पुणे जिल्ह्यात एकूण सात धरणे आणि पाच नद्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी आणि ढगफुटीचे प्रमाण सातत्याने वाढतंय. अतिवृष्टीच्या वेळी पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडलं जातं. जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावामुळे तीव्र पाऊस, ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. नदीपात्रातील वाढती अनधिकृत बांधकामे यामुळे नदीपात्राची रुंदी कमी होतेय. त्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता कमी होत आहे. म्हणूनच शहराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात पुणे महापालिकेने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीच्या 44 केएमसीवरील नदी किनारी सुशोभीकरण प्रकल्पाची आखणी केली आहे. नदीच्या काठावर काँक्रीटच्या भिंती बांधल्याने नदीच्या प्रवाहाचा अडथळा रोखला जाईल. नदीच्या परिसंस्थेवर परिणाम होईल. या पार्श्वभूमीवर नदीसुधार प्रकल्प योग्य की अयोग्य याबद्दलचा हा आढावा…
पुणे शहरात मुळा, मुठा, देवनदी, रामनदी आणि पवना अशा पाच नद्या वाहतात. पाच नद्या वेगवगेळ्या भागांतील नद्यांशी जोडल्या आहेत. पाऊस सुरु झाल्यांनतर चहुबाजूने पाणी नद्यांमध्ये आल्यावर पुण्यात पुरजन्य स्थिती निर्माण होते. त्यात या नद्यांवर खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, मुळशी आणि कासार साई ही धरणे आहेत. सतत पाऊस सुरु झाला की, धरणांमधून एकाचवेळी विसर्ग सुरु होण्याची शक्यता असते. त्याचा शहराला फटका बसण्याची शक्यता आहे. या मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे शहराचा विकास झपाट्याने झाला. परंतु, या परिस्थितीला वारंवार येणाऱ्या पुराची एक गडद बाजू देखील आहे, जी नागरिकांनी अनेकवेळा पाहिली आणि अनुभवली. अलीकडचे उदाहरण म्हणजे 2019 मध्ये आलेला पूर. या पुरामुळे काही तासांत शेकडो घरे वाहून गेली होती.

पुण्यातील नद्यांची स्थिती…
पुण्यात नैसर्गिक संसाधने असूनही गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं. हे नद्यांच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. वाढते प्रदूषण, अपुरी सांडपाणी प्रक्रिया, नदीकाठी मोठ्या प्रमाणात होणार अतिक्रमण त्यामुळे नदीकाठचा नागरी विकास थांबला आहे. मुठा आणि मुळा नद्यांच्या उर्ध्व प्रवाहात धरणे आहेत. त्यामुळे नदीमध्ये येणार्या पाण्याचा विसर्ग कमी होतो. त्यामुळे नद्या कोरड्या पडल्या आहेत. सांडपाणी, मैलापाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जात असल्यामुळे नद्यांना गटारीचं स्वरूप आलं आहे. अशा परिस्थितीमुळे नद्यांमधील जीवसृष्टी नष्ट होत चालली आहे.
पुणे नदीसुधार प्रकल्प…
पुण्यातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पुणे महापालिका नदी सुधार प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाअंतर्गत नद्यांच्या काठी अर्थपूर्ण सार्वजनिक क्षेत्र निर्माण केलं जाईल, असं पुणे पालिकेचं म्हणणं आहे. या प्रकल्पाचं काम अकरा टप्प्यांत होईल. या प्रकल्पासाठी साधारणपणे साडेपाच हजार कोटी इतका खर्च होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत सुधारणा प्रस्तावित…
- पुरापासून संरक्षण करण्यासाठी तटबंदी बांधणे
- नदीच्या पाण्याच्या प्रवाहातील मानवी अडथळ्यांचा प्रभाव कमी करणे
- नदीभोवती सार्वजनिक क्षेत्र तयार करणे
- कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा
- नदीला शहराच्या मुख्य प्रवाहात आणणे
- नदीकाठी सार्वजनिक क्षेत्र तयार करणे
- ड्रेनेज आणि सांडपाणी प्रक्रियांद्वारे होणारे प्रदूषण रोखणे

