जलसंधारणातून दुष्काळाशी सामना करण्यासाठी झटताना राज्य सरकारपासून प्रसिद्धी माध्यमांपर्यंत सर्वजण काही गावांचा उल्लेख वारंवार करतात. यामध्ये वारंवार उल्लेख केलेली दोन्ही गांवे म्हणजे राळेगणसिद्धी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव आणि दुसरे हिवरे बाजार, पोपटराव पवार यांच्या प्रयत्नातून आदर्श बनलेले गाव. मात्र, महाराष्ट्रातीलच आणखी एक गाव या दोन्हीपेक्षा वेगळे आहे ते म्हणजे आदिवासी गाव बारीपाडा. धुळे जिल्हातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किलोमीटर अंतरावर वसलेले बारीपाडा हे सुमारे 800 लोकवस्तीचे गाव आहे.
सध्याचे बारीपाडा म्हणजे सुजलाम सुफलाम. परंतु, 1992 पर्यंत बारीपाडाकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, किरकोळ पीक, निरक्षरता, व्यसनाधीनता, सर्वत्र उजाड ओसाड आणि उदासवाणी परिस्थिती. इतर अनेक आदिवासी पाड्यांप्रमाणेच सर्वांच्या लेखी बारीपाडा बेदखल होते. अलीकडे हे गाव केवळ प्रकाशझोतात आले नाही, तर इतरांसाठी आदर्श ठरत आहे. हा बदल झाला तो चैत्राम पवार या तरुणामुळे.

‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ चैत्राम पवार यांना
चैत्राम पवार यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव करण्यात आला आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्च रोजी पवार यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
बारीपाड्याच्या परिवर्तनाचे शिल्पकार
अत्यंत कष्टातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर हिंदुस्थान एअरोनॉटिक्सससारख्या कंपनीत मिळालेली नोकरी त्यागणे, हे खरेतर चैत्राम पवार यांच्यासाठी कठीणच होते. पण आपण जिथे मोठे झालो, त्या बारीपाड्याचा विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी नोकरीची वाट सोडली आणि शेती, पाण्याचे स्रोत, रानभाज्या, आदिवासींना स्वतःची ओळख असे अनेक उपक्रम राबवत त्यांनी बारीपाड्याचा चेहरामोहराच पालटून टाकला आहे. देशातील अनेक लहान-मोठ्या आदिवासी पाड्यांप्रमाणे एक असलेला बारीपाडा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. 800 हून कमी लोकसंख्या असलेल्या या पाड्याने एकजुटीच्या आधारे ही कामगिरी केली आहे. चैत्राम पवार हे या बारीपाड्याच्या परिवर्तनाचे शिल्पकार ठरले आहेत.
अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैत्राम पवार यांनी अपार कष्ट झेलत पदव्युत्तर स्तरापर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साहजिकच नोकरी पकडून सुस्थापित होण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार नाशिकजवळच्या ओझरच्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये त्यांची निवडही झाली. पण तुझ्या गावासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी तू काहीतरी केले पाहिजेस, हा वनवासी कल्याण आश्रमातील कार्यकर्ता मित्रांचा सल्ला काळजाला भिडला आणि 1991 पासून सुरू झाला बारीपाड्याच्या परिवर्तनाचा प्रवास.

