलेलो असतो, आणि समोरच्या तमाम जनतेला कसलाही धरबंध नसतो. कधीतरी अतिफुशारकी मारण्यासाठी मुले रुळावर येतात आणि गाडीचा वेग, भले मोठे धुड बघून एकदम घाबरून जातात आणि हकनाक मरतात. बऱ्याचदा त्यांना मरायचे नसते पण रेल्वेच्या फटक्यात दुसरी संधी नसते. मी बघतो रेल्वेच्या फटक्याने माणसाचे रक्त लगेच वहात नाही सुरुवातीला कोथळा बाहेर आल्यासारखे नुसते पिवळेपांढरे मांस बाहेर येते. झटक्याची तीव्रता इतकी असते की रक्त पण गोठून जाते थोड्या वेळाने ते वहायला लागते. अशा लोकांसाठी अकबर इलाहाबादी हा प्रसिद्ध शायर म्हणून गेला आहे,
रहता है इबादत में हमें मौत का खटका
हम याद-ए-खूदा करतें है, करले ना खुदा मुझे याद…
(साधी प्रार्थना करतानाही मनात मरणाचं भय असतं. देवाचं स्मरण करतानाही, देवाला आपलं स्मरण होऊ नये हीच काकुळतीची भावना आपल्या मनात रेंगाळत असते)
माणूस/मुलगा चक्क रुळांच्या मधे झोपतो आणि शेजारी त्याचे मित्र टाळ्या वाजवत बघत उभी असतात आमचा ऱ्हदयाचा ठोका चुकतो पण ती मंडळी मात्र गाडी गेल्यावर खूप काही तरी मिळवल्यासारखा जल्लोष करतात. आपल्या छातीचे सत्तर बहात्तर ठोके सतत पडत असतात म्हणे, अशा घटनेने चुकलेले आमचे अनेक ठोके आजतागायत परत सापडलेच नाहीत! आजकाल मोबाईलमुळे पण अपघातात वाढ झाली आहे. प्लँटफॉर्मवर भर गर्दीत मोबाइलवरून मोठ्याने बोलणारे, गोंगाट करणारे आपण आपल्या मागे चालणाऱ्यांचा खोळंबा करत आहोत याचे जराही भान ठेवत नाहीत. प्लँटफॉर्मवर एकवेळ समजून घेता येईल पण रेल्वे रूळावर चालताना किंवा रेल्वेचे गेट पार कानाला हेडफोन लावून बेफामपणे चालताना माणसे हकनाक मरताना आम्ही रोजच बघतो तेव्हा जीव नुसता तडफडतो. आपण नागरिकशास्त्र चाळीस मार्कांचे तेही पर्याय म्हणून शिकतो गरज म्हणून नव्हे, तिथेच आपली गफलत होते. स्टेशनवर आल्यावर गाडीत चढताना गर्दीला प्रथम उतरू द्यावे, प्लँटफॉर्वर किंवा जिने, एक्सलेटर चढता उतरताना डाव्या बाजूने चालावे, आपल्या कुठल्याही क्रुतीने कुणालाही त्रास होऊ नये. मोबाईलवर काय ऐकायचे ते तुम्ही स्वतः ऐका ना, इतरांना कशाला ऐकवता.परत आजूबाजूच्या कुणी आक्षेप घेतला की म्हणणार अरे भगवान का गाना है.. असु दे ना! पण ते तुमचे तुम्ही ऐका, इतरांना जे पहायचे, ऐकायचे ते त्यांचे ठरवतील. आता नुकताच कोरोनाचा प्रकोप प्रत्येकाने अनुभवलेला आहे मग त्यातून प्लँटफॉर्मवर आपण थुंकायचे नाही हे पण ठरवू शकत नाही का? गाडीतून उतरल्यावर दहातली नऊ माणसे थुंकताना बघून माझा जीव नुसता जळत राहतो.