नदीसुधार प्रकल्पावर कोणते आक्षेप आहेत?
- मुळा-मुठा नदी पुनर्जीवन प्रकल्प आणि त्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकलवर शहरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप नोंदवला आहे.
- या प्रकल्पात नदीपात्र, नदीकाठ, पूर नियंत्रण रेषेत महापालिका बांधकाम करणार असल्यामुळे शहराला पुराचा धोका वाढेल.
- नदीतील जैवविविधता आणि पर्यावरणीय चक्र नष्ट होईल.
- या प्रकल्पात नदीची स्वच्छता, पाण्याचा दर्जा याकडे दुर्लक्ष केलं आहे.
- व्यावसायिक प्रकल्पामुळे नदीपात्राची रुंदी कमी होणार.
- नदीची वहन क्षमता घटेल. परिणामी पुराची भीती वाढेल.
- मोठ्या प्रमाणात नैसर्गिक झाडे तोडली जाणार.
पुण्यात मुबलक पाणीसाठा असताना पुणे महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागतो, अनेक पर्यावरण तज्ञांचा, संघटनांचा आक्षेप असताना मोठ्या बजेटचा नदी सुधार प्रकल्प आणला जातो. या प्रकल्पाशिवाय पुण्यासारख्या शहराला प्रदूषणमुक्त मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी ‘जीवितनदी’ संस्थेने काही गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.
पुणेकर कोणत्या नदीचं पाणी पितात…
पुण्यामध्ये मुळा, मुठा, रामनदी, पवना आणि देवनदी अशा पाच नद्या आहेत. शहरातील लोक मुठा नदीचं पाणी पितात. या नदीवर टेमघर धरण आहे. मुठा नदीला अनेक उपनद्या जोडल्या आहेत. उपनद्यावर असलेल्या धरणातून पाणी खडकवासला धरणात येते. हे पाणी पार्वती जल शुद्धीकरण केंद्रातून शहराला पुरवलं जातं.
पुण्याला होणारा पाणीपुरवठा…
पुणे शहराला दररोज 90 ते 120 कोटी लिटर पाणी पुरवले जाते. जर लोकसंख्या 45 ते 50 लाख मानली तरी 200 ते 240 लिटर प्रति लिटर पाणी प्रति माणसाला मिळणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरण अभ्यासक सांगतात, प्रति माणसाला 200 ते 240 लिटर पाणीपुवठा असावा. पण यातील किती पाणी लोकांपर्यत प्रत्यक्ष पोहोचतं? पुणे महापालिकने 40-50 टक्के पाण्याची गळती होते. हे मान्य केलं आहे. तरीही यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षाच्या जाहीनाम्यामध्ये हा विषय येताना दिसत नाही.

शहरात पाणीगळती…
तीस -चाळीस वर्षांपासून जुन्या लोखंडी पाइपलाइन अजूनही वापरल्या जातात. त्यामुळे या पाइप गंजण्याची शक्यता असते. काही ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या जवळजवळ असतात. या वाहिन्या फुटलेल्या असतात. त्यामुळे सांडपाणी हे पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील गळतीचा लोकांच्या आरोग्यावर ही परिणाम होतो. तसेच पाणीही वाया जाते. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे.
शंभर टक्के धरणे भरूनही एप्रिल-मे कोरडाच…
वेगाने वाढणारी लोकसंख्या, पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती तसेच मोठ्या प्रमाणात जंगले नष्ट होत आहेत. झाडांच्या मुळांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. तेच पाणी झिरपत धरणांमध्ये साठत राहतं. त्यामुळे उन्हाळ्यात ही धरणात पाणी असतं. सध्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड, डोंगर उतार्याला सपाट जागा घेऊन बंगले, फार्महाउस बांधण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्लॉट्स पाडून जमिनी विकल्या जात आहेत. या सर्व गोष्टीमुळे धरणात पाण्याऐवजी गाळाचं प्रमाण वाढलं आहे.






