रितेश शिसोदे
- समुद्रसपाटीपासून २६,२४७ फूट उंचीवर, माउंट एव्हरेस्टच्या 'डेथ झोन'मध्ये गेली तीन दशके एक मृतदेह पडून होता. हजारो गिर्यारोहकांनी त्याच्याजवळून शिखर गाठलं, अनेकांनी त्याचे फोटो काढले, तर जगाने त्याला त्याच्या पायातील हिरव्या बुटांमुळे 'ग्रीन बूट्स' हे नाव दिलं.
- मात्र त्या हिरव्या बुटांमागे एक नाव, एक कुटुंब आणि एक अपूर्ण प्रवास दडला होता. तो होता भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान दोरजे मोरुप.
- १९९६ च्या एव्हरेस्ट दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर तब्बल तीस वर्षांनी त्यांचे पार्थिव कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- एव्हरेस्टवरील सर्वाधिक चर्चिलेल्या मृतदेहामागच्या माणसाची, त्याच्या स्वप्नाची, मृत्यूची आणि अखेर घरी परतण्याच्या प्रतीक्षेची ही अस्वस्थ करणारी कहाणी.
हिमालयाच्या कुशीत उभं असलेलं माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर… समुद्रसपाटीपासून २९,०३१ फूट उंच असलेल्या या शिखरावर पोहोचणं हे हजारो गिर्यारोहकांचं स्वप्न असतं. परंतू तिथे शरीर जिवंत असलं तरी प्रत्येक श्वास हा मृत्यूकडून उसनं घेतल्यासारखा असतो. फुफ्फुसात भरायला हवा असते, पण ती पुरेशी नसते. पाय पुढे टाकायचा असतो, पण शरीर त्याला साथ देत नाही. मेंदू विचार करतो, पण त्याची गती मंदावलेली असते. थंडी एवढी निर्दयी असते की ती त्वचा, स्नायू आणि हाडे यांच्यामधील प्रत्येक संवेदना गोठवून टाकते. गिर्यारोहक या पट्ट्याला एक नाव देतात, 'डेथ झोन'.
परंतू तरीही एकच जिद्द असते, एकच स्वप्न असतं शिखर सर करण्याची. पण त्या स्वप्नाची किंमत अनेकदा जीव देऊन चुकवावी लागते. एव्हरेस्टने आजवर शेकडो गिर्यारोहकांना आपल्या कुशीत कायमचं सामावून घेतलं आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांची नावं काळाच्या ओघात विस्मरणात गेली. मात्र एका मृतदेहाला जग कधी विसरलं नाही.
याच डेथ झोनमध्ये, माउंट एव्हरेस्टच्या ईशान्येकडील मार्गावर, एका चुनखडीच्या खडकाच्या आडोशाला गेले जवळपास तीस वर्षे एक मृतदेह पडून आहे. बर्फाने त्याच्यावर हळूहळू आपली चादर पसरली होती. बोचऱ्या वाऱ्यांनी त्याच्या शरीरावरील प्रत्येक खूण झिजवत नेली होती. काळ पुढे सरकत होता, पिढ्या बदलत होत्या, एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या वाढत होती; पण त्या मृतदेहाची जागा आजही बदललेली नाही. हजारो गिर्यारोहक त्याच्या अगदी जवळून जातात, काही त्याचे फोटो घेतात, तर काही त्याला निःशब्द आदरांजली वाहतात.

एव्हरेस्ट चढणाऱ्यांसाठी ‘ग्रीन बूट्स’ बनले लँडमार्क
तो कोण आहे, हे सुरुवातीला कुणालाच ठाऊक नव्हतं. फक्त त्याच्या पायात चमकदार हिरव्या रंगाचे उंच बूट होते, आणि म्हणूनच संपूर्ण गिर्यारोहण विश्वाने त्याला एक नाव दिलं…'ग्रीन बूट्स'. हळूहळू हा मृतदेह एव्हरेस्टवरील सर्वात प्रसिद्ध 'लँडमार्क' बनला. गिर्यारोहक आपल्या मोहिमेची जागा सांगताना म्हणत, "ग्रीन बूट्सच्या पुढे पोहोचलो", "ग्रीन बूट्स ओलांडले की शिखर फार दूर नाही."
तीस वर्षांपासून जगाला हे नाव माहिती आहे, पण त्या नावामागचा माणूस कोण होता, त्याच्या घरी कोण कोण वाट पाहत होतं, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचं गाव हे फार थोड्यांना माहीत होतं. कारण 'ग्रीन बूट्स' हा एखादा आख्यायिकेतील पात्र नव्हता. तो लडाखमधील एका साध्या कुटुंबात जन्मलेला, हिमालयाच्या कुशीत वाढलेला, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचा एक जवान होता. त्याचं नाव होतं दोरजे मोरुप…
आता, जवळपास तीस वर्षांनंतर, ऑक्टोबर २०२६ मध्ये त्याचा गोठलेला देह अखेर लडाखमधील त्याच्या कुटुंबाकडे परतण्याच्या मार्गावर आहे.
