- निळू दामले
प्रेसिडेंटपदाच्या खुर्चीत बसल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला कार (ईलॉन मस्कची) विकत घेतली. व्हाईट हाऊसच्या कंपाऊंडमधे उभी केली. गाजावाजा करून.आता ती कार ते विकणार आहेत, मस्कशी भांडण झालं म्हणून.
प्रेसिडेंट झाल्यावर चार महिन्यातच ट्रम्प यांनी कतारच्या अमीरकडून एक लक्झरी विमान मिळवलं. ते विमान अजूनही कतारच्या विमानतळावर उभं आहे, अजून अमेरिकेत आलेलं नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रियाधमधे 14 मे रोजी जाहीर केलं, की कतारचे अमीर अल थानी ट्रम्प यांना एक लक्झरी बोईंग विमान भेट देणार आहेत. त्या जातीच्या नॉर्मल बोईंग विमानापेक्षा ते 18 फूट जास्त लांब आहे… आणि तेही फुकट.
ते विमान अजूनही कतारमधेच थांबलेलं आहे. विमान हस्तांतरणाचा दस्त अजून तयार झालेला नाही, अमेरिका आणि कतारमधे त्यावर वाटाघाटी चालू आहेत. विमान कतारनं भेट दिलंय की अमेरिकेनं त्याची मागणी केली होती ते अजून स्पष्ट होत नाहीये. ते ठरल्याशिवाय करार होऊ शकत नाहीये.
ट्रम्प विमान ही एक रंजक कथाच आहे.
2016 साली ट्रम्प पहिल्या खेपेचे अध्यक्ष झाले तेव्हां प्रेसिडेंट वापरतात ती दोन एयरफोर्स वन (एवन) विमानं 30 वर्ष जुनी झाली होती. नव्या विमानांची मागणी हवाई दलानं बोईंग कंपनीकडं नोंदवली. बोईंग कंपनीची स्थिती ठीक नसल्यानं 2026 पर्यंत तरी ती विमान हवाई दलाला मिळणं शक्य नाही.
दुसऱ्या खेपेला प्रेसिडेंट झाल्यानंतर 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प रहातात तिथल्या फ्लोरिडा विमानतळावर विमानांचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरलं होतं. तिथं त्यांना धावपट्टीवर कतारचं एक विमान दिसलं. लांबलचक आणि देखणं. बघताक्षणीच ट्रम्प विमानाच्या प्रेमात पडले. विमानाच्या आतल्या भागात जाऊन पहाणी करून आले. विमान आतून चकाचक होतं.
संबंधित लेख वाचा: 1) ट्रम्प यांच्या मनमानीला चाप बसत असतानाच काही तासांत खेळ बदलला… |
मे महिन्यात ट्रम्प मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर गेले. सौदी,अमिराती आणि कतारशी विविध आर्थिक करार व्हायचे होतेच. त्यातल्या कशाशाही संबंध नसताना ट्रम्प यांनी कतार विमान देणारेय अशी घोषणा केली. कतारचे अमीर अल थानीनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण ट्रम्प म्हणतात तसं काही घडणार आहे याची कल्पना त्यांनाही नव्हती, गप्पागप्पांमधे विषय निघाला असेल येवढंच. परस्परच विमान ढापायचं ट्रम्प यांनी ठरवलं असणार.
विमान ट्रम्प यांच्या डोक्यात असताना समांतर पातळीवर कतारला अमेरिकेकडून 1.5 अब्ज डॉलरची शस्त्रं हवी होती. शस्त्रं विकण्याबाबत अमेरिकन सरकार-संसदेच्या काही अटी असतात. कोणाला द्यायची, कुठली द्यायची, किती द्यायची याच्या कसोट्या संसद ठरवते. शस्त्रविक्री ही गोष्ट सरळसोट होत नसते. अमेरिकन प्रेसिडेंटचा शिक्का बसला नाही तर करार होत नाही.
विमान देऊ केलं की, शस्त्र खरेदी होईल असं काही तरी कतारच्या डोक्यात असणार. बहुदा विमान अमेरिकन सरकारला द्यायचं असंही कतारचे अमीर अल थानी यांच्या डोक्यात असणार.पण ट्रम्प यां वाटलं की ते त्यांना ढापता येईल.