चैत्राम यांच्यासह गावातील चार-पाच तरुणांनी एकत्र येऊन पाड्याच्या जवळची जंगलतोड थांबविण्यापासून त्याची सुरुवात केली. वर्षातून फक्त एक महिना मोठ्या झाडांच्या फांद्या, सुकलेली पाने आणण्याची परवानगी गावक-यांना देण्यात आली. इतरवेळी जंगलतोड करणा-यांना दंड आकारण्याचा निर्णय गावाने घेतला. ही मात्रा लागू पडली. त्यातून 1100 एकर जंगल सुरक्षित झाले. पुढे जाऊन शालेय शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रात काम सुरू झाले. अगदी साध्यासाध्या गोष्टी उदा. नख कापणे, शाळेत केस विंचरून पाठविणे, पावसाळ्यात ड्रॉप टाकून पाणी पिणे, मच्छरदाणीचा वापर इ. गोष्टी करून गावात बदल घडविला गेला. शेतीतील सुधारणांसाठी राज्यातील निवृत्त कृषी प्राध्यापकांच्या जनसेवा फाऊंडेशनने मार्गदर्शन केले.
त्यामुळे सध्या 250 एकराहून अधिक जागेत दुबार पेरणी होते. त्यातून तयार झालेला त्यांच्या पाड्यावरील 12-13 टन इंद्रायणी तांदूळ यंदाच्या वर्षी बाहेरच्या गावात हातोहात खपला. याच गावक-यांनी श्रमदानातून तब्बल पावणे पाचशे दगडी बंधारे बांधले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही गावात पाण्यासाठी 20 फुटापेक्षा अधिक खोल जावे लागत नाही. एकेकाळी इतरांवर अवलंबून असलेल्या बारीपाड्यातून आता आजूबाजूच्या 5 पाड्यांना पाइपलाइनद्वारे पाणी पुरविले जाते. ज्येष्ठ जलतज्ञ माधवराव चितळे यांनाही या कामाचे अप्रूप वाटले. या कामाबद्दल चैत्राम पवारांना 2003 मध्ये इटलीच्या ‘इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट‘ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सर्वांचा गावाकडे ओघ सुरू झाला. इतर गावांनी बारीपाडा मॉडेलचा स्वीकार केला. गावाला व चैत्राम यांना आतापर्यंत 13 पुरस्कार मिळाले.
आदिवासी महिलांमधील न्यूनगंड दूर करण्यासाठी त्यांनी सुरू केलेली वनभाजी स्पर्धा सर्वत्र औत्सुक्याचा विषय ठरली आहे. आदिवासी महिला जंगलातील दुर्मिळ वनभाज्या प्रदर्शनात मांडतात. गेल्यावर्षी अशा 70 वनभाज्या मांडण्यात आल्या. यंदा 1 सप्टेंबरला ही स्पर्धा होईल. दुर्मिळ वनभाज्यांचे महत्त्व लिहून ठेवण्याचा चैत्राम पवारांचा मानस आहे. त्यांच्या या सर्व प्रयत्नांमुळे नोकरीधंद्यासाठी स्थलांतर करणा-यांचे प्रमाण बरेच कमी झालेय.
पाण्याच्या अनुकूलतेचा परिणाम कुपोषणमुक्तीच्या स्वरूपात पुढे आला. काही वर्षांपूर्वी कुपोषणग्रस्त बारीपाड्यात आता कुपोषण नावालाही उरलेले नाही. पाण्यामुळे बागायती पिकेही घेण्यात येऊ लागली, भात नागलीचे विक्रमी उत्पादन येऊ लागले. शेती स्थिर झाल्यामुळे शेतीपूरक व्यवसायामध्येही वाढ झाली. शेळीपालन, कुक्कुटपालन, म्हैसपालन, मधमाशीपालन याकडे लक्ष देण्यात येऊ लागले.
उसाची शेती होऊ लागली गूळ तयार करणे हा नवा उदयोग सुरू झाला. पापड, पत्रावळी, दोर, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, बासमती, इंद्रायणी सारख्या तांदळाच्या गोण्या आता गावातून इतर गावाकडे, शहरात विक्रीसाठी जाऊ लागल्या. बारीपाडा रहिवासी आता स्ट्रॉबेरीचेही विक्रमी पीक घेऊ लागले. पूर्वी पोटभरण्याची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे कुटुंबांचे स्थलांतर ठरलेले असायचे. आता पंचसूत्रीच्या अंमलामुळे हे स्थलांतर पूर्णपणे थांबले आहे. इतकेच नव्हे, तर काही तांत्रिक कामासाठी बाहेरून व्यक्ती बारीपाड्यात कामासाठी येऊ लागल्या आहेत.

खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण असा गाव. महात्मा गांधींच्या स्वप्नातला गाव. कमीतकमी गोष्टींसाठी इतर गावांवर, शहरांवर अवलंबून असणारा गाव. गावातील संपत्ती गावातच राहील असे नव्हेतर आजूबाजूच्या गावातील लोकांनादेखील संपन्न करणारा गाव. गावासाठी लागणारी ऊर्जा, जळण, बायोगॅस, सौरऊर्जा, अगदी वीजदेखील तयार करणारा गाव. श्रमाला महत्त्व देणारा गाव.
गावातील रस्तेदेखील खड्डेमुक्त, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करणारा गाव. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जिवंत गोष्टीवर मनापासून प्रेम करणारा गाव. अशा गावाला अनेक पुरस्कार प्राप्त होणे अपरिहार्यच आहे. अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत. चैत्राम आता नुसता बारीपाडा गावाचाच नसून जगातील अनेकांचा मार्गदर्शक झाला आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यदेखील हेच आहे. ग्रामविकास हा एक आयाम आहे. पण प्रत्यक्ष गावातील एखादा प्रेरित झालेला तरुण पुढे आला तर काय घडू शकते, हे पाहण्यासाठी बारीपाड्यास एकदा भेट देणे गरजेचे आहे.