दोरजे मोरुप कोण होते?
दोरजे मोरुप यांचा जन्म लडाखच्या थंड, कठोर पण निसर्गरम्य प्रदेशात झाला. हिमालय त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. बालपणापासूनच त्यांनी बर्फाच्छादित डोंगर, विरळ हवा आणि खडतर भूप्रदेश अनुभवला होता. ज्या वातावरणात सामान्य माणूस काही दिवसांत थकून जाईल, त्या वातावरणात जगणं ही त्यांच्यासाठी रोजची बाब होती. म्हणूनच भारत-तिबेट सीमा पोलीस दलात त्यांची निवड होणं ही योगायोगाची गोष्ट नव्हती.
ITBP ही केवळ सीमा सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा नाही, हिमालयातील अत्यंत कठीण परिस्थितीत काम करणारे, पर्वतारोहणात प्राविण्य मिळवलेले जवान हे तिचं मोठं वैशिष्ट्य आहे. या दलातील अनेक जवानांना गिर्यारोहणाचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं आणि देशाच्या पर्वतारोहण मोहिमांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. दोरजे मोरुप हे त्यांच्यापैकीच एक.
त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणींमध्ये दोरजे यांचं वर्णन अत्यंत शांत, मितभाषी आणि जबाबदार जवान म्हणून येतं. प्रसिद्धीची हौस नव्हती, विक्रम करण्याची गर्जना नव्हती. त्यांच्यासाठी पर्वतारोहण म्हणजे निसर्गाशी संघर्ष नव्हता, तो निसर्गाशी संवाद होता. हिमालय त्यांच्या दृष्टीने जिंकण्याची वस्तू नव्हती, तर आदराने पार करायची जागा होती.
१९९६ मध्ये जेव्हा एव्हरेस्ट मोहिमेसाठी त्यांची निवड झाली, तेव्हा त्यांच्या कुटुंबासाठी तो अभिमानाचा क्षण होता. एव्हरेस्ट सर करणं म्हणजे केवळ वैयक्तिक यश नव्हे, तर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी होती. पण नियतीने त्या प्रवासासाठी वेगळंच शिखर निवडलं होतं. १९९६ हे वर्ष एव्हरेस्टच्या इतिहासात आजही काळ्या अक्षरांनी लिहिलं जातं. त्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेने आधुनिक पर्वतारोहणाच्या संकल्पनाच बदलून टाकल्या. व्यावसायिक एव्हरेस्ट मोहिमा वेगाने वाढत होत्या. जगभरातून शेकडो गिर्यारोहक सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी नेपाळ आणि तिबेटमार्गे एव्हरेस्टवर दाखल झाले होते. हवामानाचा अंदाज अनुकूल होता. अनुभवी मार्गदर्शक, अत्याधुनिक उपकरणं आणि ऑक्सिजन सिलिंडर यांच्या आधारावर अनेकांना वाटत होतं की एव्हरेस्ट आता पूर्वीइतका कठीण राहिलेला नाही. मात्र हिमालय माणसाचा आत्मविश्वास किती सहजपणे मोडू शकतो, याची जाणीव त्याच वर्षी संपूर्ण जगाला झाली…
वादळ, ऑक्सिजनची कमतरता आणि दोरजे यांचा अखेरचा प्रवास
१० मे १९९६ च्या सकाळी अनेक गिर्यारोहकांनी शिखराकडे अंतिम चढाई सुरू केली. काहींनी यशस्वीपणे शिखर गाठलेही. पण दुपार सरू लागली तसा हवामानाचा स्वभाव बदलू लागला. ढग दाटू लागले, वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि काही तासांतच एव्हरेस्टवर प्रचंड हिमवादळ कोसळले. तापमान उणे अनेक अंशांवर गेले. दृश्यमानता जवळपास शून्यावर आली. शिखर गाठण्याचा आनंद क्षणात जीव वाचवण्याच्या संघर्षात बदलला.