अमेरिकन सरकार आणि कतार यांच्यात विमानाबाबत चर्चा चालू होती. अमेरिकन नोकरशाहीच्या मते ते विमान अमेरिकन हवाई दलाला भेट म्हणून मिळणार होतं, त्यात आवश्यक बदल करून ते एवन म्हणून भविष्यातले प्रेसिडेंट वापरणार होते. हवाई दलाने त्यांच्या एका कंत्राटदाराला विमानाची तपासणी करायला सांगितली. कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार विमानाची स्थिती चांगली नव्हती.
त्यात खूप दुरुस्त्या कराव्या लागणार होत्या. प्रेसिडेंटच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही अनेक बदल करावे लागणार होते. हा सर्व खर्च 1.5 अब्ज डॉलरच्या घरात जाणार होता. 50 कोटीचं विमान आणि त्यावर 1.5 अब्ज खर्च हे गणित कसं बसवायचं ते हवाई दलाला कळत नव्हतं. घोड्याची नाल कतार देणार होता, घोडा आणायची जबाबदारी अमेरिकेची होती.
अमेरिकन सरकारचा निर्णय होत नव्हता.
दुसरी भानगड अशी की शस्त्रखरेदीचा करार करण्याच्या आधी कतारनं एक विमान भेट देणं ही लाच होती असं कायदेतज्ज्ञांचं मत होतं. किमान दोन खासदारांनी संसदेला ही लाचबाजी स्वीकारणं कायद्यात बसत नाही असं कळवलं होतं. उद्या संसदेत ही भानगड निघाली तर त्याला तोंड देता नाकी नऊ येतील असं कतारला वाटत होतं. त्यामुळं कतारही निर्णय घ्यायला तयार नव्हतं.
तिसरी भानगड अशी की हे विमान हवाई दलाकडं न जाता आपल्या गोठ्यात बांधायचं असं ट्रम्प यांचं गणित होतं. पण अमेरिकन आणि कतारचे अधिकारी म्हणाले की विमान ट्रम्प या व्यक्तीकडं जाणं अमेरिकन कायद्याला धरून नाही.
अमेरिकन कायद्यानुसार खाजगीरीत्या प्रेसिडेंटला महाग भेटवस्तू घेता येत नाहीत. पेन, टोपी, चपला असल्या गोष्टी चालतात. महागडी हिऱ्याची अंगठी, मोठ्ठी कार इत्यादी घेता येत नाही. विमानाचा तर प्रश्नच नाही. कोणी खूप कीमती वस्तू दिली तर ती सरकारजमा करावी लागते, ती प्रेसिडेंटच्या खिशात जात नाही. बोईंग ट्रम्प यांच्या गोठ्यात जाणं कठीण होतं. 
ट्रम्प आपल्याच नादात होते. कतारनं उदारपणे येवढी उत्तम भेट दिली असताना ती नाकारण्याचा करंटेपणा मी करणार नाही असं ते प्रथम म्हणाले. कायद्यातल्या अडचणी लक्षात आल्यावर ते म्हणाले की कतारचं विमान प्रथम प्रेसिडेंटचं एवन होईल आणि ट्रम्प यांची कारकीर्द संपली की ते ट्रम्प यांच्या लायब्ररीत ट्रम्प यांच्या व्यक्तिगत उपयोगासाठी रवाना होईल. ट्रम्प तसं बोलूनही दिले. तसं गपचूप केलं असतं तर वेगळं, असं जाहीरपणे विमान ढापणं बेकायदेशीर होतं.
विमान गाळात रुतत गेलं. शेवटी 20 मे रोजी कतारच्या अमीरानं जाहीर केलं की विमान प्रेसिडेंशियल एयर फोर्स वन होईल. हा व्यवहार कायद्यात कसा बसवायच्या या खटाटोपात सध्या अमेरिका आणि कतार सरकारं गुंतलेली आहेत.
थोडक्यात असं की हे विमान आता ट्रम्प यांच्या गोठ्यात जाण्याची शक्यता कमी आहे, फार तर ते अमेरिकन हवाई दलाच्या ताब्यात जाईल. हे लक्षात आल्यावर ट्रम्प यांनाही या व्यवहारात रस उरलेला नाही. परिणामी बोईंग विमान कतारच्या धावपट्टीवर आराम करतंय.
(सौजन्य - www.niludamle.com)