फलाटावर कुणीतरी आपली काळजी घेईल या भ्रमात फिरणारा निर्बुद्धांचा जमाव दिशाहीन फिरताना मला रोजच दिसतो तेव्हा वाईट वाटते आणि एखादा मग अगदी दिशा विचारतो तेव्हा मी समोरच्याला सूर्य उगवतो ती पूर्व इथूनच सांगायला सुरुवात करतो. वेळीअवेळी अशी माणसे बेफिकिरी दाखवत आमच्या गाडीखाली येऊन रेल्वेच्या हद्दीत मरतात तेव्हा ते मरण पण अक्षरशः बेवारस असते. रेल्वेच्या हद्दीत मेलेल्या माणसाला ओळखले तर निदान पुढचे सोपस्कार करता तरी येतात, नाहीतर खूपदा पिठाच्या गोळ्याला अग्नी देण्याची वेळ येते. असेच एकदा एका रेल्वेच्या अधिकाऱ्याला अपघाती मृत्यु आला, रात्रभर हद्दीतील चोरासोरांनी अंगावरचे कपडेही काढून घेऊन गेले. ओळख पटवण्यासाठी तिसऱ्या दिवशी मुलगा निघाला तेव्हा पोलिसांनी बेवारस म्हणून प्रेत दफन करून टाकले होते आणि एकदा दफन केलेल्या प्रेताला बाहेर काढण्यासाठी डिस्ट्रिक्ट मँजिस्ट्रेटची परवानगी वगैरे लागते. नाईलाजाने पिठाच्या गोळ्याला अग्नी द्यावा लागला होता. रुळांवर माणसे दमून भागून आपल्याच देशात झोपतात आणि मरतात. लोकांना भयच नाही वाटत. आम्ही मात्र सतत धास्तावलेल्या अवस्थेत असतो आपल्या गाडीखाली कुणी मरू नये यासाठी जे काही करता येईल ते सततच करत राहतो.
चित्रपटात रेल्वेच्या संदर्भात दाखवलेल्या धाडसाने भारावलेल्या मुलांना तेच धाडस प्रत्यक्ष करायचे असते पण ते खरे नसते हे पटण्यासाठी ती मुले आपले प्राणच पणाला लावतात. सलमान, शाहरुख यांना रेल्वेच्या गाडीवर धावणे, नाचणे, मारामारी करणे यासाठी पैसे मिळतात. प्रत्यक्षात हे सगळे खोटे असते हे लोकांना समजावून कसे सांगायचे. आजकालच्या पिढीला तर हीच मंडळी आदर्श वगैरे वाटतात तेव्हा गोष्टी अधिकच अवघड होत जातात.एकदा एक मुलगी तिच्या मित्रांसोबत लोकलच्या दरवाजात लटकत होती, मी म्हणालो हे असे करु नका तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तिने तितक्याच बेफिकीरपण मला झिडकारले आणि म्हणाली मला सवय आहे.. मी हक्काबक्का होऊन बघतच राहिलो, अभ्यासाची सवय असू शकते पण असे लटकण्याची पण सवय असू शकते हे तरी मी प्रथमच ऐकत होतो, कालाय तस्मै नमः म्हणत पुढे सरकायचे.
(लेखक गणेश मनोहर कुलकर्णी हे गेल्या 34 वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोटारमन म्हणून कार्यरत आहेत. रेल्वेचे सारथ्य करत असतानाचे विलक्षण अनुभव त्यांनी ‘रुळानुबंध’ या पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत. हे ‘रुळानुबंध’ वाचताना, मनाच्या तळाशी एक अपराध-भावना दाटून येते. आपण कुटुंबकबिल्यासहित प्रवास करताना या ड्रायव्हर माणसाचं विश्व मात्र दोन समांतर रूळ आणि सिग्नलचे दिवे, यांच्याशी घट्ट जोडलेलं राहतं, ही जाणीव अस्वस्थ करून सोडते.)
(सौजन्य – अनुभव दिवाळी अंक 2022)