या दुर्घटनेने संपूर्ण जग हादरले. प्रसिद्ध गिर्यारोहक आणि मोहिमा प्रमुख रॉब हॉल, स्कॉट फिशर यांच्यासह अनेक जण त्या वादळात कायमचे हरवले. पुढे पत्रकार आणि गिर्यारोहक जॉन क्राकॉवर यांनी लिहिलेल्या Into Thin Air या पुस्तकामुळे ही दुर्घटना जगभर चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर Everest या चित्रपटानेही त्या काळ्या दिवसाचे चित्रण केले. पण या चर्चांमध्ये काही नावे प्रसिद्ध झाली, तर काही जण इतिहासाच्या पानांवर जवळजवळ हरवून गेले. त्यापैकीच एक नाव होते, दोरजे मोरुप…
दोरजे ज्या पथकासोबत होते, त्या मोहिमेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिखर गाठण्याचा प्रयत्न केला. परतीच्या प्रवासात ऑक्सिजनची कमतरता, वाढता थकवा आणि बर्फाळ वादळ यांनी परिस्थिती अधिकच बिकट केली. ८,००० मीटरच्या वर असलेल्या त्या भागात शरीराची प्रत्येक हालचाल ही प्रचंड ऊर्जा खर्च करणारी असते. चालण्याचा वेग इतका मंदावतो की काहीशे मीटरचे अंतर पार करायलाही तास लागतात. याच संघर्षात दोरजे आपल्या सहकाऱ्यांपासून मागे पडले.
नंतर जे दिसले, त्यावरून असा अंदाज व्यक्त करण्यात आला की त्यांनी एका खडकाच्या आडोशाला बसून विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला असावा. पण डेथ झोनमध्ये विश्रांती म्हणजे अनेकदा कायमची झोप ठरते. शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते, मेंदूवर ऑक्सिजनच्या कमतरतेचा परिणाम होतो आणि झोप येऊ लागते. त्या झोपेतून पुन्हा जाग येत नाही. दोरजे यांच्याबाबतही नेमके हेच घडले असावे, असे गिर्यारोहण तज्ज्ञांचे मत आहे.
तीस वर्षांनंतर ओळख परत मिळालेला दोरजे
दोरजे यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे त्यांच्या मृतदेहाची ओळख स्पष्ट नव्हती. चेहरा बर्फाने आणि काळाने बदलून गेला होता. शरीरावरील कपड्यांवरून ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र त्यांच्या पायात असलेले हिरव्या रंगाचे 'कोफ्लाख' (Koflach) पर्वतारोहण बूट दूरूनही सहज लक्ष वेधून घेत होते. 1996 मध्ये ब्रिटिश गिर्यारोहक आणि चित्रपट निर्माता मॅट डिकिन्सन यांनी पहिल्यांदा बर्फात अडकलेल्या दोरजे मोरुप यांच्या मृतदेहाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. नंतर हे फुटेज 'समिट फीवर' माहितीपटातही दाखवण्यात आले. पायात घातलेल्या हिरव्या रंगाच्या बुटांमुळे या मृतदेहाला 'ग्रीन बूट्स' असे नाव देण्यात आले. हा मृतदेह एव्हरेस्टच्या उत्तर मार्गावरील एका लहान गुहेत पडलेला होता, जो 'ग्रीन बूट्स गुहा' या नावाने प्रसिद्ध झाला. शिखरावर जाणारे जवळजवळ सर्व गिर्यारोहक याच मार्गावरून जात असत. त्यांच्यासाठी हा मार्गाची ओळख (लँडमार्क) बनला होता.
30 वर्षांपासून मृतदेह का काढता आला नाही?
दोरजे यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आहे, तो 8 हजार मीटर (सुमारे 26,247 फूट) पेक्षा जास्त उंचीवरील 'डेथ झोन' आहे. येथे समुद्राच्या पातळीच्या तुलनेत फक्त सुमारे 33% ऑक्सिजन असतो. इतक्या उंचीवर शरीर लवकर प्रतिसाद देणे थांबवते. पेशी मरू लागतात. येथे हेलिकॉप्टर देखील पोहोचू शकत नाहीत. ८,००० मीटरच्या वर हेलिकॉप्टर उड्डाण करणे अत्यंत मर्यादित आणि धोकादायक असते. विरळ हवेमुळे हेलिकॉप्टरच्या रोटरला आवश्यक तेवढी उचल (lift) मिळत नाही. हवामान काही मिनिटांत बदलू शकते. त्यामुळे जिथे दोरजे यांचा मृतदेह होता, तिथे हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रश्नच नव्हता.
दुसरा पर्याय म्हणजे गिर्यारोहकांच्या मदतीने मृतदेह खाली आणणे. पण ते ऐकायला जितकं सोपं वाटतं, प्रत्यक्षात ते जवळजवळ अशक्य असतं. जाड बर्फात गोठलेला मृतदेह हलवण्यासाठी अनेक अनुभवी गिर्यारोहक लागतात. प्रत्येकाला अतिरिक्त ऑक्सिजन वाहून न्यावा लागतो. एका मृतदेहाचे वजन कपड्यांसह आणि बर्फामुळे अधिक वाढतं. तीव्र उतारावर तो खाली आणताना जिवंत गिर्यारोहकांच्याच जीवाला धोका निर्माण होतो. अनेकदा अशा मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनाही प्राण गमवावे लागल्याची उदाहरणे आहेत.

एव्हरेस्टला म्हणूनच काही गिर्यारोहक "जगातील सर्वात उंच स्मशानभूमी" असेही म्हणतात. याच कारणामुळे एव्हरेस्टवर मरण पावलेल्या 340 हून अधिक गिर्यारोहकांचे मृतदेह आजही तिथेच पडून आहेत, असा अंदाज आहे.
त्यामुळे येथून मृतदेह परत आणणे हे जगातील सर्वात कठीण मोहिमांपैकी एक मानले जाते. दोरजे यांचाही मृतदेह या वास्तवाचा एक भाग बनून राहिला.
‘ग्रीन बूट्स' नेमके कोण आहेत, याबाबत अनेक वर्षे गिर्यारोहण विश्वात मतभेद होते. काहींनी त्यांची ओळख भारतीय गिर्यारोहक त्सेवांग पल्जोर अशी सांगितली, तर काही अहवालांमध्ये वेगवेगळ्या नावांचा उल्लेख झाला. अनेक दशकांपर्यंत या प्रश्नाचे ठोस उत्तर उपलब्ध नव्हते. मात्र अलीकडील काळात उपलब्ध नोंदी, मोहिमेतील कागदपत्रे आणि अधिकृत पडताळणीच्या आधारे ITBP आणि संबंधित यंत्रणांनी त्या मृतदेहाची ओळख दोरजे मोरुप अशी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांचे पार्थिव खाली आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि ते कुटुंबाच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू झाली.
30 वर्षांनी घरी परतणार जवानाचा मृतदेह
लडाखमध्ये दोरजे यांचे घर मात्र काळाच्या वेगळ्याच गणितात अडकून राहिले. पर्वतारोहकांच्या मृत्यूची बातमी आली की अनेकदा कुटुंबाला मृतदेहही मिळत नाही, हे त्या भागातील लोकांना माहीत असतं. तरीही माणसाची आशा सहज संपत नाही. कधी एखादा चमत्कार घडेल, कधी पार्थिव खाली आणता येईल, कधी शेवटचा निरोप देता येईल, या अपेक्षा वर्षानुवर्षे मनात राहतात. मृत्यू स्वीकारण्यापेक्षा निरोप न मिळणं अनेकदा अधिक वेदनादायी असतं.
दोरजे यांच्या पत्नी कोनचोक यांगस्किट यांच्यासाठी ही प्रतीक्षा केवळ एका पतीची नव्हती तर ती अपूर्ण राहिलेल्या एका प्रवासाची होती. अलीकडे भारतीय अधिकाऱ्यांनी 'ग्रीन बूट्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृतदेहाची ओळख दोरजे मोरुप अशी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे पार्थिव परत आणण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिल्यानंतर, त्यांच्या कुटुंबानेही हा क्षण आयुष्यभर वाट पाहिलेला असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट ऑक्टोबरपर्यंत पार्थिव कुटुंबाकडे सुपूर्द करण्याचे आहे, मात्र त्यासाठी चीनची परवानगी, हवामान आणि उच्च उंचीवरील मोहिमेचे यश या अनेक गोष्टींवर अवलंबून राहावे लागणार आहे.
75 वर्षीय पत्नी म्हणाली, ‘’त्यांना पाहूनच शेवटचा श्वास घेईन’’
दोरजे यांच्या 75 वर्षीय पत्नी कोनचोक आता ऐकू शकत नाहीत. त्या पतीच्या पेन्शनवर गुजराण करतात. मुलगा फुंतसोग दोरजेने वडिलांचा मृतदेह आणण्याच्या मोहिमेची माहिती दिल्यापासून त्या रडत आहेत. त्यांनी मुलाला कागदावर लिहून दिले आहे की, त्यांची शेवटची इच्छा एकदा पतीला पाहण्याची आहे. त्यांनी लिहिले, “त्यांना पाहूनच शेवटचा श्वास घेईन.” दोरजे यांचा मुलगा फुंतसोग भारतीय सैन्यात आहे. त्यांनी सांगितले की, आयटीबीपीकडून त्यांना अद्याप मोहिमेची पूर्ण माहिती मिळालेली नाही. आईने वडिलांच्या प्रतीक्षेत संपूर्ण आयुष्य रडून काढले. आता त्यांच्या डोळ्यात आशा दिसत आहे.





